Sunday, 12 February 2023

कविता - एक समृद्ध जगणे

एकूणच साहित्य, साहित्य व्यवहार, याकडे जरा डोळसपणे बघितले तर एक बाब लगेच ध्यानात येऊ शकते. साहित्य आपल्या आयुष्यावर बरावाईट परिणाम कळत. नकळत परिणाम घडवत असते आणि परिणामी, व्यक्तित्वावर प्रभाव टाकत असते. अर्थात हा प्रभाव नकारात्मक असू शकतो किंवा सकारात्मक असू शकतो. त्यातून आपल्यावर झालेल्या संस्कारावर देखील साहित्याचा घडणारा परिणाम घडू शकतो. खरंतर थोड्या त्रयस्थपणे विचार केल्यास, साहित्य म्हणजे तरी काय? कुणालातरी कुठलातरी अनुभव येतो, त्याच्या मनावर त्याचा संस्कार होतो आणि त्यातून जाणवणाऱ्या अनुभूतीचा शाब्दिक आविष्कार, हा साहित्याच्या रूपाने वाचकांसमोर येतो. अर्थात जो अनुभव लेखकाला आलेला असतो, त्याचे अचूक शब्दांकन एका मर्यादेपर्यंत नेमके करता येते. अनुभवाचा संपृक्त परिणाम कितीही मनावर ठसला असला तरी शब्दरूपात मांडताना, कुठे ना कुठेतरी कळत/नकळत तडजोडीच्या स्वरूपात लिहिला जात असतो. लिहिणारा बरेचवेळा आव आणतो, अनुभवाचे नेमके शब्दरूप लिहिले गेले आहे पण ते १००% खरे नसते. बरेचवेळा अनुभव शब्दात मांडताना, मनात इतर असंख्य विचार तरळत असतात आणि लिहिताना खूप वेळा असे घडते, मनाशी योजलेले शब्द मनातच विरले जातात आणि लेखक एका धुंदीत आपले लेखन पूर्ण करतो. यात कुठेही फसवाफसवी नसते तर मानवी लेखन कौशल्याच्या मर्यादेची लखलखीत जाणीव असते. बरेच वेळा जेंव्हा लिहिण्याचा मजकूर पूर्ण होतो तेंव्हा त्यातील त्रुटी लक्षात येतात आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा वेळी "अल्पाक्षरी" लेखन हे अनुभवाची अनुभूती देण्याच्या प्रक्रियेला मदत ठरू शकते. अल्पाक्षरी हे गद्य लेखन असू शकत, जसे की आलेला अनुभव अत्यंत थोडक्यात, कुठलाही शाब्दिक फापटपसारा न मांडता,गोळीबंद स्वरूपात लिहिल्यावर बऱ्यापैकी समाधान देऊन जाते. असे असले तरी गाड्या लेखनाला बऱ्याच मर्यादा पडतात आणि हे कुठलाही सुजाण माणूस नाकारणे कठीण. त्यामुळेच बहुदा अल्पाक्षरी माध्यमातील "कविता", गद्य लेखनापेक्षा अधिक सृजनक्षम, अधिक क्रियाशील आणि अनुभवाची दाहकता किंवा एकूणच सगळाच अनुभव ग्रथित करण्याच्या प्रक्रियेत अधिक अंतर्मुख होते. कविता कशी असावी? खरंतर कविता संपूर्णपणे आकळून घेण्याचा आग्रह अनाकलनीय आहे. बरेचवेळा गद्य लेखन देखील या पातळीवर वावरते परंतु गद्य लेखनात पसरटपणा येण्याचा संभव अधिक. कवितेच्या बाबतीत हा धोका टाळता येण्याची शक्यता बरीच असते. एकतर कविता ही, कुठलाही अनुभव थोडक्यात मांडत असते, त्यामुळे शब्दांचा भरमार नसतो. जे काही मांडायचे आहे, ते अत्यंत मोजक्या शब्दात आणि प्रभावीपणे, मांडणे, अत्यावश्यक असते. काही ओळींतच अनुभवाची संगती लावायची असते.अर्थात अल्पाक्षरी लिहिताना, अचूकता येणे गरजेचे असते परंतु अनुभवाची सांगता करताना, प्रतिमा, उत्प्रेक्षा वगैरे शाब्दिक अलंकाराची जरुरी भासते आणि बहुदा इथेच कविता या माध्यमाचे स्वरूप वेगळे होते. याचा अर्थ असा नव्हे, हेच अलंकार गद्य लेखनात उपयोगी नसतात. आत्ममग्नता जितकी कवितेतून व्यक्त होते, तशी गद्य लेखनातून अपवाद स्वरूपात शक्य होते. अर्थात हे विधान तसे ढोबळ म्हणायला हवे कारण प्रत्येक कविता आत्ममग्न असते, असे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे होय. परंतु अनुभूतीची तरलता,दाहकता जितकी कवितेद्वारे प्रकट होऊन शकते, तितकी गद्य लेखनातून फार क्वचित अनुभवायला मिळते. मी सुरवातीला जे विधान केले, त्याचेच फलस्वरूप इथे पुन्हा मांडता येईल. साहित्याचा व्यक्तित्वावर घडणारा अमीट ठसा हा कवितेद्वारे घडण्याची शक्यता अधिक असते. मुळात. कविता कशी असावी याबाबत काही ठोस नियम नाहीत. प्रत्येक कालखंडात कवितेचे स्वरूप बदलत असते आणि आपल्या संस्कृतीवर गाढा परिणाम घडवत असते. आता इथे एक प्रश्न उद्भवू शकतो. कवितेमुळे संस्कृती घडते की बदलती संस्कृती कवितेला वेगळा आकार प्राप्त करून देते? कविता हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, हे तर खरेच आहे. कविता समजून घेणे, यात साहित्यिक आणि सुजाण असा आनंद आहे, हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. अन्यथा कविता वाचून कोरडे राहणारे वाचक जागोजागी भेटत असतात. आपण जे साहित्य वाचतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर होतच असतो आणि हे नाकारणे अशक्य. गद्य लेखन समजून घ्यायला तसे फारसे अवघड नसते परंतु कवितेबाबत वाचकाला, थोडेफार समृद्ध असणे आवश्यक असते. अन्यथा कवितेतील आशय, त्यातील रचना कौशल्याची गंमत आणि एकूणच अखेरचे जे संचित मांडलेले असते, त्याचा आनंद घेणे अवघड जाणार. बरेचवेळा, केवळ आपल्याकडेच नव्हे तर इतरत्र देखील, कवितेचा घाट, याला प्रमाणाबाहेर महत्व दिले जाते. कविता कशी असावी? कवीच्या मगदुरावर हे अवलंबून असते. आपल्या मराठी कवितेचा विचार केल्यास, मराठी कवितेला शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि कालानुरूप त्यात भरपूर मन्वंतर घडले आहे. परिणामी कालची कविता आज तितकीच प्रभावी वाटले का? आपली आवड शिळी होऊ शकते परंतु कविता ही कविताच असते आणि हे जर पक्केपणाने ध्यानात ठेवले पाहिजे. आपल्याकडे एकूणच एक फॅशन झाली आहे, कवितेचे काळानुरूप वर्गीकरण करून, त्या दृष्टीने आवड निर्माण करायची. परिणामी आपण जुन्या कवितांवर अन्याय करीत असतो. आपल्या वयानुसार आपली आवड बदलत असते परंतु संस्कारक्षम वयात वाचलेल्या कवितांचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. दुसरा मुद्दा असा येतो, कवितेची आवड विषयानुसार ठरवणे होय. काही विषय कालातीत असतात तर काहींना क्षणभंगुरत्वाचा शाप असतो. कालातीत विषय हे नेहमीच आपल्याला प्रत्येकवेळी वेगवेगळी अनुभूती देतात. आता ही अनुभूती स्वीकारण्याची शक्ती व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असणारच परंतु मांडलेला अनुभव आपल्या मनात किती खोलवर रुतून बसतो, त्यानुसार आपली आवड ठरवणे योग्य नव्हे का? त्यादृष्टीने विशेषतः मराठी कवितेत " सामाजिक बांधिलकी" या शब्दांनी नको तितका घोळ निर्माण करून ठेवला. कविता आत्मनिष्ठ असते आणि लिहिणारा कवी हा, याच समाजातून आलेला असतो. तेंव्हा समाजातील सुखदुःखाचा तो साक्षीदार असतो आणि त्यातूनच तो अनुभव कवितेत मांडत असतो. तेंव्हा त्यासाठी सामाजिक बांधिलकीचे बंधन कशासाठी? एक नक्की, कविता समजून घेण्यासाठी, सातत्याने वाचन करीत, स्वतःला समृद्ध करायला हवे. कवितेतील प्रत्येक प्रतिमेचं अर्थ आपल्याला लागेलच हा आग्रह वृथा आहे पण जरी आशय तात्काळ ध्यानात आला नाही ती कविता आपल्यावर गाढा परिणाम घडवत असतेच असते. ज्याप्रमाणे सततचे वाचन आपले आयुष्य समृद्ध करत असते, त्याप्रमाणेच उत्तम कविता आपल्या विचारांवर आणि तद्नुषंगाने वागण्यावर परिणाम करीत असते आणि एकूणच आपले जगणे समृद्ध करीत असते. अर्थात आपल्याला आयुष्य समृद्ध करायलाच हवे का? या प्रश्नावर मात्र सगळेच विचार गोठले जातात.

No comments:

Post a Comment