Saturday, 24 April 2021

*तनहा तनहा*

चित्रपट सांगीत आविष्कारांबाबत भारतात काही गोष्टी लगेच ध्यानात येतात आणि त्या आधारावरून एखादा आविष्कार सांगीत आहे की नाही याचा निर्णय घेतला जातो. हे निकष अगदी थोडक्यात मांडायचे झाल्यास, १) गती आणि लय काही वेळा तालापर्यंत पोचणारी असणे, २) तारतेतील बदल व स्वरधून (काही वेळा राग म्हणून ओळखणे), ३) शारीर हालचाली यांना कमीअधिक उपकारक असा नृत्यापर्यंतचा आकृतिबंध असणे,४) अपरिचित किंवा नवा स्वनरंग असणे,५) अर्थ आणि वाणीचा लगाव किंवा भाव, ६) गुणगुणता येईल अशी रचना. चित्रपट गीताचे स्वरूप, त्याची कार्यपद्धती आणि त्याचे मूल्यमापन नेटपणेकरायचे तर या ६ मुद्द्यांची जाण ठेवावी असे वाटते. या प्रकारे होणारे विवेचन आणि विश्लेषण सांगीत होईल परंतु संगीतशास्त्रीय नव्हे. हिंदी चित्रपटसंगीत विषयक लिखाणात हा विवेक फारसा नसतो. आजचे गाणे *तनहा तनहा* हे गाणे या पार्श्वभूमीवरून ऐकल्यास अधिक आनंद होईल, असा विश्वास वाटतो. *मेहबूब अलम कोतवाल* या शायराने कविता लिहीली आहे. एक शायर म्हणून फार वरच्या श्रेणीत बहुदा यांचे नाव येईलच अशी खात्री देता येत नाही परंतु प्रसंगानुरूप लिहिताना *घिसेपिटे* शब्द न वापरता काही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न दिसतो.कारकिर्दीच्या सुरवातीला *इस्माईल दरबार* यांच्या सोबत आणि पुढे ए.आर.रेहमान यांच्या सोबत जोडी जमली परंतु एकूण कारकीर्द तशी त्रोटकच राहिली. आज २० वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात वावरल्यानंतर त्यांच्या नावावर केवळ २५, ३० चित्रपट असावेत!! अशावेळी एकूणच मूल्यमापन करताना चाचपडल्याची भावना येते. प्रस्तुत कविता वाचताना कुठेही नाविन्यपूर्ण रचना वाचत आहोत, असे वाटत नाही परंतु ललित संगीतासाठी, ठराविक शब्दसंख्या असणे, ठराविक जागी *खटके* असणे इत्यादी मुद्दे महत्वाचे ठरतात आणि तिथे ही कविता एका पातळीवर उतरते. दुसरा अंतरा संपवताना *तू दिल की बात कहे दे कहेने क्या है* या ओळीवर मात्र काही क्षण थबकावेसे वाटते आणि याचे कारण आधीच्या चार ओळी वाचल्यावर जो *वाचन संस्कार* होतो, त्याला तिरोभाव अशी ओळ वाचायला मिळते. खरी गंमत आहे ती या गाण्याच्या स्वररचनेची. रेहमान यांच्या बहुतांशी रचना या *आघाती* स्वरूपाच्या असतात आणि याचे महत्वाचे कारण असे संभवते आणि याचे कार्नाजूनही त्यांच्यावर जाहिरात - संगीताचा असलेला प्रभाव. श्रोत्यांमध्ये एक भावनाविद्ध अवस्थाच उत्पन्न करायचा मानस असेल तर जाहिरातसंगीततत्व उपयुक्त ठरते, हे खरे आहे. आजच्या गाण्याची सुरवात देखील सलग वाद्यमेळाने होत नसून आघाती वाद्यांकडून एकदम गाण्याच्या चालीकडे स्वररचना वळते. थोडे बारकाईने ऐकले तर गाण्याच्या मुखड्यात *भीमपलासी* रागाचे सूचना आढळते. रहमान यांचे पायाभूत शिक्षण हे कर्नाटकी संगीतात झाले असल्याने, त्यांच्या रचनांवर दाक्षिणात्य संगीताचा प्रभाव असणे, हा काही योगायोग म्हणता येणार नाही. अर्थात आधुनिक संगीताशी मेळ घालताना, पाश्चात्य संगीताशी संपर्क येणे साहजिक आहे. रेहमान यांच्या चाली पारंपरिक अर्थाने गायनाचे आणि गीताचे मूर्धस्थान नाकारून संयोगी अविष्कारावर भर देतात. असे वाटते, स्वरसंहती किंवा सुरावट म्हणजे काय आणि ती गीतापेक्षा श्रेष्ठ का आणि कशी? या विषयी त्यांच्या काही ठाम कल्पना आहेत. आणखी थोडे वेगळे मत मांडायचे झाल्यास, रेहमान यांच्या संगीतात ध्वनी आणि संगीतकाराची चल गती यांनाही समोर ठेवले जाते. आपल्या श्रवणसंबद्ध कल्पनाशक्तीचा एक अविभाज्य घटक म्हणून अवकाशाची भावनाही संगीतात असावी, असे जणू ते नेहमी सुचवू पाहतात. असे देखील ऐकण्यात आले आहे, रेहमान आपली स्वररचना नेहमी सिंथेसायझरवर तयार करतात, बहुदा त्यामुळे मी वर जो चौथा मुद्दा मांडला - *अपरिचित किंवा नवा स्वनरंग असणे* याची पूर्ती होत असणार. आता या गाण्याची एकूणच जडण घडण बघताना, मी वर जे काही मुद्दे मांडले आहेत त्यातील दुसरा मुद्दा या संदर्भात विशेष म्हणून घेता येईल. *तारतेतील बदल व स्वरधून (काही वेळा राग म्हणून ओळखणे* हा मुद्दा लक्षात घेता या गाण्यातील *भीमपलास* रागाचे एकूण स्वरूप ठरवता येईल. *तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है, कोई साथी नहीं तेरा यहां तो ये कोई बात है* इथे रागसदृश स्वररचना दिसते परंतु पुढे मात्र चाल स्वतंत्र होते. एकूण गाण्यातील *उच्चार* बघता, कर्नाटकी संगीताचा प्रभाव जाणवतो. अर्थात कर्नाटकी संगीताचा, हिंदी चित्रपट संगीतात फार पूर्वीपासून होत आलेला आहे परंतु रेहमान यांनी अतिशय जोरकसपणे त्याची प्रतिष्ठापना केली. अंतरे वेगळ्या *अंदाजाने* बांधणे, ही एक सर्जनशीलता नक्कीच म्हणता येईल आणि इथे संगीतकाराने त्याच मार्गाचा अवलंब केलेला आहे. स्वररचना द्रुत आहे, उडत्या अंगाने विस्तारत जाते त्यामुळे रसिकाचे लक्ष सतत गाण्याकडेच केंद्रीभूत होते. *वाणीचा लगाव* देखील म्हणूनच महत्वाचा ठरतो. गायिका आशा भोसले यांनी सर्वस्वी नवीन स्वररचनांशी कसे सहजतेने जुळवून घेतले, ते बघता थोडा विस्मय दाटतो. आशाबाईंच्या आवाजात एक आश्चर्य वाटावे असा गुण आढळतो आणि तो म्हणजे स्वरांच्या फेकीचा पल्ला होय. अर्थात हाच एकमेव गुण लक्षात घेण्यासारखा नसून, रचनाकारांना हवासा वाटेल असा स्वन (tone) घेऊन त्याला सांगीत गुण बऱ्याच प्रमाणात बहाल करण्याकरिता आवश्यक ते कौशल्य आणि लागणारी कल्पनाशक्ती त्यांच्याकडे भरपूर आहे. आता हेच विधान या गाण्याच्या बाबतीत कसे लागू पडते हे बघता येईल. मुखड्याची पहिलीच ओळ - *तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है* ऐकताना स्वरांची फेक आणि त्याला दिलेला स्वनरंग केवळ असामान्य आहे. विशेषतः: *कोई बात है* हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे.गाताना शब्दांवर आवश्यक ते *वजन* दिले आहे पण त्यात ढोबळ ठाशीवपणा नसून लयकारीचा अतिशय सूक्ष्म विचार आहे. पुढे, अंतरा घेताना - *किसीका तो सपना हो आँखो में तेरी* ही ओळ अचानक वरच्या सुरांत जाते ( एक बाब अंतऱ्याआधीच्या वाद्यमेळात, अंतरा वरच्या सुरांत जाणार आहे, असे कसलेही सूचन नाही!!) परंतु तसे गाताना कुठंही *प्रयास* केलेला आढळत नाही. संगीतकार रेहमान यांनी रागाची चौकट बाजूला सारली आहे पण तसे कुठेही निर्देशित केलेले नाही आणि हेच वैशिष्ट्य आशाबाईंनी गाताना सहजतेने गळ्यावर पेलले आहे. वास्तविक या गाण्याच्या वेळी रेहमान यांची शैली प्रस्थापित झाली होती आणि त्यानुसार हिंदी चित्रपट संगीताने एक वेगळे, अधिक वैश्विक असे वळण घेतले होते. आशाबाई या तसे पाहिले तर मागील पिढीतील गायिका. इथेच आपल्या अतुलनीय आवाज-लगावाच्या कौशल्यामुळे या बाबतीत आशाबाई मानाचे स्थान मिळवून बसल्या, हा काही योगायोग नव्हे आणि याबाबतीत त्यांना आव्हान देणे अवघड आहे. एव्हाना जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला, असे आपल्याला म्हणता येईल. तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है कोई साथी नहीं तेरा यहां तो ये कोई बात है किसी को प्यार दे दे इस सारे जमाने में यही प्यारी बात है किसीका तो सपना हो आँखो में तेरी कोई घर करता हो बाहो में तेरी कोई तो बने हमसफर राहों में तेरी ये जिंदगी तो वैसे ही एक सजा है साथ किसीका हो तो और ये मजा है जमीन आसमा से तो कुछ कहे रही है लहरें भी साहील से कुछ कहे रही है चांदनी भी चांद से कुछ कहे रही है किसी ना किसी से कोई कुछ कहे रहा है तू दिल की बात कहे दे कहेने क्या है (3) Tanha Tanha Yahan Pe Jeena | Urmila Matondkar | Jackie Shroff | Asha Bhosle | Rangeela | 90's Songs - YouTube

No comments:

Post a Comment