Thursday, 25 August 2016

आरतीप्रभू

आरतीप्रभू उर्फ खानोलकर, यांच्या कवितेविषयी लिहायला सुरवात करण्यापूर्वी, मला त्यांच्या एकूणच साहित्यप्रकृतीवर प्रकाश टाकून पुढे, त्यांची ही प्रवृत्ती त्यांच्या साहित्यात कशी ठळकपणे दिसायला लागली, याचा अदमास घेता येईल. खरेतर कलाकाराच्या वैय्यक्तिक आयुष्याचा त्याच्या कलाकृतीशी संबंध असतोच असे नाही पण काहीप्रमाणात तरी वैय्यक्तिक आयुष्य त्यांच्या कलाकृतीत डोकावत राहते, हे मान्यच करायला हवे. माझा प्रयत्न, त्यांच्या वैय्यक्तिक आयुष्याचा ताळेबंद मांडण्याची नसून, सुरवातीपासून त्यांची जी विचारसरणी होती, त्या विचारसरणीचा प्रभाव आणि विस्तार कशाप्रकारे त्यांच्या कवितेत होत गेला, याचा मागोवा घेण्याकडे आहे. 
प्रतिभा आणि त्याच्या आविष्कार हा त्याच्या कलाकृतीतूनच बघावा. प्रतिभेचा प्रवास पडताळून बघणे जिथे प्रत्यक्ष कलाकाराला देखील अशक्य असते तेथे आपल्या सारख्या त्रयस्थाला तर अजिबात जमणारा नाही. कलाकृती प्रत्यक्ष समोर आल्यावर, त्या कलाकृतीच्या सत्यतेची, दर्जाची पारख करणे शक्य असते परंतु टी कलाकृती, कलाकाराच्या मनात कशी "जन्माला" आली, हे मजानुन घेणे जवळपास सर्वथैव अशक्य कोटीतील बाब ठरते. त्यादृष्टीने प्रतिभेचा शोध हा नेहमीच चकवा देणारा असतो आणि इथेच आपण "नियती" शरण व्हायला लागतो. अशावेळेस वाटते, "आत्मस्वातंत्र्य" म्हणजे काय? खरंच आपल्याला "आत्मस्वातंत्र्य" म्हणून काही मिळते का? जर तसे काही मिळत असेल तर मग "नियती" शरण या शब्दाला किती अर्थ आणि महत्व आहे? खानोलकरांच्या साहित्यात आणि पर्यायाने कवितेत मला वाटते हाच भाव सर्वत्र पसरलेला आढळतो. "आत्मस्वातंत्र्य" आणि "नियती",यांचा खानोलकरांच्या कवितेत किती प्रभाव आहे, हेआपण त्यांच्या कवितेतून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु याचाच परिणाम असा दिसतो, इथे सतत शोधाचा प्रयास चालू आहे पण त्या शोधातून आपल्याला काय मिळणार आहे, याबाबत अनभिज्ञता आणि जरी अदमास घेता आला तरी पुढील वाटचाल ही अंधारात ठेचकाळत वाट शोधण्याइतपत मर्यादित आणि ती देखील, धुक्यातून प्रवास केल्यासारखी.
वास्तविक खानोलकरांनी, "कादंबरी","नाटक", "कथा" इत्यादी साहित्य माध्यमांत लिखाण केले तरी या सगळ्यातून, त्यांच्यातील कवी सतत आपल्यापुढे येत असतो. कथेत देखील एखादी प्रतिमा खेळवत ठेऊन, कथेला अनेक अंगानी व्यामिश्र परीणाम घेऊन, वाचकाला खिळवून ठेवायचे, हाच उद्देश स्पष्ट दिसतो. त्यामुळे, आपण खानोलकरांना "कवी" याच अधिक ओळखतो. 
आरतीप्रभूंच्या कवितेतील अनुभव काहीवेळा विस्कळीत वाटतो याचे कारण, कवी बरेचवेळा एखाद्या सूत्राला धरून काहीतर, असे वाटत नाही. सुरवातीला एक सूत्र असते पण पुढे त्यात अनेक वेगवेगळ्या प्रतिमा अवतरतात आणि बरेचवेळा  वाचक काहीसा चक्रावून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुष्कळदा जागृत मनाच्या राजरस्त्याने पुढे न सरकत संज्ञाप्रवाहाच्या भूमिगत प्रवाहाबरोबर ते पुढे सरकतात आणि मध्येच कवितेतील मूळ संकल्पना नजरेस आणून, वाचकांना बिचकवतात. पण हे सगळे करताना, अनुभवांच्या रचनेच्या मूळ तत्वांना ते डावलत नाहीत. कवितेतील सगळेच अनुभव बांधेसूद असतात. ते डावलतात ते अनुभवांच्या रचनेविषयीच्या संकेतांना. त्यामुळे, त्यांच्या अनुभवांची रचना जराशी अस्वाभाविक वाटली तरी तरी ती, त्या प्रत्यक्ष अनुभवांपुरती अधिक स्वाभाविक असते, असे आपल्याला म्हणता येईल. 

"चिरा लाल नि सिमेंट ढवळे 
त्यांतुन फुटते डहाळ हिरवी; 
कळसाआधी भिंत अनावर 
दचकून होते इथें ओणवी. 

घुमवयाचे गगन खोलवर 
तिथें चिमुटभर घुमते गाणें;
तुटते चिंधी जखमेवरची 
आणिक उरते संथ चिघळणे. 

चिरा लाल नि सिमेंट ढवळे
त्यांतून कैसे निघतील बगळे?
म्हणून माझ्या पायधुळीची 
गिरकी जाते कळसापरती..."
(गिरकी जाते कळसापरती - जोगवा) 

नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. मागे मी म्हटले होते त्याप्रमाणे  ही शब्दांमधून. आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे तर सगळे खरंच असते पण ते गृहीत धरावे लागते कारण त्यांचीही जाणीव होते, ती अखेर शब्दांमधूनच!! एकदा आशय गृहीत धरल्यावर, कवीने पुढे काय, हे पडताळणे सर्वार्थाने महत्वाचे असते आणि इथे परीक्षा असते, ती भाषेशी, तिच्या घटकांशी आणि घडणीशी. 
आरतीप्रभू इथे, सुरवातीला गद्यमय शब्द वाटतील इतक्या रोकड्या प्रतिमांतून कवितेला आरंभ करतात. सिमेंट, चिरा सारख्या शब्दांतून सुरवात करून, "कळसाआधी भिंत अनावर, दचकून होते इथें ओणवी. "  इथे एकदम काहीसे धक्कातंत्र वापरून कवितेची "जमीन" तयार होते. 
पुढील ओळी खऱ्याअर्थाने कवितेचा आशय व्यक्त करतात आणि कवी म्हणून आपण किती खोलवर विचार करून शकतो ,याची अप्रतिम प्रचिती देतात. एक व्यथा, एक खंत मनाशी बाळगून आयुष्य पुढे चाललेले आहे आणि तो अनुभव देताना, "तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे." अशी असामान्य प्रतिमा वापरतात. वास्तविक, जखम होणे, रक्त गळणे हे आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक वेळा घडत असते परंतु खानोलकरांनी "नजर" अशा वेळी प्रगट होते आणि तीच कृती, आधीच्या ओळीच्या अनुभवाशी जोडून घेताना, सगळीच कविता फार वरच्या पातळीवर नेऊन ठेवली जाते.
खानोलकर आपल्या कवितांमधून असाच "अनपेक्षित" पणाचा धक्का वारंवार देतात आणि आपल्या सृजनशक्तीचा प्रत्यय घडवतात. त्यामुळे मला नेहमी असेच म्हणावेसे वाटते, आरतीप्रभूंची कविता, हे त्यांचीच असते, त्याच्यावर त्यांची खास "नाममुद्रा" असते, तिचा "तोंडवळा" वेगळा असतो. ती तथाकथित सामाजिक जाणीव, विद्रोह यांच्या पासून दूर आहे तसेच मानवी प्रगती आणि तिच्या समस्या वगैरेंशी दुरान्वये देखील संबंध ठेवत नाही. 

मुळात आरतीप्रभूंचे लेखन हे वाचकाला आरपार झपाटून टाकते, प्रसंगी हेलपाटून देखील टाकते. अनुभवाची खोली जितकी शक्य आहे, तितकी दाखवण्याचा असामान्य प्रयत्न सतत चाललेला असतो. हीच त्यांच्या अभिव्यक्तीची खासियत म्हणता येईल. इथे आपण, उत्तरोत्तर त्यांची प्रतिभा कशी विकसित होत गेली आणि तशी होताना, वाचकाला आपल्याबरोबर खेचून घेण्याची अद्भुत ताकद, या दोन प्रमुख मुद्द्यांचा विचार करावा लागेल. कवितेसारखे अत्यंत अल्पाक्षरी माध्यम हाताशी घेऊन, प्रतिमांच्या साहाय्याने आशयाची व्याप्ती जी दाखवली जाते आणि त्यामुळे एकूण कविताच कशी समृद्ध होत जाते, हे बघणे अधिक श्रेयस्कर ठरते. 

"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
कुठे उतरावे? कशासाठी तंबू ठोकून? 
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून? 
या सगळ्याचा हिशेब ठेवायचा कुणी?
मनांतल्या मनात कुजून जगतात कुणी 
गुलाब राहतील तरीही ताजे. 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

इथले सगळे दिवे विझून जातात,
अंधारांत वृक्ष गोठून झडत राहतात,
कुणी करतात प्रीत, कुणी करतात पूजा,
कुणी खोकत खोकत जीवनाशी पैजा 
मारून म्हणतात : आम्ही राजे!
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. 
कुणी देतो एक हळी, त्याचाच पडतो बळी,
हारासारखे हौतात्म्य त्याच्या येते गळी,
त्याचे त्याला माहित पंजे. 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?"
(कुणाच्या खांद्यावर - नक्षत्रांचे देणे) 
कवितेचा आशय अगदी स्पष्ट आहे, आयुष्यातील अत्यंत निराशावस्थेतील अभिव्यक्ती आहे, अगदी टोकाची वाटावी अशीच आहे आणि त्यासाठी, "दिवे विझून जाणे" किंवा "वृक्ष झडत जाणे" अशा अगदी वेगळ्या आपल्याला सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा वापरल्या आहेत. अशा कवितांमधून कवीची खरी अभिव्यक्ती समजून घेता येते. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणिवेची प्रतीती देते आणि ती देताना वाचक काहीसा झपाटला जातो. या कवितेतून काही मूलभूत प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे. नियती आणि आत्मस्वातंत्र्य ह्यांचे खरे स्वरूप काय? त्यांचे नाते काय? नियती म्हटले की तिच्यामागे काहीतरी "नियंत्रण" करणारी शक्ती परंतु स्वतः: मात्र त्यापासून मुक्त, स्वयंभू अशी शक्ती मानावी लागते पण तशी कुठली शक्ती जाणवते का? तर तसे काहीच नसते. आपण फक्त, आपले जीवन घडविता येण्याच्या अनेक शक्यतांचा शोध घेत असतो पण याचाच वेगळा अर्थ, अंशत: तरी आपण आत्मस्वातंत्र्य उपभोगत असतो!! तसे बघितले तर आत्मस्वातंत्र्य तरी आपल्याला कुठे संपूर्णपणे उपभोगता येते.  
"कुणी देतो एक हळी, त्याचाच पडतो बळी,
हारासारखे हौतात्म्य त्याच्या येते गळी,"
निदान या ओळी तरी आपल्याला याच बाबीचा निर्देश करतात. म्हणजे माणसाला स्वातंत्र्य कसले? तर आपला तुरुंग कुठला आहे, हे निवडण्याचा!! त्याशिवाय सुटका नाही. फार तर आपण त्या तुरुंगाच्या भिंती किती? त्याला खिडक्या किती? इतपतच प्रश्न विचारू शकतो. त्यापलीकडे आपण सगळेच हतबल असतो.  
इथे याच कवितेच्या संदर्भात आणखी काही ओळी आठवल्या, आरतीप्रभूंच्याच एका कवितेतील ओळी आहेत. 
"कशासाठी, कुणासाठी, कुठवर कुठवर;
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर". 
मी मघाशी तुरुंगाचा उल्लेख केला, तीच बाब या ओळीत अधिक खोलवर व्यक्त झाली आहे. जर का प्रत्येक आयुष्य हा अभेद्य तुरुंग असेल असे मानले तर मग, तिथे आत्मस्वातंत्र्याला कुठे जागा आहे? आरतीप्रभूंच्या "नक्षत्रांचे देणे" या संग्रहातील बहुतेक कविता, हीच जाणीव आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमांच्या साहाय्याने दाखवत आहेत आणि त्या जाणीवा सहज समजून घेताना, आपण केवळ विस्मित होण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. "जोगवा" नंतर "नक्षत्रांचे देणे" हा संग्रह परंतु आरतीप्रभूंच्या अभिव्यक्तीमध्ये कमालीचा बदल घडत गेला. कविता अधिक आत्मलक्षी, अंतर्मुख आणि वेदनेच्या अत्यंत नवीन जाणिवांनी भारून गेली. 
क्रमश: 
मघाशी मी एक विधान केले, आरतीप्रभूंच्या कवितेत वेदनेचे अनेक स्तर आढळतात!! या विधानामुळे एक गैरसमज होऊ शकतो, आरतीप्रभू यांनी फक्त वेदनेचीच कविता लिहिली. वास्तविक, "नक्षत्रांचे देणे" या संग्रहात, वाचताना भावनांचे अनेक कंगोरे आढळतात आणि तिथे मात्र आपण, दि:डमूढ होतो. अशीच एक, संपूर्ण वेगळ्या धर्तीवरील कविता वाचायला मिळते. 

"सबंध घरांत गाणें सुरु आहे,
दिवे लागायला अजून थोडा वेळ आहे,
खिडक्यांच्या गजांतून आलेली उन्हें 
सरकताहेत गाण्यापाशी मंद मंद फिकी,
एक स्कर्टवाली मुलगी गिरकी घेत गेली 
कुठल्यातरी खोलीत : 
गाण्यानेच फेकली फुलांची ओंजळ. 
नागमोडी जिन्यांची बुडताहेत वळणे भरगच्च 
मंद्रात, दिवे लागण्याची सम येतेय जवळ,
जिन्यावरून जातोय कुणी वर वर धीरवान पुरुष,
टक टक टक टक संपत गेली बुटांची टपटप,
माडीवरच्या एका खिडकीत उजळला मंद दिवा,
त्याने धीमी शीळ घुमवली, पोशाख उतरला,
सिग्रेट शिलगावली. 
संबंध घरात गाणे सुरु आहे :
एकेका खोलीचे भान हरपतेय,
एकेका दाराचा अडसर गळतोय,
भिंती सगळ्याच होताहेत पारदर्शक,
तो उभा आहे थोड्या उंचीवर,
ती उभी आहे जागच्या जागी लपल्यासारखी,
त्याला ती दिसली भिंतीतून, 
तिला तो दिसला नाही,
तिला फक्त जाणवला माडीवरील दिव्याचा 
पायांवर सांडलेले गिटारीच्या स्वरासारखा 
थरारता कवडसा,
आणि त्याचा रुंद खांदा तिच्यासमोर आला,
तिने डोकी टेकली त्याच्या नग्न छातीवर :
ती गाणे ऐकतेय,
तो गाणे ऐकतोय :
एक संबंध गाणेच गाणे म्हणतेय
आणि एक संबंध गाणेच गाणें ऐकतेय." 

कविता थोडी दीर्घ स्वरूपाची आहे आणि मुक्तछंदात बांधली आहे. कवितेचा विषय अगदी उघड, उघड वेश्यावस्तीचा आहे.  जरी वेश्यावस्ती असली तरी तिथल्या गणिकेची कोठी आणि तिथला एक अनुभव, हाच खरा विषय आहे. आता गणिका आणि तिची कोठी म्हणजे तिथले गाणे, हे ओघानेच येते. वास्तविक, आता ही संस्कृती पार रसातळाला गेली आहे पण २५, ३० वर्षांपूर्वी, माडीवरील गाणे समाजमान्य असेच होते. आरतीप्रभू कवितेत अनुभव मांडताना थेट मांडतात, कुठेही अनावश्यक पाल्हाळ नसतो की अनावश्यक प्रतिमा नसते. त्यामुळे आशयाला एकप्रकारचे टोक येते. ज्यांना कोठीवरील गायन संस्कृती माहीत असेल त्यांना, "गाणे सुरु झाले" म्हणजे नक्की कसा परिसर असणार, काय वेळ असणार तसेच तिथे कसल्या प्रकारचे व्यवहार असणार या सगळ्यांची इत्थंभूत माहिती नक्कीच असणार आणि त्यामुळे इथे तशा तपशिलात आरतीप्रभू जराही जात नाहीत. "गाणे सुरु झाले" म्हणजे परिसर "मदिर" झालाच असणार आणि तिथले नेहमीचे "व्यवहार" सुरु झालेच असणार, हे गृहीत धरायलाच हवे.  
"गाण्यानेच फेकली फुलांची ओंजळ" या ओळीशी थोडे थबकायला होते. कोठीवरील गाणे खरे पण तरीही गाण्यातून व्यक्त झालेले आर्जव आणि "ओंजळीतून" जाणवणारी भावना, सगळेच आपल्यासमोर एक अमूर्त चित्र उभे करतात. ऐकायला येणाऱ्या स्वरांची सांगीतिक प्रत समजून घेता येते. शब्दांना स्वरांचे कोंदण लाभते. 
हळूहळू तिथल्या व्यवहाराला "जाग" यायला लागते आणि कविता आणखी तपशिलात जाते. कोडगेपणा, हा इथला स्थायीभाव तर असतोच पण त्या जोडीला थंड भावनाशून्यता देखील जाणवते - 
"ती उभी आहे जागच्या जागी लपल्यासारखी,
त्याला ती दिसली भिंतीतून, 
तिला तो दिसला नाही" 
प्रत्यक्ष व्यक्ती समोर असून देखील मनात त्याच्याबद्दल कशाप्रकारचे भाव ठेवायचे, जणू सावलीशी संवाद चाललेला आहे!! इथले सगळे व्यवहार किती कोडगेपणाने चालतात, याचा अत्यंत मोजक्या शब्दांतून मांडलेला आलेख!! 
आरतीप्रभूंनी हीच कल्पना, आणखी दुसऱ्या एका कवितेत इतकीच सुंदररीत्या मांडलेली आहे - 
"इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास, कसे कसे हासायाचे, आहे मला" या ओळीतून आपल्याला आणखी वेगळे काय जाणवते? 
आणि, नायिकेचे अस्तित्व देखील , "गिटारीच्या थरथरत्या स्वरांच्या" स्पंदनातून जाणवते. एका बाजूने सुंदर पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजुने फार अस्वस्थ करणारे रूपक आहे. कविता गाण्याच्या सुरांच्या संगतीने सुरु होते पण बघता, बघता सगळी कविता, अतिशय दाट, गडद असा परिणाम घडवत राहते आणि हे शब्दांचे गारुड फार अद्भुत आहे. काव्य लिहायचे म्हणजे ते अनुभवांवर आधारावेच लागते. बाह्य सृष्टीचा आश्रय प्रतिभेला घ्यावाच लागतो. आरतीप्रभुंची अनुभूती घेण्याची शक्ती इतकी तीव्र आहे की, काहीं वेळा असे वाटते, खऱ्या अनुभवातून काव्यनिर्मिती करण्याऐवजी त्यांनी आपल्या प्रकृतीला अनुसरून आणि अनुरूप असेल निभाव कल्पनेने निर्माण केले आहेत. कवींच्या सृजनशक्तीने आपल्या एका अंगास दुसऱ्या अंगाचा विषय बनवून आपला स्वयंभूपणा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा प्रयत्न या वरील कवितेत स्पष्टपणे केलेला आढळतो. 
अशीच एक अप्रतिम कविता, "नक्षत्रांचे देणे" या संग्रहात आढळते. कवितेची सुरवात आणि शेवट, दोन्ही सत्कृतदर्शनी भिन्न वाटतात पण जरा बारकाईने वाचन केले तर त्यातील लय आपल्या मनाला कधी वेधून टाकते, याचा पत्ताच लागत नाही . फार विलक्षण चकवा देते. 

"शब्दाआधीची शांतता : त्यांत तूं,
शब्दानंतरची शांतता : त्यांतही तूं. 
पाखरं आली होती, उडालीसुद्धा,
पाखरं उडालेली पुन्हा आलींसुद्धा. 
एकेक मंत्र तुझा, मुग्ध पुन्हा तूं; 
एकेक पाशांत प्रशांत मी अन तूं. 
हें पात्रसुद्धा प्रतिबिंब लिंबकांत 
नाही दाखवीत, नुस्तेंच प्रवाहित. 
काय कुठे चाललोय, कुणाची कुणाला 
लाभलीय संगत? जरूर कुणाची कुणाला?
अशांत कोण? झालोत कां अनिकेत?
जीवनसूत्राची खेच : पाय कुठे पडावेत? 
भेटलीच आहेस नको त्या वळणावर;
भूतसुद्धा होईन म्हणतेस मरणानंतर सरणावर. 
सुंदर नसतो - असला तरी नको मृत्यू तुला; 
शब्दानंतरच्या शांततेत हवीस तूं मला. 
गाणाऱ्याने नुस्तें नये जाऊ गाऊन, 
जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन. 
याहून काय सांगूं? हवा तर हात पुढे कर :
वाचीन शब्दहीन रेषा, डोळे मात्र बंद कर. " 

आरतीप्रभूंची कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, तेणे आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो.  साध्या निसर्गचित्रातून कवितेचा आरंभ होतो. परंतु वाचताना एकदम, "एकेक मंत्र तुझा, मुग्ध पुन्हा तूं; एकेक पाशांत प्रशांत मी अन तूं." ही ओळ वाचायला मिळते!! कविता वेगळ्याच वळणावर उभी राहते. दोन प्रेमीजीवांचा संवाद पण खरे तर हा स्वतः:शीच चाललेला मूक संवाद आहे पण हे नंतर जाणवते!! मनात चाललेल्या खळबळीतुन निर्माण झालेले प्रश्न आणि त्या त्या विचारलेल्या प्रश्नांतून मिळत असलेली उत्तरे, असे काहीसे स्वरूप या कवितेचे आहे. 
चांगल्या भावकवितेतील भावनाशयासंबंधी काहीं लिहिणे मुळातच फार कठीण असते कारण तिच्यातून जाणवणारा एखाद्या भाववृत्तीचा अनुभव हा संमिश्र असूनही संश्लेषणात्मक, तरल आणि विशिष्ट स्वरूपाचा असतो. आणि त्यामुळे गद्यात तो अनुभव नेमक्या शब्दांत मांडणे फारच अवघड होऊन बसते. एका बाजूने प्रेयसीशी संवादात्मक बोलणे पण दुसरीकडे पटकन मरणाची आठवण करून देणाऱ्या ओळी!! आरतीप्रभुंची प्रतिभा ही अशीच सतत एखाद्या लंबकाप्रमाणे हेलकावे घेत असते आणि आपल्याला फार चकवा देत असते. एकूणच या कवीला मृत्यूबद्दल विलक्षण आकर्षण असल्याचे बहुतेक कलाकृतींमधून आपल्याला अनुभवायला मिळते. 
कवितेचा शेवट किती अर्थपूर्ण केला आहे. सहवास तर संपण्यासाठीच असतो पण त्यावेळी जाणवणारा एकाकीपणा विषण्ण करणारा असतो आणि म्हणूनच "जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन" अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नंतर येणारा रितेपण तरी निखळ असावे, हेच जणू यामधून सुचवायचे आहे. भावनाशयाचा स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे प्रवास कसा होतो आणि कविता एकूणच किती सघन होत जाते - 
"गाणाऱ्याने नुस्तें नये जाऊ गाऊन, 
जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन. 
याहून काय सांगूं? हवा तर हात पुढे कर :
वाचीन शब्दहीन रेषा, डोळे मात्र बंद कर. "
समृद्ध भावनाशयाचे अप्रतिम उदाहरण!! कविता इथेच संपायला हवी, अशीच अपरिहार्यता या ओळी वाचून झाल्यावर आपल्या मनात येते. येथे भावानुभवाचे बाहेरून वर्णन करण्याचा प्रयत्न नसून, त्या अनुभवाचे संवेदनाशरीर साकार करून त्याच्या द्वारे तोच अनुभव पुन्हा निर्मिण्याचा सुंदर प्रयत्न आहे. या विशिष्ट भाववृत्ती एकत्रितपणे जाणवून देऊन, अस्तित्वात असलेल्या सर्व घटकांच्या सूक्ष्मतर छटा अति निकटतेने जाणवून देत आहेत. भावकविता अशीच असायला हवी, हे दर्शवून देणारी ही असामान्य कविता. 
नियतीच्या खेळाची जन्म आणि मृत्यू ही दोन टोके. या खेळाचे स्वरूप जाणून घेणे,हेच या कवीच्या सगळ्या कलाकृतीचे मूलभूत सूत्र आहे. त्यांच्या केवळ कवितेतून(च) नव्हे तर इतर गद्य लेखनातून याचाच आपल्याला पडताळा येतो. याच दोन संकल्पनेतून आपल्या सगळ्या साहित्याचा डोलारा मांडायचा आणि तो देखील अतिशय तरल, सूक्ष्मपणे मांडलेला दिसतो. मराठीत अशा प्रकारचे लेखन फारच तुरळक झाल्याचे आढळते. 

1 comment:

  1. खूप आवडला लेख,छान उलगडून दाखवलंत या काहीशा गूढ कवीला..आभार

    ReplyDelete