मराठी संगीत रंगभूमीवरील रचनाकार नेहमीच असा दावा करतात की ते भारतीय कलासंगीताचा यथायोग्य वापर, आपल्या स्वररचनेतून दाखवतात. ही भूमिका आणि हा दावा निश्चितच योग्य आहे. मराठी संगीत रंगभूमीचा जवळपास शतकभरातला इतिहास पडताळून बघितला तर या दाव्यातील सत्यता स्पष्टपणे दिसते. अण्णासाहेब किर्लोस्करांपासून सुरु झालेला प्रवास हा आजतागायत भारतीय कलासंगीताचे बोट धरूनच झाला आहे. किंबहुना असे म्हणता येईल, रागदारी संगीताची ओळख आणि जवळीक, सामान्य रसिकांना मराठी संगीत रंगभूमीने समर्थपणे करून दिली. अर्थात, संगीत रंगभूमीवरील रचनाकार हे मुळातून कलासंगीताचे व्यापक अभ्यासक, मीमांसक होते आणि याचा परिणाम, रसिकांना झालेले रागदारी संगीताचे परिपूर्ण आकलन. याच प्रदीर्घ परंपरेतील एक प्रतिष्ठित नाव - पंडित जितेंद्र अभिषेकी. मुळात "आग्रा" घराण्याची यथास्थित तालीम घेऊन, अभिषेकी बुवा रंगभूमीवर अवतरले. याचा परिणाम असा झाला, त्यांच्या बहुतेक स्वररचनांना रागदारी संगीताचे अधिष्ठान लाभले. आजचे गाणे " अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा" हे सरळ सरळ "भटियार" रागावर आधारलेले आहे पण तरीही अस्ताईच्या शेवटाला "ललत" रागाचा शिडकावा झालेला दिसतो.
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय निती सारा खेळ कल्पनेचा
"संगीत मत्स्यगंधा" नाटकातील गाजलेली रचना. विशेष मुद्दा विचारात घ्यायचा झाल्यास, प्रस्तुत गाणे कविता म्हणून विचारात घ्यावे, असे आहे. थोडा बारकाईने विचार केल्यास पूर्वीच्या काळातील संगीत नाटकांतील शब्दरचना ही शब्दबंबाळ, संस्कृतप्रचुर अशी असायची. काव्य म्हणून आस्वाद घेणे निरातिशय अवघड असायचे आणि या पार्श्वभूमीवर, प्रस्तुत कविता ही सुबोध, गेयतापूर्ण, लालित्यपूर्ण अशी वाचायला मिळते. वास्तविक, वसंत कानेटकर हे गद्य नाटककार म्हणून प्रसिद्ध तरीही या नाटकातील काही गाणी त्यांनी लिहून थोडा आश्चर्याचा धक्काच दिला असे म्हणता येईल. वास्तविक कविता म्हणून वाचताना एक,दोन ठिकाणी शब्द डाचतात परंतु वसंत कानेटकर हे कुणी सिद्धहस्त कवी नाहीत, ही बाब इथे ध्यानात ठेवलेली बरी.
ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी जो पडूनी शिल्प कोसळावे
सर्वनाश एकच दिसतो नियम जगाचा
"संगीत मत्स्यगंधा" नाटकाचे संगीत हा खरे तर दीर्घ निबंधाचा विषय आहे. संगीतकार म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकींचे पहिले नाटक पण पहिल्याच नाटकात बुवांनी आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. संगीत नाटकातील संगीतात संपूर्ण परिवर्तन घडवून आणले. नाटकातील गाणी सहजपणे गुणगुणता येतील, अशा चाली बांधल्या पण तसे करताना, स्वरविस्ताराला भरपूर जागा ठेवल्या. गाणारा गायक/गायिका प्रशिक्षित असेल तर अशी स्वररचना गाताना त्याच्या प्रतिभेला वाव मिळेल, अशा प्रकारच्या चाली बांधल्या. मुळात, लिखित शब्दाला प्राधान्य देऊन आणि शब्दांचे औचित्य राखणाऱ्या चाली निर्माण केल्या आणि हे पंडित जितेंद्र अभिषेकींचे निर्विवाद आणि निखळ यश होय. चालींमध्ये लालित्य तर आहेच पण गायकीला आव्हान देखील आहे. हे सगळे करताना, स्वतः: संगीतकार हे आग्रा घराण्याचे प्रशिक्षित गायक असूनही बहुतेक स्वररचनांचा पिंड आणि बाज, त्यांनी ललित संगीताच्या अंगाने फुलवला. रागदारी संगीतातील लालित्य नेमके वेचून काढून, आपल्या रचना करताना, त्या संगीताचा सढळ उपयोग करून घेतला, मराठी संगीत रंगभूमी श्रीमंत केली. त्यांनी चालीचा धर्म, नेहमीच "गीतधर्मी" ठेवला. गाणे तयार करताना, कवीच्या शब्दांना सुद्धा तितकेच महत्व द्यायचे, हा विचार रुजवला.
प्रस्तुत स्वररचना ही केवळ ३,४ मिनिटांत संपते परंतु त्यातही आपले सांगीतिक कौशल्य तितकेच प्रभावीपणे सादर होईल आणि संगीताबरोबर शब्दांचे औचित्य सांभाळले हा विचार प्राधान्याने ठेवला. यापूर्वी काही अपवाद वगळता, असा विचार जोरकसपणे मराठी संगीत रंगभूमीवर कुणीही मांडलेला नव्हता. चाकोरी मोडण्याचे प्रयत्न झाले परंतु चाकोरी मोडून, पुन्हा नवीन विचारांची पुनर्स्थापना करताना, जुन्या वळणाची काही अंगे कायम ठेऊन, नावीन्य सादर केले. ही एक प्रकारची बंडखोरीच होती.
दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरती धर्म एक साचा
गायिका म्हणून आशालता वाबगावकर यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, गेल्यावर रागदारी संगीताचे ठळक संस्कार दिसत नाहीत परंतु छोट्या हरकती, हलक्या ताना इत्यादी अलंकारांनी गायन फुलवण्याचे कौशल्य मात्र सुरेख, असेच म्हणायला लागेल. गळ्याचा तारता पल्ला मर्यादित, स्त्री गळा असल्याने तार सप्तकात निसर्गत: निमुळत्या स्वरांत जाणे शक्य. इथे या रचनेची लय थोडी द्रुत असल्याने, तालाच्या मदतीने गायन ठसठशीत झालेले आहे. मुखड्याचीच चाल पुढील दोन्ही अंतऱ्यांना असल्याने, कुठेही अवघडलेपण आढळत नाही. संगीतकाराने जो "नकाशा" आखलेला आहे, त्यातून मार्ग काढून इप्सित स्थळी भाव व्यवस्थित पोहोचवला आहे. पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा घेताना, दुसऱ्या ओळींनंतर चाल वरच्या स्वरांत जाते आणि तो प्रवास नीटसपणे गायिकेने निभावला आहे. परिणामी ,गाण्याचा स्वतः:चा म्हणून एक खास परिणाम घडतो, त्यात गायिकेला यश मिळाले, रसिकांना सुद्धा एक समृद्ध संगीत रचना ऐकल्याचे दीर्घकाळ समाधान मिळते. ललित संगीताची व्याप्ती यापेक्षा फार वेगळी नसते.
No comments:
Post a Comment