Tuesday, 29 September 2020
साऊथ आफ्रिकेतील मूळ रहिवासी
तसे बघायला गेल्यास, साऊथ आफ्रिकेतील जे मूळ रहिवासी आहेत - प्रामुख्याने कृष्ण वर्णीय, ते "मूळ" स्वरूपात फक्त प्रदर्शनात बघायला मिळतात. सध्याचे कृष्ण वर्णीय हे जवळपास इतर आफ्रिकन देशांतील कृष्ण वर्णीयांचेच बांधव आहेत. डर्बन येथील "१००० island" हा भागात आदिवासी कृष्ण वर्णीय, त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत रहात असतात अर्थात या १००० टेकड्यांपैकी सगळ्या टेकड्यांवर तुम्ही जाऊ शकत नाही, जसे अंदमान इथल्या काही बेटांवर जायला बंदी आहे तसेच इथे आहे परंतु आपल्याला जे बघायला मिळतात त्यात प्रदर्शनाचा भाग जास्त असतो. असो, तो मुद्दा थोडा वेगळा आहे. परंतु आजही या देशाच्या लोकसंख्येची वर्गवारी केल्यास, ६५% कर्षण वर्णीय, १५% गौर वर्णीय, १५% भारतीय आणि पाकिस्तानी तर कलर्ड वर्णाचे ५% असे प्रमाण सापडते. आता हे तर जागतिक सत्य आहे, इथे १९९२ पर्यंत वर्णवर्चस्व पद्धत होती आणि गोऱ्या लोकांनी अगदी ठरवून इथल्या बाकी लोकसंख्येचे मानसिक खच्चीकरण केले. यातूनच चळवळ उभी राहिली आणि नेल्सन मंडेलांचे नेतृत्व उदयास आले. साधारणपणे असे म्हणतायेईल १९८८ नंतर इथे सुधारणेचे वारे वाहू लागले परंतु याला अधिक जोर आला तो, नेल्सन मंडेलांची "रॉबिन आयलंड" इथल्या विक्राळ तुरुंगातून १९९२ साली सुटका झाल्यावर. अर्थात तोपर्यंत इथल्या कृष्ण वर्णीय आणि भारतीय वंशजांनी अपार भोगले. मी या देशात जुन १९९४ मध्ये गेलो आणि त्याच्या ३ महिने आधी मार्च १९९४ मध्ये इथे केंद्रीय निवडणूक झाल्या आणि लोकशाही पद्धतीने नेल्सन मंडेला निवडून आले. त्यामुळे जरी मला वर्णद्वेषाच्या प्रत्यक्ष झळा सोसाव्या लागल्या नसल्या तरी पुढे समाजाच्या अंतरंगात वावरायला लागल्यावर अनेक अनुभव समजायला लागले, काही वेळेस तर प्रत्यक्ष भोगायला लागले.
आजच्या साऊथ आफ्रिकेत भयानक असुरक्षितता आहे, कायद्याची पायमल्ली वारंवार होत असते, भ्रष्टाचार आता आचार झाला आहे पण या बाबी आजच्या आहेत. सुरवातीला १९९४ मध्ये मी संध्याकाळी रस्त्यावरून पायी हिंडत होतो आणि पीटरमेरित्झबर्ग शहर नजरेखालून घालत होतो. एकटाच रहात असल्याने संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बराच निवांत वेळ मिळत असे. वास्तविक हे गाव तसे लहानखोर असल्याने इथे वैय्यक्तिक ओळखी लगेच झाल्या, अर्थात भारतीय वंशाच्या लोकांशी प्रथम ओळखी होणे क्रमप्राप्तच होते. त्यातूनच इथे या समाजाने वर्णद्वेषी राज्यपद्धतीत किती भोगले, अनन्वित अत्याचार सहन केले यांच्या कहाण्या समजल्या. या देशातील बिगर गौर वर्णियांनी फार भोगले. समाजातील साध्या सुविधा देखील अप्राप्य होत्या. अर्थात इथे कृष्ण वर्णीय अधिक भरडले गेले कारण त्यांना आपण भरडले जात आहोत याचीच जाणीव सुरवातीला नव्हती. आपले आयुष्य असेच नकारार्थी आहे आणि असेच जगायचे आहे, हाच संस्कार वर्षानुवर्षे त्यांच्या मनावर झाला. शहरातील उत्तम राहायच्या जागा या नेहमीच गौर वर्णियांना मिळणार, शैक्षणिक सुविधा आणि उच्च शिक्षण हे गौर वर्णियांनाच प्राप्त होणार. इतकेच कशाला, डर्बन इथले अप्रतिम सागर किनारे देखील गौर वर्णीयांचे निराळे, कृष्ण वर्णीयांचे निराळे आणि भारतीय वंशजांसाठीचे निराळे अशी विभागणी केली होती आणि तसे कायदे बनवले होते. उच्च पगाराच्या नोकऱ्या या खास गोऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेल्या असायच्या आणि हलक्या दर्जाची कामे हि काळ्या लोकांनी करायची असे वर्षानुवर्षे चालू होते. खुद्द नेल्सन मंडेला उच्च शिक्षित बॅरिस्टर होते पण त्यांना संधींची वानवा होती आणि तिथे खरी ठिणगी पडली. साल १९५५ की १९५७ असावे पण त्या वर्षी मंडेलांना आपल्यावरील जुलमाची जाणीव झाली आणि चळवळ खऱ्याअर्थी लोकाश्रयी व्हायला लागली. परंतु सगळे स्थिरस्थावर व्हायला १९९२ साल उजाडावे लागले!! पीटरमेरित्झबर्ग शहरात आजही Raisethorpe हे उपनगर केवळ भारतीय लोकांचे आहे तर शहराबाहेरील गचाळ वस्ती ही प्रामुख्याने काळ्या लोकांचीच आहे.
आजही शहरातील उत्तम व्यवस्था, सुरक्षित आणि कडेकोट बंदोबस्त वगैरे सुविधा या एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या वस्तीत सापडतात. अर्थात त्या जागेत आता कुणीही राहू शकते परंतु परिस्थिती अशी आहे,अशा वस्तीत घर घ्यायचे म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली हवी आणि काळे लोकं अजूनही त्याबाबतीत फार उदासीन आहेत, हे दुर्दैव. या बाबतीत एक स्वानुभव सांगतो. मी २००४ साली Standerton इथल्या गावात U.B.group (विजय मल्ल्या पुरस्कृत) मध्ये नोकरीला लागलो. Department Head या न्यायाने माझ्याकडे Stock Checking हे महत्वाचे काम होते आणि त्यानिमित्ताने साऊथ आफ्रिकेच्या अंतर्भागातील आमच्या बियर हॉल, वगैरे जागी जाऊन प्रत्यक्ष Stock तपासण्याचे काम करावे लागत असे. त्यानिमित्ताने या देशातील अंतर्भाग बघायला मिळाला. आजही इथे असंख्य काळे लोकं शेणमातीच्या घरात रहात असतात. मला नेहमी प्रश्न पडायचा - इथे जुन आणि जुलै महिन्यात -६ तापमान असताना अशा मोडकळीस आलेल्या घरात हे लोकं रहातात तरी कसे? रोजच्या खाण्याला मारामारी असते आणि घरात खाणारी तोंडे भरपूर!! बियर हॉलला भेट देणे म्हणजे दिव्य असायचे. सगळीकडे कुबट वास भरलेला असायचा, कुणीतरी काळा अति बियर पिऊन झिंगलेला असायचा, कुठंतरी जमिनीवर बियर सांडलेली असायची आणि अशा वातावरणात मला Beer Stock बघायला लागायचा. परंतु इथे काळ्या लोकांना या वातावरणाची इतकी सवय झालेली असते की त्याचे त्यांना काही वाटतच नाही. बरेचवेळा तिथून निघायला मला संध्याकाळ व्हायची आणि परतीच्या प्रवासात असताना, या शेणामातीच्या घरात कुठेतरी एखादी चिमणी पेटलेली असायची, इलेक्ट्रीसिटीचा पत्ताच नसायचा!! ही परिस्थिती २००४ सालची म्हणजे स्वातंत्र्य मिळून १० वर्षे झाली होती. याचा परिणाम असा झाला, शहरातील गुंडगिरीत काळ्या लोकांचा सहभाग भरपूर वाढला, भ्रष्टाचार वाढला. वास्तविक आता कायद्याने काळ्या लोकांना भरपूर सुविधा मिळत आहेत, काही काळे आता फार मोठ्या पदावर कार्यरत आहेत पण एकूणच प्रमाण तसे नगण्यच आहे. शहरातील गुंडगिरी याच काळ्या लोकांनी पोसली आहे. इथे आता तर गावात देखील सहजपणे ड्रग्ज मिळत आहेत, रिव्हॉल्वर तर भाजी विकत घ्यावी इतक्या सहजपणे मिळत आहेत. अमेरिकेत जे घडते त्याचेच प्रत्यंतर या देशात दिसत आहे. झाडावरून फळ तोडावे तसे जीव घेतात.
आजही एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला तिरस्काराची किंवा दुर्लक्षित वागणूक सहन करायला लागते आणि जरा तुम्ही खडसावून वागायला लागलात तर उर्मट वागणूक मिळते. अर्थात याचे महत्वाचे कारण म्हणजे गोऱ्या कातडीला मिळणारे अपरंपार महत्व आणि हे गोऱ्या कातडीचे सगळे जाणून आहेत. इथे वर्णद्वेषी व्यवस्थेने इथल्या लोकांची मानसिक घडीच बिघडून टाकली आहे. आपल्यावर अन्याय झाला हे देखील त्यांना जाणवून दिले नव्हते. सगळ्या समाजाची बुद्धी भ्रष्ट करून टाकली होती. गोऱ्या लोकांनी या देशाला जवळपास लुटले असे म्हणता येईल पण हे तर जगभर त्यांनी केले आहे. भारतात काय वेगळे केले, इतर आफ्रिकन देश लुटून खंक केले आणि मग देश सोडून निघून गेले. आजही इथे शिक्षण अतिशय महाग आहे परंतु काळ्या लोकांना शिक्षण फी मध्ये भरपूर सवलती आहेत. परंतु फारच थोड्या लोकांनी याचा फायदा उठवला. बहुतेक काळे हे Easy Money मिळवण्याच्या मागे लागले. मुळात अंगपेराने दणकट शरीरयष्टी असल्याने, इथे गोऱ्या लोकांनी त्यांच्या कडून नेहमीच अंगमेहनतीची कामे करवून घेतली आणि ती देखील अत्यंत तुटपुंज्या पैशात!! आजही परिस्थिती अशी आहे, घरकामाला तुम्हाला गौरवर्णीय मुलगी किंवा स्त्री सापडणार नाही पण कृष्णवर्णीय मुली अत्यंत स्वस्तात घरकामाला मिळतात. त्या मुली देखील असाच विचार करतात, घरात अठराविश्वे दारिद्र्य आहे तेंव्हा जिथे पैसे मिळण्याची शक्यता जास्त, त्या घरकामात त्या गुंतून जातात. याचा परिणाम गुन्हेगारीत अतोनात झालेली वाढ. आज एकही आठवडा असा जात नाही जिथे त्या शहरात बलात्कार झाला नाही किंवा दरोडा पडला नाही किंवा मारहाण करून यमसदनास धाडले नाही. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ठळकपणे अशा बातम्या वाचायला मिळतात!! आर्थिक असमानता या देशात भयानक आहे आणि या विपत्तीत प्रामुख्याने काळा समाज अडकलेला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहे ते आलिशान आयुष्य जगत आहेत आणि बाकीच्यांकडे रोजच्या जेवणाची भ्रांत आहे आणि तरीही हे लोकं ड्रिंक्स घ्यायला नेहमी पुढे असतात!! इथे "माझे कुटुंब" या शब्दाला किंमत नाही तसेच लग्नसंस्था तर अशी हेलकावे घेत आहे की जहाजाला कुठे भोक पडले आहे आणि कुठे जहाजात पाणी शिरत आहे, हेच कळत नाही!! देशातील ४५% लोकसंख्या एड्सने ग्रस्त आहे!! आणि या व्याधीत प्रामुख्याने काळा समाज आहे.
सोन्यासारखा देश आहे पण हळूहळू गर्तेत सापडून निकामी होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment