Wednesday, 7 April 2021
आज सोचा तो आंसू भर आये
अनुभव निर्मिती करू शकणाऱ्या वस्तू-विश्वातील अनेक वस्तू आणि *शब्द* ही दोन्ही एकाच "जातीची" आहेत. शब्द देखील वस्तुविश्वातल्या वस्तूंच्या समान आहेत. प्रत्येक शब्द संवादाचे साधन या अर्थाने संस्कृतीच्या कुठल्या तरी जगाशी कुठल्या तरी नात्याने निगडित झालेला असतो. तसेच त्या नात्यात तो त्या *अंगाचे* वाहन असतो. त्याचप्रमाणं निर्मितीतील एक द्रव्य (material) या नात्यानं प्रत्येक उच्चारित आणि अनुच्चारित अशा शब्द या नावघटकाची स्वतःची अशी गुणवत्ता असते. जेंव्हा असे शब्द काही एका स्वरांशी निगडित होतात तिथे मग शब्द आणि सूर यांचे अतिशय निराळे अर्थ जाणवायला लागतात. सूर देखील संस्कृतीच्या अगणित घटकांशी आपले नाते जोडत असतो. अशाच प्रकारच्या अत्यंत निरंतर तरीही निर्वात पोकळी भरून टाकणाऱ्या गाण्याचा आज आपण परिचय करून घेणार आहोत - *आज सोचा तो आंसू भर आये*. शब्दाची लय आणि स्वरांची लय यांची एकात्मता अतिशय तरलपणे आणि तितक्याच अलौकिक समन्वयाने भारले गेलेले गाणे!!
वास्तविक ही एक कविता - भावकाव्य आहे. भावकाव्य हे स्वभावतःच वैयक्तिक अनुभवांची विशिष्टता शोधत जाणारे काव्य असते. या वैयक्तिक अनुभवांची रसिकाला अत्यंत निकटची अशी प्रचिती देऊ शकते. अर्थात या प्रयत्नात हल्ली अलीकडच्या काव्यात जाणवणाऱ्या दुर्बोधता या काव्यात आढळत नाही. एखादा अनुभव काव्यरूप घेतो, त्यावेळी तो कवीच्या जाणिवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वतःचे रुप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वास्तविक ही रचना एकचित्रपट गीत आहे परंतु पारंपरिक ढाचाच्या पलीकडील अनुभव देणारी रचना आहे. उर्दूमढीक प्रथितयश शायर कैफी आझमी यांची ही शायरी आहे. ही शायरी जरा बारकाईने वाचली तर काव्यातील शब्दसंख्य प्रत्येक ओळीगणिक विषम आहे. अशी रचना स्वरबद्ध करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते कारण चालीचा मीटर ठरवणे अवघड असते. जरी २,२ ओळींचे अंतरे असले तरी तिला गझल वृत्तातील कविता असे म्हणता येणे कठीणआहे आणि याचे कारण विषम शब्दसंख्या!! असे असून देखील शायरीतील भावार्थ अतिशय गहिरा आहे. प्रत्येक शब्दाला *वजन* आहे. आता मुखड्यात *आसू भर आये* लिहिताना त्याची जोड *मुद्दते हो गयी मुस्कुराते* या ओळीशी करून, या कवीने अतिशय तरल परिमाण दिले आहे. मी पहिल्या परिच्छेदात लिहिताना "अनुभव निर्मितीच्या वस्तू विश्वातील अनेक वस्तू" हे शब्दाचे महत्व दर्शवणारे वाक्य इथे पूर्ण होते. गाणे अर्थातच अनेक चित्रपटात घासून पुसून गुळगुळीत झालेल्या विरही प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आहे परंतु जातिवंत कवी, त्यातही आपली प्रतिभा दाखवून देतो. *दिल की नाजूक रगे टुटती हैं, याद इतना भी कोई ना आये* अशा काहीशा विरोधाभासी भावनेशी येते आणि या ओळींशी ही कविता संपते.
संगीतकार मदन मोहन यांची स्वररचना आहे. मुखड्याची पहिली ओळ ऐकल्यास आपल्याला लगेच *जौनपुरी* रागाचीआठवण येते. इथे बरीच गंमत आहे. मुखडा जौनपुरी रागात सुरु होतो पण अंतऱ्यातील ओळी *काफी-सिंधुरा* या रागाच्या सुरांशी नाते जोडताना दिसते. आता थोडे तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, *मंद्र सप्तकातील शुद्ध निषादापासून ते दोन्ही धैवत* असा प्रवास आढळतो. वास्तविक जौनपुरी रागात *धैवत कोमल*असतो परंतु इथे आपल्याला शुद्ध आणि कोमल धैवत ऐकायला मिळतात. पहिलीच ओळ * रे म ग(को) रे सा सा रे नि सा ग(को) रे* या सुरांच्या अंगाने जाताना दिसते. अर्थात मुखड्याच्या दुसऱ्या ओळीत *दोन्ही धैवत* ऐकायला मिळतात. अर्थात हा थोडा जटील असा भाग आहे!!
आता आपण सरळ गाण्याकडे वळूया. स्वररचना अतिशय अवघड आहे, हे लगेच समजून घेता येते. इथे स्वरविस्ताराला वाव आहे परंतु एक संगीतकार म्हणून मदन मोहन यांनी प्रत्येक *जागा* अतिशय कौशल्याने बंदिस्त केली आहे . एक उदाहरण देतो. मुखडा सुरु झाल्यावर, दुसऱ्या ओळीत *मुद्दते हो गयी* म्हणताना चाल वरच्या सुरांत प्रवेश करते आणि तसे करताना एखादी हरकत घेणे शक्य होते परंतु मदन मोहन यांनी तिथेच लय वळवून घेतली आणि *मुस्कुराये* शब्दावर अचूक सम आणून ठेवली. मघाशी मी जो उल्लेख केला, तो इथे वेगळ्या संदर्भात करता येईल. मुखड्याची दुसरी ओळ केवळ ४ शब्दांची आहे तर पहिली ओळ ६शब्दांची आहे परंतु कवितेचा आशय बघता, हीच शब्दरचना योग्य वाटते आणि अशा वेळेस, संगीतकाराने शायरीचा योग्य तो मान राखून स्वरिक लय त्याला अनुसरून बांधली. कवीच्या शब्दांना किती महत्व देता येते, याचे हे एक सुरेख उदाहरण म्हणता येईल. वाद्यमेळ तर अतिशय मोजका आहे परंतु *गिटार* तसेच *सतार* या वाद्यांचा अतिशय वेधक उपयोग करून घेतला आहे. एकूणच स्वररचना ठाय लयीत बांधलेली असल्याने (ठाय लयीत गाणी बांधणे हे संगीतकार मदन मोहन यांचे खास वैशिष्ट्य सांगता येईल) ताल आणि त्यांचे आघात अगदी नाममात्र आहेत. नीट ऐकल्यास आपल्याला *रूपक* ताल मिळू शकतो परंतु मात्रांचे आघात अतिशय मृदू आणि संथ लयीत आहेत.
अशी काहीशी *अमूर्त* वाटणारी स्वररचना आणि ती बांधणारा संगीतकार मदन मोहन, म्हणजे गायन लताबाईंचे असणार, हे ओघाने येते!! गाण्याची सुरवात सरळ लताबाईंच्याच आवाजात होते. सर्वसाधारणपणे, कुठलेही गीत हे, सुरवातीला चालीचे *वजन* दर्शविणाऱ्या वाद्यमेळाने होते पण इथे तसे काही घडत नाही. इथेच गायिकेच्या गायनाची परीक्षा सिद्ध होते. चाल ऐकायला फार गोड आहे पण प्रत्यक्षात चालीतअसंख्य *खाचखळगे* आहेत. किंबहुना चाल कुठेही एका सरळ रेषेत जात नाही. असंख्य *कंगोरे* असल्याने गायन करताना सतत दक्षता घेणे आवश्यक. *हर कदम पर उधर मूड के देखा, उनकी महफिल से हम उठ तो आये* हा पहिलाच अंतरा या संदर्भात बघता येईल. एकतर या अंतऱ्याची *उठावण* संपूर्णपणे मुखड्याच्या चलनापेक्षा वेगळी आहे तसेच इथे *जौनपुरी* राग बाजूला सरतो आणि *काफी* रागाचे सूर समोर येतात. चाल एकदम वरच्या सुरांत जाते. मजेचा भाग म्हणजे अंतरा सुरु होण्याआधी जो वाद्यमेळ आहे त्यातून अशा प्रकारचे *सूचन* चुकूनही मिळत नाही परंतु अशी गुंतागुंतीची रचना लताबाईंनी कमालीच्या सहजतेने आपल्या गायनातून दर्शवली आहे. रागाच्या मूळ चौकटीपासून निघून या गाण्याची रचना उभी राहते आणि तसे करताना कुठलाही आक्रस्ताळेपणा (गायन वरच्या सुरांत गेलेले आहे, ही बाब लक्षात घेता ....) न करता, संयत भावनाविष्कार साधून संगीत कसे असू शकते त्याचा हा नमुना नि:संशय श्रवणीय आहे.
मदन मोहन यांच्या संगीतास वेदनेचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे त्यांच्या चाली चैतन्यमय चलनांतून उशी घेत उडणाऱ्या चेंडूसारख्या वाटत नाहीत आणि हे निरीक्षण ठाम करण्यासाठी प्रस्तुत गीताचे उदाहरण लक्षणीय ठरेल.
आज सोचा तो आंसू भर आये
मुद्दते हो गयी मुस्कुराये
हर कदम पर उधर मूड के देखा
उनकी महफिल से हम उठ तो आये
रह गयी जिंदगी दर्द बन के
दर्द दिल में छुपाये छुपाये
दिल की नाजूक रगे टुटती हैं
याद इतना भी कोई ना आये
(4) AAJ SOCHA TO AANSOO BHAR AAYE H@RRI 720P - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment