Saturday, 17 February 2024
कोई हमदम ना रहा
Whitney Houston, Celine Deon किंवा Michael Jackson, हे तिन्ही गायक (इथे उदाहरणादाखल ही नावे घेतली आहेत) संपूर्ण जगात प्रचंड लोकप्रियता मिळवून होते. अर्थात लोकप्रियतेच्या संदर्भात, त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या. मुलाखतीत एक बाब ध्यानात आली. या कलाकारांना एकदाही, तुम्ही *सिंफनी संगीत* किंवा *जाझ संगीत* शिकला होतात का? हा प्रश्न विचारला गेला नाही. पाश्चात्य कलाविश्वात, प्रत्येक कलाप्रकारांचे एक विविक्षीत विश्व असते आणि त्याच्या परिघातातच त्या कलाकाराचे विश्लेषण केले जाते.
भारतात मात्र *गायक* म्हटला की त्याचे विश्लेषण रागदारी संगीताच्या संदर्भात जाणूनबुजून किंवा आडमार्गाने केले जाते आणि जर का संगीताची तालीम नसेल तर काहीसे ऊणेपण दर्शविले जाते. गायकाला रागदारी संगीताची चांगली समज असणे, हा निकष मानला गेला आहे आणि या निकषांमुळे, काही कलाकारांची वैशिष्ट्ये सांगताना, *कलाकाराने शास्त्रीय संगीताची तालीम घेतली नव्हती* अशा धर्तीवर विधाने केली जातात.
गायकाने तालीम घेतली असेल तर उत्तमच पण जर का नसेल, तर टीका जरूरीची आहे का? हा विचार करणे आवश्यक आहे. आपले आजचे गाणे विचारात घेताना, वरील प्रश्न नक्कीच उद्भवतो. *झुमरू* चित्रपटातील *कोई हृदय ना रहा* या गाण्याचे गायनच नव्हे तर संगीतरचना देखील किशोरकुमारची आहे. किशोरकुमार प्रशिक्षीत कलाकार नव्हता पण एकूणच सर्वांगाने विचार करता, त्याच्या निर्मितीत कुठेही उणेपणा नव्हता.
सुप्रसिद्ध ऊर्दू कवी मजरूह यांनी गाणे लिहिले आहे. गाण्यात कविता न आणता, कविता म्हणून वेगळी दखल घ्यावी, इतकी असामान्य कामगिरी त्यांनी आयुष्यभर केली. मजरूह यांनी आपली शायरी आणि चित्रपटगीते, यामध्ये फरक केला होता पण असे करताना, आवश्यक इतका दर्जा कायम राखले. हे सहज जमण्यासारखे नाही. आपल्या प्रतिभेचा आत्मविश्वास असावा लागतो. *कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा* या पहिल्याच ओळीत, गाण्याची पार्श्वभूमी लक्षात येते आणि पहिल्याच अंत-यातील *शाम तनहाई की है, आएगी मंज़िल कैसे* इथे पुढील कवितेचा विस्तार कशाप्रकारे होणार आहे, याची चुणूक मिळते. कवितेत काही ऊर्दू शब्द आहेत पण आकळायला कुठेही अडचण येत नाही. चित्रपटगीतासाठी कशा प्रकारची शब्दरचना असावी, याचा मजरूह यांनी आदर्श निर्माण केला.
आता संगीतरचनेकडे वळूया. गाण्याची थोडी तांत्रिक घ्य्याची झाल्यास, *झिंझोटी* रागाच्या काही ठळक खुणा, रचनेत आढळतात. अर्थात जर का बारकाईने ऐकल्यास रागदर्शन घडते. आता झिंझोटी रागात आरोहात *नि वर्ज्य* तर अवरोही सप्तकात *नि कोमल* तसेच बाकीचे सगळे स्वर *शुद्ध* लागतात. या गाण्याच्या संदर्भात थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास,
*कोई हमदम ना रहा, कोई सहा रा ना रहा*
*रे प मगम ग रेग, सारे सा(को)ध(को)निसानि ध पसा*
वर दर्शवलेली सुरावट बारकाईने बघितली तर *निषाद* स्वर प्रभाव टाकताना दिसतो आणि मग स्वररचनेचे चलन ऐकल्यावर या रागाचे अस्तित्व दिसून येते. काही वेळेस *खमाज* राग ऐकायला मिळतो आणि त्याचे कारण झिंझोटी रागावर खमाज थाटाचा असलेला प्रभाव.
गाण्याचा सुरवातीचा वाद्यमेळ ऐकताना, गाण्याची प्रकृती ध्यानात येते. वाद्यमेळासहित जेंव्हा किशोरकुमार, हुंकाराच्या अनेकविध छटा दाखवतो आणि रागाचे अस्तित्व तरळते. अत्यंत शांत सुरांत स्वररचना सुरु होते. गाण्यात जवळपास पूर्णवेळ व्हायोलिन वाद्याने प्रभाव दाखवला आहे. तसे बारकाईने ऐकले तर मुखड्याचीच चाल, पुढील अंतऱ्यासाठी वापरलेली आहे. अर्थात एक बाब स्पष्टपणे मांडायला लागेल, गाण्यात खऱ्याअर्थी *गायक* किशोरकुमार, संगीतकार किशोरकुमारवर अधिक प्रभाव दाखवतो. अत्यंत संयत, सुबोध स्वररचना असून मनावर हीच भावना ठसते.
गायक म्हणून किशोरकुमार निव्वळ अप्रतिम आहे. अर्थात किशोरकुमार हा मुळातला सक्षम गायक. त्यामुळे असेल पण त्याची गायकी अधिक अर्थपूर्ण दिसते. वास्तविक *यॉडलिंग* गायक म्हणून सुप्रसिद्ध असताना, अशा प्रकारची गाणी गाऊन, त्याने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. अत्यंत सुरेल आणि दीड सप्तकापर्यंत सहज प्रवास होताना दिसतो. नैसर्गिक देणगी मिळावी तर अशी. गाण्यातील शब्दांचे औचित्य राखून, *शब्दाभोगी* गायन करण्यात केवळ आशा भोसले, यांचाच गळा समोर येतो. किशोरकुमार यांच्या गायकीबद्दल बोलताना, बरेचवेळा त्याच्या नैसर्गिक देणगीबरोबर त्याने रागदारी संगीताचे प्रशिक्षण घेतले नाही, हा मुद्दा मांडण्यात येतो परंतु त्याचे गायन ऐकताना, त्याची या गायकाला खरोखरच जरुरी होती का? हा प्रश्न वारंवार मनात येतो. निव्वळ गायक म्हणून त्याला निदान भारतीय गायकांमध्ये जवळपास येणार आवाज अजूनतरी आढळलेला नाही. शब्दोच्चाराबरोबर सुरेलपणा टिकवून ठेवणे, हे सहज जमण्यासारखे नाही. कुठेही स्वरांत *नाटकीपणा* आढळत नाही.
*शाम तनहाई की है, आएगी मंज़िल कैसे* किंवा *ऐ नज़ारों ना हँसो, मिल ना सकूँगा तुमसे* या ओळीने गायक म्हणून किशोरकुमार काय ताकदीचा गायक होता, याची कल्पना येते. *शाम* या शब्दातून संध्याकाळची हताश वेळ, क्षणात डोळ्यासमोर उभी राहते. तसे च पुढील *तनहाई* हा शब्द गाताना, गायक म्हणून श्रेष्ठत्व स्पष्ट होते. त्याने रागदारी संगीताची तालीम घेतली नाही, या मुद्द्यावर आजूबाजूला असंख्य गायक ऐकायला मिळतात परंतु कुणीही त्यांच्या जवळपास देखील ठेऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे बहुदा याचमुळे हे गाणे आजही चिरस्मरणीय ठरले आहे.
कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा
हम किसीके ना रहे, कोई हमारा ना रहा
शाम तनहाई की है, आएगी मंज़िल कैसे
जो मुझे राह दिखाए, वही तारा ना रहा
ऐ नज़ारों ना हँसो, मिल ना सकूँगा तुमसे
वो मेरे हो ना सके, मैं भी तुम्हारा ना रहा
क्या बताऊँ मैं कहाँ, यूँ ही चला जाता हूँ
जो मुझे फिर से बुला ले वो इशारा ना रहा
Koi Hamdam Na Raha with lyrics | कोई हमदम ना रहा, कोई के बोल | Kishore Kumar | Jhumroo | HD Song (youtube.com)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment