आपल्याकडे निव्वळ चित्रपट गीतांनी चित्रपटाला अमाप लोकप्रियता मिळवून दिली आहे, असे असंख्य चित्रपट बघायला मिळतात. वास्तविक हे फार एकांतिक विधान झाले पण या विधानातच भारतीय चित्रपटांचे वैशिष्ट्य लपले आहे, हे देखील मान्यच करायला हवे. याच जातकुळीत मांडला जाईल, असे आजचे गाणे आहे."होनाजी बाळा" चित्रपटातील गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. या चित्रपटाची ओळख खरेतर "घनश्याम सुंदरा" या अजरामर भूपाळीने नक्की केली आहे परंतु याच चित्रपटातील इतर गाणी देखील तितकीच श्रवणीय आहेत.
"सांगा मुकुंद कुणी हा पाहिला" हे गाणे अशाच पंक्तीत मांडायला लागेल. गाण्याची शब्दरचना बघितली तर लगेच समजून घेता येते, त्याकाळच्या "पंत" काव्याचा दाट प्रभाव पडलेला आहे. "भावबळें वनिता व्रजाच्या हो, बोलावून सुतप्रती नंदजीच्या" ही शब्दरचना थेट मोरोपंत किंवा वामन पंडितांच्या शैलीशी नाते सांगते. अर्थात हा दोष म्हणून सांगत नसून त्याकाळी शब्द, रचना आणि घाट इत्यादींचा एक विशिष्ट ठसा होता. शाहीर होनाजी बाळा हे त्याकाळचे एक प्रख्यात नाव. कुठल्याही कलेच्या संदर्भात विचार करताना त्यावेळच्या राज्यसत्तेच्या देखील विचार तितकाच महत्वाचा ठरतो.
त्यावेळी महाराष्ट्रात पेशवाई अंमल होता आणि तद्नुषंगाने शाहिरी साहित्य, ज्यावर प्रामुख्याने संस्कृत साहित्याचा अधिक प्रभाव होता, तसेच साहित्य प्रसिद्ध झाले. मला तर आजही गंमतीने म्हणावेसे वाटते, जर का भारतीय संस्कृतीतून कृष्णाला वगळले तर पूर्वीचे कितीतरी साहित्य रद्दबातल ठरेल, इतका कृष्ण, या व्यक्तीचा प्रभाव आहे.
संगीतकार म्हणून वसंत देसायांचा विचार करायचा झाल्यास, त्यांच्या स्वररचनेवर सातत्याने, रागदारी संगीत आणि मराठी रंगभूमीवरील पारंपरिक संगीत, या दोहोंचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. याचा परिणाम असा झाला, स्वररचनेवर विविधता आणि वास्तव ध्वनी-उगम वापरण्यावर असलेला कटाक्ष!! प्रस्तुत रचनेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, एका बाजूने लावणी म्हणता येईल तर दुसऱ्या बाजूने त्याला चित्रपटगीतांचे स्वरूप प्रदान केले आहे. मूल्यमापनाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, बहुतेक सगळ्याच स्वररचनेत, मराठी नाट्यगीतांचा गंध दरवळत राहिला. आता या गाण्याचेच उदाहरण द्यायचे झाल्यास, प्रमुख गायक, पंडित नगरकर!! गळ्यावरील पायाभूत संगीताचा ठसा, आवाजात
धार आणि पुरुषी आवाजात फारसा न जाणवणारा असा निमुळता होत जाणारा स्वर. या वैशिष्टयांचा वसंतरावांनी अचूक उपयोग करून तर्ज बांधली आहे. गाण्यातील हरकती आणि ताना ऐकताना, हे समजून घेता येईल. वसंतरावांची आणखी वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, पारंपरिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास, याचा परिणाम असा झाला, पारंपरिक चलने तशीच्यातशी वापरायला मागे-पुढे बघितले नाही. हिंदुस्थानी कलासंगीत आपण यथायोग्य पद्धतीने वापरतो असा संगीत नाट्यपरंपरेचा दावा, वसंतरावांनी चित्रपट संगीतात नेला.
या गाण्यात २ अंगे स्पष्ट दिसतात. १) पारंपरिक लावणी - प्रत्येक अंतऱ्यानंतर जो कोरस गायनाचा आवाज आहे, त्याचा स्वर आणि लय,ही पारंपरिक लावणीशी नाते सांगते. तसेच २) स्वररचना अभ्यासली असता, त्याचे गीतधर्मी स्वरूप नेमके ऐकायला मिळते. आता गीतधर्मी म्हणजे काय? स्वरचना बांधताना, गाण्याचे स्वरूप ललित अंगाने फुलविणे म्हणजे ढोबळमानाने गीतधर्मी असे म्हणता येईल.
गाण्याची सुरवातच ढोलकीच्या थापेने होते आणि ती संपेपर्यंत पंडित नगरकरांच्या गळ्यातून सुरेल तान निघून, समेची मात्रा गाठली जाते. मुखडा एकदम मनात ठसतो. मुखडा एकाच ओळीचा असल्याने, पुनरावृत्ती आकारून चाल रसिकांच्या पसंतीला उतरते. हाताशी तयार गळा असल्याने, संगीतकाराने देखील तशीच "गायकी" अंगाची चाल बांधली आहे.
"सांगा मुकुंद कुणी हा पाहिला"
पहिला अंतरा बांधताना, संगीतकार वसंतरावांनी एक गंमत केली आहे. अगदी नेमके उदाहरण म्हणणे जरा अवघड आहे पण त्याच धर्तीवर चाल फिरवली आहे. याचा काळात महाराष्ट्रात "कटाव" म्हणून गायकी आविष्कार उदयाला आला होता त्याची शब्दरचना आणि स्वररचना ही आत्ताच्या रॅप संगीताशी केली जाऊ शकते आणि त्याच धर्तीवर, तशाच वेगाने पहिल्या अंतऱ्यातील ओळी गायल्या गेल्या आहेत.अशा स्वररचनेत प्रामुख्याने श्वासावरील नियंत्रण आणि वेगवान लयीवर शब्दोच्चार या बाबींवर अधिक भर असतो. इथे तशाच प्रकारचे गायन केले आहे. अर्थात इथे लय वेगवान असते म्हणजे ताल सुद्धा त्याच अंगाने वाजला जाणार, हे उघड आहे.
रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनी गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
गाण्यात वाद्यमेळ नाही, तितका वाव देखील नाही. म्हटले तर महाराष्ट्राच्या लोकसंगीतावर आधारित स्वररचना आहे पण तरीही गायकी अंगाला वाव देणारी आहे. ताल ढोलकीवर सिद्ध झालेला असून, पार्श्वभागी बासरीचा वापर आहे आणि जोडीला आशा भोसल्यांची छोटी आलापी आहे. अर्थात दुसरा अंतरा सुरु होण्याआधी किंचितकाळ खोल या बंगाली तालवाद्याचे बोल घेतले आहेत. असे असून देखील खरी गंमत आहे ती "सांगा मुकुंद कुणी हा पाहिला" या ओळीच्या पुनरावृत्तीतून ऐकायला मिळणारी गायकी. प्रतेय्क वेळी, वेगळी हरकत घेऊन पुन्हा समेची मात्रा घेतली आहे. वरती मी एक विधान केले होते, वसंत देसायांच्या स्वररचनेत नाट्यगीतांचा गंध मिसळलेला असतो, त्यामागे हेच कारण आहे.
गोपी आळविती हे ब्रजभूषण हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळें वनिता व्रजाच्या हो
बोलावून सुतप्रती नंदजीच्या
प्रेमपदी युदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी हा देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
जरी अस्ताई - अंतरा पद्धतीने गाणे बांधले असले तरी अंतऱ्याची चाल ही अस्ताईला सुसंगत अशीच ठेवली आहे. अर्थात चाल तशीच ठेवल्याने गाणे लक्षात ठेवायला सोपे जाते पण इथे काही रचनाकार प्रत्येक अंतरा वेगळ्या पद्धतीने बांधून आपल्या सृजनाची साक्ष पटवून देतात. वसंत देसायांच्या संगीतात बाबत आणखी एक वेधक विधान करता येते. राजकमलसाठी केलेल्या स्वररचना आणि बाहेत इतर चित्रपटांसाठी केलेल्या स्वरचना, यात बरेच अंतर आणि वैविध्य आढळते. याचाच वेगळा अर्थ असा होऊ शकतो,त्यांच्या सर्जनशीलतेला व्यापक रूप होते.
No comments:
Post a Comment