Tuesday, 15 January 2019

दुभाजक राजकारण


हल्लीच्या राजकारणात दोन पक्ष स्पष्टपणे दिसतात. १) मोदीभक्त, २) मोदीविरोधक. राजकारण म्हटले की विरोधक आणि समर्थक असे दोन विभाग सहजपणे पडतात परंतु गेल्या काही वर्षांत प्रस्तुत विभागणी अगदी ज्वलंत म्हणावी अशी उदयाला आली आहे. राजकारण इतके सरळ चालते का? कधीच नाही. आजचा विरोधक उद्या गळ्यात गळे घालणारा मित्र होऊ शकतो. राजकारणात, कुणीही कधीही कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही, हे सर्वसाधारण चित्र अनादी काळापासून अनंत काळ स्पष्टपणे दिसणार आहे. असे असून देखील एक बाजू घेऊन, खिंड लढवणारे समर्थक, प्रसंगी तुंबळ युद्ध लढण्याची आततायी भाषा करतात. मला इथे कुणाचीच बाजू घ्यायची नाही पण इथे ज्या हिरीरीने मते मांडली जातात, त्यावरून राजकारणाची दिशा नक्कीच ठरत नाही किंवा त्या रेषेवरून राजकारण चालत नाही. खरतर, इथे प्रत्येकजण आपला लिहिण्याचा "कंडू" सामावून घेत असतो. 
सध्याच्या गदारोळात, एक बाब स्वच्छ दिसते. भक्त आणि विरोधक, दोघेही टोकाची भूमिका घेत आहेत. मुळात, राजकारणात टोकाची भूमिका ही नेहमीच सोयीस्कररीत्या घेतली जाते आणि पुढे नामानिराळी राहते.या वस्तुस्थितीचे भान एकूणातच विरळा दिसते. टोकाची भूमिका घेणे कितपत योग्य आहे? विचारात समन्वय साधणे खरंच इतके अवघड आहे का? मुळात संतुलित भूमिका घ्यावी, असे इथे कुणालाच का वाटत नाही? एखादा माणूस हा सतत काळ्या रंगातच रंगवला पाहिजे का? ती व्यक्ती सतत चूकच करीत असते का? किंवा एखादी व्यक्ती नेहमीच बरोबर असते का? या प्रश्नांची तड लावण्याची गरजच कुणाला उरलेली नाही!! एक भूमिका घ्यायची आणि त्यावर अद्वातद्वा लिहीत/बोलत बसायचे!! राजकारणात सोयीस्कर भूमिका घ्यावीच लागते, त्याशिवाय तरुणोपाय नसतो पण इथे लिहिणारे राजकारणी आहेत का? तटस्थ विचार करणे अवघड झाले आहे का? 
कुठलीही व्यक्ती आणि तिचे विचार हे कधीही आणि सदासर्वकाळ अचूक असत नाहीत. परिस्थिती बदलते आणि त्यानुसार त्या विचारांची छाननी करणे जरुरीचे असते. असे असून देखील, व्यक्तीच श्रेष्ठ हा विचार खरोखरच भयानक रोग आहे. इथे केवळ मोदी, हीच व्यक्ती ध्यानात घेतली नसून गांधी, आंबेडकर, सावरकर, नेहरू इत्यादी सगळेच राजकीय नेते लक्षात घेतले आहेत.  गांधीवाद,आंबेडकरवाद किंवा सावरकरवाद, यातील कुठलीही विचारसरणी "अंतिम शब्द" नव्हे!! पण, आपण हे कधीही लक्षात घेत नाही किंवा मान्य करत नाही आणि त्या विचारधारेच्या अनुरोधाने हुज्जत घालत असतो. आपल्याला सतत कुठलातरी "देव" देव्हाऱ्यात बसवायचा असतो आणि त्याच्या नावाने शिमगा करायचा असतो - बाकी काही नाही. वरील कुठल्याही विचारधारेत मानवी प्रश्नांची कायमची तड लावण्याची क्षमता नाही, तशी ती कुठल्याच विचारधारेत नसते. मानवी प्रश्न प्रचंड जटील, गुंतागुंतीचे होते आणि भविष्यात अधिक अवघड होत जाणार आहेत. तेंव्हा एकच एक विचारधारा कवटाळून बसण्यात काय हशील आहे? हीच खरी वस्तुस्थिती आहे. प्रस्तुत नेत्यांनी लोकांवर गारुड घातले कारण ती त्या काळाची गरज होती पण काळ बदलत असतो, मानवी मूल्ये देखील बदलत असतात. हे जर पटवून घ्यायचेच नसेल तर मग तुमच्या विचारांत कडवटपणा येतो. जो इथे वारंवार दिसत आहे. या विचारधारा, हेच अंतिम सत्य एकदा मानले की लगेच तुम्ही मनात देव्हारा तयार करता आणि त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता. हे करायची काही गरज आहे का? गांधी, आंबेडकर, सावरकर, नेहरू हे सगळे आपल्यासारखेच माणूस आहेत, त्यांचेही काही विकार आहेत, काही महत्वाचे विचार आहेत. यात "काही" हा शब्द महत्वाचा. माणूस म्हटला की अपूर्णता आलीच पण आपण या माणसांच्यात काही न्यूनत्व आहे, हेच स्वीकारत नाही. देव इथेच तयार करतो. 
आज मोदी आहेत, उद्या कदाचित राहुल गांधी येतील किंवा आणि दुसरा कुणी येईल. यांच्या विचारसरणी निखळ आहेत, हे मानण्याची गरज आहे का? यांचे सगळेच सतत चुकत असते का? किंवा या व्यक्ती नेहमीच अचूक बोलत/वागत असतात का? आपण विचारात कुठेतरी समन्वय ठेवायला नको का? माझे बोलणे कदाचित अर्धवट असेल पण मूर्ख नक्कीच नाही. दुसरा भाग असा, आपल्यालाच सगळे कळले आहे, हा अभिनिवेश. यात आपण  आपलीच फसवणूक करीत आहोत. आपले म्हणणे मांडावे, यात काहीच चूक नाही पण मांडताना थोडीतरी तौलनिक वृत्ती ठेवावी. एकांतिक वृत्ती काही काळापुरती इतरांवर प्रभाव पाडीत असते पण कालांतराने त्यातील कमतरता लक्षात येते. परंतु एकच एक दृष्टिकोन हा कधीही योग्य नसतो. एका बाजूने, प्रत्येक विचाराला अनेक दिशा असतात, असे मान्य केले जाते पण प्रत्यक्षात वावरताना, या विचाराला तिलांजली दिली जाते, हा खरा विरोधाभास आहे. 
विरोध करावा पण प्रत्येक मुद्दा हा वेगळा असतो,  त्याला अनेक कंगोरे असू शकतात. इतपत तरी ध्यानात ठेवावे. अर्थात समर्थन करताना, आपण कशाचे समर्थन करीत आहोत, याची वाजवी जाणीव ठेवावी, हे देखील सतत बाजूला सारले जाते. याचे एकमेव कारण म्हणजे विचार करताना कोत्या वृत्तीने केला जातो. जर का विचार करताना, अशा अनेक शक्यता ध्यानात घेतल्या तर विचारांत एकांतिकपणा येण्याची शक्यता दुरावते. 
लवकरच भारतात निवडणुका आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मी लिहिले आहे. 

No comments:

Post a Comment