Friday, 24 February 2023
मेरी याद में तुम ना आंसू बहाना
हिंदी चित्रपट सृष्टीत एक काळ असा होता, जेंव्हा गाण्यातील कवितेला आणि त्या काव्याला समजून, स्वररचना करताना त्याला भारतीय संगीताचे लेणे बहाल करण्याचा. हा काळ अगदी विस्मृतीत गेला असे म्हणता येणार नाही परंतु आता अभावानेच अशा प्रकारची गाणी तयार होताना दिसतात. अर्थात काळ बदलतो, काळानुरूप अभिरुची बदलते आणि त्या अभिरुचीला धरून आवड निर्माण होत असते. तरीही काही मूलभूत गाष्टी तितक्याच महत्वाच्या असतात आणि त्या कायम चिरंतन राहणारच, त्यातील एक बाब म्हणजे गाण्यातील मेलडी. मेलडी हा भारतीय संगीताचा प्राण! अर्थात निखळ मेलडी ही रागदारी संगीतात प्रकर्षाने ऐकायला मिळते परंतु आपले भारतीय संगीतकार इतके प्रज्ञावान की त्यांनी ललित संगीतात त्याचा सढळ वापर केला आणि तो तसे करताना, मेलडीला अनेक अंगाने सजवले, प्रसंगी मगदुराप्रमाणे वळवून देखिल घेतले.
इथे बरेच वेळा एकमुद्दा उपस्थित केला जातो. मेलडी म्हणजे काय? भारतीय संगीत सुरप्रधान आहे, हे निश्चित आणि या सुरांना धरूनच मेलडी अवतरते. परंतु नुसता एक सूर गायला म्हणजे मेलडी तयार होत नसते. अर्थात बहुदा २,३ सूर एकत्रित गायला घेतले म्हणजे मेलडी तयार होते, हे म्हणणे देखील धार्ष्ट्याचे ठरेल. तेंव्हा काही ठराविक सुरांचा समुच्चय गाताना, त्यात संगती निर्माण करून एकामागोमाग एक, अशी स्वरसंहती तयार करणे म्हणजे मेलडी होय, असे सर्वसाधारणपणे मांडता येईल. अर्थात हे फार ढोबळ आणि प्राथमिक वर्णन झाले परंतु एका गाण्याच्या संदर्भात आणखी विस्ताराने किती लिहिणार? तेंव्हा हा विषय इथे मांडण्यात, एक औचित्य साधायचे होते आणि ते म्हणजे आजचे आपले गाणे *मेरी याद में तुम ना आंसू बहाना*, मेलडीच्या अंगाने कसे सौंदर्याधिष्ठित झालेले आहे, याचा अदमास घेता येतो.
राजा मेहदी अली खान यांनी शब्दबद्ध केलेले गीत आहे. मुळातला कवी परंतु बऱ्याच चित्रपटांसाठी गीतरचना केलेला कवी. उर्दू भाषेतील प्रतिष्ठित शायरांमध्ये याचे नाव फारसे प्रचलित नाही परंतु चित्रपटासाठी सक्षम गाणी लिहिणारा, असा ख्यातकीर्त आहे. विशेषतः संगीतकार मदन मोहन सोबत त्यांनी बऱ्याच असामान्य गीतासाठी हात मिळवलेला आहे. उर्दू आणि हिंदी शब्दांचा यथोचित वापर करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. चित्रपटगीत लिहिताना बरेचवेळा अनावश्यक अक्षरांची जोडणी करावी लागते कारण तिथे स्वरिक लयीला प्राधान्यक्रम असतो. तरीही *प्रचलित* मधून *अप्रचलित* निर्मिती करण्याचे कौशल्य अप्रतिम आहे. सर्जनशीलता मर्यादित अर्थाने का होईना, तिथे दिसते. मुखड्यातील ओळींमध्ये *समझना के एक था सपना सुहाना* या ओळीत वास्तविक *के* अक्षराला स्वतंत्र अर्थ नाही परंतु त्या अक्षरानेच एक लय पूर्ण होते, हे महत्वाचे. *निगाहें* किंवा *मोहब्बत के काबिल* सारख्या शब्दांच्या पखरणीने कवितेला एकप्रकारचे वजन प्राप्त होते आणि हे नाकारता येणार नाही. बाकीची कविता, तशी सरळ,साधी आहे पण गेयता अचूकपणे मांडलेली आहे. त्यामुळे संगीतकाराला एक सक्षम शायरी संगीतबद्ध करायला मिळाली, हे महत्वाचे.
संगीतकार मदन मोहन याची *तर्ज* आहे. राग *जौनपूरी* रागाशी संबंधित प्रस्तुत स्वररचना आहे. आता आपल्याला माहीत आहे, असे व्यासंगी संगीतकार शक्यतो रागाच्या चलनाच्या आधाराने स्वररचना न करता, त्यातील *वेचक* भागावर आधारित चालीची निर्मिती करतात. इथे असेच झाले आहे. कसे ते बघूया. *गंधार* स्वर *आरोही* सप्तकात वर्ज्य आहे परंतु *अवरोही* सप्तकात *गंधार*,*धैवत* आणि *निषाद* स्वर *कोमल* लागतात आणि बाकीचे स्वर *शुद्ध* स्वरूपात योजले जातात. मुखड्याची पहिलीच ओळ घेतल्यास, *मेरी याद में तुम ना* ही ओळ *सा सा रे रे म म म प प प* अशा सुरांत येते. लक्षात घेण्यासारखे म्हणजे इथे *गंधार* घेतला नाही. पुढील *आँसू बहाना* मुद्दामून वेगळे घेतले कारण इथे *मींड* आहे. आता *आँसू बहाना* घेताना, संगीतकाराने *प सा(किंचित लांबवलेला) नि/सा रे नि ध प* अशा प्रकाराने स्वर घेतले आहेत. अर्थात हा एक तांत्रिक भाग झाला परंतु एक गाणे म्हणून विचारात घेतल्यास, काही मुद्दे मांडावेसे वाटतात.
संगीतकाराने चाल बांधताना, निश्चितपणे तलत मेहमूद आणि त्यांच्या गायकीचा विचार केला असणार. आपण ज्या गायकाला आपली स्वररचना देत आहोत, त्याचा गळा आणि गळ्याच्या मर्यादा, दोन्ही गोष्टीचा अचूक अंदाज बांधलेला दिसतो. सुरवातीपासून *मध्य लयीत* गाणे सुरु होते. इथे जरी *जौनपुरी* रागाची सावली असली तरी गायकाच्या गळ्याला कुठल्या प्रकारच्या हरकती शोभणाऱ्या आहेत, हा विचार दिसून येतो. मुखडा आणि अंतरे जवळपास सारखे आहेत. पहिला अंतरा किंचित वरच्या सुरांत सुरु होतो पण अगदी तार सप्तक गाठत नाही. संगीतकार मदन मोहन यांची गाणी बांधायची एक शैली होती. लखनवी ढंगाने चाली बांधण्यात हा संगीतकार माहीर होता. बहुदा *बेगम अख्तर* यांच्या गायकीचा असर असणार. अर्थात संगीतकाराने, या गायिकेचा प्रभाव अनेकवेळा मान्य केला आहे. एकामागून एक शब्द घेताना, कुठेही शब्दांचे औचित्य भंग होत नाही तर कवितेतील आशय सुरांद्वारे अधिक अधिक खोल होतो.
गायक म्हणून तलत मेहमूद यांच्या गळ्याला निश्चित मर्यादा होत्या परंतु आपले *परिप्रेक्ष्य* काय आहे,याची वाजवी जण ठेवली आणि त्यानुरुपच गाणी गायला घेतली. त्यांना माहित होते, आपण इतरांसारखे गाऊ शकत नाही पण आपली ओळखआणि आवड नक्क्की केली तर आपल्याला आपल्या अभिरुचीची गाणी मिळू शकतात आणि तसे त्यांनी सिद्ध केले. अर्थात हा गायक देखील लखनवी संस्कृतीत मुरलेला असल्याने, गाणे गायच्या आधी, काव्याचा ठराविक दर्जा, चालीचे मूल्य आणि आपण गाऊ शकू की नाही, याची अचूक धारणा,आपल्याला नेहमी बघायला मिळाली. यासाठी आपली आपल्यालाच ओळख असावी लागते. गाणी गाताना, गाण्यात किती हरकती घ्यायच्या, शब्द किती ताणायचा वगैरे बाबतीत या गायकाचे गायन आदर्श मानावे, इतपत योग्यतेचे निश्चित होते.
तलत मेहमूद यांच्या आवाजातील *आर्जव* हा गुण विशेष आहे. कुठलेही गाणे ऐकायला घ्या, धीम्या गतीने, शांतपणे शब्दांचा आस्वाद घेत गायन करायचे,ही त्यांची गायन प्रकृती. आपल्या मराठीतील अरुण दात्यांवर तलत मेहमूद यांच्या गायकीचा सुरवातीच्या काळात प्रभाव होता. गायला घेतलेले गीत एका विशीष्ट दर्जाचे आहे, हे ध्यानात ठेऊन, ते नेहमी गायन करीत असत. *ये रो रो के कहता है टुटा हुआ दिल* हे मुद्दामून ऐकावी. ओळीत दु:खाचा कडेलोट आहे पण म्हणून गाताना अभिव्यक्ती संयमित आहे, कुठेही आकांत नाही. आता आयुष्य मुकेपणाने, झुरत काढायचे आहे, ही विषण्ण करणारी जाणीव ऐकायला मिळते आणि हे जाणीव अतिशय सुरेलपणे ऐकायला मिळते. *जुदा मेरी मंज़िल, जुदा तेरी राहें,मिलेगी न अब, तेरी मेरी निगाहें* ही ओळ देखील वरील विवेचनाचा पुरावा म्हणून दाखवता येईल. *निगाहें* गाताना, एका दुखऱ्या भावनेची अतृप्त अशी जाणीव दिसते.
आपले गायन हे नेहमीच संयत तरीही प्रभावी कसे करावे, यासाठी तलत मेहमूद यांची गायकी अभ्यासण्यायोग्य आहे.
मेरी याद में तुम ना आँसू बहाना
न जी को जलाना,मुझे भूल जाना,
समझना के एक था सपना सुहाना
वो गुज़रा जमाना, मुझे भूल जाना
जुदा मेरी मंज़िल, जुदा तेरी राहें
मिलेगी न अब, तेरी मेरी निगाहें
मुझे तेरी दुनिया से है दूर जाना
न जी को जलाना,मुझे भूल जाना
ये रो रो के कहता है टुटा हुआ दिल
नहीं हूँ मैं तेरे मोहब्बत के काबिल
मेरा नाम तक अपने लबों पे ना लाना
न जी को जलाना,मुझे भूल जाना
(2) meri yaad me na tum aansu bahana, mujhe bhool_Madhosh_Manhar &MeenaKumari_Talat_R M A Khan_ MM_a tri - YouTube
Sunday, 19 February 2023
गोलंदाजी - नयनरम्य सोहळा
केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर क्रिकेट खेळात फलंदाजाला जितके महत्व दिले जाते, कौतुक केले जाते त्याप्रमाणात गोलंदाजाला डावलले जाते. वास्तविक पहाता, गोलंदाजांनी २० बळी घेतल्याशिवाय सामना जिंकणे अशक्य! अशी स्थिती असूनही, फलंदाजाने षटकार मारल्यावर जे कौतुक प्राप्त होते, तिथे गोलंदाजाने त्रिफळा उडवल्यावर, कौतुक होते पण प्रमाण कमी असते. शतक लावल्यावर सामनावीर पारितोषिक मिळते पण त्याच सामन्यात १० किंवा जास्त बाली मिळवलेल्या गोलंदाजाला तितके झुकते माप मिळत नाही आणि अशा प्रकारचा दुजाभाव फार पूर्वीपासून चालत आला आहे. त्यामागे एक कारणमीमांसा केली जाते, फलंदाजाकडे कर्तृत्व दाखवायला एकच चेंडू असतो, तिथे जर काही दाखवले नाही तर सरळ पॅव्हेलियनची वाट पकडणे क्रमप्राप्त असते. गोलंदाजाकडे, समजा षटकार मारला तरी पुढील चेंडू टाकून बळी मिळवण्याची शक्यता अजमावता येते. अर्थात हा मुद्दा नजरेआड करणे अवघड आहे. क्रिकेट खेळ क्षणभंगुर ठरतो तो अशा क्षणांच्या वेळी. ताशी १५० च्या वेगाने चेंडू जेंव्हा अंगावर येतो तेंव्हा फलंदाजाकडे केवळ निमिष, इतकाच वेळ हाताशी असतो आणि त्याच वेळात निर्णय घ्यावा लागतो. निर्णय चुकला तर खेळ संपला. इतका हा खेळ क्रूर आहे. तेंव्हा फलंदाजीच्या कलेला थोडे झुकते माप मिळणे, अगदीच चुकीचे नसते. परंतु मी वर म्हटल्याप्रमाणे, २० बळी मिळवणे, हेच कुठल्याही विजयाचे इप्सित किंवा गमक असते. खेळपट्टी फलंदाजी धार्जिणी असली तर गोलंदाजीची होणारी कत्तल, निमूटपणे सहन करण्यावाचून काहीही करता येत नसते. अशा वेळी गोलंदाजी म्हणजे वेठबिगारी वाटते. थोडा विचार केल्यास, गोलंदाज व्हायचे असेल तर प्रचंड प्रमाणात घाम गाळणे, मनाची स्थिरता कायम ठेवणे तसेच चेंडू टाकणे म्हणजे रेम्याडोक्याचे काम नोहे, हे मनावर बिंबवणे होय. प्रत्येक चेंडूवर बळी मिळवण्याची आस मनात ठेऊनच गोलंदाजी करावी लागते. मनोनिग्रहाची कसोटी जितकी फलंदाजांची असते, तितकीच गोलंदाजांची देखील असते. टाकलेल्या चेंडूचा शेवट कसा आहे, हे त्याच्या हातात फारसे नसते, विशेषतः मंदगती गोलंदाजाच्या बाबतीत. चेंडू वळवलेला असतो पण त्याचे नेमके काय करायचे, हे समोरच्या फलंदाजाच्या हातात असते!! हा एक प्रकारचा जुगार असतो. असे फार थोडे मंदगती गोलंदाज झाले आहेत, त्यांनी निव्वळ मनगटी कलेच्या आधारावर फलंदाजांना भ्रांतचित्त करून सोडले आहे. अन्यथा वाट बघत बसणे, इतकेच बव्हंशी मंदगती गोलंदाजाच्या नशिबी असते.
इथे मला "बेदी" आणि "प्रसन्ना" या जोडगोळीची आठवण आली. केवळ ३,४ पावलांची धाव आणि शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्या फलंदाजाला कसाही चुणूक न दाखवता, त्याला गुंगारा द्यायचा आणि जाळ्यात पकडायचे!! हे असामान्य कौशल्य या दोघांकडे होते.असे नव्हे, हे दोघे एकाच प्रकारची गोलंदाजी करायचे. त्यांच्या भात्यात विविध अस्त्रे होती. कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळवायची त्यांची ताकद निव्वळ बेमिसाल होती. चेंडू तरंगत टाकायचा आणि चेंडूचा टप्पा "फसवा" ठेवायचा!! तो इतका फसवा ठेवायची की समोरच्या फलंदाजाला शेवटपर्यंत, पाय पुढे टाकून खेळायचे की पाय मागे ठेऊन खेळायचे? हे समजू द्यायचे नाही. हे बघणे, हा नयनरम्य सोहळा असायचा. फलंदाजाला चकवा देण्यात हे दोन्ही गोलंदाज माहीर होते. ऑस्ट्रेलिया इथल्या खेळपट्ट्या सर्वसाधारपणे वेगवान गोलंदाजीला धार्जिण्या असताताई अशा खेळपट्टीवर तिथेच ३ सामन्यांच्या मालिकेत प्रसन्नाने २५ बळी मिळवले होते, अत्यंत खडूस अशा आयन चॅपल कडून त्याने मनापासूनची वाहवा मिळवली होती. तसेच बेदी, इंग्लंडच्या थंडगार हवामानात, तिथल्या फलंदाजांना आपल्या मनगटावर नाचवण्याची किमया घडवणारा किमयागार होता. दुर्दैव असे होते, त्यावेळी भारतीय फलंदाजी तितकी "सखोल" नव्हती,परिणामी बरेचवेळा या दोघांचे पराक्रम मातीमोल झाले.
खेळपट्टी कशी असावी? गोलंदाजाला थोडी तरी पोषक असावी जेणेकरून फलंदाजाला, त्याच्या कौशल्याला आणि प्रयत्नांना पणाला लावणे जरुरीचे व्हावे. दोघांना आपले कौशल्य दाखवण्याची समसमान संधी मिळायला हवी, अशाचवेळी खऱ्याअर्थी क्रिकेट खेळाची मजा घेता येते एकतर्फीपणा निरस ठरतो. एकतर वेगवान गोलंदाजी ही नेहमीच शारीरिक परिश्रमाची प्रचंड मागणी करत असते. सततच्या खेळणे, सर्वात आधी दुखापतग्रस्त कुणी होत असेल तर, तो वेगवान गोलंदाज. सातत्याने प्रचंड ताकद लावून, वेगवान गोलंदाजी करणे, हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. त्यातून जेंव्हा फलंदाजाकडून mis time फटका बसून, चेंडू सीमारेषेबाहेर जाताना बघणे, हे त्रासदायक असते.वेगवान गोलंदाजी खेळणे, हा निमिषभराचाच खेळ असतो. टाकलेला चेंडू अंगावर शेकू शकतो, झेल जाऊ शकतो किंवा त्रिफळा उडू शकतो. टाकलेल्या चेंडूने यष्टी उडवली जाणे, यासारखे दुसरे सुख, वेगवान गोलंदाजाच्या नशिबात नसते. Cartwheeling बघणे, खरोखरच अनुपम सुख असते. नवीन चकचकीत चेंडू कसा उसळी घेईल,कितपत स्विंग होईल, याचा बरेचवेळा खुद्द गोलंदाला देखील पूर्ण अंदाज नसतो आणि फलंदाज तर थोडा भ्रांतचित्त असतो. त्यावेळचे द्वंद्व खरी, परीक्षा असते. अर्थात अशा वेळी मारलेला कव्हर ड्राइव्ह, डोळ्यांचे पारणे फेडत असतो, हे देखील तितकेच सत्य होय. हे साप-मुंगूस यांच्यातील युद्ध असते. एखादा लिली किंवा अँडी रॉबर्ट्स जेंव्हा चेंडू टाकत, तेंव्हा फलंदाजाला कायम दक्ष अवस्थेतच वावरायला लागायचे. येणार चेंडू कशा प्रकारचा असेल, किती स्विंग होणार असेल, याचा फक्त "अंदाज" बांधणे, इतकेच फलंदाजाच्या हातात असते. हवेत चेंडू स्विंग करणेआणि टप्पा पडल्यावर आणखी चेंडू स्विंग होणे, ही असामान्य ताकदीची कला आहे.
तसेच वेगवेगळ्या वेगाचे बाउंसर्स टाकणे, अचानक "यॉर्कर" टाकून, फलंदाजांची भंबेरी उडवणे, ही वेगवान गोलंदाजाच्या भात्यातील प्रभावी अस्त्रे आहेत. फलंदाजांचा मनोनिग्रह आणि कस अशा वेळीच बघायला मिळतो. अचानक वेगात बदल करून, फलंदाजाला गंडवणे, ही उच्च प्रतीची कला आहे. विशेषतः इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इथल्या वेगवान गोलंदाजी धार्जिण्या खेळपट्टीवर, म्हणूनच शतक लावणे, ही फलंदाजी कलेची उच्च श्रेणी ठरते. त्यातून अशा देशात, चेंडूची लकाकी बराच वेळ कायम असते, त्यामुळे फलंदाजाला उसंत मिळाली, असे फार कमी वेळा बघायला मिळते. वेगवान गोलंदाज नेहमीच आव्हान देत असतात. एखादा होल्डिंग किंवा थॉमसन सारखा गोलंदाज, अचानक sand shoe पद्धतीचा यॉर्कर टाकतात, तेंव्हा फलंदाजाला आपला त्रिफळा कधी उडाला, याचा पत्ताच लागत नाही. अर्थात अशा प्रकारचा चेंडू टाकायला, प्रचंड मेहनत घ्यावी लागते कारण जर का खोलवर अचूक टप्पा पडला नाही तर तो चेंडू "फुलटॉस" जातो आणि झणझणीत चौकार सहन करावा लागतो. एकूणच वेगवान गोलंदाजी ही क्रिकेट खेळाची खरी लज्जत आहे, खरे सौंदर्य आहे. खरतर टाकलेल्या चेंडूचा अंदाज घेऊन, तसाच विकेटकीपरकडे सोडून द्यायचा!! हा भाग देखील तितकाच विलोभनीय असतो. आपल्या सुनीलचा याबाबतीतला अंदाज निव्वळ थक्क करणारा होता.
असे काही प्रसंग आठवत आहेत, जिथे द्वंद्व पराकोटीचे बघायला मिळाले आहे. एकदा वेस्टइंडिज इथे भारतीय संघ खेळायला गेला असताना, त्यावेळी मार्शल आग ओकत होता. मार्शलचा वेग म्हणजे तारांबळ नक्की, असेच सगळीकडे पसरलेले होते. अशाच एका सामन्यात, मार्शलचा चेंडू अचानक उसळला आणि सुनीलच्या कपाळावर आदळला!! बरोबर कपाळाच्या मध्यभागी आदळला!! वेडं पराकोटीच्या झाल्यास असणार परंतु ती वेदना सुनीलने मनातल्या मनात पचवली आणि पुढल्या चेंडूवर त्याने कचकचीत कव्हर ड्राइव्ह मारून चौकार मिळवला!! इथे मी खेळत आहे आणि मी इथला "बॉस" आहे, हे गर्जून सांगणारा तो क्षण होता.
असाच आणखी एक प्रसंग आठवला. ऑस्ट्रेलियात वेस्टइंडीजचा संघ गेला होता, विव्ह रिचर्ड्सचा दबदबा जगभर पसरला होता. विव्ह नेहमीप्रमाणे हेल्मेट शिवाय खेळत असताना, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज, रॉडनी हॉग याने एक बाउन्सर टाकालाआणि विव्हचा अंदाज चुकला आणि डोक्यावर चेंडू शेकला. क्षणभर विव्ह दचकलाच!! असे फार कमी वेळा घडले पण कष्ट त्याने सावरून घेतले आणि पुढल्या चेंडूवर त्याने अफलातून षटकार मारला!! खच्चीकरण कसे करायचे असते, हे दर्शविण्यासाठी हे २ प्रसंग मी लिहिले परंतु यात मूळ मुद्दा असा, या दोन्ही गोलंदाजांनी, या फलंदाजांना आव्हान दिले, डिवचले आणि त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना चेव आला. असामान्यत्व इथेच सिद्ध होते.
हे दोन्ही गोलंदाज जगभर धुमाकूळ घालणारे होते. अशी आणखी अनेक उदाहरणे देता येतील. यात गंमत अशी आहे, वेगवान गोलंदाजी अत्युच्च टप्प्यावर सुरु असताना, आपले तितकेच अत्युच्च कौशल्य दाखवले गेले. वेगवान गोलंदाज तगडा असला की असे प्रसंग बघायला मिळतात. दोन घ्यावे आणि दोन द्यावे, यात खरी या खेळाची लज्जत आहे. इथे एका क्षणी एखादा यशस्वी होतो पण त्याला यशस्वितेचा "फॉर्म्युला"सापडला असेच कधीच होत नसते.येणार प्रत्येक चेंडू हा एक आव्हान घेऊन येत असतो आणि त्या आव्हानाचा सामना करण्यातच फलंदाजाची असामान्य कसोटी असते. क्रिकेट खेळ उच्च प्रतीचा आनंद असाच देत असतो.
Saturday, 18 February 2023
ललित संगीताचा आस्वाद- सांस्कृतिक सोहळा
इथे सुरवातीलाच काही बाबी स्पष्ट करतो. प्रस्तुत लेखात, ललित संगीत आणि त्याचा आस्वाद,इतकेच कार्यक्षेत्र आहे.ललित संगीताची निर्मितीआणि त्याचा प्रवास, हा उद्देश अजिबात नाही कारण तिथे प्रत्यक्ष संगीतकार, हा घटक अवतरतो आणि महत्वाचा ठरतो. त्याच्या निर्मितीबाबत कुठलेही विधान करणे, अति धाडसाचे आणि म्हणून अति बाष्कळ ठरते.
आपण गाणे ऐकतो, सहज ऐकतो आणि निदान पहिल्या श्रवणात तरी, गायक/गायिकेच्या कौशल्याचा परिणाम आपल्या कानावर होत असतो. वास्तविक पाहता, ललित संगीतात, गायक हा घटक सर्वात शेवटी येतो. *आधी चाल, मग शब्द* ही पद्धत असो किंवा *आधी शब्द मग चाल* अशी पद्धत असो, गायनक्रीडा शेवटच्या पातळीवर येते. आपले श्रवण हे बहुतांशी याच पातळीवर वावरते. अर्थात गायनक्रियेचा परिणाम साहजिकच प्रगाढ होतो. एकतर सगळाच सांगीत आविष्कार हा ३,४ मिनिटांचा असतो. त्यामुळे इतक्या अल्प काळात, अविष्कारातील कुठल्या सौंदर्याकडे लक्ष द्यायचे? हा विचार करण्यापेक्षा जे आपल्या कानावर पडत आहे, तेच श्रेयस्कर मानण्याकडे सर्वसाधारण कल असतो. त्यातून गळ्यातून येणारा सूर, हे नेहमीच अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने,तिकडे आपले वेधले जाणे, यात प्राथमिक दृष्टीने काहीच चूक नाही. आता बघा, आपण शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जातो, तिथे तर सर्वकाळ सुरांचेच राज्य असते आणि तिथे सुरांच्या राज्यात आपण भान हरपून बसतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे तिथे *सूर* याच घटकाला संपूर्णपणे महत्व असते. एक बाब नक्की, सुरांच्या राज्यात शब्द माध्यम हे नेहमीच परके राहते!! शब्द माध्यम, त्याची अभिव्यक्ती आणि केवळ कैवल्यात्मक पातळीवर वावरणारे असे सूर हे माध्यम सगळ्यात लवचिक आणि म्हणून मनावर गाढ परिणाम करणारे असते.
ललित संगीतात प्राय: ३ घटक असतात आणि हे आता सर्वमान्य आहे. प्रत्येक घटकाला सम प्रमाणात महत्व मिळावे, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात काय घडते? गाण्याच्या श्रवण क्रियेत *गायन* या घटकाला अतोनात महत्व मिळते कारण मी वर म्हटल्याप्रमाणे आपल्याला गायनाचा पहिला प्रत्यय येतो.
त्यानंतर संगीतकाराची विचारणा होते आणि मग ऐकणारा जर का अधिक चिकित्सक असेल तर कवीने काय लिहिले आहे, याचा विचार करायला घेतला जातो. संगीतकाराच्या स्वररचनेचा आणि कवीच्या कवितेचा साधक बाधक विचार, ही वैचारिक पायरी फारच थोड्या वेळी ओलांडली जाते. याचे मुख्य कारण असे संभवते, कवीची कविता समजून घेण्यासाठी, मनाची तशीच तयारी आणि आवड होण्याची गरज असते. कविता समजून घ्यायची असेल तर मुळात शब्द माध्यमाबद्दल मनात आवड व्हावी लागते. त्यातूनच पुढे मग स्वरांनी घातलेले गारुड बाजूला सारून, शब्दरचनेचा स्वतंत्रपणे विचार करणे, गरजेचे असते आणि तिथे बौद्धिक व्यायाम आवश्यक असतो. कोण इतका मेंदूला त्रास देणार? कविता समजून घेण्याची गरजच काय? असले प्रश्न सर्वसामान्यपणे सगळ्यांना पडतात. स्वतःच्या मेंदूला कमीत कमी तोशिस देऊन, जे गाणे ऐकायला मिळते, तोच खरा आस्वाद,हीच आस्वादाची रूढ पद्धत. शब्द ओळखणे, समजून घेणे, काहीसे अवघड असते, हे कुणीही मान्य करेल परंतु आस्वादाच्या प्रक्रियेत त्याला फार मोठे स्थान आहे. मुळात ललित संगीत ही बौद्धिक विचाराची मागणी आहे, हेच फारसे कुणाला पटत नाही. जाता जाता सिगारेट शिलगावी आणि आनंद मिळवावा, तद्वत विचार ललित संगीताच्या आस्वादात अंतर्भूत असतो. गाण्यातील कविता, हे स्वतंत्र आस्वादाचे क्षेत्र आहे आणि त्यासाठी मन एकाग्र करून, कवितेचा विचार करायचा असतो,हेच फारसे पटत नाही.
खरतर जरा गंभीरपणे विचार केला तर कविता संग्रह आणि गीत संग्रह, यात तत्वतः काहीही फरक नसतो पण आपल्या समाजात याबाबत गीतसंग्रहाला नेहमीच खालचे स्थान दिले जाते. कविता संग्रह निघतात परंतु गीतसंग्रह अपवाद स्वरूपात निघतात!! जितक्या प्रमाणात भुक्कड कविता प्रसवल्या जातात तितकेच प्रमाण गीत लेखनात असू शकते.
यात एका अडचण फार महत्वाची असते, कवितेचा आस्वाद घेताना, कानातून सुरांचे गारुड बाजूला ठेवणे गरजेचे असते आणि तिथेच खरी अडचण उद्भवते. आपण गीतातून सुरांना वेगळे करू शकत नाहीआणि सुरांना साथीला घेऊनच कविता वाचायला घेतो ही पद्धत निखालस चुकीची आहे. गीतातील कविता ही इतर कवितेप्रमाणे वाचायला घ्यावी लागते. तर आणि तरच तुम्ही गीतातील कविता आस्वादू शकता. त्यासाठीच मनाची एकाग्रता आवश्यक असते.
तसेच संगीतकाराच्या स्वररचनेबाबत म्हणावे लागेल. प्रत्येकवेळेस स्वरलेखन करून, चालीचे संदर्भ जाणून घ्यायची अजिबात गरज नसते. आपले कान त्यासाठीच्या विश्लेषणासाठी तयार करावे लागतात. मी वर म्हटल्याप्रमाणे, स्वररचनेच्या जन्माची कहाणी शोधायची गरज नसते. ऐकायला मिळत असलेली चाल - इथे शब्द बाजूला ठेवणे गरजेचे असते. नुसती चाल मनात घोळवायची आणि त्याचा स्वतंत्र आनंद घ्यायचा. इतके केले तरी गाण्यातील स्वररचनेचा गाभा जाणून घेता येतो. ऐकायला मिळालेली चाल किती कठीण, किती सोपी आहे, याचा अदमास घेता येतो. सतत ललित संगीत ऐकणे, हाच एकमेव उपाय आहे आणी त्यामुळे आपली विचार करायची पद्धत नक्की होते.
आपण रागदारी संगीत सातत्याने ऐकतो आणि मगच त्यातील आनंद घ्यायला लागतो. हे आपले सहजपणे घडत असते. असे आहे, तर मग ललित संगीताबाबत दुजाभाव कशासाठी? वास्तविक ३ मिनिटांच्या आविष्कारात सौंदर्याच्या असंख्य परी दडलेल्या असतात, इथे एकही क्षण वाया दवडला जात नसतो. किंबहुना प्रत्येक क्षणाची स्वतंत्र अनुभूती असते. इथे वाद्ये, वाद्यमेळ, त्यांचा शब्दाशी जोडला गेलेला भावार्थ आणि ते सगळं जाणून,गायनाची अनुभूती घ्यायची!! ही कलाकृती सांघिक असते आणि परिणामी यशाचे भागीदार देखील सम प्रमाणात असतात.
मी लेखाचे शीर्षक लिहिताना -सांस्कृतिक सोहळा असे जे लिहिले, ते सगळे या सगळ्या विवेचनाच्या संदर्भात आहे. इथे प्रत्येक घटक हा संस्कृतीला आधाराला घेऊनच जिवंत होत असतो. आपली संस्कृती आकाराला येत असते,ती अशाच पायऱ्यांच्या आधाराने. इतका जर का बारकाईने विचार करायला सुरवात केल्यास, आपले आपल्यालाच कळेल, आपण आपले व्यक्तित्व किती प्रगल्भ करीत आहोत. हे प्रगल्भ होण्याची प्रक्रिया, आपल्या नकळत होत असते आणिअचानक एका विविक्षित क्षणी आपले विचार समृद्ध झाल्याची जाणीव होते आणि आपण आयुष्य उपभोगायच्या प्रक्रियेत ४ पावले पुढे आलोआहोत. कलेची फलश्रुती यापेक्षा वेगळी असण्याची काहीही गरज नसते.
Friday, 17 February 2023
Clive Lloyd
मुंबईत नव्याने झालेले *वानखेडे स्टेडियम*! खेळपट्टी कशी असेल याची सुतराम कल्पना नाही कारण जिथे हे स्टेडियम नव्याने बांधले आहे तिथे खेळपट्टी देखील नव्यानेच तयार केली असणार. वेस्टइंडीज संघाची पुनर्बांधणी सुरु होती. ग्रीनिज,रिचर्ड्स सारखे खेळाडू हळूहळू आपला दबदबा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते. अँडी रॉबर्ट्सने आपले कर्तृत्व याच १९७४/७५ च्या मालिकेत सिद्ध केले होते. खरतर संघात *फ्रेड्रिक्स* आणि *लॉइड* हेच खऱ्याअर्थी अनुभवी खेळाडू होते. या पार्श्वभूमीवर या मालिकेतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर सुरु झाला. दूरदर्शनवर सामन्याचे लाईव्ह चित्रीकरण होणार म्हणून शाळांनी देखील पहाटेचे वर्ग ठेवले होते. माझ्या घरी नुकताच टीव्ही आला होता आणि तेंव्हा मला वाटतं, आजूबाजूच्या परिसरात टीव्ही फारसे नसल्याने, माझ्या घरात मित्रांची रीघ लागली होती. लॉइडने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. याच काळात आपल्या फिरकी गोलंदाजांनीं अपालाजगभर दबदबा निर्माण केला होता. याही मालिकेत त्याचे प्रत्यंतर मिळाले होते. *बेदी* आणि *चंद्रशेखर* ही नावे घरोघर कौतुकाने घेतली जात होती.
सलामीचा फलंदाज - फ्रेड्रिक्स तर कमालीच्या वेगाने धावा जमवत होता. अर्थात हळूहळू बेदीने आपली जादू दाखवायला सुरवात केली आणि पहिले काही बळी मिळवले. अशाच वेळी लॉईड मैदानावर अवतरला!! ६ फुटापेक्षा जास्त उंची,शरीराने अत्यंत काटक, चालताना पाठीला किंचित बाक देऊन चालायची सवय. तोपर्यंत लॉईडने आपले नाणे खणखणीत वाजवले असल्याने, एकूणच मैदानावर त्याचे अस्तित्व जाणवत होते. सुरवात हळू केली.मला वाटतं स्वतः:च्या ७,८ धावा झाल्या असताना, बेदीने स्वतःच्या गोलंदाजीवर लॉइडचा झेल सोडला!! लॉइडचा झेल सोडणे म्हणजे काय असते,याचे प्रत्यंतर पुढे ४,५ तास बघायला मिळाले. निर्दय कत्तल म्हणजे काय याचा वस्तुपाठ होता. भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा करून लॉइडने २४२ धावांची खेळी सजवली. आम्ही मित्र तर केवळ नाईलाज म्हणून ते *झोडपणे* बघत होतो. लॉइडने एकहाती सामना आपल्या ताब्यात घेतला. इतके दिवस या फलंदाजांचा *महिमा* फक्त ऐकून होतो, वर्तमानपत्रात वाचीत होतो पण आक्रमक खेळी कशी असते, याचे रोकडे उदाहरण, त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर बघायला मिळाले. एकाही गोलंदाजाला दया दाखवली नव्हती. अर्थात हा सामना आणि मालिका, वेस्टइंडीजने खिशात टाकली. लॉईडची ही खेळी आजही माझ्या मनात ताजी आहे.
लॉइड तेंव्हाही आणि नंतरही वेस्टइंडीज संघाचा अविभाज्य भाग होता. आपण रिचर्ड्सचे अफाट कौतुक करतो आणि ते योग्यच आहे. परंतु एक मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे. सलामीला पूर्वी फ्रेड्रिक्स-ग्रीनिज आणि खाली कालिचरण/गोम्स व लॉइड अशी खंदी फळी असल्याने, रिचर्ड्सला मोकळे रान मिळत होते. असे कितीतरी सामने दाखवता येतील, जिथे रिचर्ड्स अपयशी झाला आणि इतरांनी फलंदाजी सावरून घेतली. अर्थात प्रचंड वेगवान ताकदीचा गोलंदाजीचा ताफा तेंव्हा कायम मदतीला होता, हे आणखी त्या संघाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. परंतु लॉइड हा कायम वेस्टइंडीज संघाचा आधारस्तंभ होता, हे मान्यच करायला लागेल. भारतीय फिरकी संघाची जवळपास दहशत पसरलेली असताना, लॉइड संघात आहे, ही भावना,या संघाला तारून न्यायची.
हातात प्रचंड वजनाची बॅट, आणि कुठलीही गोलंदाजी फोडून काढण्याचा आत्मविश्वास. तो खेळपट्टीवर आहे, याचेच दडपण जगातील यच्चयावत गोलंदाजांना यायचे. सामना एकहाती फिरवून द्यायची ताकद मनगटात होती. लॉइड नुसताच फलंदाज नव्हता, वेस्टइंडीज संघ म्हणजे छोट्या देशांचा समुच्चय, त्यांना लॉइडने शिस्त लावली, संघ *घडवला*!! बरेचजण म्हणतात, त्या संघात सगळेच गुणवंत खेळाडू होते, हा आरोप मान्य पण त्यांची गुणवत्ता हेरून, त्यांना संघात स्थिर करून घेण्याचे काम, एक कर्णधार म्हणून लॉईडला श्रेय द्यायला लागेल.
लॉइड नुसताच फलंदाज नव्हता, कुशल संघटक नव्हता तर, विशेषतः *कव्हर* किंवा *मिड ऑफ* इथला क्षेत्ररक्षणाचा वाघ होता, पुढे वयोमानानुसार तो स्लिपमध्ये उभा राहायला लागला आणू तिथेही त्याने अविश्वसनीय वाटावेत,असे झेल पकडले. तेंव्हा स्लिपमध्ये लॉइड, रिचर्ड्स आणि ग्रीनिज सारखे अफलातून क्षेत्ररक्षक असायचे.परिणामी, वेस्टइंडीजच्या वेगवान गोलंदाजांना खात्री असायची, बॅटीची कड घेतली की ती यांच्या हातात विसावणार. तशी १४५/१५० या वेगाने येणारा चेंडू , जेंव्हा बॅटीची कड घेतो, तेंव्हा झेलात रूपांतर होताना, त्याचा वेग आणखी भयानक असतो आणि तिथे *निमिष* हे काळाचे मापन देखील मोठे वाटते. बऱ्याचजणांना असे वाटते, स्लिप मधील झेल पकडणे, फार सोपे असते!! त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. क्षेत्ररक्षण करताना देखील लॉइड पाठीला किंचित बाक देऊन उभा राहायचा.
डोळ्यावर कायम चष्मा असल्याने, त्याची दाहकता सुरवातीला जाणवायची नाही पण मैदानावर नुसता उभा राहिला तरी प्रतिस्पर्धी दबकून असायचे. अशी एक खेळी मला इथे आठवते. १९७९/८० सालातली वेस्टइंडीज/ऑस्ट्रेलिया ही जगप्रसिद्ध मालिका. फलंदाज म्हणून रिचर्ड्सने गाजवली असली तरी तिसऱ्या सामन्यात, एकेवेळी एकदम संघाचे ४ बळी १५० धावांच्या आतच गमावले होते आणि मैदानावर लॉइड अवतरला. *लिली*आणि *पास्को* आणि *हॉग* मैदानावर आग ओकत होते. अशावेळी बहुदा लॉईडला स्फुरण चढले असावे. मालिकेत वेस्टइंडीजने आघाडी घेतली होती. ३ सामान्यांच्या मालिकेतील हा ऍडलेड इथला शेवटचा सामना होता. सुरवातीला लॉइड शांतपणे खेळत होता आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन स्थिरावत होता. अर्धा तास असावाआणि लॉइडने भात्यातील अस्त्रे काढायला सुरवात केली. लॉइड म्हणजे काय चीज होता, याचे त्याच्या १२८ धावांच्या खेळीत पुरेपूर प्रत्यंतर येते. किंचित पुढे वाकून उभा राहायचा स्टान्स, बॅट काहीशी हवेत ठेवायची आणि अखेरच्या क्षणी अत्यंत बेदरकार पद्धतीने गोलंदाजाला हाताळायचे!! या खेळीतले दोन फटके केवळ अविश्वसनीय होते. १) हॉगने मिडल स्टॅम्पवर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आणि लॉइडने क्षणार्धात स्क्वेयर लेगला हूक मारला - चेंडू मैदानाच्या बाहेर!! अरेरावी म्हणतात ती अशी. २) लिलीने ऑफ स्टम्पच्या बाहेर पण छातीच्या उंचीएवढ्या उसळीचा चेंडू टाकला आणि लॉइडने पाय टाकून, कव्हर ड्राइव्ह मारला. हे कसे शक्य आहे? चेंडू जवळपास पाचव्या किंवा सहाव्या स्टॅम्पइतका बाहेर होता पण तरीही कुठल्यातरी अतर्क्य उर्मीने लॉइडने हा फटका खेळला. चेंडू निमिषार्धात सीमापार. एकाही क्षेत्ररक्षकाला साधे हलायची पण संधी मिळाली नाही. असे खेळायचे मनात आले आणि ते खेळून दाखवले, हेच अफलातून. संघाला ३०० पार नेले आणि इनिंग संपली.
याच खेळीने ऑस्ट्रेलियाचे मानसिक खच्चीकरण झाले आणि वेस्टइंडीजने, प्रथमच ऑस्ट्रेलियात जाऊन,तिथे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण पराभव केला. निव्वळ अविश्वसनीय अशी खेळी होती, समालोचक रिची बेनो यांनी मुक्तकंठाने लॉईडच्या या खेळीचे वर्णन केले आहे.
अशीच अफलातून खेळी त्याने पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केली.लॉइड आला तेंव्हा संघाची परिस्थिती नाजुक होती. साथीला रोहन कन्हायला घेतले आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान चौकडीवर, ना भूतो ना भविष्यती असा हल्ला चढवला आणि फक्त ८५ चेंडूत १०२ धावांची खेळी सजवली होती.ऑस्ट्रेलियन संघ हतबल झाला होता. वेस्टइंडीजने पहिला विश्वचषक जिंकला,हे सांगायलाच नको. आजही ती खेळी अजरामर म्हणून मान्यता पावली आहे.
या खेळाडूने निरनिराळ्या प्रकृतीच्या, स्वभावाच्या खेळाडूंना एकत्र आणले आणि त्यांच्याकडून ऐतिहासिक कामगिरी घडवून घेतली. या सगळ्या दैवी प्रतिभेच्या खेळाडूंना एकत्र बांधून ठेवणे तसे सोपे काम नव्हतेच पण आपल्या अत्युच्च दर्जाच्या खेळाने,त्यांच्या समोर आदर्श निर्माण केला.. या बाबत विव रिचर्ड्सने आपल्या पुस्तकात लॉईडचे मुक्त कंठाने कौतुक केले आहे आणि त्याला श्रेय प्रदान केले आहे. लॉइड संघाचा खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होता. आजच्या वेस्टइंडीज संघाच्या केविलवाण्या परिस्थितीकडे बघून, लॉईडच्या संघाचा अजिबात अंदाज येणार नाही. लॉइड त्याबाबतीत अजोड खेळाडू होता.
Sunday, 12 February 2023
कविता - एक समृद्ध जगणे
एकूणच साहित्य, साहित्य व्यवहार, याकडे जरा डोळसपणे बघितले तर एक बाब लगेच ध्यानात येऊ शकते. साहित्य आपल्या आयुष्यावर बरावाईट परिणाम कळत. नकळत परिणाम घडवत असते आणि परिणामी, व्यक्तित्वावर प्रभाव टाकत असते. अर्थात हा प्रभाव नकारात्मक असू शकतो किंवा सकारात्मक असू शकतो. त्यातून आपल्यावर झालेल्या संस्कारावर देखील साहित्याचा घडणारा परिणाम घडू शकतो. खरंतर थोड्या त्रयस्थपणे विचार केल्यास, साहित्य म्हणजे तरी काय? कुणालातरी कुठलातरी अनुभव येतो, त्याच्या मनावर त्याचा संस्कार होतो आणि त्यातून जाणवणाऱ्या अनुभूतीचा शाब्दिक आविष्कार, हा साहित्याच्या रूपाने वाचकांसमोर येतो. अर्थात जो अनुभव लेखकाला आलेला असतो, त्याचे अचूक शब्दांकन एका मर्यादेपर्यंत नेमके करता येते. अनुभवाचा संपृक्त परिणाम कितीही मनावर ठसला असला तरी शब्दरूपात मांडताना, कुठे ना कुठेतरी कळत/नकळत तडजोडीच्या स्वरूपात लिहिला जात असतो. लिहिणारा बरेचवेळा आव आणतो, अनुभवाचे नेमके शब्दरूप लिहिले गेले आहे पण ते १००% खरे नसते. बरेचवेळा अनुभव शब्दात मांडताना, मनात इतर असंख्य विचार तरळत असतात आणि लिहिताना खूप वेळा असे घडते, मनाशी योजलेले शब्द मनातच विरले जातात आणि लेखक एका धुंदीत आपले लेखन पूर्ण करतो. यात कुठेही फसवाफसवी नसते तर मानवी लेखन कौशल्याच्या मर्यादेची लखलखीत जाणीव असते. बरेच वेळा जेंव्हा लिहिण्याचा मजकूर पूर्ण होतो तेंव्हा त्यातील त्रुटी लक्षात येतात आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
अशा वेळी "अल्पाक्षरी" लेखन हे अनुभवाची अनुभूती देण्याच्या प्रक्रियेला मदत ठरू शकते. अल्पाक्षरी हे गद्य लेखन असू शकत, जसे की आलेला अनुभव अत्यंत थोडक्यात, कुठलाही शाब्दिक फापटपसारा न मांडता,गोळीबंद स्वरूपात लिहिल्यावर बऱ्यापैकी समाधान देऊन जाते. असे असले तरी गाड्या लेखनाला बऱ्याच मर्यादा पडतात आणि हे कुठलाही सुजाण माणूस नाकारणे कठीण. त्यामुळेच बहुदा अल्पाक्षरी माध्यमातील "कविता", गद्य लेखनापेक्षा अधिक सृजनक्षम, अधिक क्रियाशील आणि अनुभवाची दाहकता किंवा एकूणच सगळाच अनुभव ग्रथित करण्याच्या प्रक्रियेत अधिक अंतर्मुख होते.
कविता कशी असावी? खरंतर कविता संपूर्णपणे आकळून घेण्याचा आग्रह अनाकलनीय आहे. बरेचवेळा गद्य लेखन देखील या पातळीवर वावरते परंतु गद्य लेखनात पसरटपणा येण्याचा संभव अधिक. कवितेच्या बाबतीत हा धोका टाळता येण्याची शक्यता बरीच असते. एकतर कविता ही, कुठलाही अनुभव थोडक्यात मांडत असते, त्यामुळे शब्दांचा भरमार नसतो. जे काही मांडायचे आहे, ते अत्यंत मोजक्या शब्दात आणि प्रभावीपणे, मांडणे, अत्यावश्यक असते. काही ओळींतच अनुभवाची संगती लावायची असते.अर्थात अल्पाक्षरी लिहिताना, अचूकता येणे गरजेचे असते परंतु अनुभवाची सांगता करताना, प्रतिमा, उत्प्रेक्षा वगैरे शाब्दिक अलंकाराची जरुरी भासते आणि बहुदा इथेच कविता या माध्यमाचे स्वरूप वेगळे होते. याचा अर्थ असा नव्हे, हेच अलंकार गद्य लेखनात उपयोगी नसतात.
आत्ममग्नता जितकी कवितेतून व्यक्त होते, तशी गद्य लेखनातून अपवाद स्वरूपात शक्य होते. अर्थात हे विधान तसे ढोबळ म्हणायला हवे कारण प्रत्येक कविता आत्ममग्न असते, असे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे होय. परंतु अनुभूतीची तरलता,दाहकता जितकी कवितेद्वारे प्रकट होऊन शकते, तितकी गद्य लेखनातून फार क्वचित अनुभवायला मिळते. मी सुरवातीला जे विधान केले, त्याचेच फलस्वरूप इथे पुन्हा मांडता येईल. साहित्याचा व्यक्तित्वावर घडणारा अमीट ठसा हा कवितेद्वारे घडण्याची शक्यता अधिक असते.
मुळात. कविता कशी असावी याबाबत काही ठोस नियम नाहीत. प्रत्येक कालखंडात कवितेचे स्वरूप बदलत असते आणि आपल्या संस्कृतीवर गाढा परिणाम घडवत असते. आता इथे एक प्रश्न उद्भवू शकतो. कवितेमुळे संस्कृती घडते की बदलती संस्कृती कवितेला वेगळा आकार प्राप्त करून देते? कविता हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, हे तर खरेच आहे.
कविता समजून घेणे, यात साहित्यिक आणि सुजाण असा आनंद आहे, हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. अन्यथा कविता वाचून कोरडे राहणारे वाचक जागोजागी भेटत असतात. आपण जे साहित्य वाचतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर होतच असतो आणि हे नाकारणे अशक्य. गद्य लेखन समजून घ्यायला तसे फारसे अवघड नसते परंतु कवितेबाबत वाचकाला, थोडेफार समृद्ध असणे आवश्यक असते. अन्यथा कवितेतील आशय, त्यातील रचना कौशल्याची गंमत आणि एकूणच अखेरचे जे संचित मांडलेले असते, त्याचा आनंद घेणे अवघड जाणार. बरेचवेळा, केवळ आपल्याकडेच नव्हे तर इतरत्र देखील, कवितेचा घाट, याला प्रमाणाबाहेर महत्व दिले जाते. कविता कशी असावी? कवीच्या मगदुरावर हे अवलंबून असते. आपल्या मराठी कवितेचा विचार केल्यास, मराठी कवितेला शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि कालानुरूप त्यात भरपूर मन्वंतर घडले आहे. परिणामी कालची कविता आज तितकीच प्रभावी वाटले का? आपली आवड शिळी होऊ शकते परंतु कविता ही कविताच असते आणि हे जर पक्केपणाने ध्यानात ठेवले पाहिजे. आपल्याकडे एकूणच एक फॅशन झाली आहे, कवितेचे काळानुरूप वर्गीकरण करून, त्या दृष्टीने आवड निर्माण करायची. परिणामी आपण जुन्या कवितांवर अन्याय करीत असतो. आपल्या वयानुसार आपली आवड बदलत असते परंतु संस्कारक्षम वयात वाचलेल्या कवितांचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात.
दुसरा मुद्दा असा येतो, कवितेची आवड विषयानुसार ठरवणे होय. काही विषय कालातीत असतात तर काहींना क्षणभंगुरत्वाचा शाप असतो. कालातीत विषय हे नेहमीच आपल्याला प्रत्येकवेळी वेगवेगळी अनुभूती देतात. आता ही अनुभूती स्वीकारण्याची शक्ती व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असणारच परंतु मांडलेला अनुभव आपल्या मनात किती खोलवर रुतून बसतो, त्यानुसार आपली आवड ठरवणे योग्य नव्हे का? त्यादृष्टीने विशेषतः मराठी कवितेत " सामाजिक बांधिलकी" या शब्दांनी नको तितका घोळ निर्माण करून ठेवला. कविता आत्मनिष्ठ असते आणि लिहिणारा कवी हा, याच समाजातून आलेला असतो. तेंव्हा समाजातील सुखदुःखाचा तो साक्षीदार असतो आणि त्यातूनच तो अनुभव कवितेत मांडत असतो. तेंव्हा त्यासाठी सामाजिक बांधिलकीचे बंधन कशासाठी?
एक नक्की, कविता समजून घेण्यासाठी, सातत्याने वाचन करीत, स्वतःला समृद्ध करायला हवे. कवितेतील प्रत्येक प्रतिमेचं अर्थ आपल्याला लागेलच हा आग्रह वृथा आहे पण जरी आशय तात्काळ ध्यानात आला नाही ती कविता आपल्यावर गाढा परिणाम घडवत असतेच असते. ज्याप्रमाणे सततचे वाचन आपले आयुष्य समृद्ध करत असते, त्याप्रमाणेच उत्तम कविता आपल्या विचारांवर आणि तद्नुषंगाने वागण्यावर परिणाम करीत असते आणि एकूणच आपले जगणे समृद्ध करीत असते.
अर्थात आपल्याला आयुष्य समृद्ध करायलाच हवे का? या प्रश्नावर मात्र सगळेच विचार गोठले जातात.
Subscribe to:
Posts (Atom)