Saturday, 29 January 2022

प्रतिभा!!

आपल्याकडे नेहमी *प्रतिभा* हा भारदस्त शब्द वापरला जातो आणि ज्याच्या समोर, आपण बोलताना वापरतो, तो ऐकणारा लगेच गप्प बसतो!! याचे महत्वाचे कारण म्हणजे *प्रतिभा* म्हणजे काय या प्रश्नाचे अज्ञान!! आणि जिथे प्रश्नाभोवती अज्ञान आहे, तिथे कुठल्या उत्तराचा पडताळा घ्यायचा? कुणी जरा हुशारी दाखवली की आपण त्याला *प्रतिभा* शब्दाचे लेबल चिकटवतो. लेबल चिकटवण्यात, एक फायदा असा असतो, पुढे सगळे विचार खुंटतात. या शब्दाभोवती आपणच एक *वलय* निर्माण करून ठेवले आहे, जे आपली विचारशक्ती कुंठित करून टाकते. जिथे विचार थांबतात, तिथे *देवाची भक्ती* सुरु होतो आणि मग पुढे सगळं *सोहळा* सुरु होतो. किंबहुना, या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणजेच *प्रतिभा* हा शब्द होय. इतक्या बेदरकारपणे आपण इतक्या सुंदर शब्दाची वासलात लावून टाकली आहे. आपण विचार करायला का घाबरतो? ज्या समाजात विचार करायची प्रवृत्ती क्षीण असते, तिथे दुर्गती सुरु होते!! आपण आहोत आणि माणसाला विचार करण्याची दुर्लभ देणगी मिळालेली आहे, जी इतर सजीव प्राण्यात फारशी आढळत नाही आणि दुर्दैवाने, आपण त्या देणगीचा अव्हेर करतो, आणि याची आपल्याला अजिबात जाणीव नसते!! आपण शाळेत अभ्यास करतो करतो, पुढे कॉलेजमध्ये याचीच री ओढत असतो, म्हणजेच अप्रत्यक्षपणे आपण *विचार* करीत असतो. इतर प्राणीमात्रात *अभ्यास* करणे, ही प्रवृत्ती फारशी आढळत नाही आणि म्हणूनच *जीवो जीवस्य जीवनम* हा जंगल संस्कृतीचा नियम होतो. माणसात अपवाद परिस्थितीत असे घडते परंतु सर्वसामान्यपणे आपण अभ्यास करतो, पर्यायाने विचार करायला शिकतो. आपण वाचन तर बरेच करत असतो. वाचताना सगळेच काही आपल्या लक्षात रहात नसते परंतु जे वाचले आहे, त्याचा *मतितार्थ* कुठंतरी आपल्या *अबोध* मनात टिकून राहतो. वाचताना ते काळात नाही परंतु एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना, अवचितपणे त्या वाचनाचा संदर्भ आपल्या *बाह्य मनात* जागृत होतो आणि हे जागृत होणे, हे *विचार* या शब्दाचेच दुसरे स्वरूप होय. खरी परीक्षा असते ती, आपण जागृतावस्थेत विचार करण्याची वृत्ती अंगी बाणवून घेतानाची. तिथे तुमच्या मनाचा पीळ किती आणि कसा आहे, हे तपासता येते. आपण कितीही नाकारले तरी *विचार* करणे टाळू शकत नाही आणि जे टाळू शकत नाही, त्याचा जाणीवपूर्वक स्वीकार करण्यात काय चूक आहे !! प्रश्न विचारणे, ही एक सवय असते अंडी त्यातूनच आपल्याला अनेक बाबींचे सजग भान येऊ शकते. ज्या भगवदगीतेचा आपण सारखा आधार घेतो, त्यात *प्रश्नेन परिप्रश्नेन* हा विचार आचरणात आणायला आपण धजावत नाही आणि हा खरा विरोधाभास आहे. एक प्रश्न इतर अनेक प्रश्नांना जन्म देतो आणि या शक्यतेला आपण नाकारतो. आणि तरीही आपण *सत्य सत्य* म्हणून धोशा लावत बसतो. सत्याचे थोडे स्वरूप हे नेहमीच विचाराधीन असते. संपूर्ण सत्य, हे अपवाद स्वरूपात आकलनात येते. अर्थात तो विषय वेगळा. आपण विचार करीत राहिलो म्हणजे आपले आपल्यालाच कळून चुकते, आपण किती *कमी पडतो*!! एकदा त्याची रखरखीत जाणीव झाली म्हणजे मग पुढील प्रवासाचा मार्ग स्पष्ट होतो. आता जरा खालच्या पायरीवर उतरून मांडायचे झाल्यास, मी गेले १० वर्षे अथकपणे लिहीत आहे - अर्थात त्याला बहर आले तो गेल्या ५ वर्षात. प्रत्येकवेळी काही लिहून झाले की मी एकतर छापायला पाठवतो किंवा तुमच्या सारख्या मोजक्या मित्रांना पाठवतो. काही वेळा कौतुक होते तर काही वेळा टीका देखील होते, जी मला अत्यावश्यक वाटते. सुदैवाने, आज जेंव्हा पूर्वीच्या लेखांकडे मी बघतो तेंव्हा त्यात मला त्रुटी आढळतात, कमतरता भासते आणि आज मी आणखी *बांधीव* तसेच *वेगळ्या शैलीने* लिहिला असता, असे फार वाटते. मी, माझ्या लेखनाकडे त्रयस्थ दृष्टीने बघू शकतो आणि तेंव्हा वाचणारा अनिल हा परखड समीक्षक असतो. आता ही समीक्षा म्हणजे तरी काय असते? जे विचार करून मी लिहिती, त्याची चिकित्सा होय. म्हणजेच केलेल्या विचारांचे, लेखाद्वारे जे फलस्वरूप निर्माण झाले, त्यातील *टाकाऊ*, क्वचित *नासके* किती? याचा पुन्हा विचार करणे होय!!कौतुक करताना, अर्थात माझी भलावण होत असते आणि मी त्या क्षणी नक्कीच खुश असतो. पुढे विचार येतो, या कौतुकासाठी मी लिहिले का? हा लेख इतक्या कौतुकाला पात्र आहे का? असे बरेच प्रश्न मनात येतात जे दुसऱ्या अर्थाने *विचार(च)* असतात.पुढे मग समीक्षा सुरु होते आणि लेखातील त्रुटी जाणवतात. आज मला असेच वाटते, (जवळपास ५०० लेख लिहून झालेत) काही लेखांनी मला क्षणिक का होईना समाधान दिले पण एकाही लेखाने मला *संपूर्ण समाधान* मिळवून दिलेले नाही!! ही वस्तुस्थिती आहे. कदाचित असे म्हणता येईल, यातून लेखन प्रक्रिया सुधारू शकते. अगदी मान्य. काही जणांनी तर मला *प्रतिभावान* अशी उपाधी देखील दिली आणि ती जेंव्हा दिली, तेंव्हा मी सावध झालो. *प्रतिभावंत!!* बापरे, इतका *अवजड* शब्द माझ्या लेखनाबाबत अजिबात योग्य नाही. सुदैवाने मी अनेक अलौकिक मराठी आणि इंग्रजी लेखक वाचले असल्यामुळे, माझे पाय कायम जमिनीवर राहिले. एकतर *प्रतिभा* ही नेहमीच क्षणकाल दर्शन देणारी असते आणि त्यातूनच काहीतरी असामान्य हातून घडते. ज्या निर्मितीचे अचूक विश्लेषण अशक्य असते. मी जेंव्हा प्रथम Graham Greene या लेखकाची *Power and Glory* ही कादंबरी वाचली तेंव्हा मला *प्रतिभा* या शब्दाची किंचित्काल जाणीव झाली. पुढे, Dostovsky, Arthur Koestler, Hemingway इत्यादी लेखक वाचनात आले. आता याच्या अनेक कादंबऱ्या मला आजही असामान्य वाटतात परंतु माझी खात्री आहे, यांच्या आयुष्यात प्रतिभेचे स्फुल्लिंग क्षणभर चमकले असणार आणि त्यातूनच पुढील लेखन घडले असणार. आपल्याकडील *ज्ञानेश्वर* किंवा *तुकाराम* याच्या रचनेत या शब्दाभोवती येऊ शकतात. मघाशी मी *स्फुल्लिंग* जो शब्द योजला, तो जाणीवपूर्वक(च) योजला कारण अगदी हे वरील अस्मानी लेखक घेतले तरी त्यांच्या सगळ्याच रचना *अपूर्व* नाहीत. त्यांच्याही लेखनात *चिखल* वाचायला मिळतो परंतु जेंव्हा त्यांना या स्फुल्लिंगाची जाणीव झाली, त्या कशाचे औरत स्वरूप, ज्या लेखनात सापडले, ते लेखन *अक्षय चिरंजीव* झाले. म्हणूनच मला नेहमी म्हणावेसे वाटते - *प्रतिभा* ही तात्कालिक असते आणि *ढोर मेहनत* कालातीत असते. *प्रतिभावंत* या शब्दाचा इतकाच मर्यादित अर्थ आहे

No comments:

Post a Comment