"तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत;
वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान;
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा "जोगिया रंगे."
माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, 'जोगिया" रागाची एक छटा दर्शवतात. तसे काय किंवा काय, या कलाकृतींचा एकच एक ठाम अन्वयार्थ लावणे, हे त्या कलाकृतीवर काहीसे अन्याय करणारे असते आणि बहुदा हा एक (एकमेव नव्हे) निकष, उत्तम कलाकृतीबाबत मांडता येईल. आस्वादाच्या दृष्टीने हे गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु सतत वेगवेगळ्या अर्थछटा दृग्गोचर होणे, हे आव्हानात्मक देखील असू शकते. एका बाजूने मांडायचे झाल्यास, कविता काय किंवा संगीत निर्मिती काय, याची निर्मिती ही नेहमीच "अबोध" मनातून होत असते आणि त्याचे चलनवलन नेमके शब्दबद्ध करणे, निरातिशय जिकीरीचे होऊ शकते आणि परत त्यात व्यक्तिपरत्वे अनुभूती येउन, मग अन्वयार्थ अधिक अवघड होऊ शकतो. पण, हीच कलेची खरी "मजा" आहे, हे लक्षात घेतल्यास, बऱ्याच शंकांचा निचरा होऊ शकतो.
जोगिया रागाबाबतची माझी भूमिका यावरून लक्षात येणे शक्य आहे. "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत", या स्वरांचे प्राबल्य आहे, इतके की, जरी "षडज","मध्यम" हे स्वर या रागांचे "वादी - संवादी" असले तरी मनात तरळत राहतात, ते हेच कोमल स्वर आणि या स्वरांवर घेतलेला "ठेहराव". संस्कृत ग्रंथानुसार रागाचे वर्गीकरण "भैरव" थाटात केलेले आहे आणि बहुदा याचा परिणाम असावा, पण रागाची वेळ ही, पहाटेचा पहिला प्रहर सांगितलेला आहे. आता, याच अनुषंगाने बघायचे झाल्यास, वर दिलेल्या माडगूळकरांच्या ओळी किती अन्वर्थक ठरतात, हे सहज ध्यानात येऊ शकेल. या रागाची खरी ओळख दाखवायची झाल्यास, "प ध नि ध प" किंवा "प ध म रे सा" या स्वरसंहतीचा मागोवा घेत राहिले तर समजून घेता येईल.
एखाद्या कलाकाराची एखाद्या रचनेशी कायमची नाळ जुळते आणि ती रचना म्हणजे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वाची नाममुद्रा म्हणून प्रस्थापित होते. पंडित भीमसेन जोशींची "पिया मिलन की आस" ही रचना इतकी लोकप्रिय झाली की इतर कुणा गायकाने, ती रचना गायला दहादा विचार करावा. आपण इथे तीच रचना ऐकायला घेऊया. जोगिया रागाचा "अर्क" म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल. विशेषत: तार सप्तकातील ठेहराव आणि आस, फारच अप्रतिम आहे.
ज्या रागांत भावनिक आवाहन आहे, असेच राग बहुतांशी वेळा या गायकाने निवडल्याचे सहज ध्यानात येऊ शकते. आता, रागामध्ये भाव किंवा मूड का निर्माण होतो, हा संगीत सौंदर्यशास्त्रातील जटील प्रश्न आहे. परंतु, अनवट रागांपेक्षा प्रचलित राग, हे रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात आणि त्यानुसार रागांची निवड करणे, हे धोरण या गायाकाच्याच बाबतीत नेमकेपणी दिसून येते. अर्थात, अशा प्रकारच्या निवडीने, गायनात साचेबद्धता येण्याचा धोका निर्माण होतो पण पंडितजींनी त्याबाबत सावधगिरी बाळगून, त्यात नाविन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे देखील समजून घेता येते. एकूणच संपूर्ण गायनाचा विचार केला तर, तानांची गुंतागुंत, आग्रा घराण्याच्या आघातयुक्त आणि पुनरावृत्त स्वरांच्या परिणामांवर अवलंबून असलेल्या तानांच्या अंगाने जाते, असे म्हणता येईल. शिवाय त्यात भर आहे, ती आवाजाच्या लगावातील विरोधसंबंधामुळे अवतरणाऱ्या नाट्यात्मतेची. बोल-लय, बोलतान वा तिहाई वगैरेंवर फारसा भर नाही परंतु अंतिम परिणाम रंगदार होतो की नाही, हीच कसोटी अखेरची असते आणि तिथे मात्र पंडितजी बाजी मारून जातात. ठुमरी अंगाने जाणारी रचना पण तरीही शब्दाचा आशय बघता, त्यानुसार केलेले असामान्य सादरीकरण, असेच इथे म्हणता येईल.
भारतीय संगीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताकडील झुकावानुसार जोखणे योग्य आणि गरजेचे आहे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. परंतु दुर्दैवाने, भारतीय रागसंगीताचे ज्ञान वा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे, याला एक योग्यता-निकष म्हणून बरीच प्रतिष्ठा लाभली आहे. मग, संगीतरचनाकार कुठल्याही संगीतकोटीत काम करीत असू दे. या दृष्टीने विचार करता, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांचा विचार, रचनाकार म्हणून करताना, विश्लेषण करणे आवश्यक ठरते. वास्तविक त्यांची सगळी कारकीर्द बघितली तर आणि प्रसिद्धीचा अदमास घेतला तर, त्यांची गणना, तालाचे बादशहा म्हणून करण्यात येते आणि अर्थात ती फार एकांगी आहे. प्रस्तुत गाणे, "रात भर का है मेहमां अंधेरा" - चित्रपट "सोने कि चिडिया", मुद्दामून ऐकायला हवे. वास्तविक त्यांच्या संगीताचा ढंग बघता, त्यांना भारतीय रागसंगीत वा संबंधित बाबींचे फार तीव्र आकर्षण आहे,असे दिसत नाही. त्यामुळे, त्याच्या रचनांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तर, ते राग वापरतात, कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात वा त्याच्या सावलीत मुरलेला असतो दुसरा भाग म्हणजे चाल अवतरते आणि नंतर त्यात रागाची बीजे सापडतात. प्रस्तुत गाणे दीपचंदी तालात बांधलेले आहे पण या गाण्याच्या बाबतीत, असे ठामपणे म्हणता येईल, गाण्याची लयच मुळी अशा प्रकारे बांधली आहे की तालवाद्य नसले तरी चालले असते!!
गाण्याचा मुखडा, जर बारकाईने ऐकला तर ध्यानात येईल, इथे राग जोगिया आणि त्याचे स्वर केवळ आधार म्हणून घेतलेले आहेत. गाण्याची सुरवात अति तार स्वरांत सुरु झाली तरी गाण्याचा "मुखडा" घेताना, मात्र एकदम खालच्या सुरांत आणि शांतपणे सुरु होते.राग जोगिया इथे स्पष्टपणे दिसतो. पण पहिला अंतरा सुरु होण्याआधीचे, जे वाद्यमेळातून संगीत आपल्या समोर येते, ज्यात "कोरस" संगीताचा वापर केला आहे, तिथे तर स्पष्टपणे, ऑपेरा संगीताचा प्रभाव जाणवतो. याचा वेगळा अर्थ असा घेता येईल, रचनाकार, इथे गाण्याच्या अंतिम सादरीकरणाला महत्व देत आहे आणि त्यासाठी मग कुठूनही सांगीतद्रव्य उचलण्याची तयारी आहे, मग त्यात सुरवातीला ज्या रागाचा आधार घेतला आहे, त्याला सहज बिनदिक्कतपणे बाजूला सारण्याची हिम्मत आहे. याचाच दुसरा दृश्य परिणाम असा दिसतो, नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणले असेही दिसत नाही. नवीन मुखडे बंधने, हे अनेकदा, सर्जनशिलतेचे उदाहरण म्हणून दाखवता येते. या संगीतकाराचे प्रयत्न याबाबतीत तरी कमी पडले, असे म्हणायला जागा आहे.
सुप्रसिद्ध गायकनट बालगंधर्वांनी गायलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले "वद जाऊ कुणाला शरण" हे पद ऐकुया. खरतर, गाण्याचे ध्वनिमुद्रण काहीसे सदोष आहे पण तरीही खास वैशिष्ट्ये नक्कीच समजून घेता येतात. या गाण्याची चाल बघितली तर "जोगिया/कलिंगडा" या दोन्ही रागांचा आढळ या रचनेत ऐकायला मिळतो. अर्थात, रचनेचा मुखडा मात्र नि:संशय जोगिया रागावर आहे आणि याच रागाची दाट सावली आहे.
बालगंधर्वांनी लयसिद्धी प्राप्त होती. विशिष्ट मात्रांचे तालावर्तन सुरु झाले की त्याचे स्पंदन अंगी भिनल्यासारखे कायम राखणे, तबलजीने कसेही आड वाजवले तरी सुखाने गात राहायचे त्याना जमते, हे इथे लक्षात येते. मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, ही खास लयकारी पण शब्दांची किंवा अक्षरांची फेक जरा इकडे, तिकडे केल्याने सबंध तालावर्तन कसे उठून येते, हे देखील ऐकण्यासारखे आहे. सुरावटींचा पुनरावतार असावा, पण त्यांची पुनरावृत्ती टाळावी, हे एक कालासुत्र, त्यांच्या गाण्यात प्रत्ययाला येई.लयकारीची सूक्ष्म क्रीडा, हा विशेष इथे प्रत्ययाला येतो. आवाज फार बारीक नाही पण लगाव नाजूक आहे. विशेष म्हणजे त्यात अस्थिरता नाही. पट्टी उंच आहे पण तरीही मध्यममार्ग आहे. आवाज सहजपणे हलका होतो. आवाजात काही वेळा असे आढळते, त्याला स्वरावर स्थिर करून बघितले की तो जडावतो. तसे इथे काहीच घडत नाही. सहजपणे, दुसऱ्या स्वरावर जाणे, तिथे हलकीशी हरकत घेणे आणि त्यातून लय लांबविणे, इत्यादी अनेक सांगीत सौंदर्यवाचक क्रिया, या गाण्यात सहज ऐकायला मिळतात.आशयनिश्चिती करणारा एक काहीसा अमूर्त घटक म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्कटता. तसे बघितले तर, उत्कटता ही मनोवृत्ती सर्जनशिलतेची पूर्वअट असते. बालगंधर्व जे काही गात असत, त्यात एक उत्कटता, एक भारलेपण होते आणि ते ऐकणाऱ्यापर्यंत संक्रांत होणे, ही अपरिहार्यता होती. तसे बघितले तर संगीताचा आशय, गवयी-गाण्याचा नाही. पण तरीही त्या गायनाची सावली सादरीकरणावर पडलेली आढळते.
आता आपण या रागावरील आणखी काही गाणे ऐकुया.
कहे दो कोई ना करे यहां प्यार
दिल एक मंदिर
No comments:
Post a Comment