Monday, 1 July 2019
मोगरा फुलला
आपल्याकडील संत साहित्य सामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यात ललित संगीताचा मोठा हातभार लागला आहे आणि या विधानावर फारसे आक्षेप घेतले जाऊ नयेत. सामान्य रसिक हा नेहमीच सुरांकडे आकृष्ट होतो, ललित संगीतातील "शब्द" घटकांबद्दल वाजवी जाणीव फार थोडे रसिक घेत असतात परंतु सर्वसाधारणपणे सामान्य रसिक हे सुरांच्या माध्यमातूनच शब्दांकडे वळतात. हे जर मान्य केले तर ललित संगीताच्या फलश्रुतीची व्याप्ती अधिक विस्तारलेली दिसून येईल. अर्थात यामागे संगीतकारांची विचक्षण दृष्टी, व्यासंग हे ध्यानात येते. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे यांच्यासारखे प्रतिभावंत आणि त्यांनी घेतलेले परिश्रम, यामुळे संत साहित्य लोकप्रिय झाले. "मोगरा फुलला" ही संत ज्ञानेश्वरांची रचना, काव्य म्हणून किती जणांनी वाचले असते? हा जर प्रश्न विचारला तर नकारार्थी उत्तरे बव्हंशी येण्याची शक्यता अधिक. इथेच संगीतकार मदतीला येतात. आजची आपली रचना, काव्य म्हणून बघायला गेल्यास, सहजपणे आकळण्यासारखी नाही.
ज्ञानेश्वरांबाबतच नव्हे तर एकूणच सगळ्याच संतकवींकडे आपला बघण्याची नजर काहीशी भावविवश आहे.
मुळात हे सगळे संत, कवी आहेत पण हीच बाब ध्यानात न ठेवता, त्यांच्याभोवती गूढतेचे वातावरण तयार केले, काही चमत्कार चिकटवले गेले आणि नको त्या बाबतीत अति उदो उदो केला जातो. या सगळ्या "कौतुक" सोहळ्यात, त्यांची मूळ ओळख बाजूला राहाते किंवा विसरली जाते. आता या काव्यात ज्ञानेश्वरांनी "मोगरा" आणि "त्याची वेल" या प्रतीकांतून "प्रतिभा" आणि तिचा प्रवास रेखाटला आहे. मुळात मोगरा हे फूल म्हणून अतिशय देखणे, सुवासिक आहे आणि अशा फुलाचे प्रतिभा दर्शविण्यासाठी केलेले उपयोजन, हाच महत्वाचा भाग आहे. "मनाचिये गुंती गुंफियेला शेला" ही प्रतिमाच किती सुरेख आहे. मन आणि मनोव्यापार हे कधीही न सुटणारे कोडे आहे म्हणूनच "गुंती" हा शब्द आपल्याला गुंगवून टाकतो आणि या गुंतवळ्यातून तयार झालेला "शेला" हा अखेर विठ्ठलाकडेच जाणार. किंबहुना काव्याच्या सुरवातीच्या ओळीच अप्रतिम आहेत. अंगणात मोगरा फुललेला आहे पण त्याचे आपल्याला झालेले दर्शन हे पहाटे फुले वेचताना "अचानक" झाले. कळीतून फुल निर्माण होणे, हा निसर्गक्रम आहे पण तो ज्याप्रकारे काव्यात्मक नजरेतून मांडला, हे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांनी कवितेची जातकुळी ओळखूनच "गोरख कल्याण" सारख्या मनोरम आणि काहीशा अनवट रागाची निवड केली. आणखी वैशिष्ट्य म्हणजे गाण्याच्या वाद्यमेळातील पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची वाजलेली बासरी. "सा", "रे" आणि "म" हे स्वर घेताना हलकाच "कोमल निषाद" (अवरोही सप्तकात) स्वर घेण्याची पद्धत निव्वळ अवर्णनीय अशीच म्हणायला लागेल. रचनेत स्वरवाद्य म्हणून केवळ बासरीचा वापर तर तालवाद्य म्हणून तबला साथीला आहे. अर्थात यामुळेच गाणे ऐकताना कवितेचा स्वतःचा आनंद घेता येतो. हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार म्हणून बरेचवेळा चालीसाठी शास्त्रोक्त चीजेचा यथायोग्य वापर करतात आणि इथेही हाच प्रकार घडलेला आहे. अर्थात इथे एक मुद्दा उपस्थित होऊ शकतो. शास्त्रीय चीजेचा आहे तसाच वापर करणे, यात सर्जनशीलता कुठे येते? अर्थात याचे उत्तर तसे सोपे नाही कारण इतरत्र देखील असाच वापर केलेला आढळतो आणि या निमित्ताने रागदारी संगीत सामान्य जनांच्या ओळखीचे होऊ शकते. या संगीतकारावर एक आक्षेप नेहमी घेतला जातो आणि या गाण्याच्या संदर्भात देखील तो आक्षेप तितकाच लागू होतो. गाण्याच्या चाली फार अवघड असतात. "इवलेसे रोप लावियले द्वारी" ही ओळ सुरवातीला सरळ जाते पण "द्वारी" शब्द घेताना जी हलकी अशी हरकत आहे, ती फार अवघड आहे. किंवा "मोगरा फुलला" गाताना "फुलला" शब्दातील "ला" या अक्षरावरील अशीच कठीण हरकत आहे.
आता अशा "गायकी" अंगाची चाल गायला मिळाल्यावर अर्थातच लताबाईंची "गायकी" तितकीच खुलते. कवितेतील सात्विक भाव आणि ऋजुता तसेच स्वररचनेतून मांडलेला एक ठाम विचार, लताबाईंनी तितक्याच आर्ततेने आपल्या गळ्यातून व्यक्त केला आहे. कवितेतील आशय तितक्याच भावार्थाने व्यक्त करणे, हे ललित संगीताचे महत्वाचे वैशिष्ट्य. मुळात लताबाईंचा निर्मळ, टोकदार आवाज ओवी, भजन इत्यादी काव्य गायनात अधिक खुलतो आणि इथे तर साथीला वाद्यमेळ असा फारसा नाही त्यामुळे "गायन" या घटकाला अपरिमित महत्व मिळाले आहे. बासरीच्या सुरांतून सुरु झालेली रचना, त्याच मंद स्वरांतून "मोगरा फुलला" हा अनिर्वचनीय अनुभव आहे. खरतर ही स्वररचना तशी हृदयनाथ मंगेशकरांच्या पठडीतील वाटत नाही म्हणजे गाण्यात फार चढं/उतार नाहीत आणि ज्या हरकती आहेत, त्या फार छोट्या आहेत, जेणेकरून काव्यातील आशय वृद्धिंन्गत व्हावा. अर्थात अशा छोट्या हरकती घेणे, हे देखील फार अवघड असते.
अर्थात याच सगळ्या वैशिष्टयांमुळे गाणे आजही रसिकांच्या मनात ठाण मांडून बसले आहे.
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरू कळियांसी आला
इवलेंसे रोप लावियलें द्वारी
त्याचा वेलू गेला गगनावरी
मनाचिये गुंती गुंफियेला शेला
बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिल
https://www.youtube.com/watch?v=4thXvviBQnkा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment