Thursday, 27 January 2022
ज्ञान????
आपल्याकडे कुणाही व्यक्ती काही निराळे केले, काही निराळे दाखवले की लगेच आपण त्याच्यावर *हुशार* हे लेबल चिकटवतो. त्या पुढील पायरी म्हणजे समजा नवीन विचार मांडला किंवा संपूर्णपणे नवीन अशी मांडणी केली मग ती कला, खेळ, विचार अशा कुठल्याही शाखेतील असेल, आपण लगेच त्या व्यक्तीला *प्रतिभावंत* संबोधायला लागतो. त्याही पलीकडे काही घडले की मग *ज्ञानवंत* शब्द अस्तित्वात आणतो!! मुळात *ज्ञान* म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नसताना, *ज्ञानवंत* म्हणणे म्हणजे आपल्याच अकलेचे आपल्या हातानी दिवाळे काढण्यासारखे आहे. परंतु अशी लेबले लावणारे बहुसंख्य असतात आणि बहुसंख्यांच्या समोर विवादी स्वर कायमचा मिटला जातो. जरा विचार केला तर हे असे किती हास्यास्पद आहे, याचा कुणीही विचार करत नाही. मेंढरांप्रमाणे घोळक्याने आरडाओरडा करायचा आणि एक नवे *देवघर* निर्माण करायचे!! हेच शतकानुशतके चालू आहे. वास्तविक पाहता, *प्रतिभावंत* व्यक्ती ही शतकातून एखादीच जन्माला येते किंवा येऊ शकते आणि आपल्याकडे पायलीला पासरीभर प्रतिभावंत सापडतात!! खरंतर निर्मितीच्या क्षणी प्रतिभेचा एखादा तरी क्षण लाभला तर धन्य वाटावे, असे त्या शब्दाचे अप्रूप असते आणि क्षण हाच शब्द योग्य आहे. मग त्याला *साक्षात्कार* असे नाव दिले तरी चालेल.
परंतु *साक्षात्कार* म्हटले की लगेच देव, धर्म इत्यादी बाबाजी समोर येतात आणि मुळातला हा अद्वितीय शब्द नासला जातो!! साक्षात्कार या शब्दातच क्षण या शब्दाचे अस्तित्व असताना, त्याची क्षणभंगुरता आपण विचारात घेत नाही आणि ज्याला कुणाला साक्षात्कार होतो, त्याला लगेच देवपदी नेऊन ठेवतो. एकदा का देवपदी ठेवले म्हणजे समाजाला तार्किक विचारांची गरजच भासत नाही आणि वेळ घालवायला नवीन साधन सापडते. अशी आपल्या समाजाची घडी आहे. मला आठवतोय, सुप्रसिद्ध लेखक आर्थर कोसलर याच्या आत्मचरित्रात लिहिलेला एक परिच्छेद. *या जगात खऱ्या अर्थाने प्रतिभावंत हे ५०,६० आहेत. ते कुणी कलावंत, खेळाडू किंवा शास्त्रज्ञ देखील नाहीत. त्यांचा या जगाशी लौकिकार्थाने आहि संबंध नाही परंतु त्या व्यक्ती एकांतात आपली "बेटे" करून स्वान्तसुखाय वावरत असतात. त्यांना ना कुठले वादळ घाबरवत नाही, ना त्यांना मृत्यूची भीती वाटत. कुठल्याच संकटाने हे हेलावू शकत नाहीत. तशी ती रूढार्थाने सामान्य माणसे असतात परंतु वेळ येते तेंव्हा "कसे जगायचे" हे दाखवून देतात!!* मला आजही असेच वाटते, आर्थर कोसलर हा अशाच निवडक व्यक्तींपैकी एक होता. एकेकाळी भांडवलशाहीचा कट्टर पुरस्कर्ता, पुढे हिटलरच्या काळात स्टालिनच्या रशियात जाऊन कम्युनिस्ट झाला आणि नंतर भ्रमनिरास झाल्यावर स्वतःच्या हाताने मृत्यूचा पत्ता शोधला. हे करताना, त्याची त्रयस्थ, तटस्थ वृत्ती कधीच लोप पावली नाही
अर्थात हे माझे वैय्यक्तिक मत आहे. इथे आणखी उदाहरणे शोधून प्रतिवाद होऊ शकतो. आपण आधी *माणूस* आहोत, आपणही *स्खलनशील* आहोत, आपल्याला इतरांप्रमाणे भावभावना आहेत, आपल्या देखील शारीरिक, मानसिक गरज असतात आणि आपण त्याची पूर्तता करण्याचा आयुष्यभर प्रयत्न करीत असतो. हे सगळे, ज्यांना आपण तथाकथित प्रतिभावंत म्हणतो, त्या सगळ्यांना लागू पडते परंतु आपण देवघरात स्थापना केल्यावर, त्यांना हे नियम लागू पडत नाहीत आणि दुर्दैवाने, हे आपणच ठरवत असतो आणि तशी त्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवत असतो.कधीतरी एक वेळ अशी येते, त्या तथाकथित प्रतिभावंताचा बुरखा फाटला जातो आणि मग लगोलग त्याला पायदळी तुडवण्याचे *सत्कार्य* देखील आपण लगोलग करतो. त्याला नाकारल्यावर आपण शहाणे होततो का? या प्रश्नाचे उत्तर आजतागायत *नाही* असेच दुर्दैवाने द्यावे लागते कारण लगेच आपण दुसऱ्या कुणा व्यक्तीची, त्या *ओक्याबोक्या* झालेल्या देवघरात प्रतिष्ठापना करायला मोकळे होतो आणि तशी करतो देखील. यामध्ये *विचार* करणे गरजेचे साठे, अशी गरज देखील उत्पन्न होत नसते.
*ज्ञान* हे कधीही क्षणिक नसते, या विधानावर बऱ्याच विचारवंतांचे एकमत आहे परंतु नक्की काय मिळवले म्हणजे ते *ज्ञान* म्हणून सिद्ध होईल? याचेच उत्तर अवघड आहे. आपण सगळेच जे काही जाणतो, ती निव्वळ *माहिती* असते. त्यात ज्ञानाचा कण देखील नसतो. आपण, आपल्याला जे आठवते, तेच सांगत असतो. मग ते वाचलेले असेल, अनुभवलेले असेल. वेगळ्या शब्दात आपण केवळ *Super Computers* असतो, प्रसंगानुरूप बदाबदा माहिती समोरच्या तोंडावर टाकत असतो. चिकणमातीचे ओलसर गोळे टपकावेत त्याप्रमाणे बऱ्याचवेळा आपल्या माहितीचे स्वरूप असते. त्याला आपण *ज्ञान* म्हणण्याचा मूर्खपणा करीत असतो. समोरचे श्रोते जेंव्हा बिनदिक्कतपणे तुमची माहिती मान्य करतात किंवा मुकाटपणे ऐकतात, तेंव्हा आपल्याला आणि समोरच्याला खुळचट *ज्ञान* प्राप्त झाल्याचा *साक्षात्कार* होतो, ज्याला कसलाच *आकार* नसतो!! *व्यक्तिपूजा* नामक भयाण रोग पसरायला सुरवात होते अंडी तार्किक विचार प्रवणता लोप पावते. कुणालाच याची क्षिती नसते कारण सगळेच मेंढरासारखे घोळक्याने एकत्र येतात आणि एकत्रित खड्ड्यात पडतात. खड्ड्यात पडल्याने तात्पुरत्या जखमा होतात, त्यावर मलमपट्टी केली जाते, ती तेव्हढ्यापुरती कारण पुन्हा घोळका करून जगायला आपण तयार असतो. म्हणजे झालेल्या अपघातातून आपल्याला शहाणपण येते, हा भ्रम आहे, हेच सिद्ध करून दाखवतो आणि अशा समाजात आपण *ज्ञानवंत* निओजतील अशी अत्यंत भाबडी आशा बाळगून असतो. ते जेंव्हा जमत नाही किंवा नजरेच्या टप्प्यात येत नाःई असे जाणवते तेंव्हा मग सारासार विचार बाजूला सरळ जातो आणि नवीन देवाची प्रतिष्ठापना होते, मेग पुन्हा नवीन आरत्या, नवीन जयघोष इत्यादी सुरु होते. या सगळ्या कृतीत *ज्ञान* कणभर देखील नसते, किंबहुना बहुसंख्यांना त्याची जरुरी उरलेली नसते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment