Saturday, 18 February 2023
ललित संगीताचा आस्वाद- सांस्कृतिक सोहळा
इथे सुरवातीलाच काही बाबी स्पष्ट करतो. प्रस्तुत लेखात, ललित संगीत आणि त्याचा आस्वाद,इतकेच कार्यक्षेत्र आहे.ललित संगीताची निर्मितीआणि त्याचा प्रवास, हा उद्देश अजिबात नाही कारण तिथे प्रत्यक्ष संगीतकार, हा घटक अवतरतो आणि महत्वाचा ठरतो. त्याच्या निर्मितीबाबत कुठलेही विधान करणे, अति धाडसाचे आणि म्हणून अति बाष्कळ ठरते.
आपण गाणे ऐकतो, सहज ऐकतो आणि निदान पहिल्या श्रवणात तरी, गायक/गायिकेच्या कौशल्याचा परिणाम आपल्या कानावर होत असतो. वास्तविक पाहता, ललित संगीतात, गायक हा घटक सर्वात शेवटी येतो. *आधी चाल, मग शब्द* ही पद्धत असो किंवा *आधी शब्द मग चाल* अशी पद्धत असो, गायनक्रीडा शेवटच्या पातळीवर येते. आपले श्रवण हे बहुतांशी याच पातळीवर वावरते. अर्थात गायनक्रियेचा परिणाम साहजिकच प्रगाढ होतो. एकतर सगळाच सांगीत आविष्कार हा ३,४ मिनिटांचा असतो. त्यामुळे इतक्या अल्प काळात, अविष्कारातील कुठल्या सौंदर्याकडे लक्ष द्यायचे? हा विचार करण्यापेक्षा जे आपल्या कानावर पडत आहे, तेच श्रेयस्कर मानण्याकडे सर्वसाधारण कल असतो. त्यातून गळ्यातून येणारा सूर, हे नेहमीच अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने,तिकडे आपले वेधले जाणे, यात प्राथमिक दृष्टीने काहीच चूक नाही. आता बघा, आपण शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जातो, तिथे तर सर्वकाळ सुरांचेच राज्य असते आणि तिथे सुरांच्या राज्यात आपण भान हरपून बसतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे तिथे *सूर* याच घटकाला संपूर्णपणे महत्व असते. एक बाब नक्की, सुरांच्या राज्यात शब्द माध्यम हे नेहमीच परके राहते!! शब्द माध्यम, त्याची अभिव्यक्ती आणि केवळ कैवल्यात्मक पातळीवर वावरणारे असे सूर हे माध्यम सगळ्यात लवचिक आणि म्हणून मनावर गाढ परिणाम करणारे असते.
ललित संगीतात प्राय: ३ घटक असतात आणि हे आता सर्वमान्य आहे. प्रत्येक घटकाला सम प्रमाणात महत्व मिळावे, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात काय घडते? गाण्याच्या श्रवण क्रियेत *गायन* या घटकाला अतोनात महत्व मिळते कारण मी वर म्हटल्याप्रमाणे आपल्याला गायनाचा पहिला प्रत्यय येतो.
त्यानंतर संगीतकाराची विचारणा होते आणि मग ऐकणारा जर का अधिक चिकित्सक असेल तर कवीने काय लिहिले आहे, याचा विचार करायला घेतला जातो. संगीतकाराच्या स्वररचनेचा आणि कवीच्या कवितेचा साधक बाधक विचार, ही वैचारिक पायरी फारच थोड्या वेळी ओलांडली जाते. याचे मुख्य कारण असे संभवते, कवीची कविता समजून घेण्यासाठी, मनाची तशीच तयारी आणि आवड होण्याची गरज असते. कविता समजून घ्यायची असेल तर मुळात शब्द माध्यमाबद्दल मनात आवड व्हावी लागते. त्यातूनच पुढे मग स्वरांनी घातलेले गारुड बाजूला सारून, शब्दरचनेचा स्वतंत्रपणे विचार करणे, गरजेचे असते आणि तिथे बौद्धिक व्यायाम आवश्यक असतो. कोण इतका मेंदूला त्रास देणार? कविता समजून घेण्याची गरजच काय? असले प्रश्न सर्वसामान्यपणे सगळ्यांना पडतात. स्वतःच्या मेंदूला कमीत कमी तोशिस देऊन, जे गाणे ऐकायला मिळते, तोच खरा आस्वाद,हीच आस्वादाची रूढ पद्धत. शब्द ओळखणे, समजून घेणे, काहीसे अवघड असते, हे कुणीही मान्य करेल परंतु आस्वादाच्या प्रक्रियेत त्याला फार मोठे स्थान आहे. मुळात ललित संगीत ही बौद्धिक विचाराची मागणी आहे, हेच फारसे कुणाला पटत नाही. जाता जाता सिगारेट शिलगावी आणि आनंद मिळवावा, तद्वत विचार ललित संगीताच्या आस्वादात अंतर्भूत असतो. गाण्यातील कविता, हे स्वतंत्र आस्वादाचे क्षेत्र आहे आणि त्यासाठी मन एकाग्र करून, कवितेचा विचार करायचा असतो,हेच फारसे पटत नाही.
खरतर जरा गंभीरपणे विचार केला तर कविता संग्रह आणि गीत संग्रह, यात तत्वतः काहीही फरक नसतो पण आपल्या समाजात याबाबत गीतसंग्रहाला नेहमीच खालचे स्थान दिले जाते. कविता संग्रह निघतात परंतु गीतसंग्रह अपवाद स्वरूपात निघतात!! जितक्या प्रमाणात भुक्कड कविता प्रसवल्या जातात तितकेच प्रमाण गीत लेखनात असू शकते.
यात एका अडचण फार महत्वाची असते, कवितेचा आस्वाद घेताना, कानातून सुरांचे गारुड बाजूला ठेवणे गरजेचे असते आणि तिथेच खरी अडचण उद्भवते. आपण गीतातून सुरांना वेगळे करू शकत नाहीआणि सुरांना साथीला घेऊनच कविता वाचायला घेतो ही पद्धत निखालस चुकीची आहे. गीतातील कविता ही इतर कवितेप्रमाणे वाचायला घ्यावी लागते. तर आणि तरच तुम्ही गीतातील कविता आस्वादू शकता. त्यासाठीच मनाची एकाग्रता आवश्यक असते.
तसेच संगीतकाराच्या स्वररचनेबाबत म्हणावे लागेल. प्रत्येकवेळेस स्वरलेखन करून, चालीचे संदर्भ जाणून घ्यायची अजिबात गरज नसते. आपले कान त्यासाठीच्या विश्लेषणासाठी तयार करावे लागतात. मी वर म्हटल्याप्रमाणे, स्वररचनेच्या जन्माची कहाणी शोधायची गरज नसते. ऐकायला मिळत असलेली चाल - इथे शब्द बाजूला ठेवणे गरजेचे असते. नुसती चाल मनात घोळवायची आणि त्याचा स्वतंत्र आनंद घ्यायचा. इतके केले तरी गाण्यातील स्वररचनेचा गाभा जाणून घेता येतो. ऐकायला मिळालेली चाल किती कठीण, किती सोपी आहे, याचा अदमास घेता येतो. सतत ललित संगीत ऐकणे, हाच एकमेव उपाय आहे आणी त्यामुळे आपली विचार करायची पद्धत नक्की होते.
आपण रागदारी संगीत सातत्याने ऐकतो आणि मगच त्यातील आनंद घ्यायला लागतो. हे आपले सहजपणे घडत असते. असे आहे, तर मग ललित संगीताबाबत दुजाभाव कशासाठी? वास्तविक ३ मिनिटांच्या आविष्कारात सौंदर्याच्या असंख्य परी दडलेल्या असतात, इथे एकही क्षण वाया दवडला जात नसतो. किंबहुना प्रत्येक क्षणाची स्वतंत्र अनुभूती असते. इथे वाद्ये, वाद्यमेळ, त्यांचा शब्दाशी जोडला गेलेला भावार्थ आणि ते सगळं जाणून,गायनाची अनुभूती घ्यायची!! ही कलाकृती सांघिक असते आणि परिणामी यशाचे भागीदार देखील सम प्रमाणात असतात.
मी लेखाचे शीर्षक लिहिताना -सांस्कृतिक सोहळा असे जे लिहिले, ते सगळे या सगळ्या विवेचनाच्या संदर्भात आहे. इथे प्रत्येक घटक हा संस्कृतीला आधाराला घेऊनच जिवंत होत असतो. आपली संस्कृती आकाराला येत असते,ती अशाच पायऱ्यांच्या आधाराने. इतका जर का बारकाईने विचार करायला सुरवात केल्यास, आपले आपल्यालाच कळेल, आपण आपले व्यक्तित्व किती प्रगल्भ करीत आहोत. हे प्रगल्भ होण्याची प्रक्रिया, आपल्या नकळत होत असते आणिअचानक एका विविक्षित क्षणी आपले विचार समृद्ध झाल्याची जाणीव होते आणि आपण आयुष्य उपभोगायच्या प्रक्रियेत ४ पावले पुढे आलोआहोत. कलेची फलश्रुती यापेक्षा वेगळी असण्याची काहीही गरज नसते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment