Friday, 12 April 2019

पिकल्या पानाचा देठ

आपल्या मराठी संस्कृतीत "शृंगार रस" याला फार मर्यादित अर्थ आहे. शक्यतो चव्हाट्याबाहेर शृंगार जाऊ नये, अशीच बरीचशी धडपड असते. त्यातून "रांगडा श्रुंगार" बाबत तर चोरटेपणाच अधिक!! अगदी मराठी लोकांच्या इतिहासात थोडे डोकावले तर "बाजीराव-मस्तानी" सारखी प्रकरणे अभावानेच आढळतात. याच पार्श्वभूमीवर "लावणी" चा आस्वाद घेतला जातो. त्यातून "बारीवरची लावणी" तर उघड उघड शृंगारिक आवाहन करीत असते ( अपवाद म्हणून काही रचना सापडतात तरीही..) वास्तविक लावणी गायन हा अविष्कार नेहमीच "गायकी" अंगाला प्राधान्य देत असतो. कुणीही उठली आणि लावणी गायला घेतली, असे सहसा घडत नाही. "बैठकीची लावणी" हा अविष्कार, त्यातलाच अतिशय महत्वाचा आविष्कार म्हणावा लागेल. प्रख्यात संगीत मीमांसक कै. अशोक रानड्यांनी " बैठकीची लावणी हे महाराष्ट्राने उत्तर भारतीय संगीतातील ठुमरीला दिलेले उत्तर आहे" असे अत्यंत सूत्रबद्ध विवेचन केले आहे आणि जर का थोडे खोलात जाऊन विचार केला तर या विधानाची सत्यता पडताळता येते. "बैठकीच्या लावणी"त श्रुंगाराला प्राधान्य असतेच पण शिसारी किंवा छचोरपणा, याला अजिबात स्थान नसते . शृंगारात आवाहन आणि आव्हान असे दोन्ही असते पण त्यात लाळघोटेपणा नसून निमंत्रण असते.  आजची स्वररचना ही एकाचवेळी चाळवते पण उत्तानपणाची सीमारेषा आखून घेते.  

दरबार जुना ह्यो हंड्या झुंबर नवं 
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं 
अंगाअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा 
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा 

सुप्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर हे नाव मराठी चित्रपट संगीतात मान्यताप्राप्त आहे. सातत्य तसेच प्रसंगी सखोल आशयबद्ध कविता केल्या आहेत. प्रस्तुत शब्दरचना वाचताना, एका बाजूने रांगडा श्रुंगार तर दुसऱ्या बाजूने एक वजनदार खानदानी मांडणी बघायला मिळते. "दरबार", "हंड्या"," झुंबर" या सुरवातीच्या शब्दांनी उच्च पार्श्वभूमी तयार होते. बैठकीला राजसपण लाभले आहे. "पिकल्या पानाचा देठ" हे खरे तर द्वयर्थी शब्द पण तरीही लासवट नव्हेत. आसमंतात मदिर रात्र पसरलेली असताना, तोच गंध माडीवर आणण्याचा प्रयत्न आहे. खेबूडकरांनी सगळे वातावरण नेमक्या शब्दांत टिपलेले आहे. कुठेही छचोरपणा आणलेला नाही आणि ही बाब आस्वादाच्या दृष्टीने फार महत्वाची. 

नख लागल बेतानं खुडा 
केशरी चुना अन काथ केवडा 
लई दिसानं रंगलं विडा 
व्हटाची लाली टिपून घ्याया 
मुखडा असा फिरवा 

संगीतकार राम कदम हे नाव, मराठी चित्रपट क्षेत्रातील फार मोठे आणि प्रतिष्ठित नाव आहे. मराठी लोकसंगीताचा अत्यंत सुयोग्य वापर, हे त्यांच्या स्वररचनेचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. सहज, ओठावर खेळातील अशा चाली तयार केल्या. यमन रागावर आधारित चाल आहे. गायिका शोभा गुर्टू यांनी सुरवातीला घेतलेल्या आलापीतच यमन राग दिसतो. "आ"कारातून ऐकायला मिळणाऱ्या "नि रे ग" आणि "नि रे ग म" या सुरावटीतुन यमन रागाची ठेवण दिसते. एकाचवेळी आर्जवी पण माडीवरील गाणे असल्याने आवाहन करणारी अशी ही सुरावट आहे. "नख लागल बेतानं खुडा" ही ओळ घेताना, "खुडा" शब्द घेण्याआधी किंचित स्तब्धता आहे. खरतर तो चेष्टायुक्त विराम आहे. मुद्दामून ऐकण्यासारखी जागा आहे. तसेच "व्हटाची लाली टिपून घ्याया" ही ओळ  गाताना,त्यात अनुस्यूत असलेला शाब्दिक रांगडा शृंगार ऐकणे देखील तितकाच विलोभनीय.  
अशा प्रकारच्या रचनेला वाद्यमेळ तसा पारंपरिक असाच असतो आणि इथे तसाच आहे. फक्त ऑर्गन आणि तबला. ऑर्गनमधून सतत यमन रागच अवतरत आहे. अर्थात चाल गायकी ढंगांचीच असल्याने हरकती आणि ताना भरपूर आहेत. संगीतकार राम कदमांनी चालीची बांधणी करताना, स्वरविस्ताराच्या अनेक शक्यता निर्माण केल्या आहेत. त्यामुळे एका बाजूने चाल आळवून, पलटे घेत, आर्जवीपणे सादर करता येते. संगीतकार म्हणून राम कदमांचे मूल्यमापन करायचे  झाल्यास, संगीत रचनाकार म्हटल्यावर त्याचा सर्वात मोठा असा पायाभूत  गुण  असतो, तो गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे. मराठी ललित संगीताचे आर्थिक गणित हे नेहमीच तोकडे असल्याकारणाने, संगीतकाराला रचना करताना, अनेक व्यवधाने पाळावी लागतात, उदाहरणार्थ वाद्यमेळ आणि वादक यावर येणारे निर्बंध. अर्थात हे सगळे स्वीकारून राम कदमांनी स्पृहणीय कामगिरी  केली आहे. इतर व्यावसायिक रचनाकारांप्रमाणे राम कदमांनीही भारतीय कलासंगीतातील राग, ताल व रूढ प्रकारांपासून दूर सरकण्याचा कल दाखवला आहे. इथेही त्याचा प्रत्यय येतो. तसे करताना देखील, रचनाकारांनी काय  साधले,याचे मूल्यमापन करताना त्यांनी यशस्वीपणे साधले आहे, असे म्हणता येईल. 

थोडी झुकून, थोडी वाकते 
पडला पदर, लाज झाकते 
नेम धरून बाण फेकते 
तुमची माझी हौस इश्काची 
हळूहळू पुरवा 
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा 

गायिका शोभा गुर्टू यांचा गळा  बघता,अशी चाल गायला मिळणे उचित ठरते. गळ्यावर उत्तर हिंदुस्थानी ठुमरी, गझल प्रकारांचा जाड ठसा दिसून येतो. शास्त्रीय संगीताची यथास्थित तालीम झाल्याचे समजून घेता येते. काहीसा जड गळा, त्यामुळे ठसठशीत उच्चार. एका बाजूने रागदारी संगीताची जाणीव दिसते पण ललित संगीताला आवश्यक अशी फिरत गळ्यात असल्याने, अशा प्रकारच्या गायकीत गायन खुलून येते. विशेषतः: ओळ संपवताना, घेतलेल्या हरकती फार लक्षणीय आहेत तसेच विशिष्ट शब्दांवर वजन आणून, आशय अधिक खुलवला आहे. 
आता असे सगळे ललित संगीताचे आवश्यक घटक एकत्र आल्यावर आपल्याला एक "श्रीमंत" स्वररचना ऐकायला मिळणार, हा कयास अचूक बांधता येतो. 


No comments:

Post a Comment