१९८१ मधील वेस्टइंडीज/ इंग्लंड मधील बार्बाडोस इथला कसोटी सामना. इंग्लंडची बॅटिंग सुरु होणार होती. फलंदाज म्हणून बॉयकॉट तर त्याला गोलंदाजी टाकायला होल्डिंग आणि क्रिकेट इतिहासातील असामान्य ओव्हर सुरु झाली. एव्हाना, होल्डींगची ओळख जगाला पूर्णपणे ज्ञात झाली होती तसेच बॉयकॉट तर तंत्राचा आधारभूत आधारस्तंभ. पहिले ४ चेंडू फलंदाजाला नाही - फलंदाज बॅटीवर घेण्याचा प्रयत्न करीत आहे पण तरीही बॅट चुकवून चेंडू विकेटकीपरच्या हातात स्थिरावत आहे. फलंदाज गोंधळलेला आणि क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि अवघे स्टेडियम उत्साहाने उसळलेले!! बॉयकॉटला नक्की काय घडत आहे, हेच समजेना. तंत्र तर अचूक आहे पण चेंडू बॅटवर येताच नाही. ही चेंडूच्या वेगाची असामान्य करामत होती. ज्यावेगाने चेंडू येत होता, त्याच्या जोडीने फलंदाजाचे reflexes कमी पडत होते. अखेरीस शेवटचा चेंडू टाकला आणि बॉयकॉटच्या यष्ट्या उध्वस्त झाल्या!! फलंदाज आणि खुद्द बॉयकॉट हतबुद्ध अवस्थेत पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याला समजेना, आपले तंत्र कुठे चुकले? तंत्राच्या बाबतीत बॉयकॉट जगन्मान्य होता पण चेंडूचा वेगच इतका भन्नाट होता, तिथे निमिष हा क्षण देखील मोठा वाटेल इतक्या अवकाशातील चूक फलंदाजाला महाग पडली. ही ओव्हर क्रिकेट जगात आजही अतुलनीय अशी मानली जाते. इथे केवळ बॉयकॉट नव्हे तर जगातील कुठलाही फलंदाज तग धरू शकला नसता, हे आता सर्वांनी एकमुखाने मान्य केले आहे.
६ फुटापेक्षा उंच, अशी लाभलेली उंची, सडपातळ बांधा तरीही सडसडीतपणा सगळ्यांच्यात उठून दिसणारा (त्यावेळेचा वेस्टइंडीज संघ आठवावा म्हणजे या विधानाची प्रचिती येईल). होल्डिंग बाबत सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे त्याचा "स्टार्ट"!! जवळपास मैदानाच्या एका टोकापासून बॉलिंगसाठी धावत येणारा येणारा होल्डिंग बघणे, हाच खरा नयनरम्य सोहळा होता. १९८३ च्या विश्वचषकात, आता नेमका सामना आठवत नाही पण, एका सामन्याच्या वेळी, होल्डिंग धावत असताना, त्याच्या जोडीने चित्त्याची धाव दाखवली होती आणि त्यातील विलक्षण साम्य बघून, मी विस्मित झाल्याचे आठवत आहे. होल्डिंग हा वेगवान गोलंदाजांमधील असामान्य कलाकार होता. वेग तर दहशतवादी होताच पण त्याची धाव, आणि चेंडू टाकण्याची शैली, यात सुंदर कलात्मक रचना होती. वर्षानुवर्षे ती कला अबाधित राहिली होती. त्याच्या वेगावर मोहित होऊन, त्यावेळी १०० कि.मी. वेग हा मापदंड निर्माण झाला होता. तसे बघितले तर त्याचा स्विंग फार मोठा नव्हता जसा अँडी रॉबर्ट्सचा होता. परंतु त्याची भरपाई, होल्डिंग आपल्या वेगाने आणि अचूकतेने करीत असे. तसेच त्याच विलक्षण अचूकतेला, होल्डींगने "यॉर्कर"ची जोड दिली होती. मी बघितलेल्या वेगवान गोलंदाजात होल्डिंग आणि थॉमसन, असे दोनच वेगवान गोलंदाज बघितले, ज्यांच्या यॉर्करने फलंदाजांची गाळण उडाली होती. टप्पा अतिशय खोलवर टाकणे, हे कौशल्य आहे कारण जर का टप्पा चुकला तर चेंडू फुलटॉस पडणार आणि चौकार निश्चित बसणार. पण, जर का चेंडू अचूक यॉर्क झाला तर दोनच बाबी संभवतात, एकतर पायचीत होणे किंवा यष्ट्या उध्वस्त होणे. १०० कि.मी. वेगाचा चेंडू बॅटीच्या खाली येणे म्हणजे काय असते, हे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांना अधिक नेमके समजून घेता येईल. निव्वळ हताश, अशीच भावना आपल्यापाशी असते.
होल्डींग हा तितकाच अफलातून क्षेत्ररक्षक होता. १९८० च्या ऑस्ट्रेलिया/वेस्टइंडीज मालिकेतील एका सामन्यात ( You Tube वर बघता येते) होल्डींगने चेंडू टाकला आणि समोरच्या फलंदाजाने, स्ट्रेट ड्राइव्ह मारला. वास्तविक गोलंदाजाने अडवण्याचा प्रयत्न देखील केला नसता परंतु इथे होल्डींगने चेंडू टाकल्यानंतर जो follow through असतो तोच थांबवला आणि मैदानावर झोकून देऊन, तो फटका अडवला. निव्वळ अविस्मरणीय परंतु इथेच होल्डिंग थांबला नाही तर त्याच ऍक्शनमध्ये हातातील चेंडूने समोरील यष्ट्या उध्वस्त केल्या. Complete Athletics. खुद्द फलंदाजच नव्हे तर समालोचन करणारा रिची बेनॉ देखील अवाक झाला होता. मानवी प्रयत्नांच्या पलीकडील ही घटना होती - निदान त्या वेळेपुरते तरी नक्कीच.
हॉलनंतर निव्वळ वेगाने दहशत निर्माण करणारा हाच वेस्टइंडीजकडून गोलंदाज निर्माण झाला होता. अर्थात वयोमानानुसार वेग मंदावतो पण इथे होल्डिंग फार वेगळा ठरला. अचूकता तर कायमची वस्तीला आलीच होती पण त्याला आता त्याने स्विंग करण्याच्या कलेची जोड दिली. इथे त्याला अँडी रॉबर्ट्स मदतीला आला. आजही होल्डिंग आणि गार्नर, याबद्दल रॉबर्ट्सचे ऋण सांगायला चुकत नाहीत. खरंतर, त्यावेळची "रॉबर्ट्स, होल्डिंग,गार्नर आणि क्रॉफ्ट" ही जगप्रसिद्ध चौकडी तयार करण्यामागे फक्त रॉबर्ट्स हाच कारणीभूत होता. उतार वयात देखील होल्डींग चेंडू टाकण्याच्या वेगात विलक्षण आणि अनपेक्षित बदल करून आणि त्याला स्विन्गची जोड देऊन, फलंदाजाला गांगरून टाकत होता.
१९८३ च्या भारत/ वेस्टइंडीज मालिकेत जेंव्हा मार्शल भारतात धुमाकूळ घालत होता तेंव्हा त्याला प्रतिउत्तर म्हणून सुनीलने मार्शलवर प्रतिहल्ला चढवला होता (दिल्ली इथल्या सामन्यात सुनीलने केलेली अविस्मरणीय १२५ धावांची खेळी) आणि काहीवेळा मार्शल हतबुद्ध झाल्याचे जाणवले पण तिथे होल्डिंग वेगळा निघाला. आजही सुनील कबूल करतो, त्या मालिकेतील होल्डिंग फार अवघड होता कारण आता तिथे निव्वळ वेग नसून, अचूकतेसोबत स्विंग आणि वेगवेगळे बाऊंसर्स मदतीला होते. वास्तविक, ५० ओव्हर्सच्या सामन्यात देखील होल्डिंग अफलातून गोलंदाजी करायचा. पुढे. पुढे त्याने स्टार्ट थॊडा कमी केला पण त्याची भरपाई, खांद्यातून चेंडू टाकणे, या कलेतून केली. खांदा वापरणे, ही खासियत रॉबर्टसची पण ती कला पुढे होल्डींगने विस्तारली. याचा परिणाम असा झाला, स्टार्ट छोटा झाला म्हणून वेग थोडा कमी झाला, असे सुरवातीला तरी बरेचसे फलंदाज मानत होते पण लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाला.
होल्डिंगचे क्षेत्ररक्षण हा दुसरा विलोभनीय भाग. मैदानाच्या टोकावरून विकेटकीपरकडे फेकलेला चेंडू बघणे, हे देखील तितकेच सौंदर्यवान होते. होल्डींगकडे चेंडू आला आहे, म्हणजे धाव चोरण्याची शक्यताच बंद. इथे देखील तो ज्याप्रकारे खांद्यातून थ्रो करीत असे, (त्यावेळी, रिचर्ड्स,गार्नर असे क्षेत्ररक्षक असाच चेंडू फेकत असत) ते बघण्यासारखे होते. फलंदाजी मात्र कामचलाऊ स्वरूपाची होती. तरीही प्रसंगी उपयोगी पडणारी होती - आठवा,रिचर्ड्सची इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यातील १८९ धावांची खेळी. सगळं संघ परतला असताना,दुसऱ्या बाजूने रिचर्ड्सला होल्डींगनेच खंबीर साथ दिली होती तरीही होल्डींगला फलंदाज म्हणून मानता येणार नाही. त्याची त्या संघाला गरजच नव्हती म्हणा.त्याला कसोटी क्रिकेट अतिशय आवडीचे होते आणि जेंव्हा संघाच्या Physiotherapist ने होल्डींगला फक्त एकदिवसीय सामान्यांपुरते राखून ठेवायचे ठरवले तेंव्हा होल्डींगने तात्काळ क्रिकेटमधून संन्यास घ्यायचे ठरवले.
जागतिक क्रिकेट एका असामान्य वेगवान गोलंदाजाला कायमचे मुकले.
No comments:
Post a Comment