"जें मत्त फुलांच्या कोषातुन पाझरले,
निळ्या लाघवी दंवांत उलगडले,
जें मोरपिसांवर सांवरले,
तें --त्याहुनही --आज कुठेंसे
पुन्हा एकदां
तशाच एका लजवंतीच्या
डोळ्यांमध्ये -- डोळ्यांपाशी --
झनन -झांझरे मी पाहिले…
पाहिलें न पाहिलें."
पु.शि. रेग्यांच्या या ओळी वाचताना, आणि पुढील सगळी कविता वाचताना,मला नेहमी "झनन -झांझरे किंवा "ठिबक-ठाकडे" असे शब्द वाचायला मिळतात. वास्तविक, हे शब्द म्हणजे नादवाचक शब्द आहेत पण कवितेच्या आशयात अगदी नेमके बसले आहेत, इतके की त्यातून फार मोठा गहिरा आशय व्यक्त होतो. भावकवितेची बंदिश बांधताना, असे शब्द फारच चपखल बसतात. कलावती रागाचा विचार करताना, या ओळी माझ्या मनात बरेचवेळा येतात.
संस्कृत ग्रंथांच्या आधाराने लिहायचे झाल्यास, या रागाचा समय "मध्यरात्र" दिलेला आहे आणि एका दृष्टीने बोलायचे झाल्यास, सगळीकडे शांतता पसरल्यावर, काळ्या अंगवस्त्रानिशी,प्रियकराला भेटण्यासाठी, गुपचूप निघालेली अभिसारिका आणि त्यांचे मिलन संकेत स्थान, याची आठवण होते.
"रिषभ","मध्यम" वर्ज्य असलेल्या या रागात, कोमल निषाद वगळता, सगळे सूर शुद्ध स्वरूपात लागतात. "औडव-औडव" जातीचा हा राग "खमाज" थाटात याचे वर्गीकरण केले आहे. रागातील प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "सा ग प ध","प ध नि(कोमल)ध","ग प ध सा नि(कोमल)" या संगती ऐकायला मिळतात. या बाबत आणखी सांगता येईल, या रागातील "कोमल" निषाद" स्वराचे स्थान आणि त्या स्वरावरील ठेहराव, हा नेहमीच अवलोकनाचा आनंददायी भाग आहे.
उस्ताद अमीर खान साहेबांनी सादर केलेला कलावती राग आपण इथे ऐकुया. "इंदोर" घराण्याचे अध्वर्यू म्हणून, यांच्या गायनाचे वर्णन करता येईल. अत्यंत ठाय लय, शक्यतो मंद्र सप्तकात गायचे, अशी काही वैशिष्ट्ये, गायनाबाबत सांगता येतील.बरेचवेळा गायनातील लय इतकी धीमी असायची की, साथीला तबला असायची जरुरी आहे का? असाच प्रश्न पडायचा!! "धृपद" गायकीचा थोडा प्रभाव पडलेला जाणवतो, विशेषत: "तराणा" सादर करताना, बरेचवेळा "नोम-तोंम" पद्धतीचा अवलंब केलेला आढळतो. तसे बघायला गेले तर, यांच्या गायकीचा असर, भीमसेन जोशींपासून ते हल्लीच्या रशीद खान पर्यंत, बहुतेक गायकांवर पडलेला दिसून येतो. "ख्याल" गायकी कशी सादर करायची, याचा एक असामान्य मानदंड निर्माण केला. गायनात "अति विलंबित" लय तसेच "बोल-आलाप" आणि या आलापीतून सरगमचे सादरीकरण, यातून, त्यांनी आपली गायकी सजवली आणि रागदारी संगीताला संपूर्ण वेगळे वळण दिले,
जरी तिन्ही सप्तकात गायन करण्याचा आवाका असला तरी देखील मंद्र सप्तक आणि शुद्ध स्वरी सप्तकाकडे ओढा अधिक. राग सादर करताना, त्याची "बढत" कशी करायची, टप्प्याटप्प्याने लय वाढवीत जायची आणि त्यातून आपल्या गायकीचा "खयाल" प्रदर्शित करायचा, हे त्यांच्या "ख्याल" गायनाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येते. प्रस्तुत रचनेत, बंदिश सादर करताना, प्रत्येक स्वर आपल्याला अक्षरश: "अवलोकिता" येतो. मघाशी, मी म्हटल्याप्रमाणे, इथे लय किती "विलंबित" आहे, याचा प्रत्यय घेता येतो. विशेषत: खर्जातील स्वर ऐकताना, तर अधिकच. समेवर येण्यासाठी कुठेही आटापिटा नाही. एखाद्या केशर सांजसमयी, विक्लांत पक्ष्याने निरवपणे फांदीवर यावे त्याप्रमाणे, इथे समेवर लय "विसर्जित" होते!! रागाचा "राग" म्हणून आणि त्याच्या "मूळ" प्रकृतीनुसार रागाचे सादरीकरण करायचे, हा विचार त्यांच्या गायनात प्रामुख्याने दिसून येतो.
असे ऐकायला मिळाले आहे की, रोशन यांना, "दिलरुबा" वाद्य अतिशय प्रिय होते आणि त्या वाद्यावर, त्यांनी प्राविण्य मिळवले होते. त्यांच्या अनेक रचनांत, त्यांनी या वाद्याचा सढळ हस्ते उपयोग केल्याचे दिसून येते. एकूणच भारतीय वाद्यांवर त्यांचे नितांत प्रेम होते, असे निश्चित विधान करता येईल. वाद्यांच्या वापराबाबत, दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. एक तर रचनाकारांचा एकंदर कल बघता, तो बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा यासाठी त्यांनी, खालचे किंवा मध्यसप्तकातील स्वर व संबंधित स्वर-मर्यादा यांतच वावर ठेवण्यात कसलीच कसूर केली नाही. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत म्हणजे विशिष्ट वाद्ये, यांच्याकडे रोशन यांचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधाचा सर्जक उपयोग, कधीही दुर्लक्षित केला नाही. किंबहुना एका गीतांत एकाधिक ताल किंवा लयबंध वापरणे, हे त्यांच्या प्रयोगशीलतेचे उदाहरण म्हणता येईल. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होतात. रोशन यांच्या रचनांच्या बाबतीत हा विशेष, विशेषत्वाने जाणवतो.
"काहे तरसाये जियरा" हे "चित्रलेखा" चित्रपटातील, आशा भोसले आणि उषा मंगेशकर, या जोडीने गायलेले गाणे इथे ऐकुया. ज्यांना या गाण्यात, रागाची "मुळावृत्ती" पडताळायची असेल तर हे उदाहरण, तसे गोंधळाचे ठरू शकते. गाण्याची सुरवात, रागाधारित आहे पण, पुढे राग बाजूला सारला जातो आणि चाल "स्वतंत्र" होते. पण अशा प्रकारचे स्वातंत्र्य, बहुतेक रचनाकार, नेहमीच घेत असतात. चित्रपट गीतात बरेचवेळा वापरला जाणारा त्रिताल आणि केरवा ताल इथे वापरलेला दिसेल. द्रुत गतीत चालणारे गाणे असल्याने, गाण्यातील हरकती इतक्या विलोभनीय आहेत की आपण या गाण्यात कधी गुंगून जातो, तेच समजत नाही.
आता आपण, रोशन यांचीच एक अजरामर कव्वाली ऐकायला घेऊ. कव्वाली, या गायनाला, चित्रपट संगीतात, खऱ्याअर्थाने, प्रतिष्ठा मिळवून दिली असेल तर ती, रोशन यांनी, असे म्हटले तर वावगे ठरू नये. इथे आणखी एक विशेष नोंदवावासा वाटतो. रोशन यांना एकूणच द्वंद्वगीते किंवा युगुलगीते, याचे अतिशय आकर्षण असल्याचे, सहज ध्यानात येऊ शकते. सांगीतदृष्ट्या बघायला गेल्यास, दोन्ही किंवा अधिक कलाकारांच्या वाट्याला त्यांच्या आवाजानुसार गायन करायला देणे, किंवा तसा नेमका वाव देणे, हे एक रचनाकार म्हणून नेहमीच आव्हानात्मक ठरते. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, रोशन यांना, ज्याला "आम" राग म्हणतात, अशाच रागांमध्ये रचना करायला आवडत होते, असे दिसते. आणखी एक बाब निर्देशनास आणावीशी वाटते. त्यांच्या रचनेत, काव्याला फार महत्व दिल्याचे जाणवते. "ना तो कारवां की तलाश" या दीर्घ कव्वाली रचनेत, या विचारांचे प्रतिबिंब पडल्याचे, आपल्याला समजून घेत येईल. एका बाजूला हार्मोनियम, ढोलक, तबला आणि टाळ्या, यांची कुशल उपाययोजना आणि दुसरीकडे, कवीच्या शब्दातील नेमके भाव जाणवून देण्यासाठी, केलेले गायन!!
एक तर ही रचना कालमापनाच्या दृष्टीने अतिशय दीर्घकाळ चालणारी आहे, त्यामुळे त्यात, अनेक गायक आहेत, जसे रफी, मन्नाडे, आशा भोसले, सुधा मल्होत्रा इत्यादी. आता इतके गाते आवाज एकत्र आणायचे म्हणजे रचना विस्तारित असणार, हे ओघानेच आले. कव्वालीची सुरवात अगदी नेमक्या कलावती रागानेच होते पण नंतर हळूहळू, कलावती रागात नसलेले सूर देखील इथे आणले गेले आहेत, जसे "शुद्ध निषाद" ऐकायला मिळतो तर काही ठिकाणी चक्क "खमाज" राग देखील जाणवतो. तरी देखील, गाण्यावर दाट छाया आहे ती, कलावती रागाचीच असे म्हणता येईल. जवळपास १० मिनिटांची रचना आहे आणि इतके गायक आहेत, पण प्रत्येक आवाजाला, आपले अस्तित्व ठळकपणे दाखवता येईल, अशा प्रकारे रचना बांधली आहे. सुरवातीच्या ठाय लयीतून, हळूहळू, द्रुत लयीत जो प्रवास होतो, तो खास करून ऐकण्यासारखा आहे. नेहमीप्रमाणे, या गाण्यात देखील सतार, सारंगी या वाद्यांचा अतिशय सुरेख वापर केलेला आढळेल.
आता आपण या रागावरील आणखी गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे ऐकुया
ये तारा वो तारा
प्रथम तुज पाहताना
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
No comments:
Post a Comment