Sunday, 30 January 2022
महामृत्युंजय जप!!
काल परवाचीच बातमी. बहुदा *वाराणसी - काशी* स्थळ असावे, नक्की आठवत नाही परंतु आवाहन असे होते, *लताबाई अत्यवस्थ आहेत म्हणून "महामृत्युंजय" जप करावा जेणेकरून बाईंना पुन्हा नव्याने आयुष्य लाभेल!!* हे वाचल्यावर हसावे की रडावे, हेच कळेना. बाईंचे वय आता ९२ आहे. निसर्गक्रमाने शरीर आता थकायला आले आहे तेंव्हा आजची जी अवस्था आहे, ती आज नाही तर उद्या येणारच आहे. त्यात जगावेगळे काहीही नाही. तिटकाड्या पुजाऱ्यांनी आवाहन न करता, स्वतःपुरते केले तर समजण्यासारखे आहे. वैय्यक्तिक भावना आहे आणि त्याची कदर करणे योग्य. परंतु वैय्यक्तिक विश्वासाचे जाहीर स्वरूप कशासाठी? जर का या मंत्रांनी मृत्यू टळत असेल तर मग MBBS, MD, FRCS या पदव्या म्हणजे कागदाचे कपटे झाले!! माणसाला *अमरत्व* कधीच प्राप्त होणार नाही आणि हे वैश्विक शास्त्र आहे तरीही आपल्याकडे असे प्रकार चालतात.
इतके होते तर मग गेल्या काही वर्षात, *किशोरी आमोणकर*, *रविशंकर* ,*बिस्मिल्ला खान* किंवा आपले *भीमसेन* आणि *जसराज* निजधामाला गेले तेंव्हा का नाही असा जप केला? असे तर नव्हे, हे कलाकार लताबाईंपेक्षा खालच्या पातळीवरील होते!! बरे असे हि नव्हे, हे कलाकार अचानक गेले. ते मृत्युशय्येवर आहेत, याची जाणीव सगळ्या जगाला होती. लताबाईंची लोकप्रियता अफाट आहे, याबद्दल दुमत नाही आणि त्यांच्या आवाजाचे गारुड सर्वसामान्य लोकांवर आहे. हे देखील मान्य. मग, बिस्मिल्ला खान याची सनई देखील घराघरात पोहचली होती. खांसाहेब कुठला राग वाजवत आहेत? याचे उत्तर शोधायच्या भानगडीत फारसे कुणीही पडत नसायचे आणि त्यांच्या सुरांचे आकंठ रसपान होत असे. किशोरी आमोणकर आणि जसराज वगळता, बाकीचे तिघे भारतातील सर्वोच्च मानाचे - *भारतरत्न* पुरस्काराचे मानकरी होते.
जरा डोळसपणे विचार केला तर आपणच आपल्याला किती खुळचट करून टाकले आहे, याचा हा पुरावा आहे. काही वर्षांपूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावेळी महालक्ष्मी मंदिराने, त्याच्या प्रांगणात डायलिसिस मशिन्स ठेवली आहेत आणि भक्तांना त्याचा वापर करता यावा म्हणून subsidised दर ठेवले आहेत. अत्यंत रास्त आणि स्तुत्य उपक्रम. प्रश्नच नाही. परंतु जर का उलट्या बाजूने विचार केल्यास, असे करताना, आपण खुद्द गणपती, या देवावर अविश्वास दाखवत नाही का? हे देऊळ अत्यंत जागृत आणि नेहमी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, अशी जाहिरात केली जाते. मग या जाहिरातीचे काय महत्व? अर्थात मला फेसबुकवर प्रचंड शिव्या मिळाल्या, ज्या मी धरूनच चाललो होतो!! परंतु कुणालाही माझा मुद्दा संपूर्णपणे खोदून काढता आला नाही, हे देखील तितकेच सत्य होय.
जपजाप्य करावे, ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी करावे पण मग त्याची जाहिरात करू नये. जाहिरात केली की मग त्याची समीक्षा ही केलीच जाणार त्या सामोरे जायला लागणार. त्याला या भक्तांची तयारी नसते. *तुम्ही तुमच्या घरात काहीही करा, तुमचे घर आणि तिथे तुमचे स्वामित्व आहे* पण *आज मी घरात सत्यनारायणाची पूजा केली आणि प्रसादासाठी बरीच माणसे आली होती* असे जाहीर तरी करू नका. पण आपल्याकडे याचे भान राखले जात नाही. मग जरा जरी टीका झाली की लगेच टीका करणाऱ्याला *वाळीत* टाकले जाते किंवा त्याला शिव्याशाप झेलावे लागतात. माझे मुद्दे याच संदर्भात असतात. मी *नास्तिक* आहे पण मी त्याची जाहिरात करत हिंडत नाही. ज्यांना माझे नास्तिकत्व माहीत आहे, ते मला कधीच पूजा कर, जप म्हण, असले उपदेश करत नाहीत. उलट्या बाजूने, दुसऱ्याच्या घरात कुणी करत असेल तर मी देखील वावदूकपणे तोंड उघडणे,चूकच आहे आणि मी ते देखील अजिबात करत नाही.
माझे काही जवळचे मित्र *स्वामी मठात* जातात, एकेकाळी मी देखील जात होतो पण पुढे माझा भ्रमनिरास झाला आणि माझी मते नास्तिकत्वाकडे झुकली. मी त्याची कारणे देखील कुणाला सांगत नाही कारण मला त्याची गरजच वाटत नाही.
असो, या विषयावर लिहू तितके थोडे आहे. भारतात *भक्तीचा सोहळा* करणे, ही सामाजिक गरज आहे आणि ती शेकडो वर्षे चालू आहे. खरंतर जितके आपण शास्त्राच्या जवळ जात आहोत, तितके आपण अधिक *आस्तिक* बनत चाललो आहोत, हा खरा विरोधाभास आहे.
Saturday, 29 January 2022
प्रतिभा!!
आपल्याकडे नेहमी *प्रतिभा* हा भारदस्त शब्द वापरला जातो आणि ज्याच्या समोर, आपण बोलताना वापरतो, तो ऐकणारा लगेच गप्प बसतो!! याचे महत्वाचे कारण म्हणजे *प्रतिभा* म्हणजे काय या प्रश्नाचे अज्ञान!! आणि जिथे प्रश्नाभोवती अज्ञान आहे, तिथे कुठल्या उत्तराचा पडताळा घ्यायचा? कुणी जरा हुशारी दाखवली की आपण त्याला *प्रतिभा* शब्दाचे लेबल चिकटवतो. लेबल चिकटवण्यात, एक फायदा असा असतो, पुढे सगळे विचार खुंटतात. या शब्दाभोवती आपणच एक *वलय* निर्माण करून ठेवले आहे, जे आपली विचारशक्ती कुंठित करून टाकते. जिथे विचार थांबतात, तिथे *देवाची भक्ती* सुरु होतो आणि मग पुढे सगळं *सोहळा* सुरु होतो. किंबहुना, या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणजेच *प्रतिभा* हा शब्द होय. इतक्या बेदरकारपणे आपण इतक्या सुंदर शब्दाची वासलात लावून टाकली आहे.
आपण विचार करायला का घाबरतो? ज्या समाजात विचार करायची प्रवृत्ती क्षीण असते, तिथे दुर्गती सुरु होते!! आपण आहोत आणि माणसाला विचार करण्याची दुर्लभ देणगी मिळालेली आहे, जी इतर सजीव प्राण्यात फारशी आढळत नाही आणि दुर्दैवाने, आपण त्या देणगीचा अव्हेर करतो, आणि याची आपल्याला अजिबात जाणीव नसते!! आपण शाळेत अभ्यास करतो करतो, पुढे कॉलेजमध्ये याचीच री ओढत असतो, म्हणजेच अप्रत्यक्षपणे आपण *विचार* करीत असतो. इतर प्राणीमात्रात *अभ्यास* करणे, ही प्रवृत्ती फारशी आढळत नाही आणि म्हणूनच *जीवो जीवस्य जीवनम* हा जंगल संस्कृतीचा नियम होतो. माणसात अपवाद परिस्थितीत असे घडते परंतु सर्वसामान्यपणे आपण अभ्यास करतो, पर्यायाने विचार करायला शिकतो. आपण वाचन तर बरेच करत असतो. वाचताना सगळेच काही आपल्या लक्षात रहात नसते परंतु जे वाचले आहे, त्याचा *मतितार्थ* कुठंतरी आपल्या *अबोध* मनात टिकून राहतो. वाचताना ते काळात नाही परंतु एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना, अवचितपणे त्या वाचनाचा संदर्भ आपल्या *बाह्य मनात* जागृत होतो आणि हे जागृत होणे, हे *विचार* या शब्दाचेच दुसरे स्वरूप होय.
खरी परीक्षा असते ती, आपण जागृतावस्थेत विचार करण्याची वृत्ती अंगी बाणवून घेतानाची. तिथे तुमच्या मनाचा पीळ किती आणि कसा आहे, हे तपासता येते. आपण कितीही नाकारले तरी *विचार* करणे टाळू शकत नाही आणि जे टाळू शकत नाही, त्याचा जाणीवपूर्वक स्वीकार करण्यात काय चूक आहे !! प्रश्न विचारणे, ही एक सवय असते अंडी त्यातूनच आपल्याला अनेक बाबींचे सजग भान येऊ शकते. ज्या भगवदगीतेचा आपण सारखा आधार घेतो, त्यात *प्रश्नेन परिप्रश्नेन* हा विचार आचरणात आणायला आपण धजावत नाही आणि हा खरा विरोधाभास आहे. एक प्रश्न इतर अनेक प्रश्नांना जन्म देतो आणि या शक्यतेला आपण नाकारतो. आणि तरीही आपण *सत्य सत्य* म्हणून धोशा लावत बसतो. सत्याचे थोडे स्वरूप हे नेहमीच विचाराधीन असते. संपूर्ण सत्य, हे अपवाद स्वरूपात आकलनात येते. अर्थात तो विषय वेगळा.
आपण विचार करीत राहिलो म्हणजे आपले आपल्यालाच कळून चुकते, आपण किती *कमी पडतो*!! एकदा त्याची रखरखीत जाणीव झाली म्हणजे मग पुढील प्रवासाचा मार्ग स्पष्ट होतो. आता जरा खालच्या पायरीवर उतरून मांडायचे झाल्यास, मी गेले १० वर्षे अथकपणे लिहीत आहे - अर्थात त्याला बहर आले तो गेल्या ५ वर्षात. प्रत्येकवेळी काही लिहून झाले की मी एकतर छापायला पाठवतो किंवा तुमच्या सारख्या मोजक्या मित्रांना पाठवतो. काही वेळा कौतुक होते तर काही वेळा टीका देखील होते, जी मला अत्यावश्यक वाटते. सुदैवाने, आज जेंव्हा पूर्वीच्या लेखांकडे मी बघतो तेंव्हा त्यात मला त्रुटी आढळतात, कमतरता भासते आणि आज मी आणखी *बांधीव* तसेच *वेगळ्या शैलीने* लिहिला असता, असे फार वाटते. मी, माझ्या लेखनाकडे त्रयस्थ दृष्टीने बघू शकतो आणि तेंव्हा वाचणारा अनिल हा परखड समीक्षक असतो. आता ही समीक्षा म्हणजे तरी काय असते? जे विचार करून मी लिहिती, त्याची चिकित्सा होय. म्हणजेच केलेल्या विचारांचे, लेखाद्वारे जे फलस्वरूप निर्माण झाले, त्यातील *टाकाऊ*, क्वचित *नासके* किती? याचा पुन्हा विचार करणे होय!!कौतुक करताना, अर्थात माझी भलावण होत असते आणि मी त्या क्षणी नक्कीच खुश असतो. पुढे विचार येतो, या कौतुकासाठी मी लिहिले का? हा लेख इतक्या कौतुकाला पात्र आहे का? असे बरेच प्रश्न मनात येतात जे दुसऱ्या अर्थाने *विचार(च)* असतात.पुढे मग समीक्षा सुरु होते आणि लेखातील त्रुटी जाणवतात. आज मला असेच वाटते, (जवळपास ५०० लेख लिहून झालेत) काही लेखांनी मला क्षणिक का होईना समाधान दिले पण एकाही लेखाने मला *संपूर्ण समाधान* मिळवून दिलेले नाही!! ही वस्तुस्थिती आहे. कदाचित असे म्हणता येईल, यातून लेखन प्रक्रिया सुधारू शकते. अगदी मान्य.
काही जणांनी तर मला *प्रतिभावान* अशी उपाधी देखील दिली आणि ती जेंव्हा दिली, तेंव्हा मी सावध झालो. *प्रतिभावंत!!* बापरे, इतका *अवजड* शब्द माझ्या लेखनाबाबत अजिबात योग्य नाही. सुदैवाने मी अनेक अलौकिक मराठी आणि इंग्रजी लेखक वाचले असल्यामुळे, माझे पाय कायम जमिनीवर राहिले. एकतर *प्रतिभा* ही नेहमीच क्षणकाल दर्शन देणारी असते आणि त्यातूनच काहीतरी असामान्य हातून घडते. ज्या निर्मितीचे अचूक विश्लेषण अशक्य असते. मी जेंव्हा प्रथम Graham Greene या लेखकाची *Power and Glory* ही कादंबरी वाचली तेंव्हा मला *प्रतिभा* या शब्दाची किंचित्काल जाणीव झाली. पुढे, Dostovsky, Arthur Koestler, Hemingway इत्यादी लेखक वाचनात आले. आता याच्या अनेक कादंबऱ्या मला आजही असामान्य वाटतात परंतु माझी खात्री आहे, यांच्या आयुष्यात प्रतिभेचे स्फुल्लिंग क्षणभर चमकले असणार आणि त्यातूनच पुढील लेखन घडले असणार. आपल्याकडील *ज्ञानेश्वर* किंवा *तुकाराम* याच्या रचनेत या शब्दाभोवती येऊ शकतात. मघाशी मी *स्फुल्लिंग* जो शब्द योजला, तो जाणीवपूर्वक(च) योजला कारण अगदी हे वरील अस्मानी लेखक घेतले तरी त्यांच्या सगळ्याच रचना *अपूर्व* नाहीत. त्यांच्याही लेखनात *चिखल* वाचायला मिळतो परंतु जेंव्हा त्यांना या स्फुल्लिंगाची जाणीव झाली, त्या कशाचे औरत स्वरूप, ज्या लेखनात सापडले, ते लेखन *अक्षय चिरंजीव* झाले.
म्हणूनच मला नेहमी म्हणावेसे वाटते - *प्रतिभा* ही तात्कालिक असते आणि *ढोर मेहनत* कालातीत असते. *प्रतिभावंत* या शब्दाचा इतकाच मर्यादित अर्थ आहे
Friday, 28 January 2022
मैत्री!!
मनुष्यप्राणी ही नेहमी *कळप* करून राहणारी जमात आहे. काहीजण नेहमी बोलतात - मला एकांतवास प्रिय आहे आणि कळप करून राहणे माझ्या प्रकृतीत बसत नाही. इथे कळप म्हणजे लोंढा नव्हे तर नातेसंबंध देखील अनुस्यूत आहेत. मुळात नातेसंबंध ही मनुष्याची भावनिक गरज असते आणि म्हटले तर ती लादलेली गरज नसून मानसिक गरज असते मग पुढे या नातेसंबंधामध्ये अनेक दिशा निर्माण झाल्या, अनेक कंगोरे तयार झाले आणि एकूणच गुंतागुंत अधिक वाढत गेली. मुळात बघायला गेल्यास, २ व्यक्ती एकत्र भेटतात, त्यांच्या विचारांची देवाण घेवाण होते आणि नातेसंबंध तयार होतात. इथे नातेसंबंध २ टोकाचे असू शकतात - एकतर स्नेहबंध अन्यथा टोकाचे शत्रुत्व!! परंतु असे घडणे ही माणसाची भावनिक गरज असते.
इथे २ व्यक्ती म्हणजे २ दोन पुरुष, २ स्त्रिया, स्त्री/पुरुष इत्यादी. यामध्ये नव्याने तयार झालेले *गे* किंवा *लेस्बियन* संबंध देखील गृहीत धरलेले आहेत. अर्थात या शब्दांनी बावचळून जायचे कारण नाही कार या संबंधाने आता कायद्याचे संरक्षण मिळाले आहे आणि मुळात ही देखील मानसिक आणि शारीरिक गरज आहे, हे महत्वाचे. या दृष्टीने मला इंग्रजी भाषा भाग्यवान वाटते. या भाषेत *Friend* हा एकच शब्द रूढ आहे मग त्यात कुठलेही संबंध असू देत. खरंतर *मैत्री* हे नाते किती सुंदर असू शकते आणि ट्याटू अनेक जीवाभावाच्या गोष्टी घडत असतात पण तरीही या नात्याला काही मर्यादा या असतातच असे माझ्यासारख्याला नेहमी वाटते. म्हणजे एका बाजूने मैत्री हवी पण दुसऱ्या बाजूने माझ्या एकांतावर त्या नात्याचे आक्रमण होणार नाही, याची तजवीज करायची असते. असे हे दुहेरी पदराचे नाते असते.
मुळात आपली संस्कृती आजही *सोवळी* आहे. एखाद्या मुलीशी मैत्री आहे, हे आजही चोरटेपणाने वागवले जाते!! तरीही आपण खाजगीत, अमुक एक मुलगी माझी मैत्रीण आहे, अशी क्वचित बढाई मारण्याचा वावदूक प्रयत्न करतो. स्त्री/पुरुष यांत *सेक्स* हाच सर्वात मोठा अडसर असतो आणि त्यामुळे गप्पा मारायला बरीच बंधने पडतात. आपल्या संस्कृतीत *सेक्स* हा शब्द अति जपून वापरला जातो, जरी ती आपली *शारीरिक गरज* असली तरी. अर्थात पाश्चात्य लोकांमध्ये त्याबाबतीत फार *मोकळेपणा* (काही वेळा अति मोकळी वृत्ती देखील!!) असतो. अर्थात, त्याचे संपूर्ण समर्थन करणे अशक्य परंतु त्यांच्यात चोरटेपणा कमी असल्याने, गप्पांच्या विषयाला तोटा आणि बंधने नसतात. आपल्याकडे अजूनही आपल्या जवळच्या मैत्रिणीला *तू आज खूप सुंदर दिसतेस* हे म्हणायला, आपली जीभ धजावत नाही, कानकोंडेपणा जाणवतो. इतकी बंधने स्वीकारल्यावर मग विषयांचा तुटवडा जाणवणे क्रमप्राप्तच ठरते. पाश्चात्य मुलीची आई - *माझी मुलगी संतती नियमनाच्या गोळ्या खाते* हे बिनदिक्कतपणे कबूल करतात. पुन्हा एकदा, हे त्यांच्या संस्कृतीचे समर्थन नव्हे!! त्यांची समाजघडी अशा प्रकारची आहे, इतकेच. मी साऊथ आफ्रिकेत असताना, *Wendy Farrell* नावाची मुलगी (आता अर्थात वयाने प्रौढा झाली आहे) माझी मैत्रीण झाली होती (*होती* म्हणजे अजूनही आम्ही संपर्कात आहोत पण प्रत्यक्ष भेट दुरापास्त!!) आणि तिच्याकडून मला - स्त्री/पुरुष मैत्री कशी असावी, याचे *धडे* मिळाले आणि एकूणच *गोरा समाज* कसा असतो, याची अंतर्मुख करणारी माहिती देखील!! तिच्यावर मी एक दीर्घ लेख लिहिला असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे टाळतो. मुद्दा असा आहे, पाश्चात्य संस्कृतीचे कितीही *गोडवे* गायले तरी त्या समाजात डागाळलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि तिथे आपण दुर्लक्ष करतो.
मैत्रीत एल तत्व अवश्य पाळायला हवे - जखमेवरील खपली काढून पुन्हा रक्त भळभळत ठेवण्याचे कृत्य करू नये कारण ती *कृती* ही पुढे *विकृती* मध्ये सामावली जाते आणि ती आपली *संस्कृती* नव्हे. मैत्री जिवलग असावी, प्रश्नच नाही परंतु तिच्या मर्यादा देखील मान्य करून, नाते राखावे!! एखादा प्रसंग दुसऱ्याला सांगणे, प्रसंगी त्याचा सल्ला घेणे, हे *सुसंस्कृत* वृत्तीचे *लक्षण* आहे, त्याचे *अवलक्षण* करून आपण त्या नात्याचा अपमान करतो. अगदी स्त्री/पुरुष मैत्री घेतली तरी त्याला *लक्ष्मणरेषा* ही असतेच, असावीच अन्यथा नात्याला विकृत वृत्तीचे स्वरूप येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि एक सुंदर नाते छिन्नविच्छिन्न होते. आपले *वैय्यक्तिक* स्तरावरील प्रश्न विचारावे, हितगुज करावे, सल्ला घ्यावा. मला तर बरेचवेळा असेच वाटते, नवरा/बायको हे नाते कितीही *जवळचे* असले तरी मित्रांच्या सहवासात आपण अधिक रममाण होऊ शकतो.
कविता वाचन : सहज की दुर्बोध?
मला कविता लिहायला जमत नाही आणि हे निर्विवाद सत्य, मला फार पूर्वीच आकळले होते. त्यामुळे कविता, या प्रकारापासून मी कायम लांब राहिलो परंतु इतरांच्या कवितेच्या जवळ जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला. एकदा का मनाची घडी घट्ट बसली की मग ती काही ढिम्म सुटत नाही आणि हेच माझ्या कवितांच्या लेखनाबद्दल घडले. काही वेळा लोकं कळवतात, माझे काही लेख कविता सदृश असतात. पण यातील *सदृश* शब्द महत्वाचा कारण कविता म्हणजे कविता!! तिथे दुसरा कुठलाच लेखन प्रकार जवळ करण्यासारखा नसतो. आणि माझे काही लेख कविता सदृश असता, यात त्यांचा माझ्याबद्द्लचा ममत्वाचा भाग अधिक असतो आणि समीक्षा कमी असते. अर्थात मी कधी प्रयत्न देखील केला नाही हे देखील तितकेच सत्य परंतु सुदैवाने मला इतक्या मोठ्या कवींच्या/कवीयत्रींच्या विविध प्रकारच्या कविता वाचायला मिळाल्या आणि त्या वाचनाने, मनाशी बसलेली गाठ अधिक घट्ट होत गेली.
कविता करणे इतके अवघड असते का? तसे नसावे कारण पूर्वीपासून आपली मराठी भाषा इतकी सुदैवी आहे की असंख्य कवींनी हे माध्यम अनेकाविध प्रकारे हाताळलेले आहे आणि आपल्या जाणीवा विलक्षण समृद्ध केल्या आहेत. माझा संस्कृत भाषेचं अजिबात अभ्यास नाही त्यामुळे उगीच *कालिदास*,*भवभूती* किंवा *बाण* अशी जडजंबाल नावे घेऊन, त्यांची उदाहरणे प्रस्तुत करणार नाही परंतु फार पूर्वीपासून मराठीत *कविता* सारखे अत्यंत लवचिक तरीही अत्यंत अर्थवाही माध्यम फार तलमरीतीने हाताळलेले आढळते. मुळातली *अल्पाक्षरी* रचना, अनेक अंगाने फुलवलेली वाचायला मिळते आणि आपण चकित होऊन जातो. दुसरे असे, माझी शैली अशा अल्पाक्षरी शैलीला साजेशी नाही. माझ्या लेखनात बरेचवेळा *पसरटपणा* डोकावतो परंतु *गद्य* लेखनात हा दोष लपला जातो. कविता लेखनात, अचूक नेमकेपणा, शब्दांवर हुकुमत तसेच शब्दांशी खेळायचे कौशल्य आवश्यक असते. *रचना*,*घाट* आणि *आशय* वगैरे अलंकार नंतर अवतरतात.
बरेचवेळा कविता करताना *कारागिरी* केलेली आढळते पण सततच्या वाचनाने ती कारागिरी ध्यानात येऊ शकते. मुळात *सकस अभिव्यक्ती* महत्वाची. एकदा तिची मांडणी झाली की मग कारागिरी समोर येते. कुणीही कितीही प्रतिभावान कवी उदाहरण म्हणून घेतला तरी त्याच्या रचनेत कुठेना कुठेतरी कारागिरीची अंतर्भाव नक्की असतो. फक्त त्याचे प्रमाण किती आणि ते प्रमाण आशयाच्या संदर्भात किती खुबीने लपविले आहे, हा भाग महत्वाचा ठरतो.
जसे कुठल्याही गाण्याच्या बाबतीत *मुखडा बांधणी* हे सर्जनशीलतेचे महत्वाचे लक्षण मानले जाते तसेच कवितेच्या बाबतीत, छंदोबद्ध रचना असेल तर *ध्रुवपद* अन्यथा मुक्तछंदातील कवितेच्या सुरवातीच्या ओळी या वाचकाचे मन धरून ठेवणाऱ्या असाव्याच लागतात.
पुढे मग त्या कवीचे अनुभवविश्व कामाला येते. हा अनुभव किती *सुदृढ* आणि *सक्षम* आहे, यावरच कवितेचे बरेचसे यश अवलंबून असते. ध्रुवपदाचे विस्तारीकरण करणे, हे कडव्यांचे कार्य असते (गझल वृत्त या नियमाला अपवाद ठरू शकते). फक्त त्यात *उपमा*,*उत्प्रेक्षा, कल्पनांचा वेगळेपणा येऊ शकतो. एखाद्या कवितेचा संकलित असा परिणाम होणे ही गोष्ट खरे म्हणजे अत्यंत महत्वाची असते. हा संकलित परिणाम कवितेतल्या अनेक घटकांच्या कलात्मक संघटनेने होत असतो. अर्थात यात एक बाब महत्वाची असते. ध्रुवपदाच्या अनुरोधाने इतर कडवी फरफटत नेल्यामुळे अनुभव सांगण्याची भूमिका कवी घेऊ लागतो (नवोदित कवींच्या बाबतीत हा धोका कायम संभवतो) त्यामुळे *अनुभूतू* आणि *प्रतिमासृष्टी* यांचे एकात्मस्वरूप राहत नाही आणि सगळीच रचना विस्कळीत होते. अल्पाक्षरी माध्यमात तर हे फारच अघटित म्हणावे लागेल. एका अनुभवाचे अनेक अनुभवांशी असलेले भावनात्मक संबंध जाणवू शकतात. एंद्रिय संवेदनांच्या बाबतीत देखील असाच प्रकार जाणवू शकतो. आणि इथे *मुक्तछंद* रचना उद्भवू शकते. छंदांच्या काचेतून मुक्तता, असे जरी बाह्य स्वरूप असले तरी देखील त्यात *शाब्दिक लय* ही कायम अंतर्भूत असते, असावी लागते अन्यथा गद्य लेखन आणि पद्य लेखन याची नेमकी सीमारेषा आखणे अशक्य!! कवितेला प्राप्त होणार *आकार* अनुभवाच्या स्वरूपावर, प्रकृतीवर अवलंबून असतो आणि इथेच वाचक त्या अनुभवाशी किती तादात्म्य होऊ शकतो, त्यावर त्या कवितेचा *दुर्बोध* असणे अवलंबून असते.
आपण कविता वाचतो म्हणजे प्राथमिक पातळीवर शब्दांचा अर्थ जोडत जातो आणि त्या तर्कानुसारी अर्थातून आशय समजावून घेत असतो. याचाच वेगळा अर्थ, शब्द आणि शब्दांची जोडणी, आपण आकलनात घेत असतो. इथे जर का शब्दाच्या associations बद्दल मनात संदेह निर्माण झाला की आपण सामान्य वाचक बावचळून जातो. आपल्या मनात बहुतांशी शब्दांचे साचेबद्ध अर्थ आणि त्या अर्थांची साखळी तयार असते आणि काहीवेळा त्या साखळीला धक्का बसतो, क्वचित प्रसंगी भांबावतो देखील आणि मग ती कविता बाजूला टाकून देतो. आपल्या मेंदूला *ताण* देण्याची आपली सवयच मोडलेली असते. कवी, आपल्या कवितेतून नेमके काय सांगायचं प्रयत्न करीत आहे? या प्रश्नाचा अदमास न घेता, आपण आस्वाद घ्यायला सुरवात करत्तो आणि आपल्या मनाला ठेचा लागतात. मनाला ठेच लागली की लगेच मन संभ्रमित होते. अशा परिस्थतीत आपण काय आणि कसला आस्वाद घेणार? एकतर कविता ही काही ओळीचाच आविष्कार असतो पण आपला धीर तितका निघत नाही!! *दुर्बोध कविता* वाटण्याची ही पहिली पायरी होय.
पुढे मग सगळेच धुकाळ वातावरणात आपला मार्ग आक्रमण्याचे प्राक्तन नशिबात येते आणि आपण अधिकाधिक गोंधळत जातो. कविता अल्पाक्षरी म्हटल्यावर तिथे प्रत्येक शब्दच नव्हे तर त्यातील विरामचिन्हे, प्रसंगी एकाक्षर देखील तितकेच महत्वाचे असते. आपण *एकाग्र* होत नाही आणि सहजपणे कवीला दोष देऊन, आपली सुटका करून घेतो. आपण जेंव्हा रागदारी संगीताची मैफिल ऐकायला जातो तेंव्हा आपण आपल्या मनाची स्थिती तशी करून ठेवतो कारण रागदारी संगीत हे अत्यंत विस्तारपूर्वक मांडलेले सांगीतिक विचार असतात आणि तिथे आपण प्रत्येक सुराचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु कविताबाबत आपल्याला तसा धीर धरवत नाही कारण विं.दा.करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे *कविता भोगणे* या प्रक्रियेलाच आपण नाकारतो. कुठली कला ही *भोगवती* असते आणि तशी केली तरच त्या कलेचा खरा आनंद आपल्याला मिळू शकतो. प्रश्न आहे, आपल्या मनाचा पीळ किती मजबूत आहे?
Thursday, 27 January 2022
ज्ञान????
आपल्याकडे कुणाही व्यक्ती काही निराळे केले, काही निराळे दाखवले की लगेच आपण त्याच्यावर *हुशार* हे लेबल चिकटवतो. त्या पुढील पायरी म्हणजे समजा नवीन विचार मांडला किंवा संपूर्णपणे नवीन अशी मांडणी केली मग ती कला, खेळ, विचार अशा कुठल्याही शाखेतील असेल, आपण लगेच त्या व्यक्तीला *प्रतिभावंत* संबोधायला लागतो. त्याही पलीकडे काही घडले की मग *ज्ञानवंत* शब्द अस्तित्वात आणतो!! मुळात *ज्ञान* म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नसताना, *ज्ञानवंत* म्हणणे म्हणजे आपल्याच अकलेचे आपल्या हातानी दिवाळे काढण्यासारखे आहे. परंतु अशी लेबले लावणारे बहुसंख्य असतात आणि बहुसंख्यांच्या समोर विवादी स्वर कायमचा मिटला जातो. जरा विचार केला तर हे असे किती हास्यास्पद आहे, याचा कुणीही विचार करत नाही. मेंढरांप्रमाणे घोळक्याने आरडाओरडा करायचा आणि एक नवे *देवघर* निर्माण करायचे!! हेच शतकानुशतके चालू आहे. वास्तविक पाहता, *प्रतिभावंत* व्यक्ती ही शतकातून एखादीच जन्माला येते किंवा येऊ शकते आणि आपल्याकडे पायलीला पासरीभर प्रतिभावंत सापडतात!! खरंतर निर्मितीच्या क्षणी प्रतिभेचा एखादा तरी क्षण लाभला तर धन्य वाटावे, असे त्या शब्दाचे अप्रूप असते आणि क्षण हाच शब्द योग्य आहे. मग त्याला *साक्षात्कार* असे नाव दिले तरी चालेल.
परंतु *साक्षात्कार* म्हटले की लगेच देव, धर्म इत्यादी बाबाजी समोर येतात आणि मुळातला हा अद्वितीय शब्द नासला जातो!! साक्षात्कार या शब्दातच क्षण या शब्दाचे अस्तित्व असताना, त्याची क्षणभंगुरता आपण विचारात घेत नाही आणि ज्याला कुणाला साक्षात्कार होतो, त्याला लगेच देवपदी नेऊन ठेवतो. एकदा का देवपदी ठेवले म्हणजे समाजाला तार्किक विचारांची गरजच भासत नाही आणि वेळ घालवायला नवीन साधन सापडते. अशी आपल्या समाजाची घडी आहे. मला आठवतोय, सुप्रसिद्ध लेखक आर्थर कोसलर याच्या आत्मचरित्रात लिहिलेला एक परिच्छेद. *या जगात खऱ्या अर्थाने प्रतिभावंत हे ५०,६० आहेत. ते कुणी कलावंत, खेळाडू किंवा शास्त्रज्ञ देखील नाहीत. त्यांचा या जगाशी लौकिकार्थाने आहि संबंध नाही परंतु त्या व्यक्ती एकांतात आपली "बेटे" करून स्वान्तसुखाय वावरत असतात. त्यांना ना कुठले वादळ घाबरवत नाही, ना त्यांना मृत्यूची भीती वाटत. कुठल्याच संकटाने हे हेलावू शकत नाहीत. तशी ती रूढार्थाने सामान्य माणसे असतात परंतु वेळ येते तेंव्हा "कसे जगायचे" हे दाखवून देतात!!* मला आजही असेच वाटते, आर्थर कोसलर हा अशाच निवडक व्यक्तींपैकी एक होता. एकेकाळी भांडवलशाहीचा कट्टर पुरस्कर्ता, पुढे हिटलरच्या काळात स्टालिनच्या रशियात जाऊन कम्युनिस्ट झाला आणि नंतर भ्रमनिरास झाल्यावर स्वतःच्या हाताने मृत्यूचा पत्ता शोधला. हे करताना, त्याची त्रयस्थ, तटस्थ वृत्ती कधीच लोप पावली नाही
अर्थात हे माझे वैय्यक्तिक मत आहे. इथे आणखी उदाहरणे शोधून प्रतिवाद होऊ शकतो. आपण आधी *माणूस* आहोत, आपणही *स्खलनशील* आहोत, आपल्याला इतरांप्रमाणे भावभावना आहेत, आपल्या देखील शारीरिक, मानसिक गरज असतात आणि आपण त्याची पूर्तता करण्याचा आयुष्यभर प्रयत्न करीत असतो. हे सगळे, ज्यांना आपण तथाकथित प्रतिभावंत म्हणतो, त्या सगळ्यांना लागू पडते परंतु आपण देवघरात स्थापना केल्यावर, त्यांना हे नियम लागू पडत नाहीत आणि दुर्दैवाने, हे आपणच ठरवत असतो आणि तशी त्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवत असतो.कधीतरी एक वेळ अशी येते, त्या तथाकथित प्रतिभावंताचा बुरखा फाटला जातो आणि मग लगोलग त्याला पायदळी तुडवण्याचे *सत्कार्य* देखील आपण लगोलग करतो. त्याला नाकारल्यावर आपण शहाणे होततो का? या प्रश्नाचे उत्तर आजतागायत *नाही* असेच दुर्दैवाने द्यावे लागते कारण लगेच आपण दुसऱ्या कुणा व्यक्तीची, त्या *ओक्याबोक्या* झालेल्या देवघरात प्रतिष्ठापना करायला मोकळे होतो आणि तशी करतो देखील. यामध्ये *विचार* करणे गरजेचे साठे, अशी गरज देखील उत्पन्न होत नसते.
*ज्ञान* हे कधीही क्षणिक नसते, या विधानावर बऱ्याच विचारवंतांचे एकमत आहे परंतु नक्की काय मिळवले म्हणजे ते *ज्ञान* म्हणून सिद्ध होईल? याचेच उत्तर अवघड आहे. आपण सगळेच जे काही जाणतो, ती निव्वळ *माहिती* असते. त्यात ज्ञानाचा कण देखील नसतो. आपण, आपल्याला जे आठवते, तेच सांगत असतो. मग ते वाचलेले असेल, अनुभवलेले असेल. वेगळ्या शब्दात आपण केवळ *Super Computers* असतो, प्रसंगानुरूप बदाबदा माहिती समोरच्या तोंडावर टाकत असतो. चिकणमातीचे ओलसर गोळे टपकावेत त्याप्रमाणे बऱ्याचवेळा आपल्या माहितीचे स्वरूप असते. त्याला आपण *ज्ञान* म्हणण्याचा मूर्खपणा करीत असतो. समोरचे श्रोते जेंव्हा बिनदिक्कतपणे तुमची माहिती मान्य करतात किंवा मुकाटपणे ऐकतात, तेंव्हा आपल्याला आणि समोरच्याला खुळचट *ज्ञान* प्राप्त झाल्याचा *साक्षात्कार* होतो, ज्याला कसलाच *आकार* नसतो!! *व्यक्तिपूजा* नामक भयाण रोग पसरायला सुरवात होते अंडी तार्किक विचार प्रवणता लोप पावते. कुणालाच याची क्षिती नसते कारण सगळेच मेंढरासारखे घोळक्याने एकत्र येतात आणि एकत्रित खड्ड्यात पडतात. खड्ड्यात पडल्याने तात्पुरत्या जखमा होतात, त्यावर मलमपट्टी केली जाते, ती तेव्हढ्यापुरती कारण पुन्हा घोळका करून जगायला आपण तयार असतो. म्हणजे झालेल्या अपघातातून आपल्याला शहाणपण येते, हा भ्रम आहे, हेच सिद्ध करून दाखवतो आणि अशा समाजात आपण *ज्ञानवंत* निओजतील अशी अत्यंत भाबडी आशा बाळगून असतो. ते जेंव्हा जमत नाही किंवा नजरेच्या टप्प्यात येत नाःई असे जाणवते तेंव्हा मग सारासार विचार बाजूला सरळ जातो आणि नवीन देवाची प्रतिष्ठापना होते, मेग पुन्हा नवीन आरत्या, नवीन जयघोष इत्यादी सुरु होते. या सगळ्या कृतीत *ज्ञान* कणभर देखील नसते, किंबहुना बहुसंख्यांना त्याची जरुरी उरलेली नसते.
Wednesday, 26 January 2022
मोसे छल किये जाय
*लावण्याला असल्या असण्याचा हक्कच ना;*
*प्रज्ञेतच फक्त तये उजळावे, आणि पुन्हा*
*जळताना, घडवावी प्रतिमा निस्तुल काळ्या*
*काळ्या पाषाणातून शब्दातून थिजलेल्या ---------*
सुप्रसिद्ध कवी पु.शि. रेग्यांची भोगवादी कविता. चराचराच्या, निसर्गाच्या रस-रंग-नाद-स्पर्शमयी रूपांतून रसरसणारे स्त्रीचे नित नवे दर्शन कवीमनाला भुलवित असतेच. परंतु, रेग्यांना या सृजनशक्तीच्या मार्दवाचा आणि सौष्ठवाचा, गूढतेचा आणि ऐश्वर्याचा खरा साक्षात्कार घडतो, तो स्त्रीच्या मृदू, मादक शरीरलावण्यात तसेच मुग्धा,मधुर भावविलासात!! आणि हा भावविलास जवळपास अशाच स्वरूपात आपल्याला या गाण्यातून आढळतो.
मुळातील हे गीत म्हणजे *नृत्यगीत* आहे. त्यामुळे शब्दांची रचना करताना त्यात खटकेबाज शब्द येणे क्रमप्राप्तच होते. लटका प्रणय हीच या शब्दांची मूळ अभिव्यक्ती. पहिल्या अंतऱ्यात *धमकाया? और करूं भी क्या* लिहिताना, एक शब्द प्रश्नार्थक आणि लगेच पुढे काहीशी हताशता!! असे सुंदर जुळवून आणले आहे. त्याच भावनेची परिपूर्ती पुढील ओळीतील *देखो मोरा जियरा...... तडपाये* हे सगळेच शब्द लटक्या प्रेमाची ग्वाही देणारे. अशी काहीशी संवादात्मक शब्दरचना कवी शैलेंद्र यांनी केली आहे. अर्थात काव्य लिहिताना, *बैरी कारा* किंवा *दी नी गारी* सारखे लोकसंगीतातील शब्द घेऊन त्यांनी कवितेत वेगळीच खुमारी आणली आहे. खरंतर गाण्याच्या पहिल्या ओळीपासून आपल्याला हीच भावना वाचायला मिळते. अर्थात नृत्यगीत असल्याने, काही शब्दांची पुनरावृत्ती वाचायला मिळते जसे, दुसऱ्या अंतऱ्यात *तडपाये तडपाये तरसाये* या ओळीत *तडपाये* शब्दाची द्विरुक्ती आहे परंतु पुढे *तरसाये* या शब्दामुळे ती फारशी खटकत नाही. एकूणच सगळ्या ओळी या आकाराने फार छोट्या आहेत आणि मुळात गाण्याची स्वररचना द्रुत आणि अति द्रुत होत असल्याने दीर्घ ओळी लिहिण्याची गरजच निर्माण होत नाही. शंका अशी आहे, बहुदा गीताची स्वररचना आधी झाली असावी आणि पुढे त्याच्यावर आधारित अशी गीतरचना झाली असावी.
या गीताची स्वररचना सचिन देव बर्मन यांनी *झिंझोटी* रागावर आधारित अशी बांधली आहे. तर हा राग *अनवट* जातीत समाविष्ट होतो. ललित संगीतात देखील या रागावर आधारित फार विपुल अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. *खमाज* थाटात अंतर्भाव केलेल्या रागाचे स्वरूप *शाडव/संपूर्ण* असे करता येते. वेगळ्या भाषेत *आरोही* सप्तकात *निषाद* स्वराला स्थान नाही आणि *अवरोही स्वरांत* हाच *निषाद कोमल* स्वरूपात अवतरतो आणि बाकीचे सगळे *शुद्ध* स्वरूपात ऐकायला मिळतात. हा राग शक्यतो *मंद्र* आणि *मध्य* सप्तकात अधिक करून सादर केला जातो.
आता प्रस्तुत गाणे हे नृत्यगीत असल्याने, गीताचे चलन हे द्रुत लयीत सुरु होते आणि हळूहळू अति द्रुत लयीत सादर होते. त्यामुळे गीतात सरळ, सरळ *केहरवा* आणि *त्रिताल* ऐकायला मिळतात. गंमत अशी आहे, जरी दोन्ही ताल वेगवेगळ्या मात्रांनी निबद्ध असले तरी या गीतात अवतरताना सुंदर वळणावर एकत्र मिसळतात.गीताच्या आरंभी व्हायोलिनच्या सुरांनी सुरवात होते आणि लगोलग सतारीच्या सुरांची *झमझम* ऐकायला मिळते. वाद्यमेळ एकदम थांबतो आणि क्षणात *मोसे छल किये जाये* हे शब्द ऐकायला मिळतात. *झिंझोटी* राग तर समोर येतोच परंतु *केहरवा* तालाच्या दमदार मात्रांनी आपले स्वागत होते आणि गाणे विलक्षण वेगाने ऐकायला मिळते. गाणे जेंव्हा अति द्रुत लयीत शिरते तिथेच त्रितालाच्या मात्रा ऐकायला मिळतात. गाणे ऐकताना आपल्याला क्षणभर देखील उसंत मिळत नाही. एकामागोमाग एक असे स्वरबंध ऐकायला मिळतात आणि त्याच अंगाने हरकती ऐकायला मिळतात. *समझाके मैं तो हारी* या ओळीने पहिला अंतरा सुरु होतो आणि लगोलग छोटीशी सरगम ऐकायला मिळते.पुन्हा इथे तंतोतंत *झिंझोटी* राग!! असे समजायला हरकत नाही. अर्थात अशीच सरगम पुढे दुसऱ्या अंतऱ्यात *दिल जिसे दे डाला* इथे घेतलेली आहे. सरगम देखील इतकी वेगात घेतली आहे की बऱ्याचवेळा त्यातील *स्वर* समजून घेणे अवघड जाते. दोन्ही अंतरे सारख्या चालींनी बांधले आहेत. गाण्याची खुमारी ही वेगवान लय आणि त्यातून येणाऱ्या हरकती, इथेच आहे.
रागाधारित स्वररचना गायला मिळाल्यावर लताबाईंचा आवाज अधिक खुलतो. लताबाईंच्या गायकीचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, आणि अशा प्रकारच्या स्वररचनेतून ते वैशिष्ट्य अधिक खुलून येते - गाताना ज्या हरकती घ्यायच्या, सरगम घ्यायची किंवा स्वतंत्र ताना घ्यायच्या, त्या नेहमी ललित सांगितलं अनुरोधून(च) घ्यायच्या. आपण सांगीतिक अलंकार घेता आहोत, याची यत्किंचितही जाणीव करून न देता, लयीचे वर्तुळ पूर्ण करायचे. सम गाठताना देखील याच पद्धतीचा अवलंब करायचा. थोडक्यात हरकत किंवा तान घेताना, मुद्दामून घेतली आहे (तसे वस्तुतः नेहमीच असते) असे जाणवून न देता, लयीच्या अंगाने, सहज गळ्यातून काढायची (काढायची - ही कृती महत्वाची). आपण नेहमीच *सहज* या शब्दाचा वेगळा अर्थ ध्यानात घेतो परंतु *सहजता* ही कधीच *सहजपणे* प्राप्त होत नसते.
मोसे छल किये जाये, हाय रे हाय, देखो सैय्या बेइमान
समझाके मैं तो हारी
धमकाया? दी नी गारी, और करूं भी क्या
देखो मोरा जियरा हां जियरा तडपाये, जियरा तडपाये
मोहे हाय हाय देखो सैय्या बेइमान
मन का हैं बैरी कारा, दिल जिसे दे डाला
प्रीत मोरी पल पल रोये
तडपाये तडपाये तरसाये,
मोहे हाय हाय देखो सैय्या बेइमान
Guide Mose Chhal Kiye Jaye Hai Lata Mangeshkar - YouTube
Tuesday, 25 January 2022
थंडी
गेले काही दिवस मुंबईवर थंडीचा गारठा पसरला आहे एकदम मुंबईकरांची भाषा बदलली!! मुळात मुंबईत काकडणारी थंडी हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो.वास्तविक मुंबईत थंडी म्हणजे अंगावर चादर घ्यायला लागणे इतपतच!! अशा परिस्थितीत सध्या दुपारचे ११/१२ वाजले तरी पंखा लावावा, असे वाटू नये, हे नवलच म्हणायला हवे. परंतु ही थंडी तशी अनपेक्षित आली हे नक्की. तशा हवामान खात्याने पूर्वसूचना दिल्या होत्या परंतु भर दुपारी पंख लावायची गरज भासू नये, इतपत थंडी पसरेल असे फारसे कुणाला वाटले नव्हते. नेहमीप्रमाणे टीव्हीवर उत्तर भारतातील थंडीचा कहर, ठिकठिकाणी बर्फवृष्टी अशा बातम्या झळकायला लागल्या. पण त्यात फारसे नवल नव्हते कारण अशी चित्रे दर वर्षी बघायला मिळतात. मुंबईकरांना ती चित्रे बघूनच थंडी भरते!! परंतु या वर्षी जरा परिस्थिती बदलली. आदित्य पुण्याला असतो, त्याच्याकडून रोजच पुण्याच्या तपमानाच्या बातम्या वाचायला मिळत होत्या. अर्थात *पुणे तिथे काय उणे* या उक्तीप्रमाणे पुण्याची थंडी जगावेगळी (हे फक्त पुणेकरांचेच मत!!) मुंबईची थंडी म्हणजे तपमान २२/२३ च्या आसपास. पारा जरा आणखी खाली उताराला म्हणजे ठेवणीतले स्वेटर्स, शाली बाहेर पडतात आणि *काय ही हाडे गारठवणारी थंडी* अशी ठेवणीतली वाक्ये ऐकायला मिळतात. मला मात्र अशी थंडी उपभोगायला फार आवडते. एकतर अशी थंडी या शहरात फारशी पडत नाही आणि दुसरे म्हणजे जरा गारवा आला तर चांगलेच आहे. लगेच *अंग कुडकुडायला लागले* सारखी वाक्ये बोलायची म्हणजे अशा थंडीचा अपमान होय!! थंडीचा देखील *उपभोग* घेणे हा अप्रतिम आनंदाचा सोहळा असतो.
मला आठवत आहे, जेंव्हा मी साऊथ आफ्रिकेत रहात होतो तेंव्हाचे दिवस. एकतर हा देश म्हणजे दक्षिण गोलार्धातील शेवटचे टोक. केप टाऊनला गेल्यावर याची प्रचिती येते. या देशाचे वातावरण शहरागणिक बदलते असते. १९९४ साली मी जून महिन्यात या देशात प्रथम आलो. इथे भारताच्या नेमके उलटे ऋतुमान असते. इथला हिंवाळा हा एप्रिल ते ऑगस्ट असा असतो आणि पावसाळा बाराही महिन्यात कधीही!! तरी देखील डिसेंबर/जानेवारी हे महिने खास करून पावसाचे. परिणामी इथली हवा फार कोरडी. मी प्रथम *पीटरमेरित्झबर्ग* या शहरात आलो. हे शहर म्हणजे काही टेकड्यांवर वसलेली गावे!! अर्थात डोंगराळ भाग म्हणजे जून मध्ये भरपूर थंडी. माझ्यासारखा भारतातून आलेल्या माणसाला तर *कडाका* चांगलाच जाणवणार आणि तसेच सुरवातीचे काही दिवस झाले परंतु मी बोक्यासारखा!!! कसेही पडलो तरी पायावर उभे राहणार!! या शहरात जून/जुलै मध्ये ५६ इतके तपमान उतरते. मुळात इथे तशी वस्ती विरळ आणि रस्त्यावर तर वर्दळ नावाची नामोनिशाणी नसते. अशा परिस्थितीत इथली थंडी मला बाधली नाही, हे नवल. पण इथे मी थंडी उपभोगायला शिकलो. अगदी दुपारी ३ वाजता मिट्ट काळोख पसरत असताना, तिथल्या जवळपास निर्मनुष्य रस्त्यावरून एकट्यानेच हिंडणे, हा अनिर्वचनीय अनुभव होता.
डर्बन हे हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले त्यामुळे तिथे थंडी इतकी जाणवत नाही. साधारणपणे १३/१४ पर्यंत तपमान उतरणे आणि ते देखील काही दिवस, इतकीच थंडी!! अर्थात समुद्रकिनारी वसलेले, हे कारण तितकेसे बरोबर नाही कारण केप टाऊन देखील अटलांटिक महासागराच्याच किनाऱ्यावर वसलेले महानगर परंतु तिथे जून/जुलै मध्ये ०/-२ इतके तपमान खाली उतरते!! दुसरे कारण संभवते, केप टाऊन शहराच्या पलीकडे जगाची भूमी संपते!! त्यामुळे थंड वाऱ्यांना फारसा अटकाव होत नाही.
मला जर खऱ्या अर्थाने थंडी जाणवली ती, जेंव्हा मी Standerton या गावात नोकरीनिमित्ताने रहायला आलो. सावूठ आफ्रिकेतील अति थंड हवामानाचे गाव (शहर नव्हे) आणि एकूणच लोकवस्ती जास्तीतजास्त १५/१६ हजार इतपतच आणि बहुतेक सगळे गोऱ्या वर्णाचे. पुढे इथली भौगोलिक परिस्थिती समजली आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीचे इंगित कळले/ मला आठवत आहे, इथे नोकरी करताना, मे महिन्यात मी सुटीवर यायचे ठरवले. तेंव्हा या गावाचे तपमान हे -२/-३ इतके उतरले आणि मी त्या थंडीत मुंबईत उतरलो आणि पश्चात्तापाने पोळून निघालो!!मुबई +३० तपमानात जळत होती!! _३ वरून काही तासात +३० या तपमानाला शरीर सरावणे निव्वळ अशक्य!! मला या दिवसात इथे यायची दुर्बुद्धी झाली होती. अर्थात पुन्हा जून महिन्यात तिथे परतल्यावर पुन्हा काही तासांनी मी -४/-५ तपमानात शिरलो!! हा बदल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतोनात थकवणारा ठरला आणि पुन्हा चुकूनही मे महिन्यात रजा घ्यायची नाही हे ठरवूनच टाकले. या गावात राहताना, *थंडीचा काकडा* म्हणजे काय याचा पूर्णांशाने अनुभव घेतला.
प्रथमच असे वाटायचे, सकाळी *आंघोळ* करायलाच हवी का? अर्थात आपला भारतीय स्वभाव, मग आधी गरम पाण्याचा शॉवर सुरु करायचा आणि जरा वाफ पसरली की अंघोळ करायला आत शिरायचे, अशी मी माझ्यापुरती पद्धत ठरवली.खरी धमाल पुढे होती. बाहेर आलो तर नाकाचा शेंडा तुटतो कि काय असेच वाटायला लागले आणि बघाईतले गाडीच्या काचेवर Frost साचलेले!! अर्थात थंड पाणी घेऊनच ती काच साफ करणे अत्यावश्यक. थंड पाणी का? गरम पाणी वापरले तर काच तडकायची. या सगळ्या सूचना मला आधीच इतरांकडून मिळाल्या होत्या. गाडीत हीटर सुरु करायचा, थोडा वेळ गाडीचा अंतर्भाग गरम करायचा आणि मग गाडीत बसायचे!! प्रथम मला यातले काही माहित नव्हते तेंव्हा निव्वळ फजिती, हाच शब्द योग्य होता. पुढे गाडीच्या स्टियरिंगवर हात ठेवला आणि बोटांना भाजल्याचा चटका बसला!! बाहेरील हवेच्या थंडीने स्टियरिंग, फ्रिझर पेक्षा अधिक थंडगार झाले होते. त्यादिवशी मी ऑफिसमध्ये न जाता, प्रथम हातमोजे घेतले!!
तेंव्हा सुदैवाने मला असे वेगवेगळे थंडीचे अतर्क्य अनुभव मिळत गेले आणि आयुष्य अधिक रंगतदार होत गेले आणि या पार्श्वभूमीवर आताची ही मुंबईची थंडी, मला अजूनही *काकडा* असे वाटतच नाही. अर्थात मी साऊथ आफ्रिका सोडून आता जवळपास ११ वर्षे होतील आणि आता माझे शरीर मुंबईच्या हवामानाला सरावले आहे. अर्थात या १६ वर्षांच्या आठवणी कायमच्या मनात स्थिरावल्या आहेत आणि अवचित कधीतरी बाहेर पडतात. मला आजही असेच वाटते, साऊथ आफ्रिकेत मला इतकी वर्षे काढता अली, नुसतीच काढली नाही तर नोकरींनिमित्ताने अनेक शहरात वास्तव्य करायची संधी मिळाली, हे माझ्या धडपड्या स्वभावाचे यश पण थोडा नशिबाचा भाग देखील आहे. सगळ्यांना अशा संधी प्राप्त होत नाहीत.
इथे स्मिताने सध्या चादरीत गुरगटून घेतले आहे आणि ते स्वाभाविक आहे पण मी मात्र निव्वळ अंगावर चादर ओढून घेतो आणि शांतपणे या थंडीचा गोडवा उपभोगत असतो.
Saturday, 22 January 2022
संस्कार!!
आपण सगळेजण रोज काही ना काहीतरी वाचत असतो, मग ते रोज शिळे होणारे वर्तमानपत्र देखील असो. आपल्याला, निदान मध्यमवर्गीय मराठी समाजाला वाचनाची आवड ही अगदी शाळकरी वयापासून लागलेली असते. त्यावेळी अर्थातच आपल्या वाचनावर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा प्रभाव असतो. पुढे आपण जसे वयाने वाढत जातो आणि अनुभवाने परिपक्व (आयुष्यात ज्याला *परिपक्व* म्हणता येईल अशी स्थिती प्राप्त होते का हा एक गहन प्रश्नच आहे.पण ते असो.) होत जातो आणि आपली आवड, आपल्या नकळत बदलत जाते. बदल घडत जाणे, हे प्रगतीचे विविक्षित लक्षण आहे. पूर्वी रोजचे वर्तमानपत्र, वाचनाचे साधन असायचे, पुढे कथा,कादंबऱ्या आणि अगदीच सूक्ष्म आवड झाली तर कविता वाचन सुरु होते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असणे सुसंगत असते आणि तिथे टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला घरात काय प्रकारचे वातावरण अनुभवायला मिळते, त्यावरून बव्हंशी आपली आवड ठरत जाते.
असे सहज विधान करता येईल, आपल्या सगळ्याची आवड ही *प्रेमकथा* किंवा *साहसकथा* अशा विषयांवर निर्माण होते आणि त्यात फारसे वावगे नाही. आता आपण सगळेच मराठी आणि सगळ्यांच्या घरातील मराठमोळे वातावरण म्हटल्यावर मराठी भाषेतील साहित्य वाचणे क्रमप्राप्तच होते. रोजच्या वर्तमानपत्र वाचनावरून आपण सहजपणे ज्याला *साहित्य* म्हणता येईल, अशा लेखनाकडे वळतो. बरेचवेळा आपली आवड इथेच थबकतो कारण ही वाचनाची दिशा जेंव्हा नक्की होते तेंव्हा आपल्या रोजच्या आयुष्याचा मार्गक्रम बदललेला असतो आणि आपल्या गरजा वेगळ्या झालेल्या असतात. *वाचन ही गरज होणे, गरजेचे असते!* पण असे सहसा, आपल्या तरुण वयात तरी होत नाही. कथा, कादंबऱ्या देखील फुरसत मिळाली तर वाचायच्या, असा प्राधान्यक्रम होतो. अर्थात हे देखील चुकीचे म्हणता येणार नाही.
मजेचा भाग असा असतो, आपण जे वाचतो, त्यातील काही भाग आपल्या नकळत आपण मनात झिरपत असतो. आपल्याला तेंव्हा काहीच कल्पना नसते परंतु भविष्यात अकल्पितपणे ते आपल्याला आठवते आणि आपण सगळेच चकित होतो. असे अचानक आठवणे, हे कसे घडले याची तर्कसंगती लागत नाही आणि इथे *दैव* किंवा *नशीब* हे अवतरते! मुळात आपण खोलात शिरून विचार करायचे टाळतो कारण कशाला विचार करायचा? कशाला डोक्याला शीण द्यायला लावायचा? रोजच्या आयुष्याच्या कटकटी काय कमी आहेत म्हणून या विचारांची भुणभुण मागे लावून घ्यायची? असे अनेक विचार मनात आणून,आपण दुसऱ्या विचारांकडे (तरीही ते विचारच असतात!!) वळतो.
यात मजेचा भाग असा असतो, आपल्यावर जे *संस्कार* झालेले असतात, त्याबाबत सजगपणे आपण विचारच करत नाही, त्याची आपल्याला गरजच वाटत नाही.लहानपणी पाठ केलेली स्तोत्रे, पुढे कधीही म्हणत नाही परंतु वेळ आली की तीच स्तोत्रे आपल्या तोंडून येतात आणि आपण त्याला *चमत्कार* असे अत्यंत भोंगळ नाव देऊन, सुटका करून घेतो. खरे तर ही आपली, आपल्यापासून दूर जाण्याची एक पळवाट असते परंतु चंगळवादाच्या आत्यंतिक आहारी गेल्यामुळे असल्या विचारांना तिथे स्थान नसते. किंबहुना एक बावळटपणा, म्हणून आपण संभावना करतो. तसे करणे आपल्याला रोजच्या आयुष्यासाठी सोयीस्कर असते. इथेच मघाशी मी *झिरपणे* हा शब्द वापरला, त्याचा अनुभव येतो, जो *संस्कार* म्हणून मानला जातो.
कविता ही अशीच आपल्या मनात झिरपत असते, त्यासाठी खास प्रयास करण्याची अजिबात गरज नसते. गरज असते ती, ती आवड मनापासून करण्याची. मला काही तरी वाचले पाहिजे, मी काहीतरी संगीत ऐकले पाहिजे, याची मनाला आच लागायला हवी. ऑफिसमधील एखादी अडचण समोर आली की आपण सहजपणे धुडकावून टाकतो का? नाही टाकत कारण तिथे आयुष्य कारणी लागलेले असते, आर्थिक प्रश्न असतात. त्याक्षणाची ती गरज असते परंतु त्याचबरोबर आपण हे देखील ध्यानात घेत नाही, ऑफिसमधील कटकटी आपण शक्यतो घरी आणत नाही कारण *गरज सरो, वैद्य मारो* ही उक्ती आचरणात आणतो.
संस्काराचे असे होत नाही. संस्कार आपल्या मनाच्या तळाशी जाऊन बसतात. म्हणूनच घरातील कुणी निर्वतले की बाकीच्यांनी सांगायच्या आधी आपल्या डोळ्यात *दहिवर* साठते. ती प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया असते जी आपल्या मनाच्या तळाशी कुठेतरी लपलेली असते आणि अशा प्रसंगी उन्मळून बाहेर येते. आठवणींचे असेच असते. मनाच्या कप्प्यात कुठेतरी त्याचे अस्तित्व असते पण आपल्याला त्याची साधी जाणीव देखील नसते.
*संस्काराने व्यक्ती जखडलेली असते, ती अशी*
बाळासाहेब ठाकरे - व्यामिश्र व्यक्तिमत्व!!
वास्तविक बाळासाहेबांना जाऊन २,३ दिवसच झाले आहेत, त्यामुळे अत्यंत "तठस्थ" वृत्तीने लेखाजोगा करणे तसे अवघड आहे. तरीही, ते गेल्यानंतर ज्या रीतीने पेपर्स, टीव्ही आणि फेसबुकवर बातम्या, मते वाचायला मिळत आहेत, त्यावरून मला दोनच निष्कर्ष काढता येतात. त्यांचे जे "कौतुक" चालू आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जी "टीका" चालू आहे, यात कुठेतरी सुवर्णमध्य आवश्यक आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, कुठलीही व्यक्ती हि कधीच एकरेषीय नसते, त्यातून बाळासाहेबांसारखी लोकमान्य व्यक्ती तर कधीच असू शकत नाही आणि हाच दृष्टीकोन मनाशी ठेऊन, मी पुढे विधाने करणार आहे.
बाळासाहेबांसंबंधी लिहायचे म्हणजे सरळ,सरळ दोन भाग पडतात.१] राजकीय व्यक्तिमत्व , आणि २] व्यंगचित्रकार. आता, राजकीय व्यक्तिमत्व बघायचे झाल्यास, त्यात अनेक विरोधी गोष्टी दिसतात काही उदाहरणे बघूया. मुंबईत जेंव्हा मराठी लोकांना कुणी वाली नव्हता( आज तरी किती आहे, हे वादाचा भाग झाहे!! तरीदेखील) तेंव्हा, त्यांनी या परिस्थितीचा नेमका फायदा उठवला. त्यावेळी, मुंबईत कम्युनिस्ट लोकांचे उपद्व्याप सरकारला डोईजड झाले असताना, मराठी माणसांच्या या चळवळीने, मुंबईतून कम्युनिस्ट जवळपास हद्दपार झाले. यातूनच, कृष्णा देसाई खून प्रकरण घडले आणि तिथून शिवसेनेचा दरारा वाढायला लागला, असे म्हणता येईल. एक गोष्ट मान्यच करायला लागेल त्याकाळी, सरकारी नोकरीत मराठी-अमराठी हा भेदभाव प्रचंड होत होता. शिवसेनेने हे वर्चस्व मोडीत काढले. विशेषत: बँक, मंत्रालय, सरकारी खाती इथे मराठी लोकांची वर्णी लागायला लागली. अर्थात, त्याचवेळेस, एयर इंडिया मधील, नंदांच्या थोबाडीत मारून, जबरदस्तीने मराठी भरती सुरु केली!! आता हा प्रकार कुठल्या सुसंस्कृतीत बसतो? त्यावेळी, मराठी लोकांवर अन्याय होत होता हे नक्की आणि या चळवळीनिमित्ताने, मराठी लोकांना या नोकरीची दारे उघडी झाली. परंतु, केवळ "क्लार्क" किंवा फारतर "ऑफिसर" इतपतच नोकर भरती होत राहिली. पुढे याला अधिक व्यापक स्वरूप ,मिळाले नाही, हे निखालस सत्य आहे. त्यामुळे. मराठी मानसिकता, हि नेहमीच संकुचित राहिली.
राजकीय पक्ष सांभाळायचा म्हणजे अनेक तडजोडी, व्यापक हित ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्यासाठी लोकसंग्रह हि अत्यावश्यक गरज असते. या दृष्टीने विचार करायला गेल्यास, बाळासाहेबांचे वक्तृत्व हे नेहमीच वादग्रस्त राहिले. लोकांना आवाहन करणे निराळे, लोकांवर गारुड टाकणे निराळे आणि अश्लाघ्य भाषा वापरणे निराळे. त्याबाबतीत तारतम्य राखणे गरजेचे नाही का? मृणाल गोऱ्यांना "घृणाल गोरे" म्हणणे किंवा पुष्पा भाव्यांना "भावीण" म्हणणे कुठल्या संस्कृतीत बसते? तसेच नेहमीच अत्याग्रही भूमिका कितपत संय्युक्तिक ठरते? याच बाबीचा थोडा विस्तार केला तर, या संदर्भात कै. पु.ल. देशपांडे यांच्याबाबतीत वापरलेली भाषा, हि कुठली संस्कृती म्हणायची जेंव्हा तुम्ही, राजकारणात पडता, तेंव्हा, विरोधी मतांचा आदर, हि नेहमीची गरज असते. प्रत्येक प्रसंगाच्या विविध बाजू असतात आणि त्या चर्चेने घडवू शकतात. भारतात, प्रथमपासून लोकशाही अस्तित्वात आहे( १९४७ नंतर!!) आणि चर्चा, ही नेहमीच लोकशाहीची पायाभूत गरज असते. ज्या चर्चिलचा त्यांना अभिमान होता, त्या चर्चिलने, त्यांच्याकडे सर्वाधिकार असताना देखील, कधीच त्याचा दुरुपयोग केला नाही, किंवा स्वत:वरची टीका अडवली नाही!! त्याबाबतीत बाळासाहेबांचे पारडे हलके होते. आपली मते म्हणजे वज्रलेप आणि तिथे संवाद उद्भवत नाही, हि भूमिका लोकशाहीत कितपत योग्य ठरते? एकाबाजूने काँग्रेस मधील "घराणेशाहीवर" टीका करायची परंतु स्वत"च्या पक्षात तीच धोरणे राबवायची, हा दुटप्पीपणा नाही का? भ्रष्टाचाराच्या विळख्यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही, तेंव्हा त्याबाबतीत बाळासाहेबांवर तशी टीका करण्यात काहीच मतलब नाही. शिवसेनेने "खंडणी" संस्कृती राबवली, अशी टीका केली जाते पण, मग इतर कुठला पक्ष यातून नामानिराळा राहू शकेल? बाकीचे पक्ष "मवाळ" म्हणणे, हि शुद्ध फसवणूक आहे.
इथे इतर राज्यांबद्दल काहीही दाखले द्यायची जरुरी नाही, कारण हि "खंडणी" संस्कृती बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमधून पूर्वीपासून राजरोस चालूच होती. त्यावेळी, कुणी टीका केल्याचे फारसे आठवत नाही!! कदाचित, महाराष्ट्र पहिल्यापासून "बुद्धीवादी" राज्य आहे, म्हणून असे असावे!!
आता, जरा दुसऱ्या बाजूने बघूया. एक काळ मुंबईत असा होता, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, हे भाग म्हणजे "मिनी" पाकिस्तान म्हणून गणले जायचे. हे अतिरेकी लिहिणे नव्हे, मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. उदाहरण देतो. १९८७ च्या शारजा इथल्या जगप्रसिध्द क्रिकेट सामन्यात, जेंव्हा जावेद मियांदादने, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून, विजयश्री खेचून घेतली, तेंव्हाची या भागातील आतषबाजी, आजही माझ्या मनात ताजी आहे. माझ्या बाजूलाच, त्यावेळी बरीच मुस्लीम वस्ती होती, तिथले वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. तेंव्हा या "पाक" धर्जीण्या मनोवृत्तीला खरा पायबंद घातला असेल तो शिवसेनेने!! दुसरे "पाक" धर्जिणे उदाहरण!! काही महिन्यांपूर्वी, युरपमध्ये, एक "कार्टून" प्रसिद्ध झाले, त्यात मुस्लीम प्रेषित, मोहम्मद, याची "थोडी टिंगल" उडवली होती, लगेच त्याचे पडसाद भारतात उमटले!! काय संबंध? पण, त्यावेळी असा प्रश्न कितीजणांनी विचारला होता? किमानपक्षी विरोध नोंदवला होता? गुंडागर्दी केंव्हाही अक्षम्य, हे कबुल पण, जग कधीच एका वृत्तीने चालत नसते. जोपर्यंत आपण बलोपासना करीत नाही, तोपर्यंत समोरचा त्या भेकड वृत्तीचा फायदा हा उठवणारच, हे मानवी इतिहास आहे. १९६२ चे चीन युध्द याला साक्ष आहे. अर्थात, हे थोडे विषयांतर झाले.
अर्थात, व्यंगचित्रकार म्हणून त्यांना स्थान होते, हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतील. आपल्यासारख्या सामान्य माणसांना असे सांगितले जाते की "बाळासाहेबांना इतर कलांची बरीच जाणकारी होती" वगैरे, वगैरे... पण, हे त्यांचे खासगी रूप झाले.प्रत्येकाला याचा पडताळा कसा येणार? सामान्य माणसाच्या समोर प्रतिमा उभी राहते, ती सभेतल्या भाषणातून आणि तिथे तर हे व्यक्तिमत्व वादग्रस्त ठरते. जहाल भाषा वापरणे, महाराष्ट्राला नवीन नाही. अत्रे देखील कमरेखालची भाषा नेहमी वापरत. पण म्हणून, ती भाषा सुसंस्कृत ठरत नाही. त्यामुळे, बाळासाहेबांचे नेतृत्व सामान्य माणसाला जवळचे वाटले, हे सत्य आहे आणि त्याच ओढीतून, त्यांच्या अंत्ययात्रेला जो प्रचंड जमाव जमला, त्याचे इंगित ध्यानात येते. राजकारणात, सामान्य माणसाशी नाळ जोडावीच लागते. यशवंतराव चव्हाणांची होती, शरद पवारांची आहे पण त्यासाठी त्यांना खालच्या पायरीचा आश्रय घ्यावा लागला नाही. यशवंतराव चव्हाण तर बहुश्रुत होते, हे त्यांच्या विरोधकांनी देखील खुल्या मनाने मान्य केले आहे. इथे मला, या व्यक्तिमत्वाचा तर्कशुद्ध आढावा घ्यायचा नाही पण, मला जे भावले, त्याचा हा लेखाजोगा आहे.
Monday, 17 January 2022
कृतार्थता (?)
मला वाटतं, आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात काहींना काही तरी करत असतो, त्यासाठी धडपडत असतो. मग ते धडपडणे चरितार्थासाठी असेल किंवा काही आवडत्या छंदांसाठी देखील असू शकते. धडपड ही प्रासंगिक असू शकते किंवा अथक असू शकते. अथक धडपड ही त्या विषयावर अवलंबून असते, म्हणजेच जगण्यासाठीची धडपड ही अथक असते. त्याला कुठे अंत असावा? या प्रश्नाचे उत्तर वैय्यक्तिक असते. किंबहुना धडपडीला अंत असतो का? असा सार्वकालिक प्रश्न देखील या संदर्भात विचारात घेतला जाऊ शकतो. आपण, आपल्या गरजा, आपल्या भोवतालचे सामाजिक तसेच सांस्कृतिक वातावरण आणि त्या घुसळीतून आपल्यावर होणारे संस्कार, इत्यादी असंख्य मुद्दे या संदर्भात विचारात घ्यावे लागतील. *जगण्यासाठीचा चरितार्थ* ही संकल्पना फार फसवी आहे, पाण्याच्या वेगवान भोवऱ्यात सापडून गटांगळ्या खायला लावणारी असोशी आहे. याचे मुख्य कारण, आपले जगणे, हाच मुळात अथक शोध असतो आणि त्यामुळे चरितार्थ या कल्पनेला कुठलीही मर्यादा रहात नाही. अगदी झोपडपट्टीत अत्यंत हलाखीत जगणारा माणूस असो किंवा अब्जाधीश असलेली व्यक्ती असो, चरितार्थाची धडपड सुटलेली नाही, किंबहुना ते अटळ प्राक्तन असते. आपण आणखी एक उदाहरण बघू,कलाकार किंवा खेळाडू आपल्याला अतिशय सुखद असा अनुभव देतात तेंव्हा त्या अनुभव देण्याच्या क्षणी त्या व्यक्ती देखील कुठेतरी अंतर्मुख होत असणार कारण हा जो क्षण आपण दिला आहे, याच धडपडीसाठी सगळा अट्टाहास केला होता का? वास्तविक हा कृतार्थतेचा क्षण असतो परंतु याच क्षणी त्या व्यक्तीला पुढील नवीन क्षितिजे खुणावत असतात. याच अंधुक पायवाटेतून त्यांना ठेचकाळत मार्गक्रमणा करीत पुढील क्षण शोधायची धडपड करायची असते. कला किंवा खेळाची अंगे याच प्रकारे विस्तारित होत जातात. मी वर जो शब्द वापरला, जगण्यासाठीचा चरितार्थ, हा शब्द सगळ्यांनाच लागू होतो. इथे चरितार्थ म्हणजे फक्त आर्थिक व्यवहार, इतकाच मर्यादित अर्थ नाही. कलाकारांनी केलेला अथक रियाझ किंवा खेळाडूने रक्त आटवून घेतलेली मेहनत, असे सगळे काही चरितार्थ या शब्दात सामावलेले आहे कारण त्याशिवाय दुसरी गती संभवत नाही. आपण जेंव्हा जगायला सुरवात केली तेंव्हा काही एक लक्ष डोळ्यासमोर ठेवलेले असते. त्या लक्षपूर्तीसाठीची धडपड, हेच चरितार्थ या शब्दाचे दुसरे स्वरूप होय. बऱ्याच परिश्रमानंतर ते लक्ष आवाक्यात आल्याचे आपल्याच ध्यानात येते परंतु त्याच क्षणी आपल्या नवीन शिखरे खुणावायला लागतात आणि आपण त्या क्षणी थोडे भ्रांतचित्त होतो. समोर मार्ग दिसत आहे, मार्गातील खाचखळगे एव्हाना ध्यानात आलेले असतात तरीही मनाला भुरळ पडलेली असते!! याचाच वेगळा अर्थ, आपल्याला जे *साफल्य* मिळाले असे वाटत होते, ते केवळ *मृगजळ* होते का?? मृगजळ म्हणणे कठीण आहे कारण ते साफल्य अस्तित्वात आलेले असते परंतु आपली मानसिक अवस्था थोडीशी दोलायमान अवस्थेला आलेली असते. नवीन खुणावणारी शिखरे आपल्याला अस्वस्थ करीत असतात, पुढे मार्गक्रमणा करायला प्रवृत्त करीत असतात. हे जे खुणावणारे असते, त्यालाच मी मघाशी मृगजळ म्हणून संबोधले. अशावेळेस प्रश्न पडतो, आयुष्यात *कृतार्थता* कधीतरी लाभणारी असते का? आपल्या संस्कृतीत *वानप्रस्थाश्रम* ही जीवनाची अंतिम वाटचाल मानली गेली आहे. परंतु, असे धरून चालू आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला (खरे तर आधुनिक जगात याला किती स्थान आहे?) पण त्या अवस्थेत देखील जगण्याची धडपड चालूच असते. आपण इतकी वर्ष जपून ठेवलेले छंद आणखी वाढवायचा ध्यास लागलेला असतो. आपण ठरवतो, आता वयाची साठी उलटली (आपली पिढी आता याच वयात शिरली आहे म्हणा) तेंव्हा आता स्वान्तसुखाय वाचन करायचे, विचारमंथन मनात घडवायचे आणि संध्याकाळी मंद आवाजात संगीत ऐकायचे. या सुखाच्या आपल्या परमोच्च अवस्था म्हणून स्वीकारतो पण प्रत्यक्षात या छंदाला कुठेही अंत सातो, हे देखिल आपल्याला जाणवायला लागते आणि मग या धबडग्यात स्वान्तसुखाय अवस्था आणि परमोच्च समाधान, या शब्दांना कुठेच *जागा* मिळत नाही.मग आयुष्याला कृतार्थता लाभली म्हणजे नक्की काय लाभले? अशी कृतार्थता अनुभवता येते का?
एक गमतीशीर विचार
जरी विचार गंमत म्हणून लिहीत असलो तरी काही प्रमाणात गंभीरपणे विचार नक्कीच केला आहे. एकूणच सगळीकडे एक प्रघात असतो - आजची पिढी आमच्यापेक्षा वेगळी आहे आणि वस्तुस्थिती तशीच आहे. परंतु १९९२ नंतर आपल्याकडे जे मन्वंतर झाले आणि समाजात झपाट्याने बदल होत गेले, त्याचा वेग केवळ स्तिमित करणारा होता. अशा प्रकारे बदल, आपल्या पूर्वीच्या पिढीने अनुभवाला नव्हता, अगदी दुसरे महायुद्ध जमेस धरून. दुसऱ्या महायुद्धाने सगळ्याच मूल्यव्यवस्थांना हादरा दिला तरी ती पिढी बरीचशी भावनाप्रधान, स्वप्नावस्थेतील होती, ज्याचे संस्कार आपल्या पिढीवर झाले. परंतु आधुनिकीकरणाच्या रेट्यात, तोच मध्यम वर्ग आमूलाग्र बदलला!!
हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, हल्ली असे सर्रास बोलले जाते, आजच्या पिढीला *मराठी* भाषेबद्दल फारशी आस्था नाही, त्यांचे मराठी वाचन जवळपास थांबले आहे, इत्यादी. आता आपण, आपल्याबद्दल विचार करू. आपण जेंव्हा तरुण होतो तेंव्हाचे वातावरण आणि मराठी लेखन आणि संस्कृती, या सगळ्याशी आपले मानसिक नाते जोडलेले होते. घरोघरी आपले आई/वडील खास मराठी सण साजरे करीत होते आणि आपल्या पिढीने, जमेल तसे टिकवून ठेवले. घरात मराठी वाचन, हा *वाचन धर्म* होता. आता उदाहरण घेतो. पु.लं. चे *बटाट्याची चाळ* आपल्या अवतीभवती होती. त्यामुळे त्यातील व्यक्तिरेखा आणि वातावरण, आपल्याला कधीही परके वाटले नाही. अगदी वैय्यक्तिक बोलायचे झाल्यास, याच लेखकाची पुस्तके वाचून, मी माझ्यावर थोडेफार संस्कार करवून घेतले. अर्थात पुढे आपले वय वाढले आणि अपाय अभिरुचीत बदल होत गेला. बदल हळूहळू होत होता पण घडत होता हे नक्की.
पुढे माझे वाचन खूपच बदलत गेले तरीही पु.लं. बद्दल मनात कृतज्ञता कायम राहिली, हे देखील खरे. आज जेंव्हा मी या लेखकाची पुस्तके पुन्हा वाचायला घेतो तेंव्हा मला तितके आपलेसे वाटत नाही कारण आता आजूबाजूला *हरितात्या* किंवा *बबडू* सारख्या व्यक्तिरेखा आढळतच नाहीत. पूर्वस्मृती रम्य होत्याच परंतु आजचे माझे मन, त्या विनोदांना तितकी दाद द्यायला तयार नव्हते! आता या पार्श्वभूमीवर, आजच्या पिढीकडे वळायचे झाल्यास, माझ्या मुलाला या व्यक्तिरेखेत काय गम्य सापडणार? एकतर मराठी वाचन कमी झाले (याला आपली पिढीच जबाबदार आहे) त्यातून आजूबाजूला टिपिकल मराठमोळी संस्कृती प्रसादापुरती शिल्लक राहिलेली नाही. मग आजच्या पिढीतील मुले, या वाचनातून कसा काय आनंद घेणार? बरे, अशा गोष्टी समजावून सांगण्यात काहीही अर्थ नसतो कारण त्यांना उदाहरण म्हणून आपण काय दाखवणार? इथे मी पु.ल. देशपांडे हे एक उदाहरण म्हणून घेतले पण इतर मराठी लेखकांबद्दल देखील हेच म्हणावेसे वाटते.
आजही जागतिकीकरणाचा रेटा प्रचंड असूनही आपले मराठी साहित्य मात्र *जातीव्यवस्था* किंवा *सामाजिक भान* (म्हणजे काय? हा मोठा प्रश्नच आहे!!) यांच्या पलीकडे जात नाही आणि बहुतेक लिखाण हे समाजाला सुधारायचे, असल्या बालिश उद्देशाने लिहिलेले आढळते. त्या पलीकडे फार मोठे जग विस्तारलेले आहे आणि ते विस्तारलेले जग, आजच्या पिढीला इंग्रजी साहित्यातून समजून घ्यायला मदत करते!! ही बाब आपली पिढी फारशी लक्षात घेत नाही. फार मागे वि.का.राजवाड्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे "जेंव्हा पाश्चात्य संस्कृतीत देकार्त आणि बेकन सारखे विचारवंत होते तेंव्हा भारतात फक्त संतांचाच प्रभाव होता!!"
आपल्याकडे "पतंजली, चार्वाक,चाणक्य,चरक किंवा सुश्रुत ही दैदिप्यमान परंपरा होती पण कुणीही ती परंपरा पुढे खंडित का झाली?" हा प्रश्न विचारत नाही. इथे इंग्रज फार नंतर, काही शतकांच्या अवधीने अवतरले, हे लक्षात ठेवायला हवे. दुसरे असे आपल्याला युरोप मधील औद्योगिक क्रांतीचे आकलनच पुरतेपणी झाले नाही. आपण सारखे, "आमच्या संतांनी आयुष्याचा अर्थ सांगितला आहे" या भ्रमात वावरत होतो आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. फार मागे जयंत नारळीकरांनी म्हटले होते -" त्याकाळी राजगायक तसेच राजज्योतिषी पदरी बाळगण्यात स्पर्धा असायची पण कुणीही राजगणिती किंवा राजवैज्ञानिक पदरी ठेवत नव्हते"!!
याचा सगळा परिणाम आपल्या साहित्य निर्मितीवर होणारच होता. तेंव्हा अशा *कूपमंडूक* डबक्यातून आजच्या पिढीला बाहेर येण्यासाठी पाश्चात्य साहित्य जवळ करावेसे वाटले तर त्यात काय चूक आहे?
मी वरती म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पिढीचा आपल्या पुढील पिढीबरोबर संघर्ष हा चालूच असतो परंतु वास्तवाचा प्रदीर्घ विचार केल्यास, आपली पुढची पिढी मराठी वाचत नाही आणि याला कारण फक्त आपण आहोत. हे मान्य करण्यावाचून तरणोपाय दिसत नाही.
Sunday, 16 January 2022
बुडत्याचा पाय खोलात!!
लेखाचे शीर्षक थोडे विचीत्र वाटेल पण सध्या तरी तेच योग्य वाटते. आपला मराठी समाज किंवा एकूणच भारतीय समाज बऱ्याचप्रमाणात अत्यंत भोंदू आणि भोंगळ आहे. अडकित्त्यात मान अडकलेली असावी तशी अवघडलेली अवस्था झाली आहे. आपण आपल्या मराठी लोकांबद्दल विचार करू. सध्याचा मराठी समाज हा बराचसा भ्रांतचित्त झाला आहे. एकीकडे पूर्वसूरींचा अतोनात सोस आणि टोकाचा अभिमान बाळगायचा पण रोजच्या व्यावहारिक जीवनात त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे बघितल्यावर आधुनिक विचारसरणीचा आधार घ्यायचा!! आधुनिक विचारसरणी स्वीकारायची कारण आपण *प्रतिगामी* ठरू, याची भीती मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असते. तेंव्हा मग *पुरोगामी* हाच मार्ग दिसतो. आता पुरोगामी लेबल चिकटवून घ्यायचे म्हटल्यावर लगेच आपली दृष्टी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळते. यात एक मखलाशी आपण अशी करतो, पाश्चिमात्य संस्कृतीमधील *आपल्याला झेपेल* इतकेच स्वीकारतो. हा भोंदूपणा झाला. मुळात निव्वळ अंधपणे ही संस्कृती स्वीकारणे, हाच पायावर धोंडा पाडून घेणे होय पण तसे आपण कधीही मान्य करणार नाही. याचे महत्वाचे कारण, आपल्याला असलेला भयानक *अहंकार!!* मी *स्वतंत्र बुद्धीवादी* आहे, अशी खुळचट आणि भ्रामक समजूत करून घेतली आहे. एका बाजूने पूर्वसूरींचे गोडवे गायचे पण प्रतिगामी ठरू म्हणून प्रतिगामित्वाचा बुरखा घालून घ्यायचा. अशी अडकित्त्यात अडकलेली स्थिती झाली आहे. यात एक मेख अशी आहे, असे धरून चालू आपले पूर्वज अत्यंत हुशार होते आणि त्यांची तत्वे,वागणे आजही उपयोगी आहेत. परंतु त्याचा अत्यंत *डोळस* अभ्यास करण्याची चिकाटी आणि तयारी नाही. वास्तविक बघता, कुठलाच विचार हा कधीही संपूर्णपणे योग्य असत नाही. तो केवळ एक मार्ग दाखवत असतो. एका बाजूने पूर्वजांचे गोडवे गायचे (तर्काशिवाय,हे महत्वाचे) कारण इथे कुणीही इतका व्यासंग केलेला नसतो. त्यातून दुसरा भाग असा, लोकांना काय, नवीन काहीतरी *आयते* मिळाले की खुश होतात आणि सारासार विचार बाजूला ठेऊन, नवीन *देवघराची* प्रतिष्ठापना करतात!! *नीरक्षीर विवेकेतू* ही वृत्ती फक्त कागदावर साजून दिसते, प्रत्यक्षात ते आपल्याला परवडत नाही. आता भाग येतो, तथाकथित *पुरोगामीत्व* स्वीकारण्याचा. मघाशी मी जो पाश्चात्य संस्कृतीचा उल्लेख केला आणि आपण आंधळ्या वृत्तीने आपल्याला झेपेल तितकेच स्वीकारतो आणि *आम्ही पुरोगामी* असा ढोल वाजवायला सुरु करतो!! *ढोल वाजवणे* आपल्या व्यवस्थित जमते. पाश्चात्य चंगळवादी सवयी आपण नेमक्या उचलल्या कारण त्या स्वीकारण्यासाठी फार काही करायची गरज नव्हती. पाश्चात्य संस्कृतीतील *बुद्धिप्रामाण्यवाद* आपण फक्त वेगवेगळ्या लेखांसाठी उचलला कारण प्रत्यक्षात आचरण करण्यासाठी लागणारी मेहनत करायची आपल्याला सवय नाही!! आता इथे उदाहरणे देण्यात येतील, विशेषतः अमेरिका किंवा युरोप मध्ये जे भारतीय फार वरच्या पातळीवर पोहोचले, त्यांची नावे फेकली जातील. परंतु अशा काही शेकडा व्यक्ती म्हणजे समाज नव्हे. या प्रयत्नात आपण आपली *ओळख* विसरत जात आहोत, हे फारसे ध्यानात येत नाही. व्यक्तिगत समाधान, ही तर पराकोटीची भावना बळावत चालली आणि समाज मागासलेला राहिला.
Subscribe to:
Posts (Atom)