मुंबई वगळल्यास, डर्बन असे शहर आहे, जिथे मी जवळपास ४ वर्षे राहिलो. भारतात, अनेक शहरांना भेटी दिल्या, काही दिवस राहिलो पण, शहराची "ओळख" काही झाली नाही. अगदी आजही, पुण्याबाबत माझे हेच म्हणणे आहे. पुण्याला आजमितीस भरपूर भेटी झाल्या, पण अजूनही पुणे शहर "ओळखले" असे म्हणवत नाही!! ही बाब पुण्याबाबत, मग दिल्ली, चंडीगड, बंगलोर, चेन्नई बाबत तर काही बोलायलाच नको.
मी डर्बन शहरात नोकरीसाठी आलो, त्या आधी, इथे ९० कि.मी. दूर असलेल्या, पीटरमेरीत्झबर्ग शहरात, सलग ३ वर्षे काढली. अर्थात,पीटरमेरीत्झबर्ग ही जरी "नाताळ" राज्याची राजधानी असली तरी शहर म्हणून तितकेसे विकसित झालेले नाही. अर्थात, त्याला भौगोलिक कारणे देखील आहेत, पीटरमेरीत्झबर्ग शहर, हे ५,६ डोंगरावर वसलेले शहर, त्यामुळे औद्योगिक विकासाला, नैसर्गिक मर्यादा पडतात. डर्बन हे, अरेबियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले शहर. त्यामुळे, इथे व्यापार, उद्योग, इत्यादींना भरपूर वाव. अर्थात, केवळ डोंगरावर शहर आहे, म्हणून मर्यादा, याला तसा फार अर्थ नाही कारण, जोहान्सबर्ग शहर देखील समुद्रसपाटी पासून जवळपास ६००० फुट उंचावर आणि असेच डोंगराळ भागात वसलेले आहे आणि साऊथ आफ्रिकेतील जवळपास ५०% औद्योगिक वाढ ही, हे शहर आणि आजूबाजूचा परिसर, इथेच झाली आहे.
साऊथ आफ्रिकेतील, एक अतिशय महत्वाचे, औद्योगिकदृष्ट्या गजबलेले तसेच "Tourist Attraction" म्हणून जागतिक स्तरावर मान्यता पावलेले शहर. आपल्या सारख्या भारतीयांच्या दृष्टीने तर या शहराला फार महत्व आहे. २०११ साली, इथे एक फार मोठा समारंभ झाला होता. भारतातून, इथे निर्यात केलेले मजूर, या घटनेला १५० वर्षे झाली म्हणून मोठ्या प्रमाणावर सोहळा साजरा केला होता. त्यावेळी आणि आजही, भारताच्या दृष्टीने, साऊथ आफ्रिकेचे "प्रवेशद्वार" म्हणजे डर्बन!! एकतर मुंबईहून इथे जहाजाने यायचे झाल्यास, डर्बन बंदर हेच सर्वात जवळचे. याचा परिणाम असा झाला, या शहरात आणि बाजूच्या पीटरमेरीत्झबर्ग शहरात, आपल्याला लाखोंच्या संख्येने, भारतीय वंशाची लोकवस्ती आढळते. पूर्वी, इथल्या गोऱ्या लोकांना, इथे उसाची लागवड आणि एकूणच शेतीची अवजड कामे करायला, कुणीतरी "मजूर" म्हणून हवेच होते आणि त्यादृष्टीने "भारत" आणि तिथली लोकसंख्या, त्यांना फारच सोयीचे पडले आणि तेंव्हापासून, भारतातून, इथे मनुष्यबळ आयात करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
आता, इथे भारतीय वंश चांगलाच स्थिरावला आहे. आताची पिढी म्हणजे कमीत कमी पाचवी, सहावी पिढी आहे. त्यामुळे, इथले भारतीय वंशाचे लोक म्हणजे केवळ नावाने भारतीय, इतकेच म्हणायला हवे. या लोकांना भारताविषयी आकर्षण आहे, आपले जुने गाव कुठले, हे बघण्याची उत्सुकता आहे पण, ती उत्सुकता तात्पुरती.परत भारतात येउन, नव्याने आयुष्य काढायची अजिबात तयारी नाही आणि थोडा विचार केला तर त्यांनी तरी असे का करावे? त्यांना ज्या प्रकारे इथे सुख-सोयी मिळतात, त्याच्या ५०% देखील सोयी भारतात मिळू शकणार नाहीत आणि हे निखळ वास्तव आहे.
भारतीयांना, डर्बन अधिक पसंत पडले याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या शहराचे हवामान आणि भारतातील हवामान, यात सत्कृतदर्शनी फारसा फरक नाही. इथे हाडे गोठवणारी थंडी अजिबात नसते. तशी हवा कोरडी आणि थंड असते पण आपल्या भारतीय लोकांनी आल्हाददायक म्हणावी, अशीच असते. आजही, साऊथ आफ्रिकेतील Import Business, जवळपास ७०% व्यापार, याच बंदरातून होतो. त्यामुळे, इथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिसेस भरपूर आहेत. अजूनही, साऊथ आफ्रिकन चलनाला, जागतिक स्तरावर महत्वपूर्ण मान्यता आहे. मी ज्या कंपनीत काम करीत होतो (१९९८ ते २००१) त्या कंपनीचा बराचसा व्यापार हा सिंगापूर देशाशी असल्याने, आम्हाला तर डर्बन फारच सोयीचे पडत होते.
भारतीयांच्या दृष्टीने बघायला गेल्यास आणि अचंबा करण्यासारखी बाब म्हणजे इथले समुद्र किनारे. अरेबियन महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले शहर तेंव्हा या शहराला प्रचंड लांबीचे समुद्र किनारे लाभले आहेत. मी तिथे रहात असताना, एखादा आठवडा देखील असा गेला नसे, मी समुद्रावर गेलो नाही. आधुनिकता म्हणावी तर उत्तर डर्बन भागातले किनारे खरोखरच अप्रतिम आहेत. पाण्यावर किती प्रकारचे खेळ खेळता येऊ शकतात, याचे इथे प्रात्यक्षिक बघता येईल. केवळ खेळापुरते नसून, ज्या प्रकारच्या सोयी पुरवल्या जातात, ज्या प्रकारे स्वच्छता राखली जाते, आपण भारतीयांनी धडे घेण्यासारखे आहे. शनिवार/रविवारी तर हजारोंच्या संख्येने इथे माणसे जमतात, पण कुठेही गडबड, गोंधळ नसतो. शिस्त तर वाखाणण्यासारखी असते. अर्थात, याला "काळी" बाजू देखील आहे. रात्रीच्या वेळी, एकटे, दुकट्याने हिंडणे, भयानक धोक्याचे ठरत आहे. जीवाला धोका उद्भवू शकतो. काही वर्षांपूर्वी, इथल्या "मरीन परेड " - सेन्ट्रल डर्बन भागातील समुद्र किनारी, लंडन वरून एक जोडपे, रात्रीच्या सुमारास गप्पा मारीत बसले होते आणि कुठूनतरी काही कृष्ण वर्णीय लोक आले आणि त्यांच्याकडे बहुदा पैशाची मागणी केली असावी. त्यातून बाचाबाची झाली असणार पण, त्याचे पर्यवसान, त्या जोडप्याचा खून होण्यात झाले. प्रकरण फार वरच्या स्तरावर पोहोचले होते आणि तेंव्हा पासून, इथे गस्तीचे प्रमाण फार वाढले आहे. अर्थात, समुद्रावर येउन, शांतपणे बसणे, यासारखा आनंदाचा भाग नाही आणि हे मी कितीतरी वेळा प्रत्यक्ष अनुभवले आहे. मी आणि माझे काही मित्र, बरेच वेळा इथे येउन बसायचो, किनाऱ्यावरील एखाद्या उघड्या हॉटेलमध्ये, हातात बियरचा ग्लास घेऊन, अगदी ब्रम्हानंदी टाळी लावलेली आहे!!
इथेच, अगदी समुद्र किनाऱ्यावर, एका रविवारी सकाळी/दुपारी, fashion show बघितला होता!! सगळ्या तरुण सुंदरी, अगदी तोकड्या कपड्यात येउन, आपल्या कपड्यांची जाहिरात करीत होत्या!! आता, असा सोहळा अनिल कसा सोडणार!! मजेचा भाग म्हणजे, सगळा कार्यक्रम, ज्या प्रकारे, बंद सभागृहात चालतो, त्याच प्रकारे इथे चालत होता. कार्यक्रम उघड्यावर होता, म्हणून आजूबाजूची माणसे चेकाळली होती, शिट्या मारीत होती, असे अश्लाघ्य प्रकार अजिबात घडत नव्हते. जवळपास तीन तास कार्यक्रम चालला होता. अर्थात त्या दिवशीची बियरची चव वेगळी लागली, हा भाग वेगळा!!
केवळ इथेच नव्हे पुढे मी साऊथ आफ्रिकेत अनेक शहरात राहिलो, अगदी गावसदृश ठिकाणी राहिलो पण, "हा देश आपला आहे आणि याची स्वच्छता आपण राखली पाहिजे" असा एकही फलक, बोर्ड पहिला नाही आणि तरीही गाव देखील अतिशय स्वच्छ असायचे. मला वाटते, हा त्या समाजावरील संस्काराचा भाग आहे. "आपला देश" असे न सांगता, त्याबद्दल ममत्व वाटणे, ही मानसिक गरज निर्माण होणे महत्वाचे!! घाण होतच नाही, हे म्हणणे खोटे आहे पण, झालेला कचरा त्वरित साफ करून परत जागा स्वच्छ ठेवणे, या वृत्तीचे मला कौतुक वाटले.
नाताळ राज्य आणि इतर राज्यात आणखी एक फरक जाणवण्यासारखा आहे. नाताळ राज्यात आणि विशेषत: डर्बन शहरात, जितकी घनदाट झाडी, हिरवीगार हिरवळ दिसते तितकी इतर भागात दिसत नाही, अगदी केप टाऊन सारखे निसर्ग रमणीय शहर घेतले तरी!! डर्बन इथे वृक्षांची सोबत कधीच सुटत नाही त्यामुळे, डिसेंबर/जानेवारीतील कडक उन्हाळा देखील खूप प्रमाणार सुसह्य होतो. जागोजाग अप्रतिम रस्ते आहेत, महामार्ग आहेत पण कुठेही झाडांची सोबत सतत तुमच्यावर सावली धरून असते. शहरातील आडमार्ग तर भरभक्कम वृक्षांच्या साथीने नटलेले आहेत. अगदी, जून/जुलै मधील हिंवाळा (वर म्हटल्या प्रमाणे कडाक्याचा हिंवाळा इथे नसतो तरीदेखील) घेतला तरी थोडीफार पानगळ होते पण, जसे जोहान्सबर्ग/प्रिटोरिया शहरात, वृक्ष उघडे/बोडके होतात, तसे इथे फार क्वचित आढळते.
मी इथे "मॉर्निंगसाईड" भागात रहात होतो, जो एकेकाळचा गौरवर्णीय भाग. अर्थात, इथे नीटनेटकेपणा, शिस्तशीर वृत्ती अंगी बाणवावीच लागते. मनात येईल तिथे थुंकणे, हातातील कोक किंवा बियरचा टीन, संपल्यावर रस्त्यावर(च) फेकून देणे, सिगारेटचे थोटूक पायाखाली चिरडणे, असले प्रकार मनात आले तरी करायला शक्यतो मन तयार होत नाही. आजूबाजूची माणसे ज्या शिस्तीने वावरत असतात, ते बघून, आपण देखील तसेच वागायला सुरवात करतो. मी इतकी वर्षे या देशात काढली पण, इतक्या वर्षांत (काही अपवाद वगळता) रस्त्यात, कुणीही लघवी करीत आहे, असे चुकूनही आढळले नाही आणि जे आढळले, ते सगळे कृष्णवर्णीय लोकांच्या भागात. तिथे मात्र उकिरडा!!
याच शहरात, पुढे २०१० मध्ये, आंद्रे रुई, या जगप्रसिद्ध कलावंताचा सिंफनी ऑर्केस्ट्रा बघितला. खरे सांगायचे झाल्यास, इथेच मला पाश्चात्य संगीताची आवड असणारे काही गोरे मित्र भेटले आणि त्यांनी, मला खूपच आनंदाने, त्यांच्या घरी नेले आणि त्यांच्याकडील संगीताचा संग्रह दाखवला आणि अगदी रात्रभर, मला थांबवून, तो संग्रह ऐकवला. इथेच, मला एका आणखी गोऱ्या मित्राने, माझा क्रिकेटमधील रस बघून, १९६०/७० च्या दशकातील, असामान्य साऊथ आफ्रिकन खेळाडूंच्या DVD दाखवल्या. तसे बघितले तर डर्बन शहर शांत स्वभावाचे आहे. जोहान्सबर्ग शहरात जसे, सगळे घड्याळाला जुंपून, धावत असतात, तसा प्रकार इथे फारसा आढळत नाही. सकाळी ८ वाजता(च) ऑफिसेस उघडता आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होतात, संध्याकाळी सहा वाजता, रस्त्यावर (ऑफिस भागातील रस्त्यावर) चिटपाखरू देखील नसते.
आधुनिक शहरांप्रमाणे, या शहरात देखील प्रचंड मॉल्स आहेत आणि इथे देखील "मॉल" संस्कृती वाढलेली आहे. भारताच्या जवळ असलेले शहर असल्याने, इथे आपले भारतीय कलाकार आणि त्यांचे "शूटिंग" हा आता नेहमीचा कार्यक्रम होत आहे. अर्थात केप टाऊन इथे त्याचे प्रमाण अधिक!! अर्थात, इथे असलेली प्रचंड भारतीय वंशाची लोकवस्ती असल्याने, इथे नवीन येणाऱ्याला तसे हायसे वाटते आणि इथल्या भारतीयांना देखील, भारतातून आलेल्या "पाहुण्यांचे" आगत-स्वागत करायला फार आवडते. तदनुषंगाने बघायला गेल्यास, इथे नवरात्र अगदी पारंपारिक पद्धतीने चालते. फरक इतकाच, इथे एक मोठे सभागृह भाड्याने घेतले जाते आणि त्या सभागृहापुरताच सगळा सोहळा मर्यादित असतो आणि त्याला जोडून आवाजाची मर्यादा!! इथेच मी, आवाजाचे प्रदूषण म्हणजे काय असते, याचा जबरदस्त अनुभव घेतला होता.
नुकताच डर्बन इथे आलो होतो, दोनच दिवस झाले होते, घर व्यवस्थित लावले आणि नेहमीच्या इच्छेप्रमाणे, घरात गाणे ऐकायचे म्हणून सिस्टीम सुरु केली. सुरु करून, १५,२० मिनिटे झाली असतील तोच घराचा दरवाजा ठोठवला गेला. दारात चक्क पोलिस उभा!! नाही म्हटले तरी तंतरलीच. पोलिसाने, लगेच सिस्टीमचा आवाज कमी करण्याची विनंती केली आणि माझ्या शेजाऱ्याने, पोलिस ठाण्यावर तक्रार केली म्हणून मला यावे लागले, अशी तंबी दिली. मला नवल वाटले, शेजारी राहणारा, मला लगेच सांगू शकला असता पण नाही!! त्याने पोलिसाकडे तक्रार केली!! इथे एकूणच Pollution बाबत फार कडक कायदे आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांच्यात जागरुकता आहे.