आपल्या रागदारी संगीतातून ज्या भावना व्यक्त होतात, त्या बहुतांशी अतिशय संयत स्वरूपाच्या असतात. किंबहुना, "संयत" हेच रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अगदी दु:खाची भावना घेतली तरी, इथे "तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे" असेच दु:ख स्वरांमधून स्त्रवत असते. इथे ओक्साबोक्शी भावनेला तसे स्थान नाही. भक्ती म्हटली तरी त्यात लीनतेला सर्वात महत्व. ईश्वराच्या नावाने काहीवेळा "टाहो" फोडला जातो पण ती एक छटा झाली, लक्षण नव्हे. प्रणयी भावना देखील, संयत, मुग्धपणे व्यक्त होते. एखादे भक्ष्य ध्यानात ठेऊन, ओरबाडण्याला इथे कधीही स्थान मिळत नाही.
या दृष्टीने पुढे विचार करता, कलाकार आणि रसिक यांच्यामधील संवाद देखील असाच मूकपणे साधला जातो. खरेतर, "एकांताने, एकांताशी एकांतवासात साधलेला अमूर्त संवाद" असे थोडे सूत्रबद्ध वाक्य इथे लिहिता यॆइल. त्यामुळे कलेशी एकरूप होणे, एकात्मता साधणे, अशा वृत्तींना इथे साहजिक अधिक महत्व प्राप्त होणे, क्रमप्राप्त ठरते.
खरतर राग "चारुकेशी" आणि पूर्वीच्या संस्कृत ग्रंथात दिलेला समय आणि रागाची प्रकृती बघत, थोडा विस्मय वाटतो. सकाळचा दुसरा प्रहर, या रागासाठी उत्तम असे म्हटले आहे आणि या रागाचे "वळण" बघता, या काळात, प्रणयी भावना बाळगणे कितपत संय्युक्तिक ठरते, हा प्रश्नच आहे!! अर्थात, आधुनिक काळात, जिथे रागांच्या समयाबाबतचे संकेत आणि नियम, फारसे पाळले जात नाहीत तेंव्हा या मतांना किती महत्व द्यायचे, हे वैय्यक्तिक स्तरावर योग्य ठरते. आधुनिक जीवनशैली अशा संकेतांना साजेशी नाही, हेच खरे.
आता रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, या रागात सगळे स्वर लागतात परंतु, "धैवत" आणि "निषाद" हे स्वर कोमल घेतले जातात तर बाकीचे सगळे स्वर शुद्ध स्वरूपात, लावले जातात. याचाच अर्थ, रागाची जाती ही,"संपूर्ण-संपूर्ण" या प्रकारात जमा होते. या अनुरोधाने पुढे लिहायचे झाल्यास, "ध,नि,सा,रे,ग,म,ग,रे" किंवा "रे, ग,म,ध,प", तसेच "रे,ग,म,रे,सा" अशा स्वरांच्या संगती, या रागाची बढत करताना, वापरल्या जातात.
मुळात, हा राग कर्नाटकी संगीतातील परंतु रागांच्या चलनवलनामधून हा राग उत्तर भारतीय संगीतात आला आणि चांगल्यापैकी स्थिरावला. या रागाचा "तोंडवळा" बघता, कधी कधी या रागाचे, "भैरव" किंवा "दरबारी" रागाशी साहचर्य जाणवते. अर्थात, याला तसा अर्थ नाही कारण, असे साम्य, इतर अनेक रागांच्या बाबतीत देखील दर्शविता येईल.
कवियत्री इंदिरा संत यांचे एक कविता आठवली.
"वाऱ्यावरून की यावी
आर्त चांदण्याची शीळ
भारणाऱ्या गाण्यांतील
यावी काळजाची ओळ
संपलेल्या आयुष्याची
अशी एक सय व्हावी
तापलेल्या जीवभावां
धून नादावून जावी."
संगीताच्या क्षेत्रात खरेतर शब्द माध्यम हे नेहमीच परके राहिलेले आहे पण तरीही काहीवेळा शब्दांची जोड, आपल्याला जाणवणाऱ्या नेमक्या भावनांना मोकळी वाट करून देते, हे देखील तितकेच खरे.
आता आपण, या रागावर आधारित, उस्ताद शुजात खान यांनी सादर केलेली एक रचना ऐकुया. उस्ताद विलायत खानसाहेबांचा पुत्र, त्यामुळे अत्यंत व्यापक संगीताचा पट, लहानपणापासून उपलब्ध. अर्थात, संगीत शिक्षणाचा स्त्रोत हा इमादखानी घराण्याशी संलग्न. त्यामुळे वादनात, "गायकी" अंगाचा असर सहज समजून घेता येतो. काहीवेळा मात्र, गुरुभक्तीचा आंधळा स्वीकार केल्याचे जाणवते. वेगळ्या शब्दात, उस्ताद विलायत खानसाहेब, सतार वादन करताना, अधून मधून, "गायकी" दाखवत आणि त्या गायकीचे तंतोतंत प्रत्यंतर आपल्या वादनातून देत असत. हे सगळे, आपले वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे दाखवून देण्याचा प्रकार होता, याच सवयीची री ओढलेली, उस्ताद शुजात खान, यांच्या वादनात दिसून येते.
या सादरीकरणात, आलापी खास ऐकण्यासारखी आहे. त्यात "गायकी" अंग स्पष्टपणे दिसते. वादनावर बरेचवेळा उस्ताद विलायत खान साहेबांची किंचित छाप जाणवते तरी देखील स्वत:ची ओळख ठेवण्यात, हे वादन यशस्वी होते. वरती जी स्वरसंहती दिली आहे, त्याचे प्रत्यंतर या वादनात आढळते. तसेच आलापीनंतर जोडून घेतलेला "झाला" फारच बहारीचा आहे. यात एक गंमत आहे, सुंदर गत चाललेली आहे, मध्येच सुंदर हरकत घेतली जाते आणि त्या हरकतीच्या विस्तारात तान अस्तित्वात येते आणि असा सगळा लयीचा आविष्कार चालू असताना,ज्याप्रकारे, हा वादक "समे"वर येतो आणि ठेहराव घेतो, त्यावरून, वादकाचे, वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे समजून घेता येते. आणखी खास " बात"म्हणजे, द्रुत लयीत वादन चालत असताना, मध्येच एखादी "खंडित" तान घ्यायची आणि ती घेत आसनात, "मींड" काढायची!! वादनातील अतिशय अवघड भाग, इथे ऐकायला मिळतो.
हिंदी चित्रपट जेंव्हा सत्तरीच्या दशकात शिरत होता, त्यावेळेस,चित्रपट संगीतावरील पाश्चात्य संगीताचा प्रभाव बराच गडद झाला होता. किंबहुना, आधुनिक वाद्यमेळाची रचना, ही पाश्चात्य वाद्यमेळावर बरीचशी आधारित असायची. तसे अधून मधून, भारतीय संगीतावर आधारित चित्रपट आणि संगीत रचना ऐकायला मिळायच्या पण त्याचे प्रमाण, साठीच्या दशकाच्या मानाने बरेच कमी झाले होते आणि अशा वेळेस, "दस्तक" चित्रपट आला. या चित्रपटातील संगीताने, संगीतकार मदन मोहनला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता (उल्लेखनीय बाब म्हणजे मदन मोहनला "फिल्मफेयर" पुरस्कार कधीच मिळाला नाही!!) याच चित्रपटातील, एक गाणे आपल्याला चारुकेशी रागावर आधारित, असे ऐकायला मिळते. "बैय्या ना धरो, ओ बलमा" हेच ते लताबाईंच्या आवाजातील एक अजरामर गीत. केरवा तालात बांधलेली रचना आहे.
या गाण्याची गंमत म्हणजे, या गाण्यात, सुरवातीच्या ओळीत "चारुकेशी" राग दिसतो पण पुढे रचना वेगवेगळ्या लयीची बंधने स्वीकारते आणि रागापासून दूर जाते.तसे बघितले तर, "बैय्या ना धरो" अशी लखनवी बाजाची ठुमरी प्रसिद्ध आहे आणि या गाण्याचा मुखडा, त्या ठुमरीच्या रचनेवर आधारलेला आहे. मजेचा भाग असा आहे, पहिल्या अंतरा जिथे संपतो, तिथून रागाला बाजूला ठेवले जाते आणि चाल स्वतंत्र होते. मदन मोहन, यांच्या रचनांचे हेच एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. त्यांच्या चाली, लयीला अवघड होतात, त्या याच प्रकारे "स्वतंत्र" होतात म्हणून!! हे असे विस्तारीकरण करणे, अतिशय कठीण असते. लताबाईंची गायकी, अशा रचनेत खास खुलून येते. शब्दागणिक निश्चित हरकत, दाणेदार तान आणि गायनातून, कवितेच्या आशयवृद्धीचा प्रत्यय!! चालीचे "मूळ" ठुमरीमध्ये दडले असेल म्हणून कदाचित, पण चाल फार अवघड झाली आहे. गाण्यात फार, बारीक हरकती आहेत, ज्याने गाण्याचे सौंदर्य वाढते पण, इतरांना गायचे म्हणजे एक परीक्षा असते!!
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अप्रतिम मराठी भावगीतांपैकी एक गाणे - "रिमझिम झरती श्रावण धारा" हे गाणे रसिकांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. हे गाणे देखील चारुकेशी रागावर आधारित आहे. वास्तविक गाण्याचे शब्द मल्हार रागाचे भाव व्यक्त करतात,असे सत्कृतदर्शनी जरी भासले तरी एकूणच ही कविता, ही विरही भावनेकडे झुकलेली आहे. ज्याला "शब्दप्रधान गायकी" म्हणून गौरवावे लागेल, अशा ताकदीचे असामान्य गाणे म्हणता येईल. शक्यतो कुठेही "यतिभंग" झालेला आढळणार नाही. चाल तशी साधी आहे पण अवीट गोड आहे. बहुदा त्यामुळेच हे गाणे आपल्या भावभावनेशी निगडीत आहे.
संगीतकार दशरथ पुजारी यांची चाल आहे. हा देखील असाच, थोडा दुर्दैवी संगीतकार म्हणता येइल. आयुष्यभर कितीतरी अप्रतिम रचना सादर केल्या परंतु संगीतकार म्हणून फारशी मान्यता पदरी पडली नाही आणि हळूहळू विस्मरणाच्या फेऱ्यात हरवून गेला!!
आता आपण, या रागावर आधारित आणखी काही रचनांचा आस्वाद घेऊ, ज्यांच्या लिंक्स खालीलप्रमाणे आहेत.
गेले ते दिन गेले - हृदयनाथ मंगेशकर - श्रीनिवास खळे
दुख की लहरे छेडा होगा - गुलाम अली - केरवा
बेदर्दी बालमा तुझको मेरा मन - लता - आरझू - दादरा
बेखुदी मे सनम - लता/रफी - हसीना मान जायेगी - कल्याणजी/आनंदजी - केरवा
No comments:
Post a Comment