Monday, 17 January 2022
कृतार्थता (?)
मला वाटतं, आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात काहींना काही तरी करत असतो, त्यासाठी धडपडत असतो. मग ते धडपडणे चरितार्थासाठी असेल किंवा काही आवडत्या छंदांसाठी देखील असू शकते. धडपड ही प्रासंगिक असू शकते किंवा अथक असू शकते. अथक धडपड ही त्या विषयावर अवलंबून असते, म्हणजेच जगण्यासाठीची धडपड ही अथक असते. त्याला कुठे अंत असावा? या प्रश्नाचे उत्तर वैय्यक्तिक असते. किंबहुना धडपडीला अंत असतो का? असा सार्वकालिक प्रश्न देखील या संदर्भात विचारात घेतला जाऊ शकतो. आपण, आपल्या गरजा, आपल्या भोवतालचे सामाजिक तसेच सांस्कृतिक वातावरण आणि त्या घुसळीतून आपल्यावर होणारे संस्कार, इत्यादी असंख्य मुद्दे या संदर्भात विचारात घ्यावे लागतील. *जगण्यासाठीचा चरितार्थ* ही संकल्पना फार फसवी आहे, पाण्याच्या वेगवान भोवऱ्यात सापडून गटांगळ्या खायला लावणारी असोशी आहे. याचे मुख्य कारण, आपले जगणे, हाच मुळात अथक शोध असतो आणि त्यामुळे चरितार्थ या कल्पनेला कुठलीही मर्यादा रहात नाही. अगदी झोपडपट्टीत अत्यंत हलाखीत जगणारा माणूस असो किंवा अब्जाधीश असलेली व्यक्ती असो, चरितार्थाची धडपड सुटलेली नाही, किंबहुना ते अटळ प्राक्तन असते. आपण आणखी एक उदाहरण बघू,कलाकार किंवा खेळाडू आपल्याला अतिशय सुखद असा अनुभव देतात तेंव्हा त्या अनुभव देण्याच्या क्षणी त्या व्यक्ती देखील कुठेतरी अंतर्मुख होत असणार कारण हा जो क्षण आपण दिला आहे, याच धडपडीसाठी सगळा अट्टाहास केला होता का? वास्तविक हा कृतार्थतेचा क्षण असतो परंतु याच क्षणी त्या व्यक्तीला पुढील नवीन क्षितिजे खुणावत असतात. याच अंधुक पायवाटेतून त्यांना ठेचकाळत मार्गक्रमणा करीत पुढील क्षण शोधायची धडपड करायची असते. कला किंवा खेळाची अंगे याच प्रकारे विस्तारित होत जातात. मी वर जो शब्द वापरला, जगण्यासाठीचा चरितार्थ, हा शब्द सगळ्यांनाच लागू होतो. इथे चरितार्थ म्हणजे फक्त आर्थिक व्यवहार, इतकाच मर्यादित अर्थ नाही. कलाकारांनी केलेला अथक रियाझ किंवा खेळाडूने रक्त आटवून घेतलेली मेहनत, असे सगळे काही चरितार्थ या शब्दात सामावलेले आहे कारण त्याशिवाय दुसरी गती संभवत नाही. आपण जेंव्हा जगायला सुरवात केली तेंव्हा काही एक लक्ष डोळ्यासमोर ठेवलेले असते. त्या लक्षपूर्तीसाठीची धडपड, हेच चरितार्थ या शब्दाचे दुसरे स्वरूप होय. बऱ्याच परिश्रमानंतर ते लक्ष आवाक्यात आल्याचे आपल्याच ध्यानात येते परंतु त्याच क्षणी आपल्या नवीन शिखरे खुणावायला लागतात आणि आपण त्या क्षणी थोडे भ्रांतचित्त होतो. समोर मार्ग दिसत आहे, मार्गातील खाचखळगे एव्हाना ध्यानात आलेले असतात तरीही मनाला भुरळ पडलेली असते!! याचाच वेगळा अर्थ, आपल्याला जे *साफल्य* मिळाले असे वाटत होते, ते केवळ *मृगजळ* होते का?? मृगजळ म्हणणे कठीण आहे कारण ते साफल्य अस्तित्वात आलेले असते परंतु आपली मानसिक अवस्था थोडीशी दोलायमान अवस्थेला आलेली असते. नवीन खुणावणारी शिखरे आपल्याला अस्वस्थ करीत असतात, पुढे मार्गक्रमणा करायला प्रवृत्त करीत असतात. हे जे खुणावणारे असते, त्यालाच मी मघाशी मृगजळ म्हणून संबोधले. अशावेळेस प्रश्न पडतो, आयुष्यात *कृतार्थता* कधीतरी लाभणारी असते का? आपल्या संस्कृतीत *वानप्रस्थाश्रम* ही जीवनाची अंतिम वाटचाल मानली गेली आहे. परंतु, असे धरून चालू आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला (खरे तर आधुनिक जगात याला किती स्थान आहे?) पण त्या अवस्थेत देखील जगण्याची धडपड चालूच असते. आपण इतकी वर्ष जपून ठेवलेले छंद आणखी वाढवायचा ध्यास लागलेला असतो. आपण ठरवतो, आता वयाची साठी उलटली (आपली पिढी आता याच वयात शिरली आहे म्हणा) तेंव्हा आता स्वान्तसुखाय वाचन करायचे, विचारमंथन मनात घडवायचे आणि संध्याकाळी मंद आवाजात संगीत ऐकायचे. या सुखाच्या आपल्या परमोच्च अवस्था म्हणून स्वीकारतो पण प्रत्यक्षात या छंदाला कुठेही अंत सातो, हे देखिल आपल्याला जाणवायला लागते आणि मग या धबडग्यात स्वान्तसुखाय अवस्था आणि परमोच्च समाधान, या शब्दांना कुठेच *जागा* मिळत नाही.मग आयुष्याला कृतार्थता लाभली म्हणजे नक्की काय लाभले? अशी कृतार्थता अनुभवता येते का?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment