12:12 PM (0 minutes ago)
| ||||
माडीवर सारंगीचे सूर जुळत, तबलजी तबल्यावर हात साफ करायच्या प्रयत्नात आहे, खोलीतील दिवे हळूहळू मंद होत आहेत, आलेले रसिक मनगटावरील गजऱ्याचा सुगंध घेत आणि तोंडातील तांबुल सेवनाचा आनंद घेत आहेत. बाजूलाच पडलेला हुक्का आपल्याजवळ ओढून, एखादा रसिक, त्यातील सुगंधी तंबाकूचा स्वाद घेण्यात मश्गुल झाला आहे. तसे बघितले तर संध्याकाळ कधीचीच उलटलेली आहे परंतु नेहमीच्या मैफिलीतील मानिंद अजून आले नसल्याने, इतर रसिकांत किंचित चुळबुळ सुरु झाली आहे. खोलीत पसरलेल्या अलिशान लालजर्द गालिच्यावर, एका बाजूला अत्तरदाणी, दुसऱ्या बाजूला पिंकदाणी आणि तिसऱ्या टोकाला लवंगी,वेलची सहीत मांडलेला त्रिगुणी विड्याचा सरंजाम जारी होता. आजची शनिवार रात्र म्हणजे कधीही न संपणारी किंवा कधीतरी उत्तर रात्रीच्या पलीकडे संपणारी मैफिल!! काहीवेळाने प्रमुख गायिका मुख्य दिवाणखान्यात प्रवेश करते आणि तो दिवाणखाना अचानक "जिवंत" होतो.
कवी मर्ढेकरांच्या भाषेत मांडायचे झाल्यास,
"लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबाचा
सांग धरावा कैसा पारा!!
आजच्या आपल्या गाण्याबाबत ही पार्श्वभूमी नेमकी आणि अचूक आहे. मराठी ललित संगीतात "बैठकीची लावणी" येते, बोर्डावरची लावणी तर नको तितकी आली आहे परंतु "लखनवी मिजाज" असलेल्या रचना अभावानेच आढळतात. आता लखनवी मिजाज म्हटल्यावर ठुमरी आणि गझलची आठवण येणे क्रमप्राप्तच आहे. "मल्मली तारुण्य माझे" ही शब्दरचना नीटसपणे वाचली तर "गझल" वृत्त समजून घेता येते परंतु गझलेची सगळी वैशिष्ट्ये आली आहेत,असे म्हणवत नाही. कवी सुरेश भटांनी मराठी कवितेत "गझल" खऱ्याअर्थाने रुजवली, असे म्हणता येईल. खरंतर चित्रपटासारख्या प्रसंगोत्पात आविष्कारात "संपूर्ण" गझल वृत्त राबवणे, फार कठीण असते. असे असून देखील अतिशय चांगल्या अर्थाने, प्रस्तुत कविता ही अप्रतिम "भोगवादी" कविता आहे, असे नक्कीच म्हणता येईल. "माझ्यात तू अन मी तुझ्यामाजी भिनावे" किंवा "मी तुला जागे करावे! तू मला बिलगून जावे" या ओळी माझ्या वरील विधानाला पूरक ठराव्यात. वास्तविक मराठी संस्कृतीत अशी रचना विरळाच आढळते आणि त्यात सुरेश भटांचा फार मोठा सहभाग आहे. इथे मला पु.शि.रेग्यांच्या कवितांची बरीच आठवण आली.
ज्या ढंगाने काव्य लिहिले गेले आहे, त्याच अंगाने संगीतकार सी.रामचंद्र यांनी चाल बांधली आहे. कवितेतील "नखरा" तंतोतंतपणे सुरांतून व्यक्त केला आहे आणि गाण्याची खुमारी वाढवली आहे. विशेषतः "मल्मली" मधील मादक हळुवारपणा ज्याप्रकारे व्यक्त झाला आहे, त्याचे श्रेय संगीतकार म्हणून सी.रामचंद्र आणि गायिका म्हणून आशाबाई भोसल्यांना द्यावे लागेल. या शब्दोच्चारातच पुढील रचनेची रंगत दडलेली आहे. पहिल्या अंतऱ्यातील "लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की" या ओळीतील "गुलाबी शिरशिरी" ऐकणे हा अनिर्वचनीय अनुभव आहे. कुठेही भावनाविवश न होता, आशयाची वृद्धी कशी करावी, याचा सुरेख मानदंड आहे. संगीतकार सी. रामचंद्र यांनी मराठीत, हिंदी चित्रपटाच्या मानाने फारच कमी संगीत रचना केल्या अर्थात हा रसिकांचा तोटा झाला. परंतु जे काही चित्रपट केले त्यातील गाणी निश्चितच संस्मरणीय अशीच आहेत.
गाण्याची लय द्रुत आहे, उडती "छक्कड" आहे. रूपक ताल अतिशय सुरेख वापरला आहे. मुखडा संपताना तसेच अंतरा संपताना लय अति द्रुत होते पण तरीही गाण्याची स्वररचनाच अशी केली आहे की रसिकांचे लक्ष केवळ तालाच्या मात्रांवर न राहता,गाण्याच्या चालीवर राहील. संगीतकाराचे मूल्यमापन करायचे झाल्यास रागाधारित गाणे तयार करताना,रागावर प्रक्रिया करून, त्याचा पुनर्रचित अवतार घडविणे, त्यांना अधिक मानवणारे होते. आता या गाण्यापुरते बोलायचे झाल्यास, स्वररचना "रागेश्री " रागाशी जुळणारी आहे पण रागाची ठेवण सरळ आपल्या समोर येत नाही. गीत ऐकता ऐकता ज्यांचे सहज आकलन होऊ शकेल अशाच लयबंधांवर त्यांचा अधिक भर होता. इथे तर कोठीवरील गाणे असल्याने, गायकी ढंग येणे क्रमप्राप्तच ठरते. सुरवातीलाच स्वरमंडळाच्या सुरांनी सुरवात होते आणि लगेच एका दीर्घ आलापाने गीताला आरंभ होतो. पुढे जलतरंग, सतार इत्यादी वाद्यांनी पार्श्वसंगीत सजवले आहे. वेगवेगळे अंतरे बांधणे ही या संगीतकाराची खासियत म्हणावी लागेल. त्यांच्यावर पाश्चात्य संगीताच्या उचलेगिरीचा वापर केला असा आक्षेप घेतला जातो परंतु अशा रचनांमधून भारतीय परंपरेचे यथायोग्य दर्शन घडवण्यात हा संगीतकार यशस्वी झाला, असे म्हणता येईल.
आशा भोसल्यांच्या गळ्याच्या ताकदीची ओळख दर्शवणारे हे गीत. मुखड्याच्या आधीच पहिलाच दीर्घ आलाप आणि पुढे खास केलेले शब्दोच्चार मुद्दामून अभ्यासावेत असे आहेत. चाल अति द्रुत लयीत जाते परंतु क्षणात पुन्हा मूळ चालीशी येऊन मिळते, गायन कसे करावे,याचा सुंदर नमुना आहे. कवितेतील शृंगार आणि आवाहनात्मक भाव मांडायचा पण कुठेही लालस वृत्ती येऊ द्यायची नाही. त्यामुळे गाणे फार वेगळ्याच प्रतीचे होऊन बसते.
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसांत माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की
राजसा, माझ्यात तू अन मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे! तुला बाहुत माझ्या रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे! तू मला बिलगून जावे
No comments:
Post a Comment