मराठी भावगीत क्षेत्रात काही वर्षांपूर्वी थोडी मरगळ आली होती. स्वररचनांचे काहीसे एकसाची बंध होत होते तसेच वाद्यमेळ आणि एकूणच "ठेवण" यात काहीशी शिथिलता आली होती. अशाच वेळी संगीतकार अशोक पत्की यांनी "केतकीच्या बनी तिथे" ही रचना सादर केली आणि भावगीतांच्या मर्यादित विश्वात थोडे कुतूहल जागे झाले. "एकदाच यावे सखया" ही रेकॉर्ड प्रसिद्धीस आली आणि या संगीतकाराचे नाव प्रसिद्ध झाले. पारंपरिक वाद्यमेळाला छेद देत त्यांनी भावगीत संगीताच्या मर्यादित क्षेत्रात आपली बैठक मांडली. तसे थोडे तांत्रिक दृष्टीने बघायला गेल्यास, या गाण्याची चाल बागेश्री रागावर आधारित आहे परंतु रागाचे पारंपरिक स्वरूप बाजूला सारून कवितेतील आशयात जो प्रणयी भाव दिसतो, तोच मध्यवर्ती ठेऊन चाल बांधली आहे. ललित संगीताची हीच तर खरी खासियत असते, एका बाजूने पारंपरिक धाटणी ठेवायची पण दुसऱ्या बाजूने आधुनिक वाद्यमेळाच्या साहाय्याने स्वररचनेत नावीन्य आणायचे. गाण्याचा ताल बघितला तर समेची मात्रा "मोर" या शब्दावर आहे. ढोबळपणे रचना ऐकली तर सम लक्षात येणार नाही आणि याचे कारण तालाचे आधुनिक स्वरूप. ताल तबला वाद्यानेच समेची मात्र घेताना आणखी side rhythm वाद्यांचा ध्वनी मिसळल्याने, केरवा ताल सहज सापडत नाही.
केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
कवी अशोकजी परांजपे आहेत. मुळातले लोकसंगीताला वाहून घेतलेले परंतु संधी मिळताच संगीतकार अशोक पत्कींबरोबर काही भावगीते केली. तशा काहीशा ढोबळ प्रतिमा परंतु शब्दरचना करताना, चालीचा "मीटर" समजून घेऊन त्या अंदाजानेच अक्षर आणि शब्द लिहिणे, हे नेहमीच कौशल्याचे काम असते आणि इथे गाणे ऐकताना, कुठेही फारशी शब्दांची "मोडतोड" आढळत नाही. अर्थात कविता म्हणून वाचताना काही शब्द खटकतात. शेवटचा अंतरा वाचताना, "भावगीत बोलले" असे आहेत. सर्वसाधारणपणे भावगीत "गायले" जाते, "बोलले" जाते नाही परंतु बहुदा आधीची ओळ "डोलले" या शब्दाने संपवली असल्याने, त्या शब्दाला "जोड" देण्यासाठी ही तडजोड केली असावी. विशेषतः ध्रुवपद वाचताना, पहिली ओळ "मोर" तर दुसरी ओळ "धीर" या शब्दांनी संपवली आहे. असे असताना,समजा "बोलले" शब्दाऐवजी "गायले" हे शब्द खटकले नसते आणि पुन्हा होण्याचा "मीटर" व्यवस्थित सांभाळला गेला असता.
.
पांपणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला ग आसावला सूर
संगीतकार म्हणून अशोक पत्कींची ही रचना, एक ठळक ओळख म्हणून मान्यता पावली आहे. वाद्यमेळाची आधुनिक बांधणी करून त्यांनी मराठी भावगीतात निश्चितच नावीन्य आणले. एका बाजूने आधुनिकता आणायची परंतु तरीही परंपरेकडे लक्ष ठेवायचे, असा थोडा दृष्टिकोन दिसतो. सर्वसाधारणपणे संगीतकार म्हटला की सगळ्यात आधी गाण्याचा मुखडा आकर्षक करणे आणि एकूणच चालीचा ढाचा गुणगुणता आली पाहिजे, इथे लक्ष ठेवतो. सुरवात जरी बागेश्री रागाच्या सुरावटीने होत असली तरी हळूहळू राग बाजूला सारला जातो आणि चालीचे स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित होते. संगीतकाराची सर्जनशीलता तपासताना बरेचवेळा हा मुद्दा ग्राह्य धरणे महत्वाचे ठरते. वास्तविक बागेश्री राग साधारणपणे विरही भावनेकडे जास्त झुकतो परंतु तरीही अशा रागातून एखादी अशी "फ्रेझ" मिळते तिथे रागाची भिन्न प्रकृती दिसते. या गाण्याबाबत बहुदा असेच झाले असावे. यात एक मुद्दा असा येतो, या दूर सरकण्यातून गुणवत्तापूर्ण म्हणण्यासारखे या संगीतकाराने काय साधले? याचे मूल्यमापन आवश्यक आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास, गाण्यातील कवितेचा आशय आणि सादरीकरण यात एकात्मता निश्चित आढळते ललित संगीतात तुम्ही चाल कुठून घेता यापेक्षा चाल बांधताना तिचे अनलंकृत सौंदर्य किती वेगळेपणाने समोर आणता याला अधिक महत्व असते.
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातून कुणी आज भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला ग भारला चकोर
गायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या मधुर गायनाने या चालीचे सौंदर्य निश्चितच वाढवले आहे. लताबाई हिंदीत चित्रपटांत गर्क झाल्या आणि सुमन कल्याणपूर यांना मराठी भावगीताचे क्षेत्र उपलब्ध झाले, असे म्हणता येईल. इथे मी लताबाईंचा उल्लेख अशासाठीच केला कारण आवाजाची जात, पोत आणि एकूणच गायकी, या संदर्भात या दोघीच्या गायकीत बरेच ठिकाणी साद्ध्यर्म्य आढळते. या गाण्यात देखील संपूर्ण गायन जरा बारकाईने ऐकले तर माझ्या या विधानाची प्रचिती येऊ शकते. स्वच्छ आणि निकोप आवाज, कुठेही अडखळणे नाही तसेच गाताना अंत्यअक्षरावर अर्ध तान घेऊन, स्वर किंचित लांबवायचा तसेच शब्दातील भावार्थ ध्यानात घेऊन विशिष्ट शब्दांवर थोडे "वजन" देऊन, तोच शब्दार्थ अधिक खोल भावव्याप्तीने दर्शवायचा इत्यादी खास वैशिष्ट्ये सांगता येतील.
No comments:
Post a Comment