Tuesday, 13 October 2015

विनय!!!!!

विनय गेला!!
वास्तविक ग्रहणाचे वेध शुक्रवार संध्याकाळ पासून लागले होते. शुक्रवारी, संध्याकाळी आठच्या सुमारास सतीशचा फोन आला आणि त्याने अतिशय भावाकुल स्वरांत," अनिल, विनय डीप कोमात गेला आहे. संध्याकाळी परत स्ट्रोक झाला आणि विनयला Ventilator वर ठेवले आहे." हे ऐकल्यावर' कितीही तटस्थतेचा आव आणला तरी भयावह भविष्याची जाणीव नक्की झाली. तसेच झाले, शुक्रवारी रात्री, काळाच्या भयाण संकुलात विनय शिरला, तो कधीही न परतण्यासाठी. काल, "विनय गेला" म्हणजे फक्त शरीर थांबले इतकाच अर्थ. नियतीला असा अनाकलनीय खेळ खेळण्याची खोड कशी लागली, हेच कळत नाही. आसभास नसताना, चकवा देणे, हा तर नियतीचा नेहमीचा खेळ. आपल्या हाती, फक्त कायमस्वरुपी हताशता देऊन, नियती आपला पुढील "डाव" खेळायला मार्गस्थ झाली!!   
वास्तविक, विनय आपल्या शाळेतला मित्र. शाळा संपली, आणि नेहमी जे घडते, त्याप्रमाणे सगळे आपापल्या आयुष्यात इतके गर्क झाले की शाळेतल्या मित्रांची आठवण धुसर व्हावी, इतपत विस्मरण झाले. तसा सटी सामासी गिरगावात उडत,उडत भेटायचा. पण, त्याला "भेट" म्हणणे चुकीचे ठरेल. पुढे, विनयचा आतेभाऊ, मिलिंद माझा अतिशय जवळचा मित्र झाला आणि त्याच्याकडून, अधून मधून, विनयचा उल्लेख ऐकायला मिळायचा. या परिस्थितीत आमची लग्ने झाली आणि संसारात आम्ही रममाण व्हायला लागलो. विनय केवळ स्मरणरंजनापुरता शिल्लक राहिला. तशात १९९२ पासून, मी परदेशाची वाट धरली आणि माझे भारतातील मैत्रीसंबंध विरळ व्हायला लागले. मिलिंदशी संबंध तसेच राहिले पण त्यात कुठेही विनय नसायचा!! एकतर, मी वर्षातून, महिनाभर सुटीवर येणार, त्यात हयात मैत्री देखील राखणे अवघड व्हायला लागले तिथे शाळेतील संबंध कुठे टिकणार?
आठवणींना ताण दिल्यावर, एक भेट आठवते. मी नुकताच, परदेशातून कायमचा भारतात राहायला आलो होतो आणि घरातील काही कामानिमित्ताने, गिरगावात फिरत होतो आणि त्यावेळी, अचानक विनयने हाक मारली. शाळेत जितकी उंची होती, त्यात कदाचित एक,दोन इंचाचा फरक, केस अर्थात थोडे विरळ झालेले, तसेच चमकदार डोळे आणि मान किंचित वाकडी करून बोलायची सवय अजूनही कायम होती. महत्वाचे म्हणजे, आवाजात कसलाही बदल झालेला नव्हता. गायवाडीच्या नाक्यावर आम्ही भेटलो. त्यावेळी, त्याने बँक सोडली होती आणि मला तेंव्हा थोडे नवलच वाटले होते. अर्थात, त्यावेळी संबंध तितके "समृद्ध" झाले नसल्याने, तसे जुजबी बोलणे झाले. काही मित्रांच्या आठवणी निघाल्या आणि आम्ही परत, आमच्या दिशेला लागलो. 
मला वाटते, आपला Whats App ग्रुप व्हायच्या सुरवातीच्या काळात, असाच मी, त्याला रस्त्यावर भेटलो आणि त्याने मला, या ग्रुपबद्दल सांगितले आणि लगेच सामील करून घेतले. इथे, विनय आणि माझ्या गाठीभेटी वाढायचा महूर्त सापडला.
तसे बघितले मी techno savvy अजिबात नाही पण, आता, शाळेतल्या मित्रांचा इथे गृप झाला आहे आणि आता त्यांच्यात regular chatting सुरु झाले, हे बघितल्यावर, मी, मुलाकडून याचे तंत्र शिकून घेतले.  विनय आणि भारती, हे एकत्र आले आणि त्यांनी या गृपला एकत्र आणले. मला तर फारच मजा वाटायला लागली आणि इथून, माझ्या, विनय बरोबर भेटी वाढायला लागल्या. एकदा, विनयने गिरगाव चौपाटीवर एकत्र भेटण्याचा घाट घातला आणि मला वाटते, तेंव्हापासून, या गृपला, एक आकार आला. त्या संध्याकाळी, सुरेश मोघे सोडल्यास, सगळ्यांना, जवळपास ४० वर्षानंतर भेटत होतो. मनात औत्सुक्य तर नक्कीच होते. त्यातूनच मळवली इथल्या पिकनिकची कल्पना  निघाली आणि सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारला. अर्थात, मळवली पिकनिक ही नंतरची. त्याआधीच, विनय बरोबर बोलणे, भेटणे, हा माझ्या आयुष्याचा नित्यक्रम झाला. सतिशला संगीताची आवड आहे, हे मला मिहीत होते पण, विनयला आवड आहे म्हटल्यावर, अस्मादिक खुश. त्यातून, मला वाटते, मिलिंदने विनयला माझ्या "ब्लॉग" बद्दल सांगितले असावे. 
माझा ब्लॉग म्हणजे काहीकाही जगावेगळे लिखाण नव्हते आणि आजही नाही, पण त्याने ब्लॉगवरील काही लेख वाचल्यावर, मला एका दुपारी, ऑफिसला फोन लावला आणि माझे कौतुक करायला सुरवात केली. अस्मादिक हवेत!! अर्थात, मला एक माहित होते, लेखनात substance किती, हा भाग जरी वेगळा असला तरी, "आपला एक मित्र काहीतरी लिहित आहे" याचा विनयला  खरा आनंद झाला होता आणि त्याने, पुढे सतीशला त्याबद्दल सांगितले!! त्याच सुमारास, माझ्या ब्लॉग बद्दल लोकसत्तेत एक लेख आला होता आणि तो वाचल्यावर, त्याने मला कायमचे "लेखक" बनवून टाकले!! पुढे, मी, सतीश आणि विनय, दोन, तीन वेळा संगीताच्या मैफिलीला गेलो आणि ओळख पक्की झाली. अर्थात, यात एकमेकांची यथेच्छ टिंगल  उडविणे,हा भाग तर अवर्णनीय असाच!! निव्वळ शुद्ध मैत्री. फोनवर तर, आम्ही एकमेकांची इतकी टिंगल उडवली आहे की, दुसरा कुही असता तर संबंध तोडले असते. याचा परिणाम असा झाला, विनयला माझ्या बाबत वाटणारा विश्वास. 
आता जिथे चार मराठी डोकी एकत्र आली तिथे दोन गृप होतात, अशी ख्याती असलेल्या मराठी माणसांची जवळपास १०० डोकी एकत्र आणण्याचे काम, विनय आणि भारती यांनी केले. आता, इथे इतके "विचारवंत" एकत्र आल्यावर मतभेदाला काय तोटा!! ग्रुपवर मतभेद, वाद आणि भांडणे तर पाचवीला पुजलेली!! मग, रुसवे, फुगवे असले प्रकार येतातच. त्या दृष्टीने, मला वाटते, आपला गृप अजूनही "षोडशा" वर्षात आहे!! जरा मत वेगळे निघाले की लगेच "मी गृप सोडणे" अशी घोषणा जगजाहीर!! अशा वेळेस, विनयचा मला फोन यायचा. त्या वाटायचे, अनिलशी बोलले म्हणजे काहीतरी मार्ग निघेल!! अज्ञानात सुख असते, ते असे!! मी देखील, त्यानिमित्ताने फोनवर बराचवेळ त्याच्याशी बोलत असे. अर्थात, अळवाच्या पानावरील थेंबाप्रमाणे हे मतभेद घरंगळून जायचे. पुढे मळवली पिकनिक आली आणि विनयच्या घरातील माझ्या भेटी वाढायला लागल्या. पिकनिक यशस्वी होण्याचे खरे श्रेय हे, परत एकदा विनय आणि भारतीचे. माझ्यासारखे मित्र खरे म्हणजे स्वयंसेवक!! 
पिकनिक जवळ आली तशी मी विनयला बोललो होतो, "विन्या, पिकनिकच्या रात्री मी कुणालाही झोपायला देणार नाही"!! विन्या खुश!! आता, आपली पिकनिक कशी झाली, ते आपण इथे सगळेच जाणता. वास्तविक, विनयला सारखी शंका यायची, "पिकनिक झाल्यावर, गृप किती टिकेल?" सुदैवाने, आता पिकनिक संपून जवळपास वर्ष उलटायला आले पण ग्रुप अजूनही सुंदर टिकला आहे. पिकनिक झाल्यानंतर, दोन एक दिवसांनी, विनायचा मला फोन आला होता, "अन्या (मला गृपमध्ये 'अन्या' म्हणणारे तीन,चारच मित्र आहेत!!) अरे, आपला गृप आता टिकणार!!" 
असेच दिवस मजेत जात होते. अचानक माझ्या किडनीच्या दुखण्याने डोके वर काढले!! अचानक विनयची आठवण आली. खरेतर विनय डॉक्टर आहे, ही बातमी देखील मला अशीच अचानक कळलेली. तेंव्हा मी फेसबुकवर रोजच्या रोज राबत असायचो आणि अशा वेळेस, विनयची friend request आली - डॉक्टर विनय पाटणकर!! आयला, अनिल क्लीन बोल्ड!! विन्या आणि डॉक्टर!! मी लगेच त्याला फोन लावला. फेसबुकवर खोटे प्रोफाईल लोड करून कितीतरी मित्र(??) वावरत असतात आणि याच जाणीवेने, मी विनयला फोन केला होता. त्यावेळी, विनयने सगळी माहिती दिली आणि मला खरेच त्याचे कौतुक वाटले. या परिस्थितीत, मी विनयला फोन करून सगळी "केस" सांगितली. त्या दिवशी दुपारी, डॉक्टर विनय पाटणकर, माझ्या ऑफिसमध्ये, औषधे घेऊन!! मी त्याला बाहेर घेऊन गेलो आणि बाजूच्या "कयानी" हॉटेलमध्ये बसलो. तिथे, विनयने सगळी औषधे कशी घ्यावीत, आणि पथ्ये पाळायला हवीत, याबाबत सगळी माहिती दिली. मी देखील अतिशय गंभीरपणे, औषधे घ्यायला सुरवात केली आणि दर दोन दिवसाआड त्याला फोन करून, प्रकृतीत होणाऱ्या बदलाबाबत माहिती द्यायला लागलो. 
विनय देखील खुश झाला. त्याने सुचवलेल्या औषधाचा मला खरच फायदा झाला. जसा तब्येतीत बदल व्हायला लागला तशी त्याने हळूहळू औषधे कमी करायला लावली आणि आता, मी पूर्ववत झालो!! वास्तविक, त्याच्या आणि माझ्या मतांमध्ये बराच फरक होता, माझ्या आणि त्याच्या आवडींमध्ये फरक होता तरीदेखील मनात कुठेतरी "आपुलकीचा" धागा होता, त्यात आपलेपणा होता आणि निव्वळ मैत्री होती. 
आता, हा विनय कसा होता? तसा कधीही भेटला तर सतत आनंदी असायचा. तसे बघितले तर, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही प्रश्न सतत असतात पण, विनयने त्याची कुणालाच कसलीही जाणीव करून दिली नाही. कधीही भेटला तरी ओठांवरील हास्य कधीच मावळले नव्हते!! मावळले ते, शेवटच्या प्रवासाला गेला तेंव्हाच!! विनय आजारी आहे, हे तर समजले होते पण मनात कुठेतरी अंधुकशी आशा, निदान सुरवातीच्या काही दिवसांत नक्कीच होती. पुढे काय घडले ते आता सगळ्यांनाच माहित आहे. 
आज विद्याला भेटायला गेलो होतो. जोडीने सतीश बरोबर होता, माझे, एकट्याने भेटायला जायचे धाडस नव्हते. काय बोलायचे आणि कसे बोलायचे? सगळेच प्रश्न!! विद्यानेच माझ्याशी बोलायला सुरवात केली आणि नको विषयाला हात घालून!! विनयच्या शेवटच्या दिवसांबद्दल!! वास्तविक, मला, गेल्या चार दिवसांची खडा न खडा माहित आहे पण, इथे मान हलवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अतिशय थंडपणे बोलत होती, निदान भासवत होती. कालच नवरा गेलेला, सगळे दु:ख्ख मनात ठेऊन, चेहऱ्यावर थंडपणा ठेऊन, बोलत होती. खरेतर, रबरी चेंडू पाण्यात दाबण्यासारखा अयशस्वी प्रयत्न होता, हे मला कळत होते तरी तिच्या जिद्दीला, मनोमन सलाम केला आणि तिथून निघालो!! 
खाली येउन सतीशबरोबर बराचवेळ गप्पा मारीत होतो. अर्थात, गप्पा सगळ्या विनयबद्दल चालू होत्या. सतीशकडील आठवणी म्हणजे त्याच्याच आयुष्याचा पट उलगडून मांडण्यासारखे!! अर्थात, वेळच अशी होती, काय बोलावे, हेच कळत नव्हते. एरव्ही मी बोलणारा पण इथे जीभ घशात गच्च अडकलेली!! 
"घुमावयाचे गगन खोलवर, तिथे चिमुटभर घुमते गाणे;
तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे". हेच अखेर आपले प्राक्तन!!

No comments:

Post a Comment