१९७९-८० सालाची ऑस्ट्रेलिया/वेस्टइंडीज मालिका. परत एकदा रणधुमाळी. १९७५ साली ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडीजची साले काढली होती. ना भूतो ना भविष्यती असा ५-१ दारुण पराभव केला होता. लिली, थॉमसन,वोकर आणि गिलमोर या चौकडीने वेस्टइंडीजला संपूर्णपणे नामोहरम केले होते. तेंव्हाही १९७९-८० साली खेळलेले बरेचसे खेळाडू त्या संघात होते, अनुभवाने कमी होते पण तरीही फ्रेड्रिक्स,लॉइड, रॉबर्ट्स सारखे अनुभवी खेळाडू संघात होते परंतु विशेषतः: लिली, थॉमसन समोर कुणाचीही डाळ शिजली नाही. बरेच फलंदाज जखमी देखील झाले होते. १९७९-८० सालच्या मालिकेत वेस्टइंडीजने क्रिकेट जगात आपल्या अजिँकत्वाची द्वाही फिरवायला सुरवात केली होती. खरतर १९७६ च्या इंग्लंड मालिकेपासून या संघाचा दरारा वाढायला लागला होता.
नुकताच १९७९सालचा विश्वकरंडक वेस्टइंडीजने सहजगत्या जिंकला होता, रिचर्ड्स जगद्विख्यात झाला होता. तसेच रॉबर्ट्स, होल्डिंग यांनी दहशत पसरवायला सुरवात केली होती. अशा वेळेस, लॉइडने १९७५ सालच्या ऑस्ट्रेलियन संघापासून स्फूर्ती घेऊन, आपल्या संघात त्याच धर्तीवर चौकडी निर्माण केली आणि इतिहासाला सुरवात झाली. बरेचवेळा दंतकथा निर्माण झाल्या. जसे रॉबर्ट्स एकाच शैलीत दोन प्रकारचे वेगवेगळे बाउंसर्स टाकत असे!! (पुढे BBC वरील एका कार्यक्रमात रॉबर्ट्सने ते गूढ उकलले - खरतर गूढ असे काही नव्हतेच!!) एक नक्की होते - हे चारही गोलंदाज - रॉबर्ट्स, होल्डिंग, क्रॉफ्ट आणि गार्नर पूर्णतः: वेगळ्या शैलीचे गोलंदाज होते. प्रत्येकाची शैली वेगळी होती, फक्त साम्य एकच होते, प्रलयंकारी वेग. या चौकडीचा खरा नायक होता अँडी रॉबर्ट्स!! याच गोलंदाजाने खऱ्याअर्थी वेस्टइंडीजच्या चौकडीला आकार दिला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खरतर जलदगती गोलंदाजीच्या कलेत नव्याने विचार आणला तो प्रथम लिलीने आणि नंतर रॉबर्टसने. लिलीची शैलीच वेगळी होती, मैदानावर प्रसंगी दोन हात करायला मागेपुढे बघत नसे. पण रॉबर्ट्स मैदानावर कधीही तोल सोडून वागला नाही. किंबहुना तो अतिशय शांतपणे फलंदाजाला निरखायचा, त्याच्या कलेचा अभ्यास करायचा आणि नेमके दुर्बळ दुवे शोधून तिथे आघात करायचा. सुरवातीला रॉबर्ट्सचा वेग प्रलयंकारी असाच होता. गोलंदाजी करताना, त्याची शैली अतिशय साधी होती पण अखेरच्या क्षणी खांद्यातून चेंडूला वेग द्यायचा, पाहिजे तसा स्विंग करायचा, बाउंस द्यायचा, अशा अनेक करामती करायचा आणि शेवटपर्यँत फलंदाजाला पत्ता लागू द्यायचा नाही. दोषच काढायचा झाल्यास, रॉबर्ट्सकडे तितका प्रभावी "यॉर्कर" नव्हता. इथे मी होल्डींग किंवा ऑस्ट्रेलियाच्या थॉमसन, यांच्याशी तुलना करीत आहे. परंतु बाउंसरच्या वैविध्यामुळे रॉबर्ट्स नेहमीच अगम्य राहिला - अगम्य म्हणजे चेंडू कशाप्रकारे टाकणार आहे, याचा जरादेखील थांगपत्ता लागू द्यायचा नाही. आणखी एक बाब म्हणजे चेंडू जुना झाला तरी रॉबर्ट्स तितकाच घातक गोलंदाज होता. चंदू जुना झाला की तो बरेचवेळा चेंडुवरील शिवण हाताच्या मनगटाच्या विरुद्ध दिशेला ठेवीत असे - चेंडू नवा असताना बोटांच्या पेरातून चेंडूची शिवण पकडून चेंडू टाकत असे. परिणाम असा व्हायचा, जुन्या चेंडुवरील "इनस्विंग" अखेरच्या क्षणी फलंदाजाला समजायचा!! हे त्याचे खरोखर विस्मयकारक तंत्र होते. याउलट होल्डिंग!!
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दौऱ्यात - १९७५ ची मालिका, होल्डिंग नवखा होता, निव्वळ वेगावर अवलंबून असायचा. अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर निव्वळ वेग काही प्रमाणात आणि काही काळ प्रभाव पाडू शकतो. त्यापलीकडे तुमच्याकडे वेगळी अस्त्रे नसतील तर तो गोलंदाज पुढे प्रभावहीन ठरतो. इथेच रॉबर्ट्सने त्याच्यातील गुणवत्ता हेरली आणि आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याबद्दल केवळ होल्डिंगच नव्हे तर गार्नर आणि क्रॉफ्ट यांनी जाहीररीत्या रॉबर्ट्सला श्रेय दिले आहे. होल्डींगची शरीरयष्टी वेगवान गोलंदाजाच्या अत्यावश्यक अशीच होती. सडपातळ बांधा, सणसणीत उंची आणि अफलातून चक्रावून टाकणारा वेग. सुरवातीला तर होल्डिंग ९० मैल वेगाने सलग १०,१२ षटके टाकीत असे आणि ती षटके म्हणजे केवळ आग!! असेच वर्णन करता येईल. सर्वात मनोहारी काय असेल तर त्याच्या "रनअप". जंगलातील भक्ष्याच्या मागे धावणारा चित्ता आणि होल्डींगचा "रनअप" यांचे सौंदर्य एकाच मापाने मोजावे!! इतकी सुंदर धाव, निदान मी तरी आजतागायत एकाही गोलंदाजाबाबत बघितलेली नाही. रॉबर्ट्स प्रमाणे चेंडू टाकायची शैली साधीच होती पण फरक होता, चेंडूचा टप्पा आणि विषयच म्हणजे होल्डींगचा जीवघेणा इनस्विंग आणि यॉर्कर!! होल्डींगने यॉर्कर टाकला आणि मैदानावर स्टॅम्प्स उधळले (९० च्या वेगाने पडलेल्या चेंडूवर वेगळे काय होणार म्हणा) यासारखे मनोहारी दृश्य नाही. फलंदाजाला आपली बॅट खाली आणायला उसंत मिळू द्यायची नाही. फलंदाज एकतर LBW व्हायचा किंवा त्रिफळाचित!! होल्डींगची एक डिलिव्हरी आजही आठवत आहे. बार्बाडोसला वेस्टइंडीज/इंग्लंड कसोटी सामना सुरु होता आणि इंग्लंडचा सलामीचा फलंदाज, बॉयकॉट आला होता. त्याला बघितले आणि होल्डिंग रोरावत आला!! पहिले ५ चेंडू, बॉयकॉटला समजलेच नाहीत आणि सुदैवाने चेंडू बॅटीची कड न घेता विकेटकीपरकडे गेले. बॉयकॉट हैराण, चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती शेवटचा चेंडू होल्डींगने यॉर्कर टाकला आणि तिन्ही स्टंप्स उधळले. मैदान सोडेपर्यंत बॉयकॉटला कळेना, आपले तंत्र कुठे चुकले!! आजही ती ओव्हर क्रिकेट इतिहासातील अजरामर ओव्हर मानली जाते. ज्या कुणाला बॉयकॉट आणि त्याचे जगप्रसिद्ध तंत्र माहीत असेल, त्यालाच यातील खुमारी कळू शकेल.
या चौकडीतील त्यातल्या त्यात कमी वेगवान असलेला गोलंदाज म्हणजे गार्नर. ६फूट ८ इंच असली उंची लाभलेला हा गोलंदाज आडदांड असाच होता. आता इतकी उंची लाभली असल्याने त्याचा चेंडू येणार तो कमीतकमी १० ते १२ फुटांवरून!! चेंडू कशाप्रकारे उसळी घेणार आहे, किती उसळणार आहे, याचा अचूक अंदाज वर्तवणे अशक्य - परिणामी यॉर्कर चेंडू हे हुकमी अस्त्र. जरा १९८३ सालचा विश्वकप अंतिम सामना. आपल्या फलंदाजांनी रॉबर्ट्स, होल्डिंग आणि मार्शल समोर थोडीफार तग धरली होती पण गार्नर समोर नांगी टाकली होती. कुणाही फलंदाजाला गार्नर समजूच शकला नाही आणि अंतिमतः: गार्नर सलग ५ विकेट्स घेऊन गेला. खरतर त्याची महाकाय उंची बघूनच फलंदाजाच्या छातीत धडकी भरायची. सुनील एकदा म्हणाला होता, या चौघांच्यात गार्नरचा वेग थोडा कमी होता. आता सुनीलसारखा खेळाडू बोलला म्हणजे त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. अर्थात थोडे बारकाईने निरीक्षण केले तर होल्डींगचा यॉर्कर आणि गार्नरचा यॉर्कर यात फरक होता. होल्डींगचा यॉर्कर अतिशय प्रत्ययकारी होता, म्हणजे थोडक्यात बोलायचे झाल्यास, होल्डींगचा यॉर्कर हा हवेत स्विंग व्हायचा, कधी कधी तर ऑफ स्टम्पच्या बाहेर टप्पा असायचा आणि क्षणात आत वळायचा (९० च्या गतीने आलेला चेंडू अखेरच्या क्षणी वळणे, हे दु:स्वप्नच म्हणायचे) त्यामानाने गार्नरचा यॉर्कर सरळसोटपणे यष्ट्यांचा वेध घ्यायचा (वेग फक्त ८५!!) मुळात यॉर्कर म्हणजे पायाच्या बुंध्यात टाकलेला चेंडू, त्यामुळे पायांना हालचाल करायला वाव जवळपास नाहीच आणि तशा अवस्थेत ऑफ स्टम्पच्या किंचित बाहेर पडलेला चेंडू आत येतो म्हणजे फलंदाजांची त्रेधातिरपीट नक्कीच. होल्डिंग इथे अधिक धोकादायक होता.
क्रॉफ्ट मात्र या तिघांपेक्षा वेगळ्या शैलीचा होता. क्रॉफ्टच्या हातांची हालचाल बघता, कधी कधी सध्याचा आपला बुमरा आठवतो. क्रॉफ्ट मात्र क्रीझच्या अंतराचा वापर करण्यात अतिशय कुशल होता. गोलंदाजी करण्यासाठी धाव घेत असताना, अखेरच्या क्षणी, क्रॉफ्ट क्रीझच्या एका टोकाला जायचा आणि तिथून चेंडूला वेगळीच दिशा द्यायचा. यामुळे, चेंडू इनस्विंग आहे की आऊटस्विंग आहे, हे समजणे अवघड व्हायचे. गंमत म्हणजे राउंड दी विकेट टाकताना देखील क्रॉफ्ट क्रीझच्या टोकाचाच वापर करायचा. क्रॉफ्टला एखाद सेकंद विचार करायला वेळ मिळायचा.
असे हे अफलातून चौघेजण!! एकापेक्षा एक वेगळे आणि तितकेच प्रत्ययकारी. लॉईडचे भाग्य म्हणायचे, त्याला एकाच काळात असे विलक्षण प्रतिभावान असे चार गोलंदाज मिळाले. १९७५ ते १९९०, सतत १५ वर्षे वेस्टइंडीजचा क्रिकेट मध्ये अभूतपूर्व असा दरारा होता, यात पुढे मार्शल, वॉल्श आणि अँब्रोज मिळाले पण तरीही या चौघांनी जी दहशत पसरवली होती, त्याला दुसरी तोड नव्हती. वास्तविक वेगवान गोलंदाजांची चौकडी, ही कल्पना ऑस्ट्रेलियाची - एकेकाळी लिली, थॉमसन, गिल्मोर, वॉकर यांनी जगावर राज्य गाजवले होते. हीच कल्पना लॉईडने आणि पुढे रिचर्ड्सने आपल्या संघासाठी वापरली. अर्थात प्रत्येक संघाचा दिग्विजयाचा असा काळ असतो. नंतर घसरण होणे क्रमप्राप्तच असते. पुढे वेस्टईंडीजचा संघ कल्पनेबाहेर घसरत गेला.
आजही ती घसरण थांबायचे लक्षण नाही.
No comments:
Post a Comment