नुकतेच कर्नाटकी संगीतातील दिग्गज आणि प्रख्यात गायक बालमुरली कृष्णन यांचे निधन झाले. कर्नाटक शैलीतील प्रमुख कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रगण्य होते, याबद्दल कसलेच दुमत नसावे आणि आयुष्यभर त्यांनी सतत कर्नाटकी शास्त्रीय संगीताचीच कास धरली. आपण इथे याच मुद्द्याला धरून त्यांच्या गायकीचा समग्र विचार मांडण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक त्यांना अनेक विषयांची आवड होती परंतु त्यांनी गायन हेच आपले लक्ष ठेवले आणि त्यातच आयुष्यभर रममाण झाले. संगीताच्या क्षेत्रात देखील त्यांनी उत्तर भारतीय संगीतातील कलाकारांच्या समवेत मैफिली केल्या, जसे पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि चौरासिया. तसेच जॅझ फ्युजन सारख्या पाश्चात्य संगीतात देखील भाग घेतला आणि आपल्या आवडींना कसलेही बंधन नाही, हे सप्रमाण सिद्ध केले. परंतु हे सगळे करताना, त्यांनी आपल्या मुल:स्रोताकडे कदापिही दुर्लक्ष केल्याचे आढळले नाही. आता असा विचार मांडता येईल, उत्तर भारतीय संगीत काय किंवा पाश्चात्य जॅझ संगीत काय, या सगळ्याचा मूल:स्रोत एकच - निखळ सूर आणि तिथे या गायकाच्या अस्तित्वाची खरी प्रचिती यायची.
आपल्याकडे एक गंमत बघायला आणि अनुभवायला मिळते. वास्तविक, कर्नाटकी संगीत हे भारतीय(च) संगीत आहे पण अजूनही "उत्तर भारतीय संगीत" आणि "कर्नाटकी संगीत"' यांच्यात अकारण एक भिंत उभी आहे आणि आजही महाराष्ट्रापासून वर जाणारी राज्ये, कर्नाटकी संगीताकडे काहीशा त्रयस्थ नजरेने तरी बघतात किंवा दुर्लक्ष करतात. कर्नाटकी संगीतात ज्याला अभिजातत्व म्हणावे असे सगळे गुण आढळतात पण तरीही आजही दोन्ही शैली, जितक्या प्रमाणात एकत्र यायला हव्यात, ताशा आलेल्या नाहीत, हे निखालस सत्य आहे. शैली भिन्न ठेवाव्यात पण आपपर भाव तरी नाहीसा व्हावा.
शास्त्रीय संगीतातील सगळे अलंकार यथास्थितपणे दोन्ही शैलीत आढळतात, फरक असतो, तो सुरांच्या लगावाबाबत!! जुलै १९३० मध्ये जन्माला आलेल्या या कलाकाराने, आयुष्यभर कर्नाटकी संगीताचीच पूजा केली आणि ही शैली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. मी इथे "प्रयत्न'केला" असाच शब्दप्रयोग वापरेन कारण ज्याप्रकारे आजही आपल्याकडे उत्तर भारतीय संगीताचे रसिक एकूण रसिकांच्या तुलनेत फारच कमी आढळतात, तोच प्रकार कर्नाटकी संगीताबाबत आढळतो, मग गाणारी सुब्बलक्ष्मी असो किंवा बालमुरली कृष्णन असोत.या लेखाच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, गायक म्हणून बालमुरली कृष्णन किती श्रेष्ठ होते आणि एकूणच भारतीय संगीतावर त्यांच्या किती प्रभाव होता? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. तिन्ही सप्तकात सहज विहार करू शकणारा निकोप आवाज त्यांना लाभला होता. त्यांचा तारता पल्ला फार विस्तृत होता - उदाहरणच द्यायचे झाल्यास, त्यांनी गायनात "सशब्द क्रिया" म्हणून नव्याने अलंकार शोधून वापरायला सुरवात केली. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, कर्नाटकी संगीतात सुप्रसिद्ध असलेला "आदिताल" इथे उदाहरण म्हणून घेऊ. ८ मात्रांचा हा ताल, सर्वसाधारणपणे मध्य लयीतील बंदिशींमध्ये वापरला जातो (कर्नाटकी संगीत बहुतांशी मध्य लय आणि द्रुत लय - या दोन लयीमध्येच सादर होते) आता या ८ मात्रा समान विभागणीमध्ये वापरल्या जातात. बालमुरली कृष्णन या तालाचे जे बोल आहेत, त्यांचा गायनात इतका समर्पक उपयोग करीत असत की ते बोल म्हणजेच त्या बंदिशींचे अभिन्न घटक वाटावेत!! हा खेळ लिहायला फार सोपा आहे आहे पण प्रत्यक्षात मांडायला फार अवघड आहे.
शास्त्रीय संगीताच्या रसिकांना,या गायकाने, पंडित भीमसेन जोशींबरोबर केलेल्या मैफिली आठवल्या तर माझ्या म्हणण्याची प्रचिती यावी. एका बाजूने पंडित भीमसेन जोशी आपल्या आवाजाने सगळे सप्तक आवाक्यात घेत असत तर दुसऱ्या बाजूने बालमुरली कृष्णन त्याच तानेचे, तालाच्या मात्रेच्या अंगाने सादरीकरण करत असत. "सशब्द क्रिया"'हा त्यांनी नव्याने शोधलेला सगीतालंकार आहे आणि त्यावर प्रभुत्व मिळविणे म्हणजे अहोरात्र रियाज करणे, हेच होय.
इथे मी, मुद्दामून भीमसेन जोशी आणि बालमुरली कृष्णन यांचे युगलगान घेतले आहे (जुगलबंदी हा शब्द मी मुद्दामून टाळला!!) एकतर या दोन्ही शैली कुठे भिन्न आहेत आणि कुठे एकत्र येऊ शकतात, याचा आपल्याला अंदाज घेता येईल. सुरवातीच्या आलापीनंतर लगेच चीज सुरु होते, ती मध्यलयीत आणि पुढे द्रुत लयीत समाप्त होते. यमन राग हा दोन्ही शैलीत ऐकायला मिळतो. अर्थात, कर्नाटकी शैलीत सूर कसा लावला जातो आणि त्यायोगे सांगीतिक अलंकार कसे घेतले जातात याची आपल्याला सुरेख कल्पना येईल. विशेषतः: तानक्रिया घेताना, तानेचा शेवट कसा घेतला जातो, हे ऐकणे अधिक उद्बोधक ठरावे. यात आणखी एक बाब विशेष उजळून येते, कर्नाटकी शैलीत, "सरगम" या अलंकाराचा प्रभाव अधिक आहे पण सरगम घेण्याची पद्धत, उत्तर भारतीय संगीतापेक्षा भिन्न आहे. नेहमीचाच यमन राग तरीही ऐकायला वेगळा वाटतो.
याच व्हिडियोत पुढे, मालकंस रागातील एक छोटीशी रचना सादर केली आहे आणि तिथे, मघाशी मी, "सशब्द क्रिया" या शब्दाचा उपयोग केला, त्याचे नेमके प्रत्यंतर ऐकायला मिळते आणि त्याचबरोबर हा अलंकार गेल्यावर चढवून घेणे किती अवघड आहे, याची कल्पना देखील. तसे जरा बारकाईने ऐकले तर "सशब्द क्रिया"' ही बरीचशी "तराणा" या प्रकाराशी बरेच जवळचे नाते दर्शवते. सरगम घेताना शेवटच्या स्वरावर ठेहराव घेताना, किंचित "टोक" आणून, तो स्वर विसर्जित करायची त्यांच्या गायनाची शैली फारच विलोभनीय होती.
मंद्र सप्तकापासून तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकणारा गळा, घुमारेदार आणि आश्वासक सूर, ही खासियत म्हणावी लागेल. स्वरोच्चार आणि दमसास ही खास वैशिष्ट्ये सांगता येतील. रुंद, भरदार आवाज आणि त्याला साजेसा गरिमा. "गरिमा'' म्हणजे ध्वनीचे लहानमोठेपण. गायनात दुसरे वैशिष्ट्य असे दिसते, जरी सुरवातीच्या आलापीनंतर मध्यलयीत बंदिश सुरु करायची झाली तरी त्यात पायरी पायरीने बढत घ्यायची पद्धत अंगिकारलेली आढळते. अट्टहास, त्यामुळे गायनातील "स्वर" या अंगावर अधिक भर देणे क्रमप्राप्तच ठरते. याचाच दुसरा परिणाम, गाण्यातील शब्दांना गौणत्व मिळणे!! भाषिक स्वरांपेक्षा व्यंजनांना उच्चारण्यात कमी श्वास लागतो. वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, घेतलेल्या श्वासात स्वरांचे काम दीर्घ पद्धतीने करता येते. त्यामुळे आवाज, मांडणी आणि त्यासाठी निवडलेले राग, या सर्वांवर घुमारायुक्त अखंडता, याच तत्वाचा वरचष्मा दिसतो. त्याचा वेगळा परिणाम असा होतो, तानक्रिया जाणवण्याइतकी द्रुत करून, त्यांचा आविष्कार करण्याचे तंत्र, गुंतागुंतीच्या, द्रुत, दीर्घ पल्ल्याच्या ताना सहज घेतल्या जातात आणि त्यामुळे ऐकणारा रसिक भारला जातो.
आता असा हा विलक्षण ताकदीचा कलाकार होता. या कलाकाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने, आपला निश्चित रसिकवर्ग तयार केला होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्नाटकी संगीताकडे या कलाकाराने जाणीवपूर्वक प्रयोग करून, रसिकांना खेचून घेतले. आपल्याकडे एक फार मोठी खुळचट पद्धत आहे. एखादा लोकप्रिय कलाकार निजधामाला की लगेच आपल्या लोकांना, "पोकळी जाणवते. एकतर असे एकाच कलाकारावर कुठलीही कला अवलंबून नसते परंतु इतका सारासार विचार फारसा आढळत नाही आणि भरमसाट विशेषणे लावून, गौरव केला जातो. प्रथितयश कलाकार येतात, जातात, क्वचित एखादाच कलाकार असा निघतो जो कलेच्या क्षेत्रात थोडीफार सर्जनशील भर टाकतो आणि त्या कलेची व्याप्ती रुंदावतो. पण, त्यामुळे कलेच्या अवकाशात कायमचे रितेपण कधीच येत नसते. आता, बालमुरली कृष्णन आपल्यात नाहीत पण त्यांनी निर्मिलेली कलेची वेगवेगळी शिखरे, या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कलाकारांना निश्चित गुंगवून टाकतील. कलाकाराला इतके यश मिळाले तरी आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असे म्हणता येईल.
No comments:
Post a Comment