१९९३ च्या अखेरीस, मी नायजेरियाहून परत मुंबई इथे आलो. परदेशी नोकरी करण्याची जरी हौस फिटली नसली तरी अनुभव मात्र भरपूर पदरी जमा झाला होता. ध्यानीमनी नसताना, त्यावेळी मला Hongkong इथल्या नोकरीसाठी बोलावणे आले आणि मी निवडला गेलो. या शहराविषयी तशी बरीच माहिती होती आणि मी जायला उत्सुक देखील होतो. निवड पक्की झाली आणि तिसऱ्या दिवशी मला, साउथ आफ्रिकेसाठी, मुलाखतीचे बोलावणे आले. वास्तविक, त्यावेळी, साउथ आफ्रिकेबद्दल, इनमिन ४ शहरे आणि नेल्सन मंडेला व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हती. वर्णभेदाचा देश आणि तिथल्या संघर्षाची तुटपुंजी माहिती, इतपतच. परंतु साउथ आफ्रिकेचा व्हिसा लवकर मिळाला. किंबहुना, माझी नोकरी, "पीटरमेरीत्झबर्ग" शहरात आहे आणि या शहराचे नाव. मी प्रथमच ऐकले होते. गांधींना गाडीबाहेर काढले, हा इतिहास माहित होता पण, याच शहरात, याची कल्पना नव्हती!! व्हिसा मिळाला, तशी माझी पहिली भावना - चला आणखी एक नवीन देश बघुया, इतपतच मर्यादित होती. त्यावेळी, भारतातून जोहान्सबर्ग आणि डर्बन, या शहरात थेट विमान वाहतूक होती आणि त्यानुसार मी, एयर इंडियाच्या विमानातून, डर्बन इथे उतरलो. विमानतळावर उतरलो आणि या देशाच्या संपन्नतेची झलक बघायला मिळाली!! तोपर्यंत, माझी मजल, मुंबई आणि लागोस, इतकीच होती. लागोस विमानतळ म्हणजे म्हणजे मुंबईचा विमानतळ भव्य आणि आधुनिक वाटावा!! अत्यंत सुव्यवस्थित व्यवस्था, कुठेही कसलाही गोंधळ नाही आणि अति स्वच्छ आणि प्रचंड. पुढे जोहान्सबर्ग बघितल्यावर, याचे आकर्षण कमी झाले.
विमानतळाच्या बाहेर, आमचा M.D. हरून उभा होता - यानेच मुंबईत माझी निवड केली होती. त्याच्या गाडीतून (त्याची मर्सिडीज ५०० गाडी होती आणि तेंव्हा त्याचे आकर्षण वाटले होते!!) मी, पीटरमेरीत्झबर्ग शहराकडे निघालो. डर्बन पासून ९० कि.मी. अंतरावर वसलेले हे शहर. जसे डर्बन पाठी राहिले तशी वातावरण बदलले. वास्तविक, सरत्या थंडीचे दिवस होते पण, तरीही गारवा जाणवत होता. तसेच आजूबाजूला असलेली गर्द झाडी, तसेच रस्त्यांचा गुळगुळीतपणा!! अगदी सलग ४०कि.मी.चा सरळ, स्वच्छ रस्ता!! याचेच मला तेंव्हा कितीतरी आश्चर्य वाटले. हॉलीवूड चित्रपटातून किंवा अनेक इंग्रजी पुस्तकांमधून, रस्त्याची वर्णने, इतकी वर्षे वाचीत/बघत होतो, त्याचा प्रत्यक्षानुभव केवळ अफलातून असाच होता (आजही मनावर तेच चित्र उमटलेले आहे) हरूनने, मला माझ्या घराशी सोडले, घराची व्यवस्था दाखवून दिली आणि निघून गेला. त्या घरात, मी आणि इतर दोन मित्र रहात होते. गाडीतून येताना, हरूनने कंपनीची सगळी माहिती दिली. कंपनीची सध्या एक (खाद्य) तेलाची रिफायनरी, त्याला जोडून मार्जरीन बनवण्याचा कारखाना, तसेच साबण बनवण्याचा देखील कारखाना आणि Corrugated Boxes बनविण्याचा, त्यामानाने छोटा कारखाना होता. नवीन रिफायनरी बांधण्याची सुरवात झाली होती. एकूण आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेली कंपनी असल्याने, डोक्यावरील प्रेशर कमी झाले.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे "ओळख परेड" झाली आणि कामाचे स्वरूप समजून घेतले. हवेत चांगलाच गारठा होता कारण आदल्या दिवशी रात्री पाउस शिंपडला होता. ऑफिसमध्ये एक, दोन व्यक्ती सोडता, सगळे भारतीय वंशाचे होते आणि मुख्य म्हणजे माझ्या वयाच्या आसपास असलेले होते. त्यामुळे इथे "सेटल" व्हायला फारसा वेळ लागला नाही. माझ्या ऑफिसमध्ये, सुरवातीला दोन मुस्लिम मुली होत्या - नसीमा आणि फरझाना. दोन्ही वागायला अतिशय मोकळ्या होत्या पण तरीही त्यांच्या मनात कुठेतरी "खंत" जाणवायची, विशेषत: आमच्या गप्पा ड्रिंक्स वगैरे विषयावर आल्या म्हणजे इथे मौनव्रत!!
हळूहळू गाव परिचयाचे व्हायला लागले. पीटरमेरीत्झबर्ग, हे शहर ४ डोंगरांवर वसलेले आहे पण हे कळण्यासाठी, मला बरेच भटकावे लागले. माझ्या ऑफिसच्या गल्लीच्या टोकाला गेलो म्हणजे या शहराच्या विस्ताराची कल्पना यायची आणि गंमत म्हणजे माझे ऑफिस देखील डोंगराच्या एका टोकावर आहे, हे समजले!! समुद्र सपाटीपासून इतक्या उंचावर हे शहर असल्याने, इथे थंडीचा प्रभाव अधिक आहे. दुसरी बाब लगेच ध्यानात आली म्हणजे इथे घरात शक्यतो "Ceiling Fans" नाहीत. हवा चोवीस तास कोरडी, वर्षातील सहा ते सात महिने थंडीचे आणि उन्हाळ्यात देखील, पावसाचे लक्षणीय प्रमाण असल्याने, हवा थंड रहायची. त्यामुळे घरात पंख्यांची फारशी गरज भासायची नाही. शहरात,गोरे आणि भारतीय वंशाच्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक. साउथ आफ्रिकेत, डर्बन सोडल्यास, याच शहरात, भारतीय वंशाची माणसे भरपूर भेटतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, जेंव्हा इथे गोऱ्या लोकांना, या भागात आणि इतर भागात, उसाची आणि पर्यायाने साखरेची लागवड करायची होती, त्यावेळेस, त्यांनी भारतातून इथे "गुलाम" आणले आणि तेंव्हा ते भारतातून जहाजाने इथे आले, ते प्रथम डर्बन किनाऱ्यावर आणि मग पुढे, डर्बन पासून केवळ ९० कि.मी. वर असलेल्या या शहरात हे भारतीय वस्तीला आले. आता, विचार केला तर, या गोष्टीला १५० वर्षे होऊन गेली.
इथे भारतीय वंशाची माणसे विपुल भेटतात. त्यांचे भारतातले मूळ बघायला गेल्यास, प्रामुख्याने, तामिळनाडू, आंध्र तसेच बिहार, उत्तर प्रदेश व राजस्थान इथून बरीच "आयात" केली. अर्थात गुजरात यात आलाच. गंमतीचा भाग म्हणजे जरी गुजरातवरून इथे माणसे आली तरी त्यातही बहुतेक माणसे ही काठीयावाड, कच्छ, सौराष्ट्र इथल्या भागातून अधिक आली आहेत. आता इथे यांच्या पाच, सहा पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि ही माणसे आता "पक्की" साउथ आफ्रिकन झाली आहेत. अपवाद इथल्या गुजराती लोकांचा. हे गुजराती मात्र अजूनही, घरात पारंपारिक गुजराती संस्कार टिकवून आहेत, इतकेच नव्हे तर, गुजराती भाषा देखील अस्खलित बोलतात, विश्वास बसत नाही की ही इथली पाचवी, सहावी पिढी आहे. अन्यथा, इतरेजनांनी मात्र, मूळ भाषेशी कधीचा "काडीमोड" घेतलेला!! अर्थात, त्यांना तसा दोष देण्यात काहीही अर्थ नाही. वर्षानुवर्षे हा देश "बाजूला" टाकलेला असल्याने, यांचा बाहेरच्या देशांशी फारसा संपर्क उरलेला नव्हता. अशा परिस्थितीत, त्यांना हिंदी भाषा आलीच पाहिजे, असा आग्रह धरणे चुकीचेच ठरते.
अर्थात, या लोकांना भारताचे कमालीचे आकर्षण आहे. कधीतरी भारतात यायचे आणि आपले "मूळ" गाव बघायचे, असली ओढ लागलेली असते. प्रत्यक्षात फार थोड्यांची इच्छा पूर्ण होते. याचा परिणाम असा होतो, इथे हिंदी चित्रपटांचे वाढलेले अतोनात प्राबल्य. मी मुंबईचा म्हटल्यावर, सुरवातीला इथले कित्येकजण, माझ्याकडे अमिताभ बच्चन, शाहरुख यांच्याबद्दल चौकशी करायचे आणि मी त्याच शहरात रहात असून देखील अजून भेटलो नाही, हे समजल्यावर आश्चर्य व्यक्त करायचे!! तोच प्रकार सचिन बाबत!! इथे एक गोष्ट स्पष्ट करायलाच लागेल, युरोप/अमेरिकेत गेलेले बहुतेकजण "बौद्धिक" दृष्ट्या वरच्या पातळीवर शिकलेले होते आणि ते तिथे गी आणि कायमचे स्थिरावले. साउथ आफ्रिकेत जे भारतीय आले, त्यांची आर्थिक परिस्थिती भारतातच हलाखीची होती, शैक्षणिक पात्रता फारशी नव्हती आणि अशा परिस्थितीत ही माणसे इथे कायमची रहायला आली. आज, इथले बरेचजण, सुस्थितीत आहेत पण तरीही अजूनही शिक्षणाच्या नावाने वानवा(च) आहे. इथले बरेचसे भारतीय अधिकाधिक केवळ "Metric" होण्यातच धन्यता मानणारे आहेत. इथे आणखी एक बाब नोंदवावी लागेल आणि ती म्हणजे इथे शिक्षण, भारताच्या मानाने प्रचंड महाग आहे आणि त्यामुळे इथे शिक्षणाबद्दल काहीशी अनास्था आढळते. पदवीधर होणे, म्हणजे मोठा सोहळा असतो आणि त्याला समाजात भरपूर मान असतो. यात आणखी एक बाब मांडायला लागेल. आता इथे गोऱ्यांचे राज्य खालसा झाले आणि Blacks लोकांचे राज्य आले. या नवीन राज्यपद्धतीत, Blacks लोकांना अनंत सुविधा मिळाल्या, मग त्या आर्थिक असोत, सामाजिक असोत. मात्र, या नवीन राज्यात, भारतीय वंशाच्या लोकांच्या पदरी फारसे काही पडले नाही.
काळ्यांना अतिशय स्वस्तात शिक्षण उपलब्ध झाले, राहायला स्वस्तात घरे मिळाली, नोकऱ्यांमध्ये "आरक्षण" मिळाले. एकूणच पुनर्वसन चांगल्या प्रकारे होत गेले. यात, इथले भारतीय बहुतांशी तसेच राहिले. कधीकधी यांच्या बोलण्यात खंत आढळते. मी जेंव्हा या शहरात आलो, तेंव्हा काही महिन्यांपूर्वी इथे प्रथमच लोकशाही मार्गाने निवडणुका होऊन, नेल्सन मंडेला प्रथमच सत्तेवर विराजमान झाले होते. लोकांना, त्यांच्यापासून खूप अपेक्षा होत्या आणि त्या दृष्टीने, मंडेलांनी पावले देखील टाकली होती पण दुर्दैवाने, १९९९ नंतर त्यांनी राजकारण संन्यास घेतला आणि देशाला उतरती कळा लागली!! वास्तविक, मंडेलांनी, मंत्रिमंडळ बनवताना, काळे, गोरे आणि भारतीय, यांचा चांगला समन्वय राखला होता. त्यांनी, गोऱ्या लोकांचे महत्व ओळखले होते पण त्यानंतर अशी दूरदृष्टी ठेवणारे नेते लाभले नाहीत आणि इथला भारतीय समाज, आता कात्रीत सापडलेला आहे!! आमच्या ऑफिसमध्ये, जे भारतीय होते, त्यांच्या मनात ही खंत होती आणि बरेचवेळा पार्टीला बसल्यावर, कधीतरी मनातून हे शल्य बाहेर पडायचे!!
तसे बघितले तर, इथले भारतीय, इथल्या सामाजिक आणि आर्थिक स्तराच्या दृष्टीकोनातून बघितल्यास, अपवाद वगळता, कधीही उच्च आर्थिक गटात सामावण्याइतके वरच्या पातळीवर पोहोचले नाहीत. आता, नोकरी हा जिव्हाळ्याचा विषय घेतला तर इथे आता, Black Empowerment कायदा लागू केला आहे आणि त्यानुसार, एखाद्या कंपनीचा आर्थिक व्यवहार, एका ठराविक पातळीवर गेला की, तिथे १० टक्के कामगार काळे असणे, अत्यावश्यक आहे आणि याचा या समाजाला भरपूर फायदा होतो पण असे कायदे इथल्या भारतीयांना लागू होत नाहीत!! म्हणजे, पूर्वी गोऱ्यांची सत्ता होती तेंव्हा त्या समाजाची चलती होती आणि आता काळ्या लोकांचे राज्य आले तर त्यांनी आपल्या समाजाचा फायदा बघितला!! भारतीय वंशाचे यात कुठेच बसले नाही!! असे असून देखील, इथे सामाजिक आणि आर्थिक स्तर, भारताच्या मानाने बराच वरचा आहे. एक उदाहरण देतो. आमच्या कंपनीच्या इमारतीसाठी, सुरक्षा व्यवस्था लागणे क्रमप्राप्तच होते. ती व्यवस्था, इथला एक भारतीय वंशाचा माणूस बघत होता आणि हा पुढे माझा चांगला ओळखीचा झाला. पुढे चांगली ओळख झाल्यावर, एकदा मी त्याच्याबरोबर, त्याच्या घरी गेलो. शहराच्या उपनगरात Raisethorp भागात घर आहे. घर कसले, दुमजली राजवाडा म्हणावा इतके प्रशस्त घर, घराबाहेर २ मर्सिडीज गाड्या उभ्या!! वास्तविक याचे शिक्षण बघायला गेल्यास, हा माणूस, शाळेच्या केवळ ६ इयत्ता शिकलेला पण इथे राजासारखा रहात आहे आणि असले जीवन इथे अपवाद म्हणून नसून, बहुतेक भारतीय याच भागात रहातात आणि प्रत्येकाची, कमी अधिक प्रमाणात, अशीच घरे आहेत. इथे टोलेजंग इमारतींना स्थान नाही!! आजही इथे Flat संस्कृती रुजलेली नाही.
इथे गाडी घेणे, ही अत्यावश्यक गरज आहे. गाडी नसेल तर तुम्ही कायमचे घरात अडकलेले!! कुठेही बाहेर जायचे म्हणजे डोंगर उतरायचा किंवा चढायचा आणि इथे आपल्यासारखी, नाक्यावरच्या वाण्याची दुकाने, असला प्रकार नाही. म्हणजे कुठेही खरेदी करायचे झाल्यास छोटेखानी मॉल किंवा बाजार गाठणे क्रमप्राप्त. एकतर इथे रस्त्यावर हिंडणे, हा प्रकारच फारसा आढळत नाही. रस्त्यावर सतत गाड्या, सुसाट वेगाने धावत असतात. रस्ते अप्रतिम असल्याने, गाड्यांना त्या वेगाने जाणे सहज शक्य असते. पीटरमेरीत्झबर्ग शहर हे नाताळ राज्याचे, राजधानीचे शहर - डर्बन नव्हे!! त्यामुळे इथे सरकारी ऑफिसेस भरपूर. शहरात सगळीकडे ब्रिटीश व्यवस्थेची छाप पडलेली. इमारती देखील त्याच वळणाच्या आणि मॉल्स देखील त्याच धर्तीवर. शहर डोंगरावर वसलेले, त्यामुळे आजूबाजूला दाट झाडी आणि बहुतेकवेळा, विशेषत: डिसेंबर, जानेवारीच्या उन्हाळ्यात, इथे जो काही फुलांचा "मोसम" फुललेला असतो, तो बघण्यासारखा असतो, अगदी रस्त्याच्या कडेला देखील, कितीतरी रंगीत फुलांनी परिसर रंगतदार केलेला असतो. त्यामुळे इथे गाडी चालविणे, हा एक नयनरम्य सोहळा असतो.
तसे बघितले तर इथे आजही प्रचंड इंडस्ट्रीज नाहीत पण तरीही इथल्या लोकांची सहज गुजराण होईल, इतपत आर्थिक व्यवहार चालतात. हवामान बघितले तर, इथे जोहान्सबर्ग, प्रिटोरिया प्रमाणे हाडे गोठवणारी थंडी नसते पण तरीही इथे थंडीत Jackets घालणे अत्यावश्यक. थंडीच्या मोसमात, इथल्या मैदानावर पायी हिंडणे, हा एक अनिर्वचनीय अनुभव आहे. पानगळ झालेली असते, सूर्याचा प्रकाश अंधुकसा असतो, वातावरण साधारणपणे ४ ते ५ तापमान इतके असते आणि अशा वातावरणात इथल्या मैदानावर हिंडणे, हाच खरा आनंद असतो. आकारमानाने गाव तसे लहानखोर आहे पण त्यामुळे असेल, मला इथे जिव्हाळ्याचे मित्र बरेच भेटले. त्यांच्या घरी, मी बहुतेक शनिवार रात्र जागवून काढल्या, त्यांच्या घरात हक्काने वावरलो. असे वावरणे, मला पुढे कधी जमले नाही. वातावरणात एक प्रकारचा स्निग्धपणा आहे, आपुलकी आहे. मोठ्या शहरात, जो रुक्षपणा जाणवतो, तसे इथे जाणवत नाही.
या शहराने मला काय दिले? सर्वात प्रथम, या नवीन देशात कसे राहायचे? कसे वागायचे? याचे प्राथमिक धडे दिले, जे पुढे मोठ्या शहरांत राहताना उपयोगी पडले. मुख्य म्हणजे, तोपर्यंतचे माझे "तर्खडकरी" इंग्रजी बदलून, उच्चारात "हळुवार"पणा आणला. समोरच्याशी वागताना, त्याला योग्य मान देऊन, वागण्याची रीत शिकवली. नायजेरियात, वागण्यात एकप्रकारचा उर्मटपणा शिरला होता, त्याचे नामोनिशाण, इथल्या पहिल्या ४,५ महिन्यात शिल्लक राहिले नाही. तसे बघितले तर लागोसला राहताना मला, मी परदेशी रहात आहे, असे फारसे जाणवले नाही कारण तिथे हजारोंच्या संख्येने रहात असलेले भारतीय, जे माझ्यासारखे केवळ नोकरीसाठी आले होते आणि त्यामुळे माझी तिथली २ वर्षे कधी उलटून गेली, याचा पत्ता लागला नाही. इथे प्रथमच गोऱ्या लोकांबरोबर वारंवार वावरण्याचा अनुभव मिळाला. आमच्या कंपनीचा ऑडीटर गोरा असल्याने आणि त्याच्याशी सारखा संबंध येत असल्याने, माझे आयते शिक्षण झाले. आजदेखील, मी ठामपणे म्हणून शकतो, गोरा माणूस इतरांच्या मानाने खूपच विश्वासार्ह आहे, अर्थात अपवाद असतातच आणि ते तर प्रत्येक क्षेत्रात आढळतात.
इथला अमेरिकन भारतीय तर फारच जवळून बघायला मिळाला आणि त्याच जोडीने, त्यांची "बाबा वाक्यं प्रमाणम" आंधळी वृत्ती देखील बघायला मिळाली. इथे, "गुड फ्रायडे" आणि जोडीने "इस्टर मंडे" एकत्रित साजरा केला जातो. त्यानिमित्ताने, सगळा देश चार दिवसांची सुटी उपभोगतो. (आणखी एक बाब, इथे त्यामानाने सुट्ट्यांचे प्रमाण फार नगण्य आहे. भारताप्रमाणे सुकाळ नाही!!) इथे, हे दिवस, तामीळ समाज आणि इतर हिंदू समाज, वेगवेगळ्या रीतीने साजरा करतात. गुड फ्रायडेला, "निर्जळी" उपास असतो. त्यानिमित्ताने देवळात, पूजा, होम हवन इत्यादी कार्यक्रम असतात. संध्याकाळी, मोठी मिरवणूक निघते. त्यात काही लोकं "तारेत" असतात!! म्हणजे, उघड्या अंगाने वावरत असतात आणि अंगावर लोखंडी आकडे अडकवतात, अडकवलेल्या आकड्यांत काही वेळा फुले तर काहीवेळा फळे लटकवून ठेवतात. काहीजण तर, जिभेत किंवा पापण्यांत आकडा अडकवतात (फळासकट!!) आणि मिरवणुकीत मिरवत असतात. ही मिरवणूक, देवळाशी येउन थांबते. तिथे, तोपर्यंत, होम वगैरे विधी संपलेले असतात. या होमात जे जळते निखारे असतात, ते सभागृहाच्या बाहेरील अंगणात आणून, जमिनीवर पसरवून ठेवतात. पुढील कार्यक्रम म्हणजे, या जळत्या निखारयावरून अनवाणी चालणे!! हे दिव्य अतिशय आनंदाने केले जाते. पहिल्याच वर्षी, मी हा सोहळा, अथ पासून इथि पर्यंत बघितला. मी उत्सुकतेने बघत आहे, हे पाहून, माझ्या ओळखीच्या कुटुंबातील एका वयस्कर माणसाने, माझे बौद्धिक घेतले आणि "आम्ही भारतीय परंपरा, किती अभिमानाने जतन केल्या आहेत", हे मला सांगतो. काय बोलणार!! साउथ आफ्रिकेसारख्या प्रगत देशात, भारतातील हळूहळू अस्ताला जाणारी कृत्ये, इथे "भारतीय संस्कृती" म्हणून अभिमानाने मिरवतात. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी!! पुढे, हाच सोहळा अधिक भव्य प्रमाणावर, डर्बन इथल्या "फिनिक्स" या उपनगरात बघितला!!
अर्थात, या सोहळ्यात, इथले गुजराती मात्र सामील होत नाहीत. त्यांचे देऊळ वेगळे. हा तर इथला आणखी अतर्क्य प्रकार. तामीळ + तेलगु यांचे देऊळ वेगळे तर गुजराती समाजाचे देऊन वेगळे आणि इतर हिंदूंचे देऊळ वेगळे!! खरतर, इथे तामीळ आणि हिंदू, असे दोन वेगळे घटक आहेत. असे का? या प्रश्नाला उत्तर नाही!! देऊळ वेगळे, हे समजण्यासारखे आहे पण म्हणून त्या वेगळ्या देवळात जायचे देखील नाही, असला प्रघात!! असे असले तरी, एकमेकांच्या घरी जाणे असते, लग्ने होतात. लग्न झाल्यावर, मग जाणारी मुलगी लगेच "धर्मांतर" करते!!
या शहराने मला शिस्त, स्वच्छता आणि शांतता, यांचे अपरिमित महत्व पटवून दिले. वास्तविक, सुरवातीला, जरा गोंधळलो होतो, हे शहर संध्याकाळी पाच नंतर शांत होते. रस्त्यावरील वर्दळ, जवळपास नाहीशी होते!! सगळे शहर चिडीचीप होऊन जाते. मला फार नवल वाटायचे आणि मुंबईची आठवण यायची. मुंबई संध्याकाळी, पुन्हा ताजीतवानी होते!! माझ्या शेजारी, गोरे कुटुंब रहात होते. त्यांचा खाक्या तर फारच अजब. माझ्या घरात जरा मोठा आवाज झाला तर दारावर लगेच टकटक!! आवाज फार वाढत आहे, तेंव्हा जरा सबुरीने घे.गंमत आणि नवलाचा भाग म्हणजे, त्यांना दोन वर्षांचे मूल होते. इतके महिने शेजारी राहिलो, एका रात्री देखील त्या मुलाच्या रडण्याचा आवाज कानी पडला नाही!! एकूणच गोऱ्या लोकांची मुले देखील बहुतांशी कमी बडबडी आढळली!!
इथल्या रेल्वे स्टेशनवर महात्मा गांधींना ज्या डब्यातून बाहेर काढले होते, तो डबा आणि तो इतिहास, जतन करून ठेवला आहे. इथेच एक सुंदर छोटेखानी म्युझियम आहे, वर्णभेदाच्या काळातील, हालअपेष्टांचे साग्रसंगीत प्रदर्शन मांडून ठेवले आहे. इथे केवळ वर्णभेद नव्हता तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनंत घटना घडल्या होत्या, अनन्वित छळ तर पाचवीला पुजला होता. केवळ मानसिक खच्चीकरण नसून शारीरिक हालांना पारावार नव्हता. कुणाकडे तक्रार करायची आणि काय म्हणून करायची? या देशाने फार भोगले पण म्हणूनच नेल्सन मंडेलांचे एका बाबतीत नेहमीच कौतुक करायला लागेल. १९९४ साली, त्यांचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी देशांत विध्वंस होणे सहज शक्य होते पण त्यांनी, आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा उपयोग करून, सत्ताबदल शांततेत घडवून आणला. उलट्या बाजूने विचार करता, इतर आफ्रिकन देशांतील सत्ताबदलाचा इतिहास बघणे, आवश्यक ठरेल.