Saturday, 17 September 2016

१९९४ ची निवडणूक आणि पुढे!!

साऊथ आफ्रिकेत १९९४ साली, राजकीय मन्वंतर घडवणारी निवडणूक झाली. देशाच्या इतिहासात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रिया कार्यान्वित झाली. अर्थात, या प्रक्रियेची सुरवात १९८८ साली, नेल्सन मंडेला तुरुंगाबाहेर आले आणि सुरु झाली होती. जगभर लोकमताचा रेटा प्रचंड होता आणि त्याचा परिणाम, तिथल्या वर्णद्वेषी सरकारला नमते घ्यायला लागणे. तोपर्यंत या देशाने खूप भोगले, नागरिक म्हणून प्राथमिक हक्कांनाही तिथल्या गौरवर्णीय समाज वगळता, बाकीच्या सगळ्या समाजाला वंचित व्हायला लागले होते. घरे वेगळ्या वस्तीत, दुकाने, हॉटेल्स, अगदी बीचेस देखील वर्णद्वेषी धोरणांचा कित्ता गिरवीत होते. शाळा, कॉलेजेस मधील प्रवेश देखील याच तत्वावर चालत होता. भौतिक सुखाच्या सगळ्या संधी जितक्या गौरवर्णीय समाजाला प्राप्त होत्या, त्याच्या शतांशाने देखील इतर समाजाला मिळत नव्हत्या आणि त्याविरुद्ध नेल्सन मंडेलानी आवाज उठवला, नेतृत्व स्वीकारले, थोडाथोडका नव्हे २७ वर्षे तुरुंगवास भोगला. अर्थात त्यावेळी त्यांच्या सोबतीला केवळ कृष्णवर्णीय नेते नसून भारतीय वंशाच्या लोकांनी देखील सक्रिय भाग घेतला होता आणि आपल्या कुटुंबाची होरपळ स्वीकारली होती. 
या सगळ्या पार्श्वभूमीवर १९९४ साली होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. आता विचार केला तर, ती निवडणूक ANC पक्ष जिंकणारच होता तेंव्हा जरी जगाचे लक्ष असले काय किंवा नसले काय, निकालावर काहीही परिणाम घडणारच नव्हता. यासाठी आपण जरा तिथल्या समाजाची घडी बघणे आवश्यक ठरेल. एकूण लोकसंख्येपैकी ६०% ते ६५% लोकसंख्या ही कृष्णवर्णियांची आहे, २०% समाज गौर वर्णियांचा आहे तर भारतीय वंशाचे लोक १५% ते २०% आहेत. वर्णद्वेषी आणि जुलमी राज्यव्यवस्थेचा परिपाक म्हणून गौर वर्णीय समाज अल्पसंख्येत राहणार, हे सांगायला कुणा राजकीय पंडितांची गरज नव्हती आणि निवडणुकीत तसेच घडले. ANC पक्ष प्रचंड बहुमताने निवडून सत्तेवर आला. निवडणूक झाली आणि कृष्णवर्णियांनी सत्ता काबीज केली. साऱ्या जगाने नेल्सन मंडेलांचे अभिनंदन केले. खरेतर ही प्रक्रिया १९९२ पासून सुरु झाली होती. याचा पहिला परिणाम, साऊथ आफ्रिकेला बाहेरील जगाने सामावून घेणे. १९९२ साली, साऊथ आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणे, ही घटना तिथली वर्णद्वेषी व्यवस्था मोडकळीस आल्याचे द्योतक होती. 
मंडेलांनी सत्ता हस्तगत केल्यावर, सर्वात प्रथम एक फार अतिशय महत्वाची गोष्ट केली. सरकार बनवताना, त्यातील काही महत्वाच्या पदांवर पूर्वीच्या गौर वर्णीय सरकारातील काही सदस्यांना प्रतिनिधित्व दिले. त्यामागे उद्देश हाच होता, या लोकांना प्रशासकीय कामांचा प्रचंड अनुभव होता आणि त्या अनुभवाचा, या नव्या राजवटीस फायदा व्हावा. आधीचे सरकार F.W.D.Klerk याचे होते आणि नव्या राजवटीत, त्यांना उपाध्यक्ष पद देऊन, त्यांचा देखील यथोचित सन्मान राखला. आर्थिक घडी नव्याने बसविणे, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता आणि त्यानुरूप अनेक आर्थिक महामंडळांवर गौर वर्णीय सदस्यांना सामावून घेतले, जेणेकरून नवीन सरकार हे सर्वसमावेशक तर असेलच परंतु कारभार देखील अधिक सुरळीत व्हावा. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे, अत्यंत खडतर संघर्ष करून सत्ता मिळाली तेंव्हा बरेचवेळा पूर्वीच्या जुलमी राजवटीतील नेत्यांच्या विरुद्ध भूमिका घेऊन, त्यांचे निर्दालन करायचे!! आजूबाजूच्या अनेक आफ्रिकन देशांचा इतिहास बघता, अशी घटना घडणे, सर्वमान्य होते आणि इथेच नेल्सन मंडेला यांनी निर्णायक भूमिका बजावली आणि सगळ्या देशात शांतीचे वातावरण पसरवले. त्यावेळी, देशातच नव्हे तर जगात नेल्सन मंडेला यांचा दबदबा पसरला होता. (याचाच अनुचित परिणाम म्हणजे मंडेला यांना "संत" घोषित करणे!!) याचा फायदा उठवताना, मंडेला यांनी देशात कुठेही यादवी माजू दिली नाही आणि हे यश खरोखरच अत्यंत स्पृहणीय असे मानायलाच हवे. वास्तविक जर का मंडेलांनी थोडी तरी "सवलत" दिली असती तर गौर वर्णीय समाजावर, आधीच्या अत्याचाराचा बदला म्हणून अनन्वित अत्याचार घडू शकले असते परंतु अत्यंत हुशारीने, मंडेला यांनी ठाम पावले उचलली आणि धुमसू शकणारा विद्वेष तिथेच थंड केला. हे यश खरोखरच स्पृहणीय आहे. 
निवडणुका झाल्या आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आणि ते साहजिकच होते. आता, आपल्याच देशात आपण कुठेही वावरू शकत होतो, काहीही करू शकतो, ही भावना सुखद होती. अर्थात, एक बाब मात्र हवेत नक्कीच होती. अजूनही वर्णद्वेषी राजवटीचे पडसाद कुठे ना कुठे तरी उमटत असायचे. एक सुंदर स्वानुभवाचे उदाहरण आठवले. १९९५ साली मी "पीटरमेरिट्झबर्ग" या शहरात नोकरी करीत होतो (याच शहरातील स्टेशनवर गांधीजींना गाडीबाहेर ढकलले होते!!) आणि एके संध्याकाळली, मी आणि माझे दोन सहकारी एकेकाळच्या गौरवर्णीय हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. प्रवेश मिळायला काहीच अडचण आली नाही परंतु जवळपास अर्धा तास झाला तरी आमच्या टेबलावर, आमची "ऑर्डर" घ्यायला कुणी आले नाही!! शेवटी अखेरीस एक गौरकन्या आली आणि अत्यंत तुसड्या चेहऱ्याने आमची ऑर्डर घेतली. वास्तविक आम्ही काही मुंबईतील इराण्याच्या हॉटेल संस्कृतीप्रमाणे चहा पाव खायला गेलो नव्हतो. आम्हा तिघांची तशी मोठी ऑर्डर होती पण ऑर्डर दिल्यावर देखील अर्धा तासाने आमचे ड्रिंक्स आले!! त्यानंतरची "रिपीट" ऑर्डर घ्यायला देखील आणखी अर्धा तास लावला गेला. खरेतर एव्हाना आम्हालाच राग यायला लागला होता. बरे असे नव्हते, हॉटेल तुडुंब भरलेले होते आणि त्यामुळे वेट्रेसेस मुलींची तारांबळ उडत  होती. हॉटेलमध्ये आम्ही तिघे वगळता, बाकीचे सगळे गौरवर्णीय ग्राहक होते आणि तिथे अगदी घरगुती पद्धतीने आगत-स्वागत होत होते. आज या घटनेला जवळपास २० वर्षे झाली पण तरीही ही तुसडी वागणूक आजही माझ्या ध्यानात आहे. तसा थोडा मोकळ्या मानाने विचार केला तर, या देशात गौर समाजाने जवळपास दीड शतक राज्य केले, पिढ्यान पिढ्या, फक्त जुलूम केला असल्याने, त्यांची मानसिक घडण देखील तशीच घडत गेली. आता परिस्थिती जरी बदलली तरी, मानसिक बदल तितक्या सहजतेने होत नसतो आणि त्याचेच अनुभव ठिकठिकाणी दिसायचे. एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या वस्त्यांत घर घेणे, ही पुढे कितीतरी वर्षे एक चर्चित "घटना" होत होती. 
हळूहळू कृष्णवर्णीय राजकारणात सक्रिय व्हायला लागले. एक बाब ठामपणे सिद्ध झाली होती, यापुढे साऊथ आफ्रिकेत वर्णद्वेष राहणार नाही आणि लोकशाही तग धरून राहणार. जसे बहुजन समाजाचे राज्य आले तशी अनेक धोरणे तद्नुषंगाने बदलत गेली. इतकी वर्षे शिक्षणाच्या नावाने वानवा होती, ते शिक्षण आता मिळण्यास कसलाच प्रतिबंध नव्हता. नोकऱ्या देखील सगळ्या पदावर मिळू शकत होत्या. त्या दृष्टीने अनेक कायदे बदलण्यात आले आणि जेणेकरून मागासलेला समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा, याची कायद्यान्वये तजवीज करण्यात आली. नवीन राजवटीच्या सुखस्वप्नात सगळे रंगून गेले होते. साऊथ आफ्रिकेची आर्थिक घडी ही मुलत: तिथल्या सोन्यांच्या खाणी आणि पर्यटन व्यवसाय, यांच्या वर आधारलेली होती आणि आजही यात फारसा फरक नाही. जगातील यच्चयावत बडे उद्योगधंदे आपले बस्तान बांधून इथे स्थिरस्थावर होते. बँकिंग व्यवसाय चांगल्याप्रकारे पसरत होता तसेच इंश्युरन्स व्यवसाय देखील. सगळ्या उद्योगात सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळायला लागले. अर्थात यात एक फरक ठळक होता, उच्चपदस्थ नोकऱ्या मात्र गौरवर्णियांनी आपल्याकडे ठेवल्या होत्या आणि ते देखील काहीसे संय्युक्तिक कारण होते. बहुजन समाजात असलेली शिक्षणाबाबतची उदासीनता!! दुर्दैवाने आजही या परिस्थितीत फारसा बदल घडलेला नाही!! 
अर्थात कृष्णवर्णीय राजकारणात सक्रिय व्हायला लागले आणि त्यांच्या महत्वाकांक्षा वाढायला लागल्या पण ही वाढ तशी साहजिक अशीच म्हणायला हवी. मानवी स्वभावच असा आहे, त्याला काय करणार. याचा परिणाम असा झाला, निवडणूक होऊन फक्त २,३ वर्षे झाली आणि लोकमत बदलाची चिन्हे मला बघायला मिळाली. १९९५ साली, मी पीटरमेरिट्झबर्ग शहरात राहात असताना, एका भारतीय वंशाच्या कुटुंबातील लग्नाला हजार राहण्याचा योग्य आला. लग्न आपल्याप्रमाणेच विधिवत झाले. दुसऱ्या दिवशी घरातल्या लोकांसाठी पार्टी होती आणि त्या पार्टीला देखील मला आमंत्रण मिळाले. तिथे मग ड्रिंक्स घेताना, काही वयस्कर मंडळींनी सध्याचे राजकारण, हा विषय काढला. अनेक मतांतरे झाली पण एका बाबतीत एकमत झाले. कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे आणि ही देणगी "नवीन" साऊथ आफ्रिकेची!! हे ऐकल्यावर मी देखील थोडा चमकलो. स्वातंत्र्य मिळून नुकतीच २ वर्षे होत असताना, भारतीय वंशाच्या लोकांना "जुनी" राजवट प्रिय वाटावी!! खरेतर कायदा व्यवस्था बिघडली इतकी काही परिस्थिती नव्हती पण हळूहळू भ्रष्टाचार कारभारात शिरत चालला होता आणि तो प्रामुख्याने कृष्णवर्णीय लोकांच्या सहभागाने शिरत असल्याचे जाणवत होते. वास्तविक, मी मनात तुलना करीत होतो ती, भारतातील भ्रष्टाचार आणि इथला भ्रष्टाचार याची आणि मला तर सगळेच सुव्यवस्थित वाटत होते!! अर्थात तोपर्यंत मला इथल्या समाजातील अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली नव्हती. 
नेल्सन मंडेलांनी अनेक चांगल्या धोरणांच्या घोषणा केल्या आणि नवीन योजना आखताना, त्यांनी समाजाचा समग्र विचार केला होता. अर्थात, कृष्णवर्णीय लोकांसाठी उजवे माप मिळणे क्रमप्राप्तच होते. पुढे काही वर्षांनी काही बाबी ठळक झाल्या. १९९४ च्या निवडणुकांनी देशात स्वातंत्र्याचे वारे सुरु झाले आणि समाज मोकळा व्हायला लागला. परंतु यात एक मेख अशी दडली होती, हळूहळू कृष्णवर्णीय समाजाला अधिक उजवे माप मिळायला लागले आणि यात भारतीय वंशाच्या लोकांची पीछेहाट व्हायला लागली. वरील परिच्छेदात मी इथल्या काही वयस्कर लोकांचे मत सांगितले, याचा रोकडा अनुभव मला नंतर यायला लागला. वर्णद्वेषी काळात, गौरवर्णीय समाज सगळेच ओरबाडून घेत होता आणि इतर समाजाला उष्टे खरकटं ठेवत होते. आता, कृष्णवर्णीयांना संधी प्राप्त झाली आणि गौरवर्णीयांना मागे सरकावे लागले. यात भारतीय वंशाच्या लोकांना काय फायदा मिळाला? स्वातंत्र्य मिळाले पण तरीही इतर समाजाला जे फायदे मिळायला लागले, त्यात वाटेकरी होता येत नव्हते, किंबहुना स्वातंत्र्य वगळता बाकी सोयी, सवलती बाबत वंचिता भोगायला लागत होती. 
धोरणात्मक बाबत लिहायचे झाल्यास, कृष्णवर्णियांना शैक्षणिक सवलती, प्रत्यक्ष फीमध्ये सवलत (साऊथ आफ्रिकेत शिक्षण प्रचंड महाग आहे), घरांसाठी स्वस्त कर्जे - प्रसंगी कर्जमाफी देखील, इत्यादी सवलती कायदे पास करून अधोरेखित केल्या. याचा दूरगामी फायदा नक्कीच झाला. जिथे शाळेची पायरीदेखील चढायची मारामार असायची तिथे "मॅट्रिक" परीक्षेपर्यंत मजल गेली, काही तर पुढे युनिव्हर्सिटीत जाऊन, प्रत्यक्ष डिग्री घेऊन आले. एक मुद्दा, इथे डिग्रीला भरपूर मान आहे. आपल्याकडे ज्या हिशेबात सरसकट "बी.कॉम.","बी. एस्सी" जसे होतात, तसा प्रकार अजूनपर्यंत तरी नाही. त्याचा परिणाम, युनिव्हर्सिटी डिग्री ज्यांनी मिळवली, त्यांना मानाच्या नोकऱ्या मिळाल्या. हा फरक तर लक्षणीय होता. एकेकाळी गौरवर्णीय लोकांनी आपल्या "स्वतंत्र" वस्त्या वसवल्या होत्या (अर्थात आलिशान, दिमाखदार वस्त्या होत्या - पुढे मी देखील अशा वस्तीत घर घेऊन राहिलो होतो) त्या ठिकाणी आता, भारतीय वंशाचे तसेच कृष्णवर्णीय लोक सहजतेने घर घेऊन, प्रसंगी बांधून राहायला लागले, भौतिक सुखाच्या दृष्टीने तर हा फरक फार मोठा होता. 
मंडेलांनी नवीन सासमाजिक कायदे बनवून घेतले आणि वर्णवर्चस्वाचा कायदा कायमचा रद्दबातल करून टाकला. हा मुद्दा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. काही राज्ये, शहरे यांची नावे बदलली ( अर्थात, अजूनही जुन्या नावानेच उल्लेख होतो, हा भाग वेगळा) उदाहरण द्यायचे झाल्यास, "प्रिटोरिया" शहराचे नाव "Tshwane" असे केले पण आजही हे शहर, प्रिटोरिया या नावानेच ओळखले जाते. आर्थिक कायदे मात्र फारसे बदलले नाहीत. १४% VAT हा गोऱ्या लोकांनी ठरवलेला होता आणि आजही त्यानुसारच कर आकारणी होत असते. आपल्याकडे GST या धर्तीवर आणायचा प्रयत्न चालेल आहे. तसेच Income Tax, Wealth Tax अशा काही मूलभूत कायद्यात कर आकारणीचे प्रमाण अजूनही फारसे बदललेले नाही. परिणाम उत्पन्नाचा फार मोठा भाग कर रूपाने कापला जातो, परंतु आजही, हा पैसा Social Welfare च्या नावानेच खर्च केला जातो. बहुतेक प्रगत देशांत Social Welfare हा फार मोठा खर्चाचा भाग असतो आणि तो नेहमीच Personal Tax, Corporate Tax मधूनच वसूल केला जात असतो. 
गोऱ्या लोकांनी या देशातील Infrastructure मात्र, माझ्यासारख्याला असूया वाटावी इतक्या अप्रतिम पद्धतीने उभारलेले होते आणि त्यात अणुमात्र बदल, मंडेला सरकारने केला नव्हता आणि त्याची तशी गरजच नव्हती. मुळात या देशाची हवा वर्षभर, (२,३ महिने वगळल्यास) थंड असते (म्हणूनच युरोपमधील गोरे इथे कायमचे राहायला आले)  त्यातून इथले रस्ते हा भारतीयांच्या दृष्टीने कायमचा संशोधनाचा विषय ठरावा!! याचा परिणाम असा झाला, वातावरणात धुळीचा संसर्ग नाही. अर्थात ही नैसर्गिक देणगी, गोऱ्या लोकांच्या सरकारने अधिक वृद्धिंन्गत केली (१९९४ च्या निवडणुकीत गोऱ्या लोकांचा हाच ठळक मुद्दा होता).  थोडक्यात सांगायचे झाल्यास, सुरवातीचा काळ खरोखरच स्वप्नवत असाच होता आणि याचे संपूर्ण श्रेय, हे नेल्सन मंडेला यांनाच जाते. 
१९९९ साली मंडेला सत्तेवरून पायउतार झाले. वास्तविक त्यांनीच अमेरिकन कायद्याच्या धर्तीवर, अध्यक्ष पदाची मुदत जास्तीत जास्त २ टर्म्स, म्हणजे १० वर्षे, असा कायदा करून घेतला होता (खरे सांगायचे झाल्यास, वर्णद्वेषी काळात देखील हीच पद्धत होती) आणि १९९९ साली, त्यांची केवळ ५ वर्षे झाली होती आणि देशात त्यांच्या शब्दाला प्रचंड मान होता. त्यांनी मनात आणले असते तर दुसरी टर्म सहज उपभोगली असती. परंतु त्यांनी आपला साथीदार Thabo Mbeki याला खुर्ची खाली करून दिली आणि जगासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण करून ठेवला. 
आज जेंव्हा सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे, तेंव्हा एक बाब ठळकपणे जाणवते, १९९४ च्या निवडणुकीनंतर कृष्णवर्णियांच्या "मूलभूत" वृत्तीनुसार गोऱ्या लोकांवर अत्याचार होणे क्रमप्राप्तच होते परंतु मंडेलांनी परिस्थिती नेमकी जाणून घेऊन, परिस्थितीला अत्यंत संयमितपणे हाताळले  आणि गोऱ्या लोकांच्या मनात देखील विश्वास निर्माण केला. याचा दुसरा परिणाम असा झाला, देशात इन्व्हेस्टमेंट भरपूर व्हायला लागली. इतकी वर्षे "पालन पोषण" हे ठराविक वर्गाचे होत असल्याने, फारशी आर्थिक चणचण जाणवत नव्हती पण आता परिस्थिती बदलली आणि संपूर्ण समाज आता प्रत्येक धोरणात बसविणे अगत्याचे होऊन बसले आणि तिथेच Capital Investment अत्यावश्यक होऊन बसली. मंडेलांनी प्रसंगी वैय्यक्तिक संबंध वापरून, विशेषतः अमेरिकेडून भरपूर सवलतीच्या दरात इन्व्हेस्टमेंट देशात आणली. पुढे अर्थात ब्रिटन, जर्मनी यांनी देखील हातभार लावला. याचा परिणाम, सामाजिक समृद्धता वाढीस लागली. कृष्णवर्णीय हळूहळू राज्यकारभारात पारंगत व्हायला लागले. हे सगळे पहिल्या ५ वर्षांत घडत गेले. मंडेला जोपर्यंत सत्तेवर होते, तोपर्यंत तरी "सुरक्षा" हा शब्द भीतीदायक नव्हता. या निमित्ताने एक सुंदर उदाहरण देतो. १९९४ मध्येच, मी पीटरमेरिट्झबर्ग शहरात असताना, आम्ही ३,४ भारतीय (आम्ही हे सगळे भारतातून नोकरीसाठी इथे आलो होतो) एका शनिवारी, इथल्याच एका प्रसिद्ध नाईट क्लब मध्ये गेलो होतो आणि मध्यरात्र उलटल्यानंतर, आम्ही जवळपास १ किलोमीटर चालत घरी गेलो!! १९९४ साली सुरक्षतेचा प्रश्न इतका भयावह नव्हता तरी त्या रात्री आम्ही चालत घरी गेलो, ही बातमी ऑफिसमध्ये सोमवारी समजली (कुणीतरी ओळखीच्याने आम्हाला बघितले असणार) आणि लगेच आम्हाला असले काही कृत्य करू नये, असा काळजीच्या स्वरात सल्ला मिळाला होता. खरेतर आम्ही सगळेच भारतातून नुकतेच या देशात आलो होतो आणि भारतात, मुंबईत रात्री चालत येणे, हा प्रकार काही धक्कादायक नव्हता. 
Thabo Mbeki सत्तेवर आले आणि खऱ्याअर्थी "नवीन" साऊथ आफ्रिकेची चुणूक दिसायला लागली. नेल्सन मंडेला यांनी तर सार्वजनिक व्यवहारातून देखील अंग काढून घेतले होते. वास्तविक मंडेला यांचे जे कुणी सहकारी, वर्षानुवर्षे तुरुंगात सडत राहिले, त्यात Thabo Mbeki यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल आणि त्यांनी सोसलेल्या हालाबद्दल समाजात नक्कीच अनुकंपा होती. फरक पडला तो राज्यव्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा. मंडेलांनी प्रसंगी, त्यांच्या बायकोला - विनी मंडेलाला आपल्या आयुष्यातून तिलांजली द्यायला जरा देखील मागे पुढे बघितले नाही ( वास्तविक या बाबतीत मंडेला हे काही धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ नव्हते परंतु राज्य महत्वाचे मानताना आणि तिथे बायकोची आडकाठी येत आहे, असे दिसत असताना, त्यांनी तिची जराही गय केली नाही) Mbeki मनाने काहीसे मवाळ निघाले आणि हळूहळू त्यांचा ताबा ढिला व्हायला लागला. ही सामाजिक घसरण कमालीच्या वेगाने होत राहिली आणि केवळ २ वर्षांत, जोहान्सबर्ग सारख्या महाकाय महानगरातील सेंट्रल सिटीमधील २ पंचतारांकित हॉटेल्स, केवळ असुरक्षितता, या कारणास्तव बंद झाली. जोहान्सबर्ग शहर तर प्रचंड असुरक्षित झाले, इतके की संध्याकाळी सेंट्रल सिटी मध्ये पायी फिरणे केवळ अशक्य, अशी परिस्थिती झाली आणि याचा परिणाम, सर्वात आधी तिथल्या या अत्यंत महागड्या पण अतिशय प्रतिष्ठित अशा हॉटेल्सच्या धंद्यावर झाला!! एकतर, साऊथ आफ्रिकेत, जोहान्सबर्ग शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी जशी आपल्याकडे मुंबई आहे. त्यामुळे बहुतांशी सगळे बडे उद्योगधंदे याच शहरात. याचा परिणाम असा झाला, जोहान्सबर्ग शहरात भरपूर पैसा मिळवण्याच्या संधी प्राप्त होत गेल्या, यात आजही फरक नाही. त्यामुळे या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण, प्रमाणाच्या बाहेर वाढत गेले. मी २००६ साली प्रिटोरिया शहरात नोकरीसाठी आलो आणि मला हा फरक प्रचंड प्रमाणात जाणवला - जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, ही दोन "जुळी" शहरे आहेत. अर्थात जोहान्सबर्ग आकारमानाने अवाढव्य आहे - त्यात कमीतकमी ३ मुंबई शहरे बसतील म्हणजे आवाका ध्यानात यावा. वास्तविक २००० च्या सुमारासच Mbeki यांनी, Black Empowerment नावाचा कायदा आणला, आपल्याकडील दलित आरक्षणाची आठवण यावी, याच धर्तीवर आणि त्या योगे कृष्णवर्णियांना नोकरीच्या अधिक संधी प्राप्त व्हाव्यात, असाच हेतू होता. 
या कायद्यान्वये कृष्णवर्णियांना नोकरीच्या संधी प्राप्त होत होत्या पण गुन्हेगारी कमी होण्याचे चिन्ह कुठेच दिसत नव्हते. Rape, Mugging. Robbery हे गुन्हे नित्याचे व्हायला लागले. एकेकाळी न्यूयॉर्क शहरातील गुन्हेगारीच्या कथा वाचायला/चित्रपटात बघायला मिळत होत्या, त्याचेच प्रत्यंतर, विशेषतः: या दोन शहरांतून दिसायला लागले. जोहान्सबर्ग शहरात Sandton नावाचे उपनगर आहे, भौतिक सुखाची परमावधी म्हणजे हे उपनगर!! या उपनगराच्याच बाजूला, (दोनही उपनगराच्या सीमा एकमेकांना चिकटून आहेत) Alexandra नावाचे उपनगर आहे. जगातील यच्चयावत गुन्हेगारीचे नंदनवन!! बहुतांशी भाग हा कृष्णवर्णियांनी व्यापलेला आहे आणि त्याच जोडीला इथे "कलर्ड" नावाची तितकीच विधिनिषेधशून्य अशी जमात आहे. एक उदाहरण देतो, २००५ साली, पोलिसांनी या भागावर धाड टाकायचे ठरवले पण त्यांनी सोबत मिलिटरी सहाय्य्य मागितले आणि ते देखील वरून Air Shelter घेऊन!! अर्थात इतके होऊन देखील, इथली गुन्हेगारी शतांशाने देखील कमी झाली नाही!! शेवटी, हा भाग गुन्हेगारी भाग म्हणून सरकारनेच घोषित करून टाकले आणि हात टेकल्याची भावना व्यक्त केली!! 
या देशात मी उणीपुरी १७ वर्षे काढली आणि त्याचा परिणाम असा झाला, इथल्या बहुतेक सगळ्या समाजाचे अंतरंग मला फार जवळून अनुभवता आले. रक्ताचाच गुण आहे की काय हे कळत नाही पण, कृष्णवर्णीय लोकांना अंगमेहनतीची कामे आवडतात पण बौद्धिक कामे म्हटले की पाय मागे!! हे मी अगदी खालच्या स्तरावरील लोकांचा अनुभव घेऊन सांगत आहे. आज, अनेक कृष्णवर्णीय, फार वरच्या पदावर सक्षमपणे कामे करीत आहेत आणि त्यांच्या बुद्धीबद्दल संशय घेण्याचे काहीच कारण नाही.. १९९२/९३ मध्ये मी लागोस-नायजेरिया मध्ये दोन वर्षे नोकरी केली. हा देश तर संपूर्णपणे कृष्णवर्णियांचा परंतु ऑफिसकामासाठी सक्षम माणूस मिळणे दुरापास्त!! भर ऑफिसवेळेत देखील, डेस्कवर डोके ठेऊन झोपण्याची अलौकिक कला सध्या झालेली असते!! बरे काही बोलायची कसलीच सोय नाही कारण हा त्यांचा देश!! दिलेले काम नाकारणे किंवा अति संथपणे करणे, यात आपण काही चूक करत आहोत, याची साधी जाणीव देखील आढळत नाही आणि साधारणपणे २००० नंतर या वृत्ती भरमसाट प्रमाणात वाढायला लागल्या. एका बाजूने आपल्या मिळालेल्या हक्कांची नको तितकी कडवी जाण ठेवायची परंतु त्याबदल्यात, आपण ज्या ऑफिसचा पगार घेत आहोत, त्या बद्दल तुसडेपणा दाखवायचा!! आता तर याबाबतीत भारतीय वंशाचे लोक देखील, आपण याच स्पर्धेत आहोत, याची जाणीव करून देतात!!  
कायद्याने आरक्षण दिले पण उद्दामपणा जराही कमी झाला नाही. मला पुस्तकी शिक्षणाची जरादेखील जरुरी नाही, हाच यांचा खाक्या असतो. अशा परिस्थितीत गुन्हेगारी वाढणे क्रमप्राप्तच होते. भारतीय वंशाचे लोक मात्र आता युनिव्हर्सिटी शिक्षणाला प्राधान्य द्यायला लागले आहेत. त्यांना देखील शैक्षणिक खर्चात बऱ्याच सवलती प्राप्त होत आहेत. कामाच्या बाबतीत, कृष्णवर्णियांपेक्षा भारतीय वंशाचे लोक बरे, अशी परिस्थिती आहे. आडमुठेपणा करतात पण जरा शांतपणे समजावून सांगितले तर समजून घेतात. आता याबाबत एक मुद्दा ठामपणे मला ऐकायला मिळाला. इतकी वर्षे इथल्या लोकांनी फार सहन केले तेंव्हा याचा परिपाक आता दिसत आहे. एकवेळ हा मुद्दा एका मर्यादेपर्यंत ग्राह्य धरला तरी ज्याप्रमाणात इथे घसरण होत आहे ( मी १९९४ साली इथे आलो तेंव्हा US $ 1 = SA Rand 3.3 हा चलनाचा दर होता, जो आज SA Rand 14/15 हा झालेला आहे!!) भ्रष्टाचार तर दिवसेंगणिक फैलावत चाललेला आहे. इतकी वर्षे भ्रष्टाचार वरच्या पातळीवर चालत होता, पण आता भारताप्रमाणे चिरीमिरीसाठी देखील पैसे खाण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे आणि याची झळ सामान्य माणसांना निश्चित बसते.मला १९९९ साली या देशाचे नागरिकत्व प्राप्त झाले आणि त्यासाठी मला तिथल्या Home Affairs (हेच डिपार्टमेन्ट, व्हिसा, नागरिकत्व इत्यादी बाबी सांभाळते) एका कृष्णवर्णीय ऑफिसरने मदत केली होती. त्यानिमित्ताने, एके दुपारी मी त्याला भेटलो आणि त्याला एक स्कॉच बाटली दिली. प्रथम त्याने ही भेट स्वीकारायला नकार दिला पण मीच त्याच्या गळ्यात मारली. आज तोच अधिकारी इतका भ्रष्टाचारी झाला आहे, की २००९ मध्ये एकाचे साधे वर्क परमीट रिन्यू करायचे तर त्याने चक्क US $ ५०० मागितले आणि माझ्या त्या मित्राला द्यायला लागले!! अर्थात त्या मित्राला, त्याच्या कंपनीकडून पूर्ण भरपाई मिळाली पण तो भाग वेगळा!! 
आता त्यांच्या हातात संपूर्ण सत्ता आहे आणि ती सत्ता कशी वापराची, याचे नेमके भान आलेले आहे. 
Black empowerment policy ने तर आता भयानक वळण घेतलेले आहे. एकतर ही पॉलिसी केवळ सरकारी नोकऱ्यांपुरती मर्यादित नसून खासगी उद्योगधंद्याला देखील लागू आहे. यात एक नियम असा आहे, जर का कंपनीचा टर्नओव्हर Rand ५० मिलियनच्या वर असेल (खासगी उदयॊगाबाबत हा नियम आहे) तरच तिथे Black Empowerment कायदा लागू होतो. याचा परिणाम असा झाला, ज्या कंपन्यांचा धंदा मध्यम प्रतीचा आहे, त्या सगळ्या कंपन्या हातचलाखी करू लागल्या आहेत तसेच शक्यतो नोकऱ्या कनिष्ठ दर्जाच्या असतील, त्याच कृष्णवर्णीयांसाठी राखून ठेवायला लागल्या!! अर्थात बड्या उद्योगधंद्यात देखील थोड्याफार प्रमाणात असलाच प्रकार चालतो. त्यामुळे प्रश्न असा उभा राहिला आहे, केवळ कायदा पास करून ही विषमता घालवता येईल का? इथे भांडवलशाही योग्य की समाजवादी पद्धत योग्य, हा प्रश्नच उद्भवत नाही. आरक्षणामागील उद्देश चुकीचा नव्हता पण त्याची राबवणूक फार चुकीच्या प्रकारे होत गेली आणि विषमतेमधील दरी अधिकाधिक रुंदावत गेली आणि पर्यायाने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत गेले!! याचे मुख्य कारण म्हणजे, भाकरी का करपली किंवा घोडा का बसला? या उक्तीत सापडते!! जेंव्हा कायदा केला त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फरक पडत गेला आणि बदलत्या परिस्थितीनुरूप कायद्याचे स्वरूप बदलले नाही आणि तो कायदा वठल्याचे स्वरूप धारण करून राहिला. 
दुसरे असे झाले, या देशात स्वातंत्र्य आले पण त्याबरोबर "माणूस" सुधारण्याचे जरादेखील प्रयत्न झाले नाहीत. त्यावेळी जी सामाजिक घडी होती, जे सांस्कृतिक वातावरण होते, त्यात कसलाच बदल केला गेला नाही. नेल्सन मंडेलांच्या कार्याचे मूल्यमापन करताना, हा मुद्दा विशेष करून ध्यानात ठेवायला हवा. त्यावेळचा कृष्णवर्णीय समाज जसा होता, तसाच स्वीकारला गेला आणि त्यांना सहजगत्या सुविधा मिळत गेल्या!! त्याची किंमत, त्या समाजाला फारशी कळलीच नाही. सुविधा सहजगत्या मिळत आहेत म्हटल्यावर कशाला मेहनत घ्यायची? हा विचार अधिक प्रबळ झाला!! हे दुर्दैव आहे पण जळजळीत वास्तव आहे. आरक्षण देण्याची ही किंमत, आता हा देश भयानक पद्धतीने चुकवीत आहे. याचा परिणाम इतर समाजावर व्हायला लागला आहे. 
१९९४ साली प्रचंड बहुमत प्राप्त करणारा, ANC पक्ष, आज झपाट्याने आपली लोकप्रियता गमावत आहे. त्यामुळे दुसरा भयानक प्रश्न उद्भवत आहे, जर का याच गतीने या पक्षाची घसरण सुरु राहिली तर त्या पक्षाची जागा घेणारा जो कुठला पक्ष यईल, (हे थोडे अवास्तव आहे, निदान आज तरी) त्याच्या हातात कुठल्या स्थितीतील देश येणार आहे? आरक्षण देऊन आता जवळपास, २० वर्षे होऊन गेली आणि जर का आढावा घेतला तर परिणाम भयावह आहे. साधे उदाहरण, Price Waterhouse, Earnst & Young सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांना प्रशिक्षित Chartered Accountant ची चणचण भासत आहे, म्हणजे जोहान्सबर्ग, प्रिटोरिया इथे नव्हे पण, Rustenburg, Pietermaritzburg सारख्या मध्यम आकाराच्या शहरात हे नक्की जाणवत आहे. याचा एक अर्थ असा घेता येतो, इथे हळूहळू कुशल कामगारांची चणचण वाढत जाणार पण त्याबरोबर Black Empowerment मुळे त्या वाढीला मर्यादांचे बंधन पडणार. गोऱ्या लोकांनी जी मेहनत घेऊन, इथे अप्रतिम infrastructure चे जाळे निर्माण केले, त्याला हळूहळू ग्रहण लागायला लागले आहे. याचा अर्थ असा नव्हे, देशाच्या ऱ्हासाला सुरवात झाली आहे पण त्या दृष्टीने वाटचाल मात्र सुरु झाली आहे. वाईट याच गोष्टीचे वाटते, आफ्रिका खंडातील सर्वात प्रगत देशाची घसरण सुरु झाली. इच्छा इतकीच, इतर आफ्रिकन देशांप्रमाणे इथे "टोळी युद्ध" आणि "यादवी" माजू नये!!

No comments:

Post a Comment