आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती "थिटा" आहे, याची नव्याने जाणीव होते. "मुक्तायन" काव्यसंग्रहात, "मी" या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते.त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!!
"माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून
तो केव्हढातरी अफाट प्रचंड असतो;
खिडकीच्या काचेतून चंद्र किरणांचा कवडसा आपल्या खोलीत पडतो,
पण कवडसाच, चंद्र नव्हे;
हजारो कवडसे पडले तरी, आकाशातील ती ज्वलंत घटना;
अनोळखीच राहते आपल्या जाणिवांना."
रागसंगीताबाबत संपूर्ण विचार जरी थोडा बाजूला ठेवला तरी, काही रागांबाबत देखील आपण, एकच एक भावना व्यक्त करणे निरातिशय जिकीरीचे आणि चुकीचे देखील ठरू शकते. इतक्या अनंत भावनांच्या छटा, त्या रागांतून, आपल्याला वेगवेगळ्या कारणाने जाणवत राहतात. काहीवेळा, काही प्रतिभावंत कलाकार त्यात, प्रत्येकवेळी स्वत:चा असा वेगळा विचार मांडून, त्या रागाची वेगळीच ओळख आपल्याला करून देतात आणि आपण मात्र, त्या रागाच्या दर्शनाने, अचंबित होतो.
चंद्रकौंस रागाबाबत माझी अशीच थोडी भावना आहे. खरे सांगायचे तर केवळ हाच राग कशाला, प्रत्येक रागाबाबत मला असेच वाटत आले आहे. आपण रागाला एका कुठल्यातरी भावनेचा रंग देतो आणि त्या चित्रात त्याला "बंदिस्त" करतो पण प्रत्यक्षात तो राग, आपल्याला प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या रंगाने मोहवून टाकत असतो. इथे या रागाला "नितळ" म्हणताना, माझी अवस्था अशी किंचित द्विधा झाली आहे.
"अनंत शिखरे निळी शिशिरमुग्ध संध्येतली,
मधून जडली तिला जलतरंग मेघावली;
तुझे बहरगीत की मयुरपंखसे आरसे,
अरण्यभर सांडला मधुर अस्त माझा दिसे".
कवी ग्रेस, यांच्या ओळी बहुदा माझा विचार स्पष्ट करतील.
आता थोडे तांत्रिक भागाकडे वळायचे झाल्यास, या रागाची ओळख - "औडव-औडव" अशी करता येते. "रिषभ" आणि "पंचम" स्वरांना या रागात स्थान नाही. "गंधार" आणि "धैवत" हे कोमल स्वर तर बाकीचे तीनही स्वर शुद्ध. रागच समय, रात्रीचे पहिला प्रहर असा दिला आहे आणि त्यातूनच माझ्या मनात "नितळ" ही कल्पना आली. उत्तरांग प्रधान राग आहे आणि प्रमुख स्वर संहती बघायला गेल्यास, "सा ग म ग सा नि नि सा"; " ग म ध नि सा" अशी ऐकायला मिळते.
किंचित अनुनासिक स्वर, अतिशय धारदार आवाज, लांब पल्ल्याचा गळा, पंजाबी धाटणीची गायकी आणि स्वरांवर "काबू" ठेवण्याची वृत्ती तसेच गाताना, अचानक "अकल्पित" स्वरस्थानांवर स्थिरावून, रसिकांना "धक्का" देण्याची आवड!! पंडित वसंतराव देशपांडे, यांच्या गायकीबद्दल असे काहीसे ढोबळ वर्णन करता येईल. वसंतराव "आलापी" गायनात फारसे रंगत नाहीत, असा एक "आरोप" त्यांच्याबाबतीत केला जातो परंतु जर का त्यांची "गायकी" जरा बारकाईने ऐकली तर त्यात फारसे तथ्य नाही, हेच आपल्याला कळून घेता येईल. खरी गोम अशी आहे, बहुतेकांना गायनात "चमत्कृती" आकर्षित करीत असते आणि तेच गायकीचे वैभव, असला चुकीचा समज करून घेतला जातो. याचाच परिणाम असा होतो, रसिकांना गायनातील "सरगम" या अलंकाराचे अतोनात असलेले आकर्षण!! वास्तविक, "सरगम" म्हणजे येऊ घातलेल्या तानेचा किंवा आधीच घेतलेल्या तानेचा किंवा आलापीचा "आराखडा" असतो परंतु या बाबीकडे दुर्लक्ष होते. वसंतरावांच्या बाबतीत, बरेचवेळा असेच घडत आले आहे. इथे आपण, त्यांनी सादर केलेला संपूर्ण लांबीचा "चंद्रकौंस" ऐकुया.
या रचनेतील सुरवातीला आलेली आलापी आणि ठाय लयीतील बंदिश ऐकताना, काही बाबी अवश्यमेव ध्यानात येतात. एखादी हरकत घेऊन किंवा तान घेऊन, परत समेवर येताना, स्वरांवर "किंचित" आघात देऊन ठेहराव घेणे किंवा मध्येच एखादी खंडित तान घेताना, स्वरांना जोरकस "धक्का" द्यायचा!! कदाचित, यामुळेच बहुदा, हा गायक, आलापीमध्ये रमत नाही, असा प्रवाद पसरला असावा. स्वच्छ, मोकळा आवाज, तिन्ही सप्तकात विनासायास "विहार" करण्याची अचाट क्षमता आणि प्रयोगशील गायकी, ताना घेताना, अफाट बुद्धीगम्यतेचा परिचय करून देणारी गायकी आहे. ठाय लयीतील हरकतींचा आस्वाद घेताना, याचा आपल्याला प्रत्यय घेता येतो. गायन ऐकताना, काही ठिकाणी, "किराणा" घराण्याची छाप जाणवते. या रचनेत, बराच वेळ सरगम घेतली आहे आणि ती ऐकताना, "धैवत" स्वरावर जो "ठेहराव" घेतला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. मी मुद्दामून ही रचना निवडली कारण ही रचना बहुतांशी "ठाय" आणि "मध्य"लयीतच सादर केली आहे.
वास्तववादी चित्रपट निर्मितीत ज्याचा उद्भव होतो, त्या संगीतावरच भर असलेले संगीतकार म्हणून वसंत देसाई, यांचे नाव घ्यावे लागेल. हिंदी, मराठी चित्रपट तसेच मराठी नाटक, या सगळ्या माध्यमात, सहज वावर करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व, असे देसायांबद्दल ठाम विधान करता येईल. याचा थोडा परिणाम असा झाला, त्याच्या रचनांत, कुठेतरी नाट्यसंगीताचा गंध राहिला, असे जाणवते. या शिवाय असेही जाणवते, पारंपारिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्याकारणाने त्या जागा, जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीत परंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, ध्यानात घेणे जरुरीचे आहे. या परंपरेचा आणि वसंत देसाई यांचा देखील, कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भर नव्हता. आणखी एक विशेष मांडता येईल. ज्या व्ही. शांताराम यांच्याशी आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीशी आयुष्यभर जवळचे संबंध असून देखील, जेंव्हा त्यांनी बाहेरचे चित्रपट निवडले, तिथे मात्र त्यांच्या शैलीचे वेगळे आणि अधिक विलोभनीय दर्शन घडते.
"सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन" हे गाणे आपण इथे ऐकायला घेऊया. चंद्रकौंस रागाच्या सावलीत बांधलेले गाणे असून, चित्रपट गीतांत प्रसिद्ध असलेल्या "दादरा" तालात बांधलेले आहे.
"संपूर्ण रामायण" सारख्या धार्मिक चित्रपट असल्याने, चालीची रचना आणि वाद्यमेळ, यात पारंपरिकता येणे क्रमप्राप्तच ठरते तरी देखील, चालीचा जरा बारकाईने विचार केला तर लगेच आपल्याला कळेल, चालीचा ढंग "गायकी" अंगाकडे झुकलेला आहे आणि रचनेत विस्ताराच्या भरपूर शक्यता आहेत. अर्थात, गायला लताबाई असल्याने, मुळातला सांगीतिक मजकूर, तितक्याच सक्षमतेने सादर केला जातो. गाण्यातील "पॉजेस" तसेच अचानक वरच्या सप्तकात चाल जाणे, ही तर या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत परंतु त्याचबरोबर, गाताना, बरेचवेळा शब्द तोडून गाण्यावर भर दिला जातो आणि याचे कारण, लयीच्या बंधनात, न बसणारी शब्दरचना. वसंत देसायांच्या रचनेत, शब्दांचे "औचित्य" या बाबतीत नेमकेपणाने सांभाळलेले दिसते.
संगीतकार म्हणून जरी पु.ल.देशपांडे यांची कारकीर्द दीर्घकालीन नसली तरी त्यांनी आपल्या काळात, अनेक असामान्य रचना तयार करून, त्यांनी आपल्यातील "कलाकारा"चे अंग अप्रतिमरीत्या दाखवून दिले आहे. बऱ्याचशा रचना तशा सहज, कुणालाही भुरळ पडतील अशा आणि गुणगुणता येतील अशा पातळीवर वावरतात. चित्रपटातील गाणी, खासगी भावगीते या प्रांतात या संगीतकाराचा प्रामुख्याने वावर राहिला. रचनाकार म्हणून जरी फार प्रयोगशील नसले तरी देखील,रचना "प्रासादिक" तसेच "रसाळ" म्हणता येतील. त्यांच्या रचनांवर काही प्रमाणात "बालगंधर्व" गायकीचा असर होता, हे स्पष्टपणे जाणवते. "हसले मनी चांदणे" हे मराठीतील प्रसिद्ध भावगीत, चंद्रकौंस रागावर आधारित आहे.
काहीशी पंजाबी धाटणीची पण तरीही मराठी नाट्यसंगीताचा "असर" दर्शविणारी रचना आहे. माणिक वर्मा यांचा किंचित अनुनासिक स्वर, लडिवाळ गायकी आणि कवितेचा आशय ध्यानात घेता, रचनेची चाल फारच सुंदर आहे. किराणा घराण्याची पूर्वपिठीका असल्याने, गाण्यात एकूणच "उदारता" हा विशेष जाणवतो. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय, नखरा पण अगदी लखनवी घराण्याचा नाही तसेच बनारसी ठुमरीच्या जवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा खास आविष्कार. मुखडा जरी खालच्या अंगाने येणारा असला तरी पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र वळणे घेत खाली येणार. भावपट मोठा नाही परंतु संदिग्ध गोडवा, हा स्थायीभाव. यामुळे, माणिक वर्मांची भावगीते महाराष्ट्रात प्रचंड गाजली. ताला शिवाय केलेली आलापी किंवा तालासाहित केलेली आलापी किंवा घेतलेल्या हरकती ऐकताना, इतर भावगीत गायिका आणि माणिक वर्मा यांची गायकी, यात फरक कळून येतो. याचा वेगळा अर्थ असा लावता येईल, मराठी भावगीतांत माणिक वर्मा, यांनी उत्तरेचा रंग फार सफाईने आणला आणि महाराष्ट्रात रुजवला.
आता आपण, चंद्रकौंस रागावर आधारित असलेली काही गाणी बघूया.
या डोळ्यांची दोन पाखरे
त्या तरुतळी विसरले गीत
No comments:
Post a Comment