Sunday, 20 September 2015

Standerton

हळूहळू, साउथ आफ्रिकेत थंडीचा कडाका वाढायला लागला होता. Standerton हा प्रदेश तर अति थंडीचा प्रदेश!! जून, जुलै महिन्यात, एकही रात्र उणे तापमानाच्या वर येत नाही!! सतत -६, -७ हेच तापमान!! या भागात थंडी भरपूर असते, याची माहिती होती आणि तशी कपड्यांची व्यवस्था केली होती तरी देखील, प्रत्यक्ष अनुभव चटका देणारा होता. नुकताच, रस्टनबर्ग इथून इथे आलो होतो. रस्टनबर्ग इथे जरी थंडी असली तरी इतका कडाका नव्हता. त्यामुळे तिथून निघताना, हातमोजे वगैरे गोष्टींची खरेदी केली. इथे मी UB group मध्ये General Manager - Finance या पदावर रुजू होणार होतो. आत्तापर्यंत, अनेक इंडस्ट्रीज बघितल्या होत्या परंतु आता इथे बियर इंडस्ट्रीचा अनुभव नव्याने घ्यायचा होता आणि तसा पुढे भरपूर घेतला. इथला General Manager दुसऱ्या बृवरीमध्ये बदली म्हणून जात होता आणि त्याच्या जागेवर माझी नेमणूक झाली होती. तसे, Standerton हे गाव आहे. इथे प्रचंड मॉल्स नाहीत, अवाढव्य हॉटेल्स नाहीत. मुळात, गावाची लोकसंख्या काही हजारात होती आणि जी होती, ती बहुसंख्य गोऱ्या वर्णांची!! 
या गावात, आमची बृवरी आणि नेसले कंपनीची Factory वगळता, ज्याला मोठ्या इंडस्ट्रीज म्हणाव्यात, असे काहीही नव्हते (आता तर दोन्ही कंपन्यांनी आपला "गाशा" गुंडाळलेला आहे!!) छोटासा शॉपिंग मॉल (अर्थात तिथेही एका दुकानात भारतीय सामान मिळण्याची सोय होती) ४ हॉटेल्स, त्यातील एक "वाल" नदीकिनारी!! हे हॉटेल आहे छोटे पण अतिशय टुमदार आणि चक्क, त्या हॉटेलचा एक भाग, नदीच्या पाण्यावर आहे. इथे, या हॉटेलात येउन खाणे, हा अप्रतिम अनुभव आहे. गावात, एक क्लब आहे आणि त्याला लागून, गोल्फ कोर्ट ( 11 holes) आहे. क्लब मात्र पारंपारिक युरोपियन धर्तीवर आहे. ठराविक ड्रेस असल्याशिवाय प्रवेश नाही आणि वेळेच्या बाबतीत अति काटेकोर!! दोन नाजूक कलाकुसर असलेली चर्चेस आहेत आणि एक छोटे मंदिर देखील आहे. गावात, जवळपास तीनशेच्या आसपास भारतीय वंशाची माणसे आहेत आणि खऱ्या अर्थी, "अल्पसंख्य" आहेत!! 
मी शनिवारी रात्री गावात आलो आणि गावाच्या वेशीवर, मला राम नायडू (याचीच बदली झाली होती) भेटायला आला. कंपनीने माझी सोय एका खासगी गेस्ट हाउसमध्ये केली होती. अर्थात, ही सोय तात्पुरती होती. मी पोहोचलो तेंव्हा रात्रीचे १० वाजले होते. दुसऱ्या दिवशी, मी न्याहारीसाठी तिथल्या हॉलमध्ये आलो तेंव्हा माझी ओळख, त्या गेस्ट हाउसच्या मालकिणीशी झाली. एलिझाबेथ उर्फ लिझ. गोऱ्या वर्णाची, सोनेरी केस, तशी ठेंगणी पण अति बडबडी. केसांचा पोनीटेल आणि अधून मधून सिगारेट ओढायची सवय. चेहऱ्यावर दोन, तीन तीळ आणि वय जवळपास ३२,३३ च्या आसपास. घटस्फोटीत पण सध्या एका बलदंड गोऱ्या माणसाबरोबर "लिव्ह-इन-रिलेशन" मध्ये रहात आहे. गेस्ट हाउस तसे खूप मोठे आहे. एकूण ५० खोल्या आहेत आणि प्रत्येक खोली म्हणजे स्वतंत्र घर,असे स्वरूप. त्यामुळे कुणालाही "एकांतवास" सहज प्राप्य. 
मला, रोजची न्याहारी, त्या बिलाच्या पैशात अंतर्भूत होती. पहिल्याच दिवशी, तिथे "सलामी" सारखे बेचव पदार्थ बघितल्यावर, काय खायचे, हा प्रश्नच पडला. मी काही घेत नाही, हे बघितल्यावर लिझ माझ्याकडे वळली. मला, "बीफ","पोर्क" खाण्याची बंदी (त्यावेळेस माझा रक्तदाबाचा प्रश्न थोडा उग्र झाला होता आणि बीफ,पोर्क वगैरे कायमचे सोडायला लागले होते) असल्याचे सांगितले. लगेच तिने, मला अंड्याचे आम्लेट आणि टोस्ट करून दिले आणि माझी ओळख वाढली. रविवार होता, त्यामुळे काय करायचे, हा प्रश्नच होता. नवीन गाव, परिचयाचे कुणीही नाही, त्यामुळे पुस्तक काढून वाचायला घ्यावे असा विचार मनात आला. 
थोड्या वेळात, तिथे राम नायडू आला आणि मला, त्याने त्याच्या घरी नेले. दुपारचे जेवण त्याच्याच घरी!! त्याच्या घरी, एकूणच कंपनीची सगळी माहिती मिळाली, इथे, माझ्या हाताखाली कितीजण आहेत आणि आणखी कितीजण लागण्याची शक्यता आहे, वगैरे बाबींबद्दल गप्पा झाल्या. राम तसा मोकळ्या मनाचा वाटला. अर्थात पहिल्या भेटीत आणखी किती समजून घेणार, हा प्रश्नच असतो. संध्याकाळी परत गेस्ट हाउसवर परतलो. रात्री जरा पाउस शिंपडला आणि वातावरण थंड झाले. वास्तविक ऑक्टोबर महिना म्हणजे हिंवाळा संपायच्या मार्गावर पण पावसाने परत थंडी आणली. चक्क खोलीतील हीटर लावून, बेड गाठला. 
सोमवारी, सकाळी लगेच तयार झालो आणि राम आला आणि लगेच ऑफिस गाठले. रामने, माझी ओळख स्टीफन डेवीस बरोबर करून दिली. हा, इथल्या बृवरीचा General Manager. गोरापान वर्ण,निळे डोळे, हाडपेर मजबूत (पुढे समजले, हा मिलिटरी मध्ये होता) किंचित घोगरा आवाज, उंची साधारणपणे सहा फुट. खरतर प्रथमदर्शनी उग्र चेहऱ्याचा वाटला आणि याच्याशी माझे कसे काय जमणार, हाच विचार मनात आला. नंतर, माझी ओळख, माझ्या Department staff बरोबर झाली. Accountant सह, माझ्या साथीला ४ माणसे होती. एक भारतीय वंशाची मुलगी सोडल्यास, बाकी सगळा गोऱ्या लोकांचा कारभार. लगेच मी, माझ्या केबिनमध्ये शिरलो आणि कामाचे स्वरूप समजून घ्यायला सुरवात केली. 
दर महिन्याच्या १० तारखेच्या आत, संपलेल्या महिन्याची Balance Sheet तयार करून देणे, त्याच्या बरोबर, इतर आर्थिक व्यवहाराचे रिपोर्ट्स तसेच काही नवीन खरेदी करायची झाल्यास, त्याबद्दलचे पेपर्स इत्यादी रिपोर्ट्सचा फोल्डर, जोहान्सबर्ग इथे, आमचे हेड ऑफिस होते, तिथे पाठवायचे. हेड ऑफिसमध्ये महिन्यातून एकदा, देशातील सगळे फायनान्स अधिकारी एकत्र जमून, मीटिंग होत असे. तिथे सगळ्या प्रश्नांचा साकल्याने विचार विनिमय होत असे आणि पुढे आणखी सुधारणा करायच्या झाल्यास, कशा करायच्या आणि त्या कशा राबवायच्या, इत्यादी बाबींची चर्चा होत असे. 
माझे आणखी मुख्य काम म्हणजे, दिवसांतून एकदा बृवरीला भेट द्यायची आणि Stock चा अंदाज घ्यायचा. अर्थात बृवरी आणि ऑफिस एकाच प्रांगणात असल्याने, त्याचा फारसा प्रश्न नव्हता परंतु आमचे ४ डेपोज होते, तिथे जाउन, Stock Audit करणे आवश्यक होते आणि त्यात नियमितता आणायची होती. हे डेपोज, शहरापासून फार दूर आणि अगदी अंतर्भागात होते. एका डेपो भेट द्यायची म्हणजे सगळा दिवस जायचा. 
पहिल्या दोन दिवसांत, या सगळ्या कामाची कल्पना आली आणि मला पुढे काय करायचे आहे, हे देखील समजले. प्रत्येक कंपनीची, स्वत:ची अशी कार्यशैली असते, रिपोर्ट्स कसे बनवायचे, याबाबत स्वतंत्र विचार असतो आणि ती तुम्ही जितक्या लगोलग आत्मसात कराल, तितके तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता अधिक!! माझे पहिले काम म्हणजे घर शोधणे. गेस्ट हाउस, ही कंपनीने केलेली तात्पुरती सोय होती. लगोलग पेपर्समधून एजंट्सची नावे शोधली आणि पुढील आठवड्याभरात एक घर नक्की केले.
एव्हाना लिझशी चांगली ओळख झाली होती. सकाळी, केवळ माझ्यासाठी म्हणून, ती मसाला आम्लेट करून देणे किंवा मला कॉफी आवडते म्हणून , दुधाची कॉफी न करता, क्रीम टाकून कॉफी तयार करीत असे. आता कुणीही असे म्हणेल, आमच्या कंपनीकडून तिला बराच "बिझनेस" मिळत होता, म्हणून माझी बडदास्त राखली जात होती पण तसे नव्हते. कारण, आमच्या हेड ऑफिसमधून बरेच वेळा वेगवेगळे अधिकारी यायचे आणि तिथेच उतरायचे पण, त्यांना अशी Treatment मिळाल्याचे, निदान मी तरी बघितले नाही. असो……. 
माझ्या Department मध्ये, स्टीव, कारेन, डेल्फी या गोऱ्या तर, किम नावाची भारतीय वंशाची मुलगी होती. तिथेच आमचा मार्केटिंग विभाग होता आणि हा विभाग मात्र बहुतांशी काळ्या लोकांच्या हातात होता. कंपनीचा सगळा व्यवहार Cash basis वर चालायचा आणि तिथेच खरी जोखीम होती. Cash Collection हे माझ्या अखत्यारीत येत असल्याने, तो व्यवहार फार काळजीपूर्वक बघावा लागत असे.खरे सांगायचे तर, आमची बियर ही, दर्जाच्या दृष्टीने कमअस्सल आणि स्वस्त होती, जिला तिथे "सोर्घम बियर" असे नाव होते. मी, जवळपास दोन वर्षे तिथे काढली पण एखाद दुसरा प्रसंग वगळता, कधीही घेतली नाही आणि घेतली ती देखील थेंबाच्या स्वरूपात!! 
मी, तिसऱ्याच दिवशी, माझ्या खात्याची मीटिंग घेतली आणि प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप समजून घेतले. एक बरे होते, सगळेजण याच गावात राहणारे होते. मी, वगळता, सगळेजण इथे जवळपास, काही वर्षे काम करून, अनुभवी झाले होते. एकतर गाव संपूर्ण अपरिचित, गावात ओळखीचे कुणीही नाही. जवळपास कुठले शहर देखील नाही - जोहान्सबर्ग शहर इथून २०० कि.मी. लांब!! सुरवातीला, इथे दिवस कसे काढायचे, हा प्रश्नच होता!! अर्थात, सोमवार ते शुक्रवार, कामाचे दिवस असल्याने, इतर काही करण्याचा प्रश्नच नव्हता पण, शनिवार, रविवार, मात्र आ वासून उभे राहायचे!! 
स्टीफनने माझी अडचण ओळखली आणि त्याने मला, तिथल्या गोल्फ क्लबचा मेंबर होण्याचे सुचवले, नुसते सुचवले नाही तर तिथला फॉर्म आणून, माझ्याकडून भरून घेतला!! मला आजही स्पष्टपणे आठवत आहे, माझा पहिला दिवस. आयुष्यात कधीही गोल्फ खेळायचा प्रसंग आला नाही आणि इथे मी त्यानिमित्ताने सगळा सरंजाम विकत घेतला!! मी आणि तो, तिथे एकत्रच गेलो. गेल्यावर, लगेच त्याने माझी, तिथल्या ट्रेनरशी ओळख करून दिली आणि माझे शिक्षण सुरु झाले!! आपल्याला वाटतो तितका हा खेळ सहज, सोपा अजिबात नाही, हे पहिल्याच दिवशी ध्यानात आले. या खेळत वेगवेगळ्या प्रकारच्या "स्टिक्स" असतात आणि ज्या प्रकारे फटका मारायचा आहे, त्याला साजेशी स्टिक्स वापरणे जरुरीचे असते. हळूहळू खेळाचे नियम समजायला लागले आणि मला त्याची गोडी वाटायला लागली. इथे सतत जाण्याचा फायदा एक(च) झाला, गावातील अनेक प्रतिष्ठित गोऱ्या वर्णाची माणसे प्रत्यक्ष ओळखायला लागली. 
महिन्यातील शेवटच्या शनिवारी रात्री तिथे, बॉल डांस पार्टी असते. अशा पार्ट्यांमध्ये माझा शिरकाव झाला. तिथे मला, खऱ्याअर्थाने, हे नृत्य समजले आणि आपण समजतो तितके सोपे, अजिबात नाही, हे नव्याने आकळले. इथे तुम्हाला ड्रेस कोड पाळावाच लागतो अन्यथा प्रवेश नाकारला जातो. क्लबची तशी शिस्त आणि नियम आहे. ज्या रंगाचा सूट असेल, त्याच रंगाची ट्राऊझर आणि गळ्याला टाय किंवा बो, लावणे क्रमप्राप्त!! ड्रिंक्स कसे घ्यावे, कुठल्या ग्लासातून घ्यावे, याचे देखील शास्त्र असते, हे नव्याने समजले. ड्रिंक्स घेताना, संभाषण कसे करावे आणि कुठले विषय बोलायला घ्यावेत तसेच विनोद देखील कसे करावेत, हे सगळे शिक्षण तिथे मला मिळाले. ड्रिंक्स घेताना वचावचा बोलणे म्हणजे ड्रिंक्सचा अपमान आहे. ड्रिंक्स घुटक्या घुटक्याने, गालात घोळवत घेतले म्हणजे त्याची खरी लज्जत कळते आणि मुख्य म्हणजे, मी आख्खी बाटली रिचवली, असला मूर्ख शेखीपणा इथे औषधाला देखील बघायला मिळत नाही!! 
वास्तविक, स्टीफन फक्त वाइन घेतो आणि ती देखील प्रसंगोत्पात पण, ड्रिंक्सला अफलातून कंपनी. ऑफिसमधील करडेपण, अशावेळी चुकूनही आढळत नाही. हलक्या नर्म आवाजात बोलत असतो. माझा आवाज म्हणजे काय वर्णावे? परंतु पुढे मी देखील आवाजाचा आवाज, खालच्या पातळीवर आणला. आमची ओळख आजही टिकून आहे आणि याचे खरे श्रेय स्टीफनकडे!! या माणसाने माझ्यावर अपरिमित प्रेम केले. त्याच्या घरी, वारंवार घेऊन गेला आणि त्याच्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखे वागवले. वास्तविक, गोरे लोकं फारसे इतरांच्यात मिसळत नाहीत आणि त्यांच्या घरात तर अजिबात प्रवेश मिळत नाही. स्टीफन याबाबत वेगळा!! त्याच्या घरी मी दोन ख्रिसमस साजरे केले पण त्याची आठवण आजन्म राहिली!!
महिन्याभरात, नव्या जागी रुळायला लागलो. नवीन घर घेतले आणि आता गाडी घेण्याची गरज निर्माण झाली. इतकी वर्षे, ज्या कंपनीत नोकरी केली, तिथे त्या कंपनीची गाडी मिळत असे पण आता, या कंपनीने, पगारात "अलाउन्स" दिल्या कारणाने गाडी आवश्यक ठरली. इथे परत स्टीफन कामाला आला. त्याचा जावई, जगप्रसिद्ध Avis कंपनीचा सेल्स डायरेक्टर असल्याने, माझे काम भलतेच सोपे झाले. इथे एक पद्धत फार छान आहे. कुठल्याही कामासाठी "लोन" मिळणे, सहज शक्य असते. तुमची पगाराची स्लिप आणि राहण्याचा कायमचा पत्ता - ज्याला Permanent Residency म्हणतात, तसेच ड्रायविंग लायसन्स कॉपी असली की दोन दिवसात, तुमचे काम होते. 
या कंपनीत, दर महिन्याला जोहान्सबर्ग इथल्या हेड ऑफिसमध्ये जाणे भाग असल्याने, गाडी आवश्यक आणि तशी मी ओपेल कोर्सा घेतली. गाव तसे फारच लहान असल्याने, रोजचे ड्रायविंग तसे फार होत नसे, फारतर ३,४ कि.मी.!! घरी जेवण करणे, आता मला चांगल्यापैकी जमायला लागले आणि एके दिवशी मी, लिझला घरी जेवायला बोलावले. अर्थात, तिच्याबरोबर तिचा बॉय फ्रेंड आलाच. अर्थात, त्याच्याशी देखील ओळख चांगली झाली होती. घरी आले, तशी मी ड्रिंक्सबद्दल विचारले तर लिझ एका पायावर तयार पण, तिचा बॉय फ्रेंड (नाव विसरलो) मात्र निर्व्यसनी!! मी, तसे भारतीय पद्धतीचे जेवण करायला शिकलो होतो आणि इथे एकूणच मसाले वापरण्याचे प्रमाण नगण्य, हे ध्यानात ठेऊन मी पदार्थ बनविले होते. माझ्या मते सपक पण त्यांच्या मते मसालेदार!! रविवारी, सकाळी आले पण दिवसभर आम्ही गप्पा मारीत होतो. परत एकदा, ड्रिंक्स घेताना, गोरा फार मिकाला होऊन, गप्पा मारतो, याचा तुडुंब अनुभव घेतला. मला आजही असेच वाटते, पार्टी करावी तर गोऱ्या लोकांनी!! कुठेही गोंधळ नाही, सगळे अतिशय शिस्तवार आणि शांतपणे!! याचा अर्थ असा नव्हे, सगळेच गोरे एकाच माळेचे मणी असतात. क्लबमध्ये धुडगूस घालणारे बरेच गोरे, मी बघितलेले आहेत. पुढे प्रिटोरिया शहरात नोकरी करताना, भिक मागणारे गोरे देखील बघितले आहेत. 
ऑफिसमध्ये, स्टीव जरा दुखावलेला होता. रामची बदली होत असताना, त्या जागेवर, त्याला यायचे होते आणि मी मध्ये आलो, म्हणून त्याचा, त्याला राग होता. वास्तविक स्टीफनने मला, पहिल्याच भेटीत हे सांगितले होते. त्यामुळे, त्याच्याशी वागताना, मी जरा नरमाईने वागत होतो. अखेर, त्यांच्याकडून काम करवून घेणे, ही माझीच जबाबदारी होती. बाकीच्या तीनही मुली मात्र व्यवस्थित काम करायच्या. काही दिवसांनी, मी त्यांच्याशी हसत खेळत दोस्ती जमवली. कारेन तर पुढे बरीच वर्षे माझ्या संपर्कात होती. कारेन म्हणजे चेन स्मोकर!! घटस्फोटिता, पदरी एक मुलगी (मुलीचे वय तेंव्हा ५ वर्षे!!) असल्याने, नोकरी आवश्यक. एकटीच रहात होती. मला खरेच नवल वाटते, आणि या मुलीबद्दल तर जास्तच. एका लग्नाचा विषण्ण करणारा अनुभव जमेस असून देखील, लगोलग कुणाच्या तरी प्रेमात पडतात. ही मुलगी देखील, आमच्याच ऑफिसमधील, केप टाऊन इथल्या स्मिथच्या प्रेमात पडलेली!! स्मिथचे लग्न झालेले आणि बायको घरात असून देखील, हिच्याशी संबंध ठेऊन!! सगळे राजरोस!! कुठेही लपवाछपवी नाही!! ऐकताना, अनिल कानकोंडा!! 
महिन्याच्या महिना रिपोर्ट्स जायला सुरवात झाली. बृवरीत रोजची फेरी सुरु झाली. आणि एके दिवशी, एका डेपोला भेट देण्याचे ठरविले. भेट, ही काहीही न कळविता करायची!! ऑफिसची गाडी आणि ड्रायव्हर घेतला आणि सकाळी १० वाजता निघालो. सखिले गावात डेपो होता, आमच्या ऑफिसपासून, १०० कि.मी.वर!! या भेटीत मला "खरी" साउथ आफ्रिका बघायला मिळाली. आपल्याला टीव्हीवर जे दर्शन घडते, तो सगळा मार्केटिंगचा भाग असतो. थोड्या वेळात, आमची गाडी, हमरस्ता सोडून, आडमार्गाला लागली आणि मातीचा रस्ता सुरु झाला. आणखी पुढे गेल्यावर, वस्ती तर विरळ झालीच पण, रस्ता खडकाळ लागला!! अगदी भारतीय रस्त्यांची आठवण झाली!! डेपो गाठला आणि लगोलग stock check सुरु झाले. दोन तासानंतर, फारशा गंभीर गफलती न आढळल्याने, तसा रिपोर्ट तयार केला आणि आणखी एका आडवळणावरील बियर हॉलला भेट दिली. आपल्याकडील देशी दारूचा गुत्ता आणि इथला बियर हॉल, यात तत्वत: काहीही फरक नाही!! तसाच जुनाट कळकट हॉल, दोन,तीन माणसे झिंगलेली, एका टेबलावर बियर सांडलेली असल्याने, त्याचा उग्र दर्प सगळीकडे पसरलेला. आणखी दोन माणसे काकुळत येई पर्यंत प्यायल्याने, तिथेच आडवी झालेली. ही अवस्था दुपारी ३,४ वाजताची!! माझे काम उरकणे अत्यावश्यक असल्याने, नाक दाबून, अर्ध्या तासात तिथून निघालो. बाहेर आलो आणि बाहेरील मोकळ्या हवेचा सुगंध शरीरात भरून घेतला!! 
परतीच्या वाटेवर, वाटेत काळ्या लोकांच्या अनेक वस्त्या दिसत होत्या. अक्षरश: शेणामातीने लिंपलेल्या भिंती, आधाराला चार,पाच काटक्यांचा आधार!! अशा अनेक झोपडपट्ट्या दिसत होत्या. मला नवल वाटले, इथे थंडी म्हणजे हाडे काकडून टाकणारी आणि अशा हवेत, ही माणसे कशी जगत असतील. घरात जिथे दिवा लावायला पैसा नाही तिथे "हीटर" म्हणजे सुखाची परमावधी!! अर्थात, रस्त्यावरील इलेक्ट्रिक केबल्सवरून वीज चोरायची, हे नित्याचे काम!! ही साउथ आफ्रिका पार वेगळी आणि फारशी कुणाच्या दृष्टीस न पडणारी!! जगातील यच्चयावत काळे धंदे या वस्त्यांमधून कायम चालू असतात, ड्रग्स तर सिगारेटच्या जोडीने सेवन करणार!! त्यामुळे डोळे सतत तांबारलेले. आधीच काळा वर्ण, त्यात सगळ्यांच्या खुरटलेल्या दाढ्या आणि लाल डोळे!! अंगाने उंच, धिप्पाड असल्याने, जवळ जाण्याची देखील भीती!! माझ्या कामाचा हा अनिवार्य भाग असल्याने, मी त्या दोन वर्षांत, अशा वस्त्यांमधून बराच हिंडलो.पुढे, प्रिटोरिया, जोहान्सबर्ग सारख्या आलिशान शहरात राहिलो पण, हे दर्शन कधीच पुसले गेले नाही!! 
आता मात्र, स्टीवला जाणीव व्हायला लागली, मी इथे रुळायला लागलो आहे आणि त्यामुळे त्याच्या कारवाया अधिक वाढल्या (अर्थात हे माझे आत्ताचे म्हणणे आहे) काम वेळेवर करून न देणे, कामात चुका करणे आणि ज्या दिवशी अत्यंत महत्वाची कामे असतील, त्या दिवशी रजा घेणे असले उद्यॊग सुरु झाले.त्यावेळी मी थोडा काणाडोळा केला (अंती मला हे फार महागात पडले) आणि त्याच्या कलाने घेण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यातून, त्याचे याच वेळेस लग्न ठरले (लग्न क्रमांक ३!!). आता, त्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून, मला त्याला पार्टी देणे भाग होते. एका रविवार सकाळी, तो आणि त्याची वाग्दत्त वाढू, याना मी तिथल्या नदीकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये बोलावले. स्टीवची फियांसी - कार्मेन त्याच्यापेक्षा खूपच तरुण होती. स्टीव, त्यावेळेस, ५७ वर्षांचा होता तर कार्मेन केवळ ३२!! असो…. पुढे मला समजले, हे लग्न देखील मोडले पण त्यावेळी, माझा स्टीवशी संबंध तुटला होता!! 
लग्न मात्र थाटात झाले. चर्चमध्ये लग्नविधी बघायचा, माझा पहिलाच प्रसंग!! इथेच मी चर्च मधील ऑर्गन बघितला आणि त्याचे स्वर, चर्च कसे भरून टाकतात, याचा अनुभव घेतला. वास्तविक इथले चर्च तसे प्रचंड, भव्य वगैरे नाही पण, चर्चमध्ये शिरल्यावर  प्रकारचा थंडावा मिळतो आणि शांतता लाभते. या अनुभव, मी इथे रहात असताना, पुढे वारंवार घेतला. अर्थात रीतीरिवाज तसेच असतात. पूर्वी चित्रपटात काही प्रसंग बघितले, त्याचीच जणू प्रतिकृती, ही इथे बघत होतो. अर्थात, चित्रपटात बघणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे, यात फरक राहणारच.संध्याकाळी लग्न झाले आणि एका हॉटेल मध्ये डिनर पार्टी सुरु झाली. सुरवातीला Champagne दिली गेली आणि स्टीवने Dance Open केला!! अगदी मध्यरात्र उलटून गेली तरी पार्टी चालू होती. खानपानाची रेलचेल होती. रात्रीचे २ वाजले तशी मी आणि स्टीफन, दोघांनी निघायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रविवार होता पण तरी पुरे!! या विचाराने, आम्ही पार्टी सोडली. नंतर समजले, पार्टी पहाटे ५ वाजता संपली!!    
लग्न झाल्यावर काही दिवसांची सुटी घेऊन, स्टीव परत कामावर रुजू झाला. मधल्या सुटीच्या काळात, कारेनने त्या कामाचा बोजा उचलला होता. मध्यंतरी, आमच्या बृवरीमधील भ्रष्टाचार बाहेर पडला. बृवरीचा धंदा वाढवा म्हणून, आमची कंपनी, वेगवेगळ्या जागी, बियर हॉल किंवा निरनिराळी विक्री केंद्रे उभारण्यास अर्थ सहाय्य करीत असते. अर्थात, हा सगळा पैसा, हेड ऑफिसवरून येत असे पण याबाबतच्या कायदेशीर बाबी, आम्हाला इथे पूर्ण करून घ्याव्या लागत. त्यासाठी, बृवरीने एक काळा माणूस नेमला होता (नाव आता विसरलो) आणि त्याच्याकडे जागा, ठरविणे, त्याची कायदेशीर कागदपत्रे तपासणे/तयार करणे इत्यादी कामे असायची. स्टीफनचा त्याच्यावर विश्वास होता आणि त्याचा याने फायदा उठवला. माझ्याकडे जेंव्हा stock तपासण्याचे काम आले तशी, याच्या कामाबाबत मला संशय यायला लागला. एके दिवशी, मी आणि स्टीफन, दोघांनी, याच्या अपरोक्ष, याच्या ऑफिसची झडती घ्यायचे ठरविले आणि तिथे अनेक बोगस पेपर्स आढळले आणि माझा संशय खरा ठरला. आर्थिक भ्रष्टाचार फार नव्हता, २०,००० Rands इतपत होता आणि आणि आमच्या पातळीवर, हे प्रकरण हाताळू शकत होतो. पोलिसांना मध्यस्थी केले आणि अनेकांच्या जाबजबान्या घेऊन, केस उभी केली. 
या केस निमित्ताने, मी आणि स्टीफन अधिक जवळ आलो. याच सुमारास, ख्रिसमस आला, इथे या काळात, एकतर भारतात जात असे किंवा इथेच काही मित्र एकत्र जमून, रात्रभर पार्टी करण्याचा घाट घालीत असे. या वर्षी मात्र, मी मे महिन्यात भारतात गेलो असल्या कारणाने, या ख्रिसमसला सुटी अशक्य. मी इथेच आहे, हे समजल्यावर स्टीफनने मला, त्याच्या घरी बोलावले.  गोऱ्या माणसाच्या घरी ख्रिसमस साजरा करण्याची पहिलीच वेळ. त्याच्या बायकोशी, माझी गाठभेट पूर्वीच झालेली असल्याने, तसा प्रश्न नव्हता. या निमित्ताने, माझा गोऱ्या कुटुंबात समावेश झाला. २४ तारखेच्या दुपारीच घरी यायचे निमंत्रण मिळाले होते. घरी आलो तशी, स्टीफनच्या दोन्ही मुली आणि त्याचे जावई आले होते, त्यांच्याशी ओळख झाली. गप्पा मारायला लगोलग सुरवात झाली. वास्तविक स्टीफनच्या एका जावयानेच मला गाडी मिळवून दिली होती. त्याच्याशी गप्पा अधिक रंगल्या. गोरा माणूस, पार्टी कशी रंगवतो, याचा परत एकदा रोकडा अनुभव आला. केवळ दुसऱ्यावर विनोद करायचे नसून, स्वत:वर व्यंगोक्ती करण्याचे, त्याचे कसब दांडगे असते!! जशी संध्याकाळ आली तशी ड्रिंक्स बाहेर आले, घरातील म्युझिक सिस्टीम सुरु झाली आणि घरातल्या सगळ्यांचे पाय थिरकायला लागले!! अतिशय मंद आवाजातील Waltz संगीत, हातात बियर किंवा व्हिस्कीचा ग्लास,  टेबलावर खमंग भाजलेली टर्की आणि वातावरणात आल्हाददायक थंडी!! माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय ख्रिसमस सोहळा!! 
जानेवारीत कामाची भाऊगर्दी सुरु झाली कारण, फेब्रुवारी मध्ये, आमचे Annual Budget सादर करायचे असते. या रिपोर्टवर, आमचे वार्षिक फंडिंग  अवलंबून!! लगोलग, मी आणि स्टीफन, एकत्र बसून कामाला सुरवात केली. संध्याकाळ, रात्रीत परिवर्तित व्हायला लागल्या. याचा परिणाम असा झाला, माझे दैनंदिन कामातील लक्ष जरा दुरावले. कारेन आणि इतरजण, रोज संध्याकाळी, मला रिपोर्ट करायच्या पण, स्टीव मात्र दुरावा असल्यासारखा वागायला लागला. अखेर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, आमचे बजेट फायनल झाले आणि मी, हेड ऑफिसला सगळे रिपोर्ट्स पाठवून दिले. यात सगळ्या घालमेलीत, जवळपास, ४ आठवडे गेले. 
परत मी दैनंदिन कामात लक्ष द्यायला सुरवात केली. आमच्याकडे, दर आठवड्याला Petty Cash Budget असते आणि त्याप्रमाणे, आम्ही, Daily Collection मधील, काही रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवतो आणि बाकीची cash बँकेत भरतो. हे काम जरी माझे असले तरी, या काळात, स्टीव करीत होता आणि काही दिवसांनी, मी त्याच्याकडे Petty Cash Statement मागितले. नेहमीप्रमाणे, माझे ऑडीट सुरु झाले आणि कुठेतरी गफलत आढळायला लागली. जवळपास, ५,००० Rands चा हिशेब लागत नव्हता. मी जसा त्याबद्दल जाब विचारला तशी स्टीव समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. लगेच मी स्टीफनला मध्यस्थी केले आणि रिपोर्ट तयार केला!! वास्तविक ५,००० रक्कम म्हणजे फार नाही आणि स्टीवला चांगला पगार होता, म्हणजे या पैशाचा मोह पडावा अशी परिस्थिती नक्कीच नव्हती. 
अर्थात, हा घोटाळा, पर्यायाने माझी जबाबदारी होती कारण मी इतके दिवस दुर्लक्ष केले होते. हेड ऑफिसला बातमी सांगणे आवश्यक होते. वास्तविक, त्याच्या पगारातून, ही रक्कम कापून घेऊन, प्रकरण संपवता आले असते पण दुर्दैवाने तसे झाले नाही. जसे प्रकरण, हेड ऑफिसकडे गेले तशी त्याला कंपनीतून काढून टाकावे, असा एक सूर निघाला. मी याबाबत स्टीफनशी चर्चा केली आणि काढून टाकणे योग्य, असेच आम्हा दोघांचे मत पडले पण, याचे नुकतेच लग्न झाले आहे आणि अशा परिस्थितीत, नोकरी जाणे कितपत योग्य आहे? हा विचार मी मांडला आणि प्रकरण माझ्याच गळ्यात पडले, जणू काही, यात माझाच हात आहे!! प्रकरण चक्क CFO पर्यंत गेले आणि आम्हा तिघांना, हेड ऑफिसला चौकशीसाठी बोलावले गेले!! चौकशी अखेर, स्टीवची नोकरी तर गेलीच पण, माझ्या फाईल मध्ये Negligence चा रिपोर्ट ठेवला गेला!! साऊथ आफ्रिकेत नोकरी सुरु करून तेंव्हापर्यंत मला १२ वर्षे झाली होती पण, माझ्याबाबत असा संशय कुणीही घेतला नव्हता. त्याबाबत आजतागायत मी बरीच काळजी घेतली होती!! 
त्या संध्याकाळी काहीशा विमनस्क मनस्थितीत मी घरी आलो. जेवण करायचा मूड अजिबात नव्हता. शुक्रवार संध्याकाळ असल्याने, आता तसा आराम करायची संध्याकाळ होती. सरळ चर्च गाठले, आत गेलो नाही पण बाहेरच बराच वेळ बसून राहिलो. तिथून जवळच असलेल्या "वाल" नदीकाठच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथेच जेवण घेतले. रात्री स्टीफनचा फोन आला, सबुरीचे चार शब्द बोलला. त्यालाही कल्पना होती, यात माझा कसलाच हात नाही पण, त्याचे देखील हात बांधले गेले होते आणि त्याला देखील मर्यादा होत्या. 
दिवसेंदिवस आमच्या बृवरीचा धंदा  होता, पण हे होणारच होते. Production आणि sales, याचा मेळ घालणे कठीण होत होते.  त्यातून,currency devaluation चा फटका बसायला लागला. मालाची किंमत वाढवणे योग्य नव्हते कारण मुळातच अतिशय स्वस्त बियर, हाच मुद्दा, बियर खपण्यामागे होता. नवीन products काढायचे ठरवले आणि Pine Beer आम्ही सुरु केली. नवीन बियर म्हणून दोन, तीन महिने सेल्स वाढला तरी देखील ज्या हिशेबात overheads होते, त्या हिशेबात सेल्समध्ये वाढ होत नव्हती. अर्थात, हा प्रकार माझ्याच बृवरीबाबत नव्हता. "इस्ट लंडन","रस्टनबर्ग","केप टाऊन","पोर्ट एलिझाबेथ" इथल्या बृवरीचे performance काळजी करण्यासारखेच होते. थोडा विचार केला तर सहज समजून घेण्यासारखे होते. मुळात, या बृवरी, इथल्याच South African Breweries - SAB, या जगड्व्याळ कंपनीच्या होत्या. विजय मल्ल्यांना, साऊथ आफ्रिकेत बिझिनेस सुरु करायचा होता आणि या कंपनीला, या बृवरी विकायच्या होत्या, कारण यांचा धंदा 'बुडीत" खात्यात जाणारा होता. "किंग फिशर" आजही तिथे जम बसवू शकलेली नाही. 
आमचे भवितव्य आम्हालाच स्पष्ट दिसत होते. खर्च तर दिवसेंदिवस वाढत होते आणि उत्पन्न घटत होते. ऑफिसमधील मार्केटिंग विभाग प्रचंड ताणाखाली वावरत होता. इतक्यात स्टीफनला टांझानिया मधून नोकरीची "ऑफर" आली आणि त्याने नोकरीचा राजीनामा दिला. अर्थात, त्याने मला आधीच कल्पना दिली होती पण इतक्या झटापट सगळे घडेल, याची त्याला देखील कल्पना नव्हती. एक तर लखलखित सत्य होते, जर का ही बृवरी बंद पडणार असेल तर इथला स्टाफ इतर बृवरीमध्ये सामावून घेणे, सर्वथैव अशक्य होते आणि दुसरे म्हणजे इथल्या लोकांची स्थलांतर करण्याची फारशी मानसिकता नसते. शक्यतो, जिथे नोकरी आहे, तिथेच आयुष्य  काढावे, अशीच वृत्ती सगळीकडे दिसते. नोकरी बदलतील पण शक्यतो त्याच शहरात दुसरी बघतील. याचा परिणाम इथल्या स्टाफ वर होत होता आणि कुणीच कामाकडे फारसे लक्ष द्यायला तयार नसायचा. यात माझी फार कोंडी व्हायला लागली. हेड ऑफिस मधील काही लोकांकडून, बृवरी बंद पडण्याचे स्पष्ट निर्देश मिळाले प, मला असे इथल्या लोकांना कसे सांगायचे, हा प्रश्न पडला. कारेन, स्मिथबरोबर लग्न करून केप टाऊन शहरात स्थिरावणार होती. तेंव्हा तिचा प्रश्न काही प्रमाणात तरी सुटला होता पण इतरांचे भवितव्य टांगणीला लागले होते.  
मी तर बोलून चालून परदेशी, मला काय आज डर्बन तर उद्या प्रिटोरिया. फिरत्या घरात रहायची सवय जडवून घेतलेली. पुढे तसेच घडले, प्रिटोरिया शहरात पुढील काही वर्षे बस्तान बसवले. मला आजही असे वाटते, मी जितका साऊथ आफ्रिका बघितला तितका तिथल्या लोकल लोकांनी देखील फारसा बघितला नसेल!! 

No comments:

Post a Comment