हिंदी चित्रपटांच्या इतिहासात एक काळ असा होता, नायिका या गायिका असणे जरुरीचे होते आणि ताशा स्त्री कलाकार मिळत देखील होत्या. अमीरबाई कर्नाटकी (इथे जन्म तारीख ध्यानात घेतली आहे) पासून ही परंपरा बरेच वर्षे हिंदी चित्रपटात कार्यरत होती आणि बहुदा याच परंपरेतील शेवटचे नाव म्हणून सुरैय्या हे घ्यावे लागेल. १९४० नंतर हळूहळू पार्श्वगायन पद्धत सुरु व्हायला लागली आणि नायिका/गायिका पद्धतीचा आवश्यकता भासू लागली नाही. या परंपरेतील लक्षणीय नाव म्हणून सुरैय्याचे नाव निश्चितपणे घ्यावेच लागेल आणि तशी वेधक कामगिरी तिने करून दाखवली होती.
साधारणपणे १९४१ साली "ताजमहाल" चित्रपटाने सुरैय्याची कारकीर्द सुरु झाली असे मांडता येईल. परंतु तिचे नाव खऱ्या अर्थाने गाजले ते "पंछी जा पीछे रहा है मेरा बचपन" ( चित्रपट स्टेशनमास्टर १९४२) या गाण्याने. गमतीचा भाग म्हणजे हे गाणे सुरैय्याने मेहताब या अभिनेत्रींसाठी गायले होते. अर्थात एकदा तिने अभिनय क्षेत्रात पाय रोवल्यानंतर मात्र ती फक्त स्वतः:साठी म्हणजे स्वतः: केलेल्या भूमिकेसाठीच गायला लागली. "परवाना","अनमोल घडी","अफसर","दरड","नाटक","प्यार की जीत","बडी बहेन" सारखे चित्रपट तिच्या नावावर गाजले. मजेचा भाग म्हणजे सैगलबरोबर गाण्याचे भाग्य (चित्रपट तदबीर १९४५) तिला लाभले. "रुस्तुम-ए-सोहराब" (१९६३) नंतर तिची कारकीर्द संपली, असे म्हणता येते.
एक गायिका म्हणून विश्लेषण करायचे झाल्यास, काही मुद्दे मांडावेच लागतील. सुरैय्याचा आवाज ना जाड ना पातळ असा असे म्हणण्यासारखा होता. आवाजाची ताकद संबंधित शब्दांच्या उच्चारण्यात, चरणांती देखील कमकुवत न झालेल्या प्रक्षेपणात आणि विशिष्ट स्वरसमूहांत गायिका किती सफाईने कसरत करू शकते यांत जाणवते. वास्तविक तिच्या आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नव्हता पण भाषणाच्या आवाजाशी अखंडतेचे नाते विनासायास राखण्यासाठी आवश्यक इतपत त्याच्या मर्यादा होत्या. भारतीय संदर्भात ही बाब दुर्लक्षित करणे अवघड आहे.
दोन स्वरांच्या मध्ये द्रुतपणे फिरणे, सुरैय्याला जमले होते - उदाहरणार्थ, "मस्त आँखो में" ( शमा १९५१, गुलाम मोहमद) या रचनेत, सुरैय्या तार सा स्वरापासून कोमल गंधार स्वरापर्यंत झपाट्याने येते. तिचा आवाज ढाल्या स्वरांवरही नैसर्गिक राहतो. ती स्वतः अभिनय करीत असल्याने, अभिनयाने तिला आणखी एक प्रमाण मिळत असावे,असा एक अंदाज बांधता येतो. याचाच परिणाम असा झाला,विशिष्ट गायन एका पात्राचे गायन आहे याचीही कल्पना सुरैय्या आपल्या मनात अधिक प्रत्यक्षपणे करू शकत होती - कारण तिच्या कालखंडाचा विचार करता, अभिनय सुद्धा अगदीच कामचलाऊ पातळीवरचा नव्हता. या सगळ्याचा संकलित परिणाम असा झाला, ताण न घेता गाणाऱ्या एका खऱ्या गायिकेचा आवाज आपण ऐकत आहोत असे ऐकणाऱ्याचा अंतिम अनुभव असे. "तू मेरा चांद" (दिल्लगी - १९४९ -नौशाद) हे गीत ऐका. चाल जरी थोडीशी अ-भारतीय पद्धतीची वाटली तरी तिला चाचपडावे लागले नाही तसेच "तारारी तारारी" (दास्तान - १९५० - नौशाद) या रफीबरोबर गायलेल्या युगुलगीतांत आनंदी, खेळकर स्वरांची प्रतीती येते.
आणखी एक वैशिष्ट्य सांगता येते. सुरैय्याला द्रुत उच्चारण जमले आणि रचना कधीही अवघड गेल्या नाहीत. "मन लेता है अंगडाई" ( अनमोल घडी - १९४६ - नौशाद) द्रुत लयीत आहे आणि नंतरचे अंतरे तर मुखड्याच्या लयीच्या दुप्पटीत ठेवले आहेत पण तरीही कुठल्याही हिसक्याशिवाय सुरैय्याने गायन केले आहे. "तेरे नैनों ने चोरी किया" (प्यार की जीत - १९४८ - हुस्नलाल भगतराम) हे गीतही उडत्या चालीचे असून गीतात सर्वत्र आनंदी दरवळ पसरलेला आहे.
गायिका-नायिका असोत किंवा पार्श्वगायिका असोत, त्यांच्याकडून अपेक्षित असतो तो कंठाभिनय. सैरैय्याने असा कंठाभिनय "दूर पपीहा बोले" ( गजरे - १९४८ - अनिल बिस्वास) मध्ये चांगला केला आहे. या गाण्यातील "दूर" या शब्दाच्या उच्चारण्याने सुरेख परिणाम साधला गेला आहे. आणखी एक सुंदर उदाहरण देता येते. "ओ दूर जानेवाले" (प्यार की जीत - १९४८ - हुस्नलाल भगतराम) या गीतात "जाना" तसेच "आना" यांसारख्या शब्दांच्या अंत्य उच्चारावयावर किंचित वजन देऊन, त्यांच्या उच्चारण्यास तसे पाहता कमी कालावधी मिळत असल्याची भरपाई करून आशय अधिक गहिरा केला आहे.
आपल्या अभिनय क्षमतेमुळे असेल, पण सुरैय्याने एक गीतप्रकर फार सुरेख सादर केला आहे - ते म्हणजे दबलेल्या हुंदक्यांचे गाणे!! सुरावटीत खटकणारा खंड न पाडता किंवा गीताच्या लयीच्या अंगाने होणाऱ्या वाटचालीत जराही न थांबता सुरैय्याने दु:खप्रदर्शनाचा एक जादा क्षण पैदा करते.
आता मला अतिशय आवडणाऱ्या गीताकडे वळूया - "ये कैसी अजब दास्ता हो गयी है (रुस्तुम-ए-सोहराब १९६३ - सज्जाद) खरतर ही रचना अधिक करून संगीतकाराचीच वाटते. ही रचना मोहवते कारण ती एकाच वेळी भारतीय आणि अरब भूमीची संगीतसंपदा जागवणारी वाटते. लयीच्या अंगाने अतिशय अवघड रचना असून, सुरैय्याने सुरेखरित्या आपल्या गळ्यावर पेलली आहे. आवाजाचे विशिष्ट कंपयुक्त लगाव, आधारभूत घेतलेली स्वरचौकट आणि सप्तकाच्या मध्येच अनपेक्षितरित्या ओळ चढू लागणे, यामुळे हे गीत गुंगवणारे आहे.
गायिका-नायिका उच्च पातळीवर नेणे, ही सुरैय्याची खरी कर्तबगारी. हिंदी चित्रपटसंगीताच्या विकासात ती एक महत्वाची अवस्था होती परंतु यापूक्षा अधिक काही करण्याची सुरैय्याची क्षमता नव्हती.
No comments:
Post a Comment