Tuesday, 13 April 2021

अजून नाही जागी राधा

मराठी भावगीत हे तसे भाग्यवान म्हणायला हवे कारण अनेक प्रतिभाशाली कवींच्या कविता अनेक तितक्याच व्यासंगी संगीतकारांनी स्वरबद्ध केल्या आणि रसिकांना त्या कवितेची ओढ लावली. भावगीत संगीताच्या प्रारंभापासून स्वररचना करताना, सक्षम कविता असणे, ही पायाभूत गरज राहिली. कधी कधी वाटते, जर का या संगीतकारांनी अशा कविता निवडल्या नसत्या तर त्या कविता, आज आहेत तितक्या लोकप्रिय झाल्या असत्या का? एक तर मुद्दा ठळकपणे मांडता येतो, कविता वाचन हा छंद तसा दुर्मिळ छंद आहे म्हणूनच कविता संग्रह फारसे खपत नाहीत. हे परखड वास्तव आहे आणि ते मान्य केलेले बरे. आजचे आपले गाणे - *अजून नाही जागी राधा* ही मुळातील अतिशय सक्षम आणि सुंदर आशय असलेली कविता आहे आणि पुढे संगीतकार दशरथ पुजारींच्या वाचनात आल्यावर ती कविता गाण्यात रुपांतरीत झाली. प्रस्तुत कविता प्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांची आहे. कविता वाचताना सुरवातीला, राधा-कृष्ण या पारंपरिक विषयाने होते पण तिथेच खरी फसगत होते. संपूर्ण कविता वाचल्यावर कवितेची नायिका *कुब्जा* असल्याचे ध्यानात येते. वास्तविक, "कुब्जा" हे व्यक्तिमत्व पुराणकाळातील, काहीसे दुर्लक्षित झालेले, किंबहुना दोन, चार प्रसंग वगळता फारसे महत्व नसलेली व्यक्तिरेखा. असे असून देखील तिचा प्रभाव महाभारताच्या संपूर्ण कथेत जाणवतो. अर्थात ही किमया महाभारतकारांची!! ही कविता वाचताना, आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांमधून साधली गेलेली कविता.सरत्या रात्रीची वेळ आणि त्यावेळी भणाणणारा वारा!! या वातावरणाच्या भोवती दिसणारा केशरी चंद्र, कवितेतील वातावरण निर्मिती, हा वेगळा शाब्दिक खेळ असतो. प्रतिमा मोजक्या शब्दात मांडावी आणि मांडताना त्यातील आशय अधिक विस्तारित व्हावा!! हेच इथे नेमकेपणा आपल्याला वाचायला मिळते.संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. पुराणकथेचा आधार घेतला तर कुब्जेने विषाचा प्याला घेऊन जीवन संपविले होते. या कृतीचे वर्णन करताना, " विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तों मुरलीरव;" किती समर्पक शब्दयोजना आहे. कृष्णाचे नाव देखील कुठे घेतलेले नाही पण "मुरलीरव" या प्रतिमेतून कृष्ण तर उभा राहिलाच पण त्याच बरोबर, "विश्वच अवघे ओठा लावून" या कृतीने आपले अव्यक्त प्रेम व्यक्त केले आहे. बरे, तिची कृती "प्याला पिण्या" इतपत नसून, विष पिताना देखील डोळ्यातून सुख सांडत आहे आणि नुसते सांडत नसून ती भावना केवळ माझीच आहे, हे अधिक महत्वाचे आहे.इथे सगळी कविता कुब्जेची होते आणि सुरवातीची राधा पूर्णपणे लुप्त होते. शेवटच्या कडव्यात जो ताण आहे, तिचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची जाणीव. अशी अप्रतिम कविता स्वरबद्ध करायला घेताना संगीतकार दशरथ पुजारींनी *झिंझोटी* राग निवडला आहे. असे म्हणता येईल. चालीचे स्वरलेखन या रागात सापडते. इथे मी मुद्दामून *सापडते* हा शब्द वापरला आणि त्याचे मुख्य कारण, या संगीतकाराच्या स्वरलेखनाच्या बांधणीत सापडते. आता इथेच बघा, *शाडव-संपूर्ण* या जातीचा राग आणि आरोहात *निषाद* स्वर वर्ज्य. गाण्याची सुरवात जरी *ध सा रे म ग* या परिचित झिंझोटी रागाच्या सुरांनी होत असली तरी आपण भावगीत बांधत आहोत आणि याच उद्दिष्टाने स्वरोच्चार या गाण्यात येतात. अर्थात गाण्याचा तोंडवळा या रागाचे सूर घेऊन दर्शवत असला तरी पुढे चाल स्वतंत्र होते. हेच तर ललित संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणायला हवे. *मावळतीवर चंद्र केशरी* या पहिल्या अंतऱ्याच्या बांधणीत रागाला पूर्ण फाटा दिला आहे. वाद्यमेळ बराचसा बासरी या वाद्यावर आधारलेला आहे. एकूणच या संगीतकाराने आपल्या सांगीतिक कारकिर्दीत नेहमीच वाद्यमेळ रचताना, अत्यंत काटकसर केल्याचे आढळते. बहुदा आर्थिक प्रश्न निगडित असावेत. एकूणच मराठी भावगीतांचा धांडोळा घेतला तर हेच व्यवच्छेदक लक्षण आढळते. त्यामुळेच जशी कविता अनाक्रोशी आहे तशीच स्वररचना देखील अतिशय संयत, शांत आहे. *आज घुमे का पावा मंजुळ* ही ओळच एकुणात स्वररचनेचा स्वभाव मांडणारी आहे. आता संगीत रचनाकार म्हटलं की त्याचा सर्वात पायाभूत गुण असतो तो गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे. या विधानावर जर का या संगीतकाराच्या स्वररचना पाहिल्यास, बहुतेक सगळी गाणी याच धर्तीवर बांधलेली आहेत. श्रोत्यांच्या मनात-कानात गीत रुजवण्यासाठी वापरायचे आणखी एक वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गीताचा पहिला चरण सप्तक मर्यादेत मधल्या स्वरावर म्हणजे *मध्यम* स्वरावर आणि दुसरी ओळ खाली आणून आधारस्वरावर म्हणजे *षड्ज* स्वरावर ठेवणे होय. अनेक सामाजिक-सांस्कृतिक कारणांनी सुरावट *सा* स्वरावर संपली की एक प्रकारची पूर्णतेची आणि स्थैर्याची भावना दृढमूल होते. हाच विचार ध्यानात ठेवल्यास, या संगीतकाराची गाणी आपल्या कानात अजूनही का रुंजी घालतात? या प्रश्नाचे उत्तर सहजगत्या मिळते. गायिका सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीवर थोडा दृष्टिक्षेप टाकल्यास, या गायिकेने, संगीतकार दशरथ पुजारींकडे भरपूर गाणी गायली आहेत. या गायिकेच्या गळ्याची बलस्थाने आणि जातकुळी बघता, या संगीतकाराकडे बहुसंख्य गाणी गाणे, हा काही योगायोग म्हणता येणार नाही. सुमन कल्याणपूर यांचा आवाज सुरेल, पारदर्शक आणि पल्लेदार नक्कीच होता परंतु प्रसंगी आवाजाला निमूळतेपण देण्याची क्षमता होती. परिणामी, शब्दांतील दडलेला आशय अधिक खोलवर मांडण्याचे कौशल्य निर्विवादपणे होते. इथे या गाण्यात, सुरवातीला मंद्र सप्तकात स्वर लागतात आणि तिथेच चालीची प्रकृती ध्यानात येते. *अजून नाही जागी राधा* ही ओळ या संदर्भात ऐकण्यासारखी आहे आणि पुढे अंतरा सुरु होताना *मावळतीवर चंद्र केशरी* ही ओळ गाताना, मघाशी म्हटल्याप्रमाणे *निमूळतेपण* सहज आणि विनासायास येते. तसेच गाणे संपताना *हें माझ्यास्तव.. हें माझ्यास्तव..* गाताना स्वरांत येणारी विन्मुखता विशेष करून ऐकण्यासारखी आहे. इथे एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे, स्वररचनेत कुठेही *आडवळणी* चलन नाही की लय अवघड झालेली नाही पण तरीही रचना कुठेही *सपाट* आणि *बाळबोध* होत नाही. गायकीला आव्हान असे कुठेही नाही तरीही गायनाचा आपल्या मनावर एक गाढा परिणाम होतो आणि ही फलश्रुती गायिका म्हणून सुमन कल्याणपूर यांची म्हणावीच मागेल. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ; अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण; अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेंच टाकून अपुले तनमन. विश्वच अवघें ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव; डोळ्यांमधले थेंब सुखाचे: "हें माझ्यास्तव.. हें माझ्यास्तव.." (5) Ajun Nahi Jagi Radha - YouTube

No comments:

Post a Comment