वाचता, वाचता एखादी कविता आपल्या वाचनात येते. सुरवातीला काही शब्द परिचित वाटतात आणि ते शब्द आपले लक्ष वेधून घेतात. काहीसे परिचित शब्द पण संपूर्ण ओळ वाचताना वेगळेच अर्थ ध्यानात येतात आणि डोळे टवकारून आपण कवितेकडे एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो. कवितेचे हेच तर खरे बलस्थान. नेहमीच्या वापरातील शब्दांचे वेगळे अर्थ वाचकांना जाणवून द्यायचे.
खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी.
शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो.
अनुभवाशी एकरूप होऊन, पुढे स्मृतीत "जिवंत" ठेवलेल्या त्या क्षणाला अनुभूतीतील स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना खऱ्या रूपात जाणवायला लागतात आणि असे होत असताना, जेंव्हा वर्तमानात जो अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला असतो, तो अनुभव बाजूला सारून, हा दुसराच क्षण, भूतकाळातील क्षण त्याची जागा घेतो आणि मग भूतकाळ हाच आपला वर्तमानकाळ होतो आणि तिथेच तो अनुभव नव्या जाणिवांनी आपल्या कक्षेत यायला लागतो.
काळाची जाणीव हलकेच पुसून टाकणारी ही नवीन जाणीव आपल्याला निराळ्याच परिणामाची अनुभूती देते. खरे तर आपल्याला जो क्षण अनुभवता आलेला असतो, त्या क्षणाच्याच साऱ्या संवेदन विश्वाला जिवंत करणे, सक्षम लेखनाची पहिली पायरी म्हणायला हवी आणि ही पायरी गाठली की रसिक वाचक देखील त्या संवेदनविश्वाची खरी अनुभूती घेऊ शकतो. वेगळ्या शब्दात, भूतकाळाचा तो क्षण पुन्हा वर्तमानात आणताना, त्यावेळच्या संवेदनेसह लेखनातून प्रकट होणे. त्या क्षणाच्या जाणिवेतील मनाच्या जागृत, अर्धजागृत आणि सुप्त पातळ्यांवरील संज्ञाप्रवाह, त्याच पातळीवरील अनुभवांचेच शब्दरूप प्रकट करणे, हेच तर कवितेच्या अननुभूत आणि अर्धुकलेल्या वाटेचे खरे संचित मानावे.
अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप.
आणि या वाटेवर चाचपडत असताना, मला इंदिरा संतांची कविता वाचायला मिळाली.
या दृष्टीने मला इंदिरा बाईंची "कुब्जा" ही कविता फार विलक्षण वाटते. वास्तविक, "कुब्जा" हे व्यक्तिमत्व पुराणकाळातील, काहीसे दुर्लक्षित झालेले, किंबहुना दोन, चार प्रसंग वगळता फारसे महत्व नसलेली व्यक्तिरेखा. असे असून देखील तिचा प्रभाव महाभारताच्या संपूर्ण कथेत जाणवतो. अर्थात ही किमया महाभारतकारांची!!
"अजून नाही जागी राधा,
अजून नाहीं जागें गोकुळ;
अशा यावेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ;
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन आपुलें तनमन.
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तों मुरलीरव;
डोळ्यांमधून थेंब सुखाचे :
हें माझ्यास्तव... हें माझ्यास्तव..."
ही कविता वाचताना, आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांमधून साधली गेलेली कविता. इंदिराबाईंच्या कवितेतील विचार आपल्याला स्वतंत्रपणे करायला लावणारी ही कविता. तसे बघितले विस्ताराच्या दृष्टीने या कवितेत प्रतिमाविश्व अतिशय मर्यादित आहे. त्या प्रतिमा, त्यांच्या स्थायीभावाच्या जाणिवेने मर्यादित केले आहे. सरत्या रात्रीची वेळ आणि त्यावेळी भणाणणारा वारा!! या वातावरणाच्या भोवती दिसणारा केशरी चंद्र, कवितेतील वातावरण निर्मिती, हा वेगळा शाब्दिक खेळ असतो. प्रतिमा मोजक्या शब्दात मांडावी आणि मांडताना त्यातील आशय अधिक विस्तारित व्हावा!! हेच इथे नेमकेपणा आपल्याला वाचायला मिळते.
संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. त्या दृष्टीने, सपक, सामान्य पातळीवरील संवेदनाविश्व इंदिरा बाईंच्या कवितेत फारसे कधी आढळत नाही. या कवितेत, अर्थातच निसर्गरूपे आहेत पण ती सहजपणे डोळ्यासमोर दिसणारी नाहीत. आपल्या भाववृत्तीच्या स्पंदनांचे प्रतिबिंबच असे निर्माण केले जाते. अतिशय अरुप अशा भाववृत्तीने जाणवणाऱ्या निसर्गाचे रूप या कवितेत आढळते.
कवितेत प्रतिमा आढळणे आणि त्यातून मूळ आशय वृद्धिंगत होत जाणे, हे भावकवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानावेच लागेल. बरेचवेळा प्रश्न पडतो, वापरलेली प्रतिमा, मूळ भावनेचा आशय अधिक अंतर्मुख होऊन व्यक्त होते की मूळ भावनेला गुदमरवून टाकते? नाकापेक्षा मोती जड, हे तत्व इथे देखील लागू पडते. प्रतिमासंयोजन म्हणजे तरी काय? जीवनात अनेक अनुभव आपणांस येतात. त्यातील काही संवेदनाद्वारे स्वतः:ला आलेले, काही कल्पनेने जाणवलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. काहीवेळा मिश्र अनुभव देखील येऊ शकतात. यातीलच कुठल्याही एकाच्या किंवा एकत्रित अनुभवांचा अर्कभूत परिणाम म्हणजे भाववृत्ती!! तिच्याशीच खऱ्याअर्थाने भावकवितेला नाते जोडता येते आणि ते नाते, प्रतिमांच्या द्वारे सखोल होत जाते.
"कुब्जा" कवितेत, हेच नात्यांचे ताणेबाणे बघायला मिळतात. या कवितेत, इंदिरा बाईंच्या प्रतिमांना ताकद मिळते, ती संवेदनाविश्वाच्या भरीव आणि निकट अशा जाणिवेमुळे. कवितेच्या पहिल्या कडव्यात राधेचा उल्लेख आणि त्याबरोबर "गोकुळ" आणि "मंजुळ पावा" या प्रतिमा आपल्या मनात एक "जमीन" तयार करतात. पुराणकथेचा आधार घेतला तर कुब्जेने विषाचा प्याला घेऊन जीवन संपविले होते. या कृतीचे वर्णन करताना,
" विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तों मुरलीरव;"
किती समर्पक शब्दयोजना आहे. कृष्णाचे नाव देखील कुठे घेतलेले नाही पण "मुरलीरव" या प्रतिमेतून कृष्ण तर उभा राहिलाच पण त्याच बरोबर, "विश्वच अवघे ओठा लावून" या कृतीने आपले अव्यक्त प्रेम व्यक्त केले आहे. बरे, तिची कृती "प्याला पिण्या" इतपत नसून, विष पिताना देखील डोळ्यातून सुख सांडत आहे आणि नुसते सांडत नसून ती भावना केवळ माझीच आहे, हे अधिक महत्वाचे आहे.इथे सगळी कविता कुब्जेची होते आणि सुरवातीची राधा पूर्णपणे लुप्त होते. शेवटच्या कडव्यात जो ताण आहे, तिचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची जाणीव.
इंदिराबाईंच्या कवितेत निसर्ग आहे आणि त्याच्या प्रतिमा देखील आहेत पण त्या प्रतिमा येताना, शब्दाच्या पलीकडील अर्थ दाखवण्याची किमया करतात. परिणाम असा होतो, आशयाचा मनावर होणारा दृढ परिणाम आणि कवितेच्या बांधणीत येणारी सघनता. प्रतिमा वाचताना, आपले संवेदनाविश्व जागे होते आणि त्याबरोबर भाववृत्ती. बाईंच्या कवितेत याच एकात्मतेचे सूत्र आढळते. जो अनुभवाचा क्षण असतो, त्यातील भाववृत्तीच्या अंतर्गत ताणाच्या जाणिवेतूनच तिचा प्रत्यय द्यायचा आग्रह दिसतो. शब्द, शब्दांची विशिष्ट तऱ्हेने घडवलेली गुंफण यांच्यातील अनेक लय त्यांच्या कवितेत साकार होतात. एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे आणि ज्या क्षणी तो अनुभव स्थिर होत आहे, तेंव्हाच त्याला किंचित धक्का द्यायचा. असे करताना, प्रतिमांची उलटापालट करायची, एका प्रतिमेचा परिणाम दुसऱ्या प्रतिमेने पुसून टाकायचा किंवा दोन्हींच्या मिश्रणाने तिसरीच प्रतिमा प्रत्यक्षात आणायची आणि या सगळ्या खेळातून भाववृत्तीचा क्षण साकार करायचा!! कधी कधी एखाद्या प्रतिमेतच टाकलेल्या विरोधी प्रतिमेत भाववृत्ती तोलून घ्यायची आणि अशा संपन्नतेणे घडवलेल्या सौंदयात्मक घडणीतून संवेदनाविश्व आणि भाववृत्ती एकत्र जोडून घ्याची. मी मागे म्हटल्याप्रमाणे, आपल्या मर्यादित भावविश्वाचीच पण अतिशय सखोल आणि गहिरी जाणीव अशाप्रकारे करून द्यायची जेणेकरून इतर घटकांची जरुरी नाही.
"कधी जीवन वाटे वाळवंट वैराण
वा दावाग्नीने घेरीयलेले रान :
होऊन सहन ना हृदयातील काहूर
मी निघू पाहते कुठे...कुठे तरी दूर."
(कधी जीवन वाटे - शेला)
इथे सुरवातीलाच आयुष्यातील विदग्ध अनुभवाची सांगड घातली गेली आहे आणि ती अनुभूती "वैराण वाळवंट","दावाग्नी" अशा प्रतिमांतून मांडली आहे. कवितेच्या सुरवातीला असा रखरखाट दाखवून कवितेची "जमीन" स्पष्ट केली. याच कवितेतील पुढील ओळी बघता,
"थरथरती शेतें, रानपाखरें चिमणी
अन क्षणांत होतें स्तब्धचि वातावरणी.
संपूच नये ही रम्य गोजिरी वाट;
संपूच नये हॅ गंधित हिरवे शेत."
मघाशी मी ज्या "धक्कातंत्राचा" उल्लेख केला तो इथे बघायला मिळतो. सुरवातीची काळोखी अनुभूती, इथे किंचित हळवी, निसर्गप्रतिमा हाताशी घेऊन,तो ताण हलका केला आहे. परंतु संपूर्ण कविता वाचली असता, याच प्रतिमेतून सुरवातीचा भाव किंवा भाववृत्तीचे सखोल दर्शन आपल्याला मिळते. भाववृत्तीतील अनुभवाचे घटक जेंव्हा एकमेकांशी संबद्ध होतात, तेंव्हा त्यांना अंत:केंद्रित करणारे जे सूत्र असते, ते त्या भाववृत्तीचे स्पंदन. या स्पंदनाचा लय म्हणजेच त्या भाववृत्तीचा लय. हा लयच कवितेला भावकविता बनवतो. अर्थात, कवितेतील नादलय ही वेगळी संकल्पना आहे. कविता वाचताना कानांवर आदळणारे शब्दांचे आघात, तो नादलय निर्माण करतात. चांगल्या काव्यात हे दोन्ही घटक एकत्रित झालेले दिसतात तरी मुळात ते दोन भिन्न घटक आहेत.
इंदिराबाईचे काव्य स्वभावत:च सहज, आर्जवी आणि सोपे आहे. मुळात, भावकाव्य हे वैय्यक्तिक अनुभवांची अनुभूती शोधणारे काव्य असते. आधुनिक काव्यात एकूणच "गूढता" या भावच्छटेला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे परंतु या छटेची छाया देखील या कवितेत आढळत नाही. नेहमीचे, वापरातले शब्द वाचायला मिळतात पण मजा इथेच असते, त्या शब्दांची रचना अशा प्रकारे केली जाते की, तोपर्यंत आपल्या मनात जी छटा दृश्यमान असते, तिचे स्वरूपच, ही कविता पालटून टाकते.
एखादा वैय्यक्तिक अनुभव जेंव्हा काव्यरूप घेतो, त्यावेळी तो कवीच्या जाणिवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वतःचे रूप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वैय्यक्तिक अनुभवाशी असलेली "नाळ" तोडणे आवश्यक ठरते.एक इथे ध्यानात ठेवावे लागेल, कुठलेही काव्य, हे एका पातळीवरील संवाद असतो आणि या संवादाचे वाहन भाषेतूनच निर्माण होते आणि हा सामाजिक संकेत आहे. हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, बाईंच्या कवितेतील भावनाशय हा सर्वस्वी त्यांचाच आहे.
"विचारांची घोडदौड
येई उडवीत धूळ,
तुडवीत टापांखाली
मन माझे भयाकूल.
कधी भवसागरात
उठे भीषण भोवरा;
असहाय माझे मन
फिरे त्यात गरगरा.
कधी होई अवचित
निराशेची वारामोड,
उन्मळल्या केळीपरी
मन घेई पुरा मोड.
म्हणुनीच येतां रात्र
मन जाई घाबरून,
भयभीत सशापरी
बसे दडून लपून."
(संग्रह - मेंदी)
वरील कविता वाचताना, संत्रस्त मानसिक अवस्था आणि त्या अवस्थेचे चित्रण, आपल्याला सहज कळून घेता येते. भावकवितेत आशयाची बंदिश किती तऱ्हांनी करता यावी याला भावकविता या रुपाचेच बंधन असते!! काल अमी अवकाश यांच्या अगदी संकुचित अशा क्षेत्रात, अगदी थोड्या घटकांच्या व्दारे अभिव्यक्ती घडवावी लागते. म्हणूनच हे एक क्षितिज गाठल्यावर, त्यानंतरची प्रगती ही अधिकाधिक संमिश्र आणि तरल अशा जाणिवा, जाणवून देणे, हेच असू शकते. ज्या भावच्छटा शब्दांच्या किंचित स्पर्शाने देखील कोमेजतील, त्यांना त्याच शब्दांनी उमलविणे हीच कसोटी इथे असते.
वरील कवितेत अनेक प्रतिमा वाचायला मिळतात पण त्या प्रतिमांची रचना बघण्यासारखी आहे. आशय एकच आहे, मनाची भयभीत अवस्था आणि त्यासाठी योजलेली प्रतीके, "टापाखाली भयभीत"," गरगरणारा भोवरा", "उन्मळलेली केळ" इत्यादी आहेत. या प्रतिकांमधून कवितेत, त्या क्षणाच्या मनाच्या अवस्थेचेच चित्रण केले आहे. संत्रस्त अवस्था खरेच पण त्यातही कमी-जास्त गडद रंग आढळतात आणि त्यातून सगळं परिणाम अधिक गडद होण्यात होतो.
एकूणच इंदिराबाईंच्या कवितेत, करड्या-काळ्या रंगाचा प्रभाव जाणवण्याइतपत प्रभावी आहे. अनुभूतीच्या क्षणाच्याच स्पंदनातून भाववृत्तीचा प्रत्यय ह्या प्रवासाला इथे पूर्तता येते. पहिल्या काही ओळीत, एका खास क्षणाचे स्वतंत्र अस्तित्व दाखवले जाते. एकदा तो क्षण दाखवून झाल्यावर मग, त्या क्षणातून पुढे मनात येणाऱ्या भावनांचे पडसाद बघायला मिळतात. हे करताना, कुठेही आधी जो ताण निर्माण केला आहे, त्याची पकड कुठेही विसविशीत होत नसून, पुढील प्रतीकांच्या साहाय्याने त्या चित्राचे रंग अधिक गडद केले जातात आणि वाचकाचे लक्ष तिथेच संपूर्णपणे केंद्रित केले जाते. "उन्मळल्या केळीपरी" सारख्या निसर्गचित्रातून आधीचीच जाणीव अधिक भीषण, खोलवर केली जाते आणि इथे कविता "स्व" शी संवाद करायला लागते.
तसे बघितले तर या कवितेतली जाणीव, इतर अनेक कवितांमधून आपल्याला मिळालेली असणार मग असे इथे काय वेगळे आहे ? पण, "फॉर्म" आणि "बॅकग्राउंड" यांच्या उलटंपालटीने, संथ चाललेल्या जीवनातील अनपेक्षित आघात नेमका शब्दांकित केला आहे. ही भावस्थिती अनुभवाच्या क्षणातील अंतर्गत ताणांच्या जाणिवेतून साकार झाला आहे.
इंदिराबाईंच्या बाबतीत एक बाब स्पष्टपणे जाणवते आणि ती म्हणजे प्रत्येक काव्यसंग्रहाद्वारे त्यांची अभिव्यक्ती अधिक अंतर्मुख आणि खोल होत गेली आहे.
"सहवास" पासून ते "गर्भरेशीम" पर्यंतचा प्रवास न्याहाळताना, आपले प्रतिमाविश्व तसेच काय ठेऊन आणि मर्यादित ठेऊन देखील, त्यांनी अभिव्यक्तीचा
फार मोठा पट मांडला आहे आणि तो कुणालाही स्तिमित करण्यासारखाच आहे. त्यांच्या कवितेत कधीही आक्रस्ताळेपणा किंवा सामाजिक
बांधिलकी वगैरे कुठल्याच विचारसरणीचा "ढोल" वाजवलेला नाही. बघायला मिळते, ती अत्यंत संयमित तसेच व्यक्तिगत अनुभवाची संपन्न
अनुभूती.
प्रत्येक कलावंताच्या कलाकृतीतून जाणवणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाशी काही ना काहीतरी संबंध असतो.
कारण या दोहोंतूनच त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व आकाराला येत असते. अर्थात, कलेच्या आस्वादाच्या प्रक्रियेत मात्र, वैय्यक्तिक स्तर मागे ठेऊन,
आपल्याला कलेचा आस्वाद घेणे गरजेचे असते. एकतर, या दोन्ही पातळ्यांचा स्वभावत: शोध घेणे असफल ठरते. कारण तिथे कलाव्यवहार
मागे पडतो आणि मानसशास्त्र आणावे लागते. तेंव्हा कलाव्यवहार मानसशास्त्राच्या आधाराने बघायला घेणे, ही अत्यंत निसरडी पायरी ठरू
शकते.
बाईंची कविता वाचताना काही ठराविक मुद्दे आकाराला येतात. बाईंचे व्यक्तिमत्व मूलतः आत्मनिष्ठ, आत्मकेंद्रित आहे आणि याचा परिणाम,
त्यांच्या कवितेतील याचा विचारांना सुसंगत असतात. बाईंचा कलाप्रवास न्याहाळताना, प्रत्येक नवीन काव्यसंग्रहातून, विकसित होत गेलेली
त्यांची आत्मनिष्ठता अवलोकणे, खरोखरच अभ्यासपूर्ण आहे. वर आपण त्यांच्या सुरवातीच्या काळातील काही कविता इथे चर्चेला घेतल्या
होत्या. त्या कविता आणि नंतरच्या काळात आलेला "गर्भरेशीम" या काव्यसंग्रहात जाणिवा, याचा मागोवा विलक्षण आहे आणि या
संग्रहातील प्रतिमादर्शन आणखी विस्मयचकित करून टाकते.
"जागृत देवस्थान, पर्वणीचा दिवस.
प्रवेश द्वारांतून न चालतांच आंत गेले.
पादत्राण सुरक्षाकडे चपला ठेवून मुक्त झालें.
पूजा सांभाळीत पुढें चाललें.
'मामी, घड्याळ सांभाळा.
काकू, पर्स सांभाळा. चेन सांभाळा.'
फिरणाऱ्या पोलिसांचे फिरते घोष ऐकले
सगळें छातीशी घट्ट धरले; पुरती बद्ध होऊन
भयाच्या गळाभर पाण्यांतून पुढें
सरकत चाललें.
गाभाऱ्यासमोर लांबलचक कट्टा. त्यावर
चौके खोललेले बँकेतल्यासारखे. पोस्टासारखे.
ईथे फुलें-दुर्वा. इथें तांदूळ-प्रसाद. इथें पैसे.
इथें कापूर-उदबत्ती. इथें... इथें...
चौक्याचौक्यांतून हजेरी नोंदवताना मधेंच
डोळे दिपले.
विदयुद्दीपांची रोषणाई. चांदीसोन्याचा झगमगाट.
हिऱ्यामाणकांचा लखलखाट....
दिपलेले डोळे किलकिले झाले तेंव्हा मी
बाहेर आले होतें....
दर्शन घडले होतें की नव्हतें?
हात जोडले होते की नव्हतें?
मनात कांहीच नव्हतें
मुकेंमुकेच चालूं लागावें वाटत होतें."
मुद्दामून सगळी कविता इथे लिहिली आहे. कवितेतील आशय स्पष्ट आहे. सध्याचा देवळांचा जो बडिवार
चाललेला आहे, त्याची अत्यंत निराश अनुभूती. कवितेची सुरवात किती संथ लयीत चालली आहे. कुठलातरी
सणासुदीचा दिवस असताना,देवाचे दर्शन घेण्याचा मनसुबा. साधी प्रवृत्ती आणि त्यातून देवळाच्या आवारात
चाललेल्या हालचाली. सगळीकडे गोंगाट आहे, हे दर्शविण्यासाठी,
'मामी, घड्याळ सांभाळा.
काकू, पर्स सांभाळा. चेन सांभाळा.'
फिरणाऱ्या पोलिसांचे फिरते घोष ऐकले.
या ओळींतूनच सगळा परिसर उभा राहिला आणि मनाची द्विधावस्था मांडली गेली. पुढील ओळींतून
देवळातील भयानक गर्दीचे वर्णन, बरेचसे रोखठोक, तसे बघितले सगळी कविता एका रेषेत जात आहे.
एक विविक्षित अनुभव असेच म्हणता येईल पण खरी गंमत येते, कवितेच्या शेवटाला.
"मनात कांहीच नव्हतें
मुकेंमुकेच चालूं लागावें वाटत होतें"
दर्शनासाठी आलो पण अखेर सगळे मन रितेच राहिले आणि त्या निराशेपोटी स्वतः:शीच संवाद साधत
अस्वस्थ मनाने चालत राहावे. याचसाठी सगळं अट्टाहास केलं आहोत का? असा प्रश्न आपल्या देखील
मनात उभा राहतो.
"गर्भरेशीम" संग्रहातील कविता बरीचशी वेगळी आहे, अर्थात आधीच्या कविता संग्रहाच्या संदर्भात. बहुतेक
कवितांमध्ये, इतर संग्रहात जशा प्रतिमा आढळतात, तसा सढळ वापर दिसत नसून, कविता अनुभवाला थेट
भिडत आहे. किंबहुना, बहुतेक कविता स्वानुभवाचीअनुभूती देणाऱ्या आहेत पण तरीही रचनेच्या दृष्टीने
फार वेगळ्या आहेत. ईथे काहीजण कारण नसताना, "सामाजिक" जाणिवेची कविता वगैरे लेबले लावतील,
पण त्याला फारसा अर्थ नाही कारण हा अनुभव फार वैय्यक्तिक स्तरावरील आहे.
इंदिराबाईंच्या कवितेचा आतापर्यंत थोडक्यात धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रतिमाविश्वाचा
मार्ग काढण्याचे धाडस केले. मी "धाडस" मुद्दामून वापरला आहे कारण कुठल्याही कलाकाराच्या
विचारांचा (त्यात प्रतिमाविश्व अंतर्भूत होते) गाभा शोधणे, मुळातच फार कठीण असते. आपण
फारतर अदमास घेऊ शकतो, तर्क लढवू शकतो. त्यापलीकडील शोध हा नेहमीच अर्धुकल्या
अवस्थेत, ठेचकाळत न्याहाळावा लागतो.
असे म्हणतात, आयुष्यातील सगळी दु:खे, आनंद पचवावी लागतात, मग त्यात दुसऱ्याची
दु:खे देखील सखोलतेने पचवावी लागतात. तेंव्हाच कुठे, कधीतरी मनात लिखाणाचे "बीज"
रुजायला लागते. इथेच प्रत्येकाचे संवेदनाविश्व वेगळे होत जाते आणि तदनुषंगाने निर्मिती
देखील. काव्यनिर्मितीच्या बाबतीत हीच जाणीव अधिक अंतर्मुख व्हावी लागते. त्यामुळे बाईंची
कविता वाचताना, एक अनुभव येतो की इंदिराबाई प्रतीक म्हणून पाहायला लागल्या म्हणजे
मग त्या प्रतिमा आपल्याला रायाला लागतात आणि एखाद्या प्रतिमेच्या अनेकवार होणाऱ्या
संपन्न अशा जाणिवेतून आपल्या स्मृतीत ती प्रतिमा राहते, एक प्रतीक म्हणून.
त्यादृष्टीने बघायला गेल्यास, संवेदनांचा प्रवास हा भावनेकडे आणि भावनेशयाचा प्रवास
स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे सुरु असतो. प्रतिमा ही इथे कवितेत अवतरते. बाईंनी शब्दांकित
केलेल्या प्रतिमेच्या जाणिवेतून स्फुरणारा जो अनुभव, तोच अनुभव हीच त्यांची खरी
त्यांची भाववृत्ती. असे आपल्याला म्हणता येईल. इथे संवेदना हाच अनुभव आहे आणि ते
भाववृत्तीचे शरीर आहे. या विशिष्ट भाववृत्तीतील एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या सर्व
घटकांच्या सूक्ष्मतर छटा जाणून घेणे, म्हणजेच बाईंच्या कवितेचा आस्वाद घेणे होय.
अखेर कवितेतील जाणीव म्हणजे तरी काय?ज्या संवेदना आपल्याला होतात, त्याचे
भाववृत्तीत परावर्तन होतानाचा प्रवास!!
आपण कितीही म्हटले तरी हा सगळं प्रवास घडतो, तो अखेर शब्दांच्याच आधारे. त्यांच्या
कवितेत नेहमी भाववृत्तीच्या क्षणातील अंतर्गत ताणाच्या जाणिवेतूनच प्रत्यय देण्याचा प्रयत्न
सतत चाललेला दिसतो. शब्द, शब्दांची विशिष्ट पद्धतीने घडवलेली गुंफण, यांच्यातून अनेक
लय साकार होतात. एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे
आमी ज्यावेळी तो स्वतः:च्या अस्तित्वाने स्थिर झाला असे वाटत असते, त्याचवेळी
धक्का देऊन. तो किंचित हलवायचा आणि ही स्थिरता, अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रगट
करायची - जसे आपण वरील कवितेत (देवस्थान - गर्भरेशीम), कवितेच्या शेवटी अनुभवले.
एखादी मंद लयीतली प्रतिमा निर्माण करायची, तिच्यावर जाणीव हेलकावे घेऊ लागली की
लगेच तिच्या जोडीला अत्यंत अनपेक्षित द्रुतलय टाकायचा आणि त्या बदलाच्या धक्क्यातून
परिणाम साधायचा!! कधी कधी, प्रतिमांची जागाच बदलून टाकायची आणि त्याच्या
मिश्रणातून तिसरीच प्रतिमा उभी करायची आणि या सगळ्या घालमेलीतून भाववृत्तीचा क्षण
साकार करायचा.
यात एक विफलता बेहमी जाणवते. जे पकडायचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला, त्याची इतिश्री
ही कधीच प्राप्त होणार नव्हती. स्वानुभवातून जाणवलेल्या संवेदनाविश्वाचा अवकाश इतका
प्रचंड आहे की तो अशा प्रतिमेच्या चिमटीत कधीच सापडू शकणार नसतो. प्रश्न असतो, आपण
त्यादृष्टीने किती अर्थपूर्ण प्रयत्न करतो? या धडपडीला इतकाच अर्थ प्राप्त होत असतो आणि
मला वाटते, इथे ही धडपड बऱ्याच अंशी अर्थपूर्ण झाली.