अर्थात मी परदेशात (साऊथ आफ्रिका) रहात असतानाचा हा अनुभव आहे. भारतात अजूनतरी "इस्टर मंडे" अशी सुटी मिळत नाही त्यामुळे सलग ४ दिवसांची रजा म्हणजे भटकायला गाडी काढणे आणि लांब फिरायला जाणे नेहमीचेच असायचे. एप्रिल महिना म्हणजे थंडीच्या मोसमाला सुरवात. हवा बोचरी नसली तरी अंगात स्वेटर घालणे आवश्यक. १९९८ मध्ये मी डर्बन इथे नोकरी करीत होतो. या देशात येऊन, ४ वर्षे आली तरी केप टाऊन झालेले नव्हते म्हणून इस्टर मंडे ला जोडून आणखी ३ दिवस रजा घेतली आणि एका मित्राला बरोबर घेऊन, गुरुवारी संध्याकाळीच केप टूर सुरु केली. रात्री ब्लूम फॉन्टेन शहरात वस्तीला राहिलो. ब्लूम फॉन्टेन शहर हे समुद्र सपाटीपासून खूपच वर असल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. आम्ही दोघे मित्रच असल्याने तशी राहण्याची काही फारशी व्यवस्था केली नव्हती, जिथे मिळेल तसे राहायचे, असेच ठरवले होते. एकतर आयत्यावेळेस ठरवले त्यामुळे बरीचशी हॉटेल्स आधीच भरलेली होती तरी देखील ब्लूम फॉन्टेन शहराच्या उपनगरात, सुदैवाने "सिटी लॉज" सारख्या उपयुक्त हॉटेलमध्ये जागा मिळाली. रात्रीचाच प्रश्न असल्याने, फारसा विचार केला नाही. रात्री शहर फिरायला बाहेर पडलो. तसे शहर फार मोठे नाही पण टुमदार आहे. डर्बन सारख्या शहरात राहिल्यानंतर मग मॉल्स, उंच इमारती वगैरे गोष्टींचे फार आकर्षण रहात नाही. बाहेर पडलो तेंव्हा रात्रीचे ८ वाजून गेले होते. हवेत गुड फ्रायडे असल्याने रस्त्यावर थोडीफार गर्दी होती. रस्त्यावरील हॉटेल्स तुडुंब भरलेली होती. हवेत गारवा असल्याने, टेबलांवर काचेचे चषक भरलेले अत्यावश्यक. मग अनिल कशाला मागे राहील? गार थंडीत On the Rocks घेणे म्हणजे काय अप्रतिम अनुभव असतो, हे शब्दात मांडणे फार अवघड आहे. आम्ही रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक टेबल पकडले आणि ड्रिंक्स सहित जेवणाची ऑर्डर केली.
दुसऱ्या दिवशी पहाटेच निघालो आणि सरळ N2 हा हायवे पकडला. इथे सलग ८०० कि.मी. रस्त्यात कुठेही कॅमेरा नाही त्यामुळे गाडी जवळपास १६०, १७० वेगाने हाणली. अशा वेगाने गाडी चालवणे, हे खरोखरच थ्रिल असते. साऊथ आफ्रिकेत फक्त याच रस्त्यावर तुम्ही सलग इतक्या वेगाने गाडी चालवू शकता अन्यथा, १२०,१३० वेग इतकीच मर्यादा!! गुड फ्रायडेच्या दुपारी आम्ही केपच्या प्रवेशाशी आलो, Worsester इथला वाईन पार्क प्रसिद्ध आहे, लगेच गाडी आत घेतली. तोपर्यंत वायनरी अशी बघितलेली नव्हती. साऊथ आफ्रिकेची वाईन जगभर प्रसिद्ध आहे. फाटकातून आत शिरलो आणि साथीला देखणी हिरवळ आली, ती शेवटपर्यंत. सुरेख, निगुतीने राखलेली हिरवळ बघणे, हा अनिर्वचनीय अनुभव असतो. आजूबाजूला वाईन विकण्याची दुकाने होती. आम्हाला, जिथे वाईन बनवतात, तिथेच जाण्यात अधिक रस होता, वाईन फॅक्टरी सगळ्यांना बघता येते. Worcester मध्ये प्रचंड द्राक्षाच्या बागा आहेत आणि सगळी लागवड ही फक्त वाईनसाठी केलेली असते. आयती बाजारपेठ उपलब्ध असल्याने, उगीच "मालाला पडलेला भाव" वगैरे प्रकार नाही. आणखी महत्वाची बाब,ही वायनरी खाजगी आहे , जशी आता आपल्याकडे नाशिककडे "सुला वायनरी" झाली आहे.
फॅक्टरीपाशी गाडी थांबवली आणि आत शिरलो. कारखाना म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर अवजड यंत्रे, खडखडाट आवाज असला सीन डोळ्यासमोर येतो पण वायनरीत यंत्राचा आवाज येतो पण तो कानाला अतिशय सुसह्य असतो. वाईन कशी बनवली जाते, याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. बहुतेक सगळी प्रक्रिया यंत्रांकडूनच पार पाडली जाते. द्राक्षे विशिष्ट प्रकारे आंबवली जातात, त्यात यीस्ट आणि इतर केमिकल्स मिसळली जातात, गाळली जाते, तिथे खरा "अर्क" बाहेर निघतो. नंतर अवाढव्य पिंपात साठवली जाते ( हे सगळे मी स्कॉच वरील फिल्ममध्ये बघितलेले होते म्हणून फारसा विस्मय वाटलं नाही). इथे तुम्हाला ताजा अर्क घोटाच्या स्वरूपात प्यायला मिळतो. अनिल कशाला असला चान्स सोडणार!!
पांढरी, सोनेरी आणि याच रंगाच्या आणखी छटांमधून वाईन तयार होते. गाळलेली वाईन, बाटलीत भरलेली बघणे - अप्रतिम सोहळा. तिथेच तुम्हाला वाईन कशी घ्यावी,हे देखील शिकवले जाते. प्रत्येक वाईनचे स्वतः:चे असे स्वतंत्र काचेचं ग्लासेस असतात आणि त्यात ओतून, घोटाघोटाने तोंडात घोळवत वाईन घेतली म्हणजे तुम्ही खऱ्याअर्थी वाईनचा आस्वाद घेता. नाझी एक गमतीचा भाग लक्षात आला,वायनरीतील वाईनची चव आणि बाहेर विक्रीला ठेवलेल्या बाटलीतील वाईनची चव, यात फरक पडतो. ताजी वाईन, म्हणून तिचा गुणधर्म वेगळाच असतो.
आजतर गुड फ्रायडे, त्यामुळे तर तिथे उत्सवच होता. संध्याकाळी, तिथल्या क्लबमध्ये खास पार्टीचे आयोजन केले होते. वास्तविक तिथे जागा आधीच आरक्षित केलेल्या असतात पण निव्वळ नशिबाने आम्हा दोघांना प्रवेश मिळाला. वास्तविक तिथून केप टाऊन २५० कि.मी. दूर आहे आणि तिथे राहण्याची सोय बघायला हवी होती. तरी देखील आम्ही या पार्टीत सामील झालो. वास्तविक पार्टीचा खर्च तसा महागडा होता पण तरीही सगळे सोसायचे ठरवले. क्लब पार्टीला जायचे तर तुम्हाला पार्टी ड्रेस कोड पाळणे अत्यावश्यक अन्यथा प्रवेश मिळत नाही. आम्ही दोघे तर सडाफटिंग कपड्यात!! तिथल्याच एका गोऱ्या आयोजकाने आमची अडचण समजून घेतली आणि त्याने त्याच आवारातील एका दुकानात नेले. तिथे पार्टी ड्रेस भाड्याने मिळत होते. अशा प्रकारे इथे काही मिळते,याचीच आम्हाला कल्पना नव्हती. लगोलग सूट,टाय आणि पॅन्ट भाड्याने घेतल्या आणि तिथल्याच एका लॉजमध्ये रात्रीची सोय केली. इथे सगळेच तसे आमच्या बजेटच्या बाहेर बसणारे होते तरी एकदा जीवाचे केप टाऊन करायचे म्हटल्यावर फारसा विचार केला नाही.
आता हवेत चांगलाच गारठा वाढला होता. रात्री ९ च्या सुमारास पार्टी सुरु झाली. त्या हॉल मध्ये आम्हीच वेगळ्या रंगाचे. बाकीचे सगळे एकतर गौरवर्णीय अथवा कृष्णवर्णीय. सुरवातीला शॅम्पेन फोडली आणि पार्टीला रंग चढायला सुरवात झाली. मंद आवाजात पाश्चात्य जॅझ संगीत सुरु झाले आणि जोडप्यांनी पाय थिरकवायला सुरवात केली. चखणा म्हणून सॉसेजीस आणि चॉप्स होते. हॉलच्या बाहेरच बार्बेक्यू लावला होता. बार्बेक्यूच्या जाळीवर मंदपणे सॉसेजीस भाजले जात होते आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे प्रत्येकजण तिथून चॉप्स, सॉसेजीस घेत होते. तिथेच मी, मेयोनीजमध्ये कुस्करून मिसळलेला बटाटा, उकडलेली अंडी आणि बारीक तिखट मिरची आणि मिरीपावडर एकत्रित करून तयार केलेला पदार्थ खाल्ला. काय अफलातून चव होती. आम्ही सडाफटिंग असल्याने नृत्य करण्याचा प्रश्नच नव्हता त्यातून ओळखीचे कुणीही नाही. त्यामुळे कुणाला नृत्यासाठी विचारायचे? हा प्रश्नच होता. एक, दोनदा आमच्या बाजूच्या एका गोऱ्या जोडप्याने, आम्ही नृत्य करत नाही, म्हणून आश्चर्यच व्यक्त केले (यात एक बाब अशी होती, तोपर्यंत तरी मला पाश्चात्य नृत्य कसे करायचे, याची सुतराम कल्पना नव्हती) गोरा माणूस अशा वेळी किती खेळकर असतो याचा सुरेख अनुभव आला. आमच्याकडे "पार्टनर" नाहीत हे बघितल्यावर, त्याने त्याच्या बायकोलाच माझ्याबरोबर नृत्य करावे, अशी विनंती केली. इथे मात्र अनिल गांगरला!! वास्तविक मी बावळट होतो, हेच खरे. मी काहीच बोलत नाही, हे बघितल्यावर तीच माझ्याशी बोलायला आली. तेंव्हा मीच कबूल केले, मला पाश्चात्य नृत्य येत नाही. तिला थोडे आश्चर्यच वाटले कारण मी या देशात येऊन एव्हाना ४ वर्षे झाली होती आणि मला पाश्चात्य नृत्य येत नाही!! शेवटी तिनेच पुढाकार घेतला आणि माझा हात हातात घेतला. मी पण मनात म्हटले,च्यायला होतोय राडा तर होऊ दे. उद्या इथे कोण कुणाला भेटणार आहे.
अर्थात सुरवातीची १०मिनिटे अनिल बावचळला. पाय कशा लयीत कसे मागे, पुढे करायचे, काहीच समजेना पण तरीही पुढे रेटायचे ठरवले. हळूहळू अंदाज यायला लागला आणि सफाईदार जरी नसले तरी नवखेपणा निघून गेला. मुळातला बुजरेपणा कमी झाला आणि थोड्या आत्मविश्वासाने पाय हलायला लागले. जवळपास, अर्धा तास नृत्य करीत होतो, मनात कुठेही वासना डोकावली नाही - त्यावेळी याचे देखील आश्चर्यच वाटले. आणखी गंमत म्हणजे मी फक्त एकच ग्लास वाईन घेतली होती पण मुद्दामून घ्यावीशी असे पण वाटले नाही. रात्री ११ च्या सुमारास टर्की आली आणि आता आम्ही चौघांनी एक टेबल पकडले. रात्रभर संगीताचा धुडगूस चालू होता.
आम्ही दोघांनी मात्र रात्री २ च्या सुमारास काढता पाय घेतला.
No comments:
Post a Comment