संध्याकाळपासून हवा किंचित थंड झालेली असल्याने, मन:स्थिती शांत होती. सध्या संगीतावर लिखाण करण्याचा ओघ बराच वाढला आहे, त्यातून वर्तमानपत्री लिखाण म्हणजे काळाशी जुळवून, हमखास लिखाण अभिप्रेत असल्याने, कधी कधी मनात शंका येत आहे, लिखाणातील "उस्फूर्तता" कमी होत चालली आहे की काय? अर्थात, तशी उस्फूर्तता कमी होणे, परवडण्यासारखे नाही. एक फायदा नक्की झाला, केवळ मूड वर अवलंबून लिखाण करायचे दिवस संपले आणि लिखाणाला थोडी शिस्त लागली. खरतर, मला वाचनाचा भरपूर छंद आहे, घरात कितीतरी पुस्तके वाचायची, म्हणून कपाटात पडून आहेत. काही वर्षापूर्वी परदेशातून कायमचे मुंबईला राहायचे ठरवल्यावर, सुरवातीच्या काळात, हाताशी काहीच उद्योग नसल्याने, भरपूर वाचन झाले. त्यातून, त्या पुस्तकांवर अभिप्रायात्मक बरेच लिहून झाले. त्या निमित्ताने, माझ्या ब्लॉगवर देखील त्यातले काही लेख ठेवले गेले. परदेशात असताना, वेळ घालवायचे साधन म्हणून, ब्लॉग उघडला आणि त्याच्या वर हळूहळू लेख टाकायला लागलो. आजमितीस जवळपास, १७० लेख झाले. वास्तविक, याचा आनंद वाटायला हवा पण, आत्तातरी असेच वाटते, आपण, लिहिण्याच्या बाबतीत थोडा अधिरेपणा दाखवला. पुस्तकांचा विषय रक्तात मुरु द्यायला हवा होता, त्यावर थोडाफार साधक-बाधक विचार करून, मगच लिहायला हवे होते, आवेगावर थोडे नियंत्रण ठेवायला हवे होते. सध्या तर वाचन फारच मंदावले आहे.
आज संध्याकाळी, मात्र ठरवून वाचायला घेतले आणि मनात सारखे यायला लागले, आपण - संगीत सोडून वेगळे काहीतरी लिहायला हवे पण नक्की काय लिहायचे, याबाबत थोडी संभ्रमावस्था आहे. पण विचार केला, सुरवात तर करू, काहीतरी सुचत जाईल. संगीत हा माझ्या अति जिव्हाळ्याचा विषय खरे पण तोच एकमेव आहे का? मराठी कवितांबाबत आपण, तितके सजग नाही का? आणि क्रिकेट? एकेकाळी, क्रिकेट म्हणजे जिवाभावाचा मित्र होता पण पुढे, नाद सुटला!! वास्तविक साऊथ आफ्रिकेत क्रिकेटला पोषक असे भरपूर वातावरण आजूबाजूला होते पण, तेंव्हा वय आड आले आणि केवळ मैदानाच्या बाहेर राहून, सामन्यांची मजा घेणे, इतकेच आपण केले.
कितीतरी मराठी कविता अजूनही, जिभेवर आहेत आणि त्या तशा आहेत, याचा आपल्याला किंचित अभिमान देखील जाणवत आहे. अजूनही, मला असेच वाटते, कविता हे साहित्यातील सर्वात लवचिक, उस्फुर्त आणि गोळीबंद अनुभव देणारे माध्यम आहे आणि अजूनही आपला रस टिकून आहे. मला कधीही, कवितेत, कालानुरूप पंक्तिप्रपंच करावासा वाटला नाही आणि तसे वाटणे, हे किती भाग्याचे!! त्यामुळे अभिरुची तर टवटवीत राहते पण त्याच बरोबर, शब्दांतील गूढ आशय, आपल्या अनुभवांच्या कक्षा रुंदावत नेतो, हे जाणवायला लागते. एक व्यक्ती म्हणून घडण्याच्या "प्रोसेस" साठी, मला हे वाटते. पण कधी कधी मनात प्रश्न येतो, केवळ मला या गोष्टी आवडतात म्हणूनच त्या योग्य आहेत, असे म्हणणे, हा "अहंकार" तर होत नाही ना? या विषयांच्या पलीकडील विषय देखील, आपले व्यक्तिमत्व समृद्ध करू शकत असतील, फक्त आपण तिकडे बारकाईने लक्ष देत नाही, इतकेच असेल!!
त्याचबरोबर, आत्ता आणखी एक विचार मनात आला. माणसाला, एखाद्या विषयात तरी, "संपूर्ण" ज्ञान प्राप्त होऊ शकते का? जर नसेल तर इतर विषयांबाबत, मनात ध्यास धरणे कितपत योग्य आहे? का ही माझी मीच केलेली फसवणूक आहे? आज मितीस, मी संगीत सजगतेने ऐकायला सुरवात करून, जवळपास ३५ वर्षे नक्की झाली पण या ३५ वर्षांत, "संगीत" या विषयाचा कितपत अंदाज आलेला आहे? अधिकारवाणीने, मी ठाम काही मांडू शकतो का? तसेच कवितेबाबत मी म्हणू शकतो का? क्रिकेट खेळाचे सगळे प्राथमिक नियम पाठ आहेत, त्यातील सौंदर्य अनुभवण्याची ताकद आहे पण म्हणून, मला हा खेळ संपूर्णपणे अवगत झाला आहे का?
कलेच्या क्षेत्रात असे कसलेच नियम नसतात, असे म्हणणे, ही धूळफेक तर नव्हे? कला अनंत असते, जितके तुम्ही समजून घ्याल, तितका धुसर प्रदेश अधिक खोलवर जाणवायला लागतो, वगैरे वाक्ये फसवी आहेत का? खरतर, "ज्ञान" या शब्दाला(च) काही अर्थ आहे का? ज्याला आपण "ज्ञान" म्हणतो, ते तर केवळ मृगजळ स्वरूपात वावरत असलेले अस्तित्व आहे का? खरे म्हणजे, "ज्ञान" असे काही नसतेच!! सगळा प्रकार म्हणजे माहिती गोळा करण्याची प्रक्रिया असते!! नियतीने फेकलेल्या फासात अडकवून घेण्याची हताश धडपड, असेच काहीसे अर्धवट विधान करता येईल का?
अगदी साधे उदाहरण मनात आले. लताची गाणी ऐकणे, हा आपल्या विश्रब्ध मनाचा आवडता खेळ आहे आणि मी जिवंत असे पर्यंत, कायम मला सोबत करणारा खेळ आहे. इतके आपण त्यात गुंतलो असताना देखील, आजही, लताची काही गाणी, आपल्या मनावर अर्धुकलेले गारुड कसे पसरते? याचा विश्लेषण करण्याचा अनन्वित प्रयत्न करून देखील हाती काहीच लागले नाही!! पारा चिमटीत पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न, आपल्याकडून प्रत्येक वेळी होत असतो. गाणे ऐकून झाल्यावर, आज काहीतरी नवीन हाती लागले, असे वाटत असताना, ती गायकी, मनातून निसटून जाते आणि परत मी, आहे त्याच ठिकाणी उभा असल्याचे दिसते!! मनाची एकाग्रता एकवटली जात नाही का? बहुदा तसेच काहीतरी कारण असावे!! असे तर नाही, मीच माझ्या मनाची समजूत घालत आहे किंवा फसवत आहे? एक काहीतरी नक्की.
कवितेबाबत देखील असेच प्रत्येकवेळी घडते. कवितेचा "मुखडा" समजून घेई पर्यंत, पुढील ओळींचे गारुड मनावर पसरते आणि आधीच्या ओळींतील आशय धुसरावस्थेत जातो. मनाची चरफड होते पण, केवळ हताशता, हाती लागते. मनात एकाच वेळी अनेक विचारांचे आवर्तन चालू असल्याचा हा परिणाम असतो का? शक्य आहे. अजूनही मनात, कविता आणि भावकविता, याबाबत नेमकेपणा मांडायचा आपण प्रयत्न करीत असतो आणि मांडताना बरेचवेळा लेखनात भावविवशता अधिक येते आणि सगळेच विस्कळीत होऊन बसते!! असे तर नव्हे, कवितेच्या ओळी वाचताना, ओळींमधील, लयीचा प्रभाव अधिक पडते आणि त्या लयीच्या अंगाने वाचताना, आशयाची लय कुठेतरी हरवते!! संगीताचा प्रभाव, मनावर अधिक असल्याचा हा परिणाम म्हणायचा का? तसे असेल तर मग, आपले कवितेवरील प्रेम "बेगडी" म्हणायला हवे पण तसे म्हणायला, आपले मन धजावत नाही - हा अहंकार? कविता करणे, मला कधीच जमले नाही आणि यापुढे कधी जमणार नाही!! अशी मनाची खात्री नेमकी कधी झाली? आयुष्यात कधीही दोन लयबद्ध ओळी लिहायचा प्रयत्नच केला नाही, म्हणून आज अशी काहीशी विफलतेची भावना मनात रुजत आहे का? कविता लिहिणे जमत नाही म्हणून आपण कवितेच्या आस्वादाच्या मार्गाला लागलो का? आणि आस्वाद तरी कितपत जमला आहे? एखादी कविता आवडते म्हणजे आपल्या मनातील काही अनुभवांशी त्या कवितेची तार जुळते, असे भासते. असेच असते का? असे असताना देखील काही कवितांच्या बाबतीत, प्रत्येक वाचनात, मनात अर्थाचे वेगवेगळे धुमारे का फुटतात? की तीच कवितेची अंगीभूत शक्ती आहे? तसे असेल तर, कुठलीही सक्षम भावकविता आपल्या कवेत, संपूर्णपणे कधीच येऊ शकणार नाही का?
सध्या एकूणच मनोवस्था बरीचशी द्विधा झाली आहे, हे तर खरेच आहे. सुरवातीला लिहिले, आज मन:स्थिती शांत आहे. शांत आहे तर मग हे जे काही लिहिले आहे, हे त्याचेच प्रतिक म्हणायचे का? गेल्या काही दिवसांत काही जवळच्या व्यक्तींचे मृत्यू सहन करावे लागले, काहींच्या प्रकृती नको तितक्या गंभीर झाल्या. मध्यंतरी माझी प्रकृती देखील अशीच हेलकावे घेत होती. या सगळ्याचा परिणाम आपल्या विचारांवर होत आहे/झाला आहे का? असू शकेल कारण असे असे परिणाम आपल्याला दृश्य स्वरूपात मांडता येत नसतात.
मला नेहमी असेच वाटत असते, आपल्या आवडत्या विषयाचा शक्यतो सांगोपांग व्यासंग करायचा, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक माहिती समजत जाईल आणि त्यायोगे मनावरील जुन्या विचारांची जळमटे काढून टाकता येतील. आयुष्यात, एखादा विषय जरी बऱ्यापैकी समजून घेता आला, तरी ते यश रग्गड मानावे, हा आपला आवडता विचार. संपूर्ण यश किंवा माहिती, ही तर केवळ स्वप्नावस्था!! प्रत्यक्षात कधीही अस्तित्वात न येणारी!! असे असताना, मी बरेचवेळा अतिरेक करतो का? भासमान स्वप्नसृष्टीला वास्तवतेची झालर लावण्याचा असफल प्रयत्न तर करत नाही ना?
फार पूर्वीपासून, मी एक खेळ खेळत आलो आहे. सकाळची आन्हिके संपवत असताना, आरशासमोर उभे राहायचे आणि स्वत:च्या चेहऱ्याकडे टक लावून बसायचे. अजूनपर्यंत, मी एक मिनिट देखील, स्वत:च्या चेहऱ्याकडे शांतपणे बघू शकलो नाही!! बघत असताना, आदल्या दिवशी केलेला खोटेपणा सगळा मनात साचायला लागतो आणि दृष्टी खाली वळते. याचाच वेगळा अर्थ, मी अजूनही खोटेपणा करत असतो आणि असे असताना देखील, संगीत किंवा कवितेसारख्या अत्यंत लवचिक कलेतील मर्म शोधण्याचा ध्यास घेतो!! किती मोठा हा विरोधाभास आहे!!
भर्तृहरीच्या शब्दात लिहायचे झाल्यास, " सर्वं यस्य वशादगात्स्मृतीपथम कालाय तस्मै नम:" हेच खरे वास्तव म्हणायचे का? हाच प्रश्न पडला आहे.
No comments:
Post a Comment