Wednesday, 2 September 2020
हेमराज वाडी - भाग १०
दातेमास्तर!! लहानखोर शारीरिक चण, स्थूलाकडे झुकणारा बांधा, जाड चष्मा एकूणच संथ चाल, काहीसे घारे डोळे असे एकुणात वर्णन करता येईल. दातेमास्तर माझ्या घराच्या समोरील इमारतीत रहात होते आणि मला शाळेत ड्रॉईंग विषयाचे शिक्षक होते. ड्रॉईंग हा माझा कधीच आवडता विषय नव्हता. कागदावर साधे वर्तुळ काढायचे कधी जमले नाही. पौर्णिमेच्या झगझगीत चंद्राचे वाटोळेपण माझ्या या विषयाच्या पेपरला, परीक्षेतील गुणांबाबत साजेसे सिद्ध होत असे!! शाळेत दातेमास्तर चांगल्यापैकी मिस्कील बोलायचे, क्वचित चेष्टामस्करी करायचे. चालण्याची ढब अतिशय संथ असायची. आम्हाला चित्रकलेच्या तासाला एखादा विषय द्यायचे परंतु मला तरी त्यावेळच्या व्हायला अनुसरून बोलायचे झाल्यास, त्यांच्या नकला फार आवडायच्या. वर्गात कंटाळा आला असे दिसले की मास्तर निरनिराळ्या व्यक्तींच्या नकला सादर करायचे आणि वर्गात तजेला आणायचे. विशेषतः वेगवेगळ्या ढंगांच्या स्त्रिया, हा त्यांचा आवडीचा विषय असायचा. मग त्या स्त्रियांचे बोलणे, चालणे, एखादी विशीष्ट ढब इत्यादी प्रकाराने त्या स्त्रीचे व्यक्तिमत्व आमच्यासमोर उभे करायचे. मग तुच्या बोलण्याच्या शैलीचे वैशिष्ट्य सांगायचे. माझ्या त्या व्हायला हे सगळे अद्भुत वाटायचे आणि तो तास नेहमीच चटकन संपला असेच वाटायचे. त्यांनी काढायला सांगितलेले चित्र, मी कधी पूर्ण केल्याचे फारसे आठवत नाही.
खरे म्हणजे मास्तर आमच्या घराच्या समोर राहायचे म्हणजे एका दृष्टीने शेजारीच होते परंतु निदान शाळेत तरी अशी ओळख दाखवल्याचे स्मरत नाही. चित्रकलेचा तास संपला की मास्तर नेहमी एकांतात वावरायचे. वास्तविक त्यांचा वर्ग हा शाळेतील सर्वात वरच्या म्हणजे चौथ्या मजल्यावर भरत असे परंतु तास संपल्यावर, आमच्याबरोबरीने जिन्यातून खालच्या मजल्यावर उतरायचे पण जिना उतरताना क्वचित कधी ओळखीचे स्मित केल्याचे आठवत आहे अन्यथा वर्गातील एक साधा विद्यार्थी अशीच ओळख डोळ्यांतून दिसत असे. पायऱ्या चढताना किंवा उतरताना, त्यांनी कधीही घाई केल्याचे आठवत नाही. नेहमीच शांतपणे पायऱ्या उतरणार आणि पहिल्या मजल्यावरील शिक्षकांच्या खोलीत जाऊन बसणार. या शिक्षकांच्या खोलीत, कामाशिवाय जायला आम्हा विद्यार्थ्यांना परवानगी नसल्याने, तिथे मास्तर इतरांशी कसे वागत, बोलत हे समजलेच नाही. परंतु त्यांचा वर्गात दिसणारा उत्साह, काहीसा बडबड्या स्वभाव इतरत्र फारसा दिसला नाही.
मी त्यांच्या वर्गात बरीच वर्षे होतो म्हणजे सातवीपर्यंत तरी आम्हाला चित्रकलेचा तास असायचा आणि मी त्या तासाला जात असे. पुढे चित्रकला विषय वाट्याला आला नाही आणि मसरांशी संपर्क तसा कमी होत गेला. मास्तर जिथे रहात होते, त्यांच्या खोलीच्या शेजारी आमचा मित्र मंदार आणि त्याचे आई, वडील आणि बहिणी रहात होत्या. मी त्याच्याकडे अधून मधून जात असे तर त्यांच्या वरच्या मजल्यावर आमचे खरे मित्रमंडळ रहात होते. माझा त्यामुळे चौथ्या मजल्यावर वावर बराच असायचा. मी, राजू आणि मोहन खरे म्हणजे करेल वाडीत आमचे घर होते (अर्थात लौकिकार्थाने) परंतु बालपण सगळे हेमराज वाडीत आणि ते देखील प्रामुख्याने इ ब्लॉक मधील चौथ्या मजल्यावरच गेले. दाते मास्तर खालच्या मजल्यावर रहातात याचा पहिले काही दिवस पत्ता नव्हता परंतु एकेदिवशी अचानक शोध लागला. एकूणच आमचा ग्रुप हा अति वांड, मस्तीखोर, आणि सतत काहीना काहीतरी उचापत्या करणारा होता. एकमेकांच्या टोप्या उडवणे तर नित्याचे होते. त्यातून कुणाच्यातरी डोक्यात कल्पना आली - रविवार दुपारी दातेमास्तरांच्या दरवाजाची कडी वाजवायची आणि "काय दाते मास्तर उठला का?" अशी आरोळी मारून पळून जायचे!! सुरवातीला मास्तरांना काहीच कल्पना यायची नाही कारण ते उठून दरवाजा उघडीपर्यंत आम्ही सगळे वरच्या मजल्यावर उद्या मारीत जात असू. वरून खाली मास्तर उठले का? याची टेहळणी करीत असू आणि त्यातून फाजील आनंद लुटत असू.
असा आमचा खेळ पहिले काही आठवडे यशस्वीपणे चालू होता आणि मास्टर संत्रस्त होत असत. मास्तरांची झोपमोड होते, याचाच आम्हाला आनंद व्हायचा!! वास्तविक रविवार दुपार म्हणजे जेवण घेऊन वामकुक्षी घेण्याची वेळ आणि अशा वेळी दारावर आवाज करून झोपमोड होणे, हा खरंतर त्रासदायक प्रकार पण आम्हाला कुणालाच याची क्षिती नसायची. एकदा मात्र अनावस्था प्रसंग ओढवला. त्यावेळी आम्ही भाऊ ठराविक रंगाच्या चड्ड्या घालीत असू. त्या रविवारी, मोहनने, माझ्याच रंगाची - लाल रंगाची चड्डी घातली होती. त्या रविवारी दुपारी, मी त्यांच्या दरवाज्याची काडी वाजवली आणि पळायला सुरवात केली. मास्तर बहुदा दबा धरून बसले असावेत कारण त्यांनी लांबून लाल रंगाची चड्डी बघितली!! मास्तर तरातरा जिना चढून वर आले. आम्ही तिथे जिन्यावरच बसलो होतो तिथे येऊन आमच्यावर ओरडायला सुरवात केली. आमची खऱ्याअर्थी पाचावर धारण बसली होती. मास्तरांच्या मोठ्या आवाजाने, जिन्याशेजारी रहाणारे टिल्लू अप्पा बाहेर आले!! तितक्यात मास्तरांना मोहनची लाल चड्डी दिसली आणि त्यांनी मोहनला मारायला हात उगारला!! तत्क्षणी टिल्लू अप्पा मध्ये पडले आणि त्यांनी "अरे दाते काय करत आहेस, थांब" असे ओरडून मास्तरांचा हात वरच्यावर धरला. एव्हाना आमची खऱ्या अर्थी तंतरली होती. कुणाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता परंतु टिल्लू अप्पांच्या, बहुदा सगळं प्रकार ध्यानात आला असणार आणि त्यांनी तो प्रसंग हाताळला. मास्तर तणतणत खाली गेले आणि टिल्लू अप्पा किंचित स्मित करून त्यांच्या घरात गेले. पुढील बराच वेळ आम्ही सगळे मित्र मुक्तपणे गप्प बसलो होतो. वास्तविक आमची कृती ही विकृती होती. एका वयस्कर वयाच्या माणसाची रविवारी झोपमोड करणे, याला कुणीही सभ्य कृती म्हणणार नाही पण आम्ही तरी कुठे सभ्यपणाचा दावा करीत होतो म्हणा!!
शाळा सुटली किंवा आमही सगळे आठवीत गेलो आमचा मास्तरांशी येणारा संबंध कमी होत गेला.मास्तरांनी लग्न केले नव्हते आणि तसे ते एकांड्या वृत्तीचे होते. एकाच खोलीत ते राहायचे, तिथेच जेवण करून घ्यायचे, तिथेच झोपायचे. शाळा सोडल्यास त्यांचे भावविश्व फार मर्यादित होते. घरी असताना, चट्टेरी पटेरी अर्धी चड्डी आणि अंगात बिन बाह्यांचा गंजी घालून वावरत असत. कधीकधी ते घराच्या बाहेर येऊन, एखाद्या वहीवर स्केचेस काढत आणि ते आम्हा वरून बघताना कळत असे. मास्तरांनी लग्न केले नसले तरी स्त्री विषय त्यांना वर्ज्य नव्हता. त्यासारख्या इमारतीच्या पाठीमागे तेंव्हा विस्तृत असा धोबीघाट होता आणि तिथे अनेक तरुण स्त्रिया कपडे धुवायला येत असत. कपडे धुण्याच्या त्या तारूंच्या लकबी कागदावर चित्रांच्या साहाय्याने रेखाटन करणे, हा मास्तरांचा छंद होता. त्यावरून आम्ही मित्र एकमेकांच्यात मनसोक्त चेष्टा करीत असायचो. अर्थात रविवारी दुपारी त्रास देण्याचे मात्र थांबवले!! आमचे त्यांच्याशी कधीही वैय्यक्तिक संबंध जुळले नाहीत आणि याला कारण मास्तर स्वतःच होते. आयुष्यभर एकटे राहिल्याने स्वभावात हेकटपणा, चिडचिडा आला होता. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तांबे कुटुंबाशी त्याचा सतत वाद, क्वचित भांडणे व्हायची आणि ते सगळे प्रसंग आम्ही मित्र चवीचवीने एन्जॉय करीत होतो. जवळपास संपूर्ण आयुष्य त्यांनी इ ब्लॉकमध्ये काढले पण कुणाशीही जवळकीचे संबंध ठेवले नाहीत. मला वाटते, त्यांना सारखे वाटायचे - मला आयुष्याने काही दिले नाही मग मी इतरांना काय आणि कशाला काही देऊ? त्यांना तशी व्यसने काही असल्याचे आढळले नाही. एकूणच टिपिकल कोकणस्थी एकांडा संसार चालला होता. त्यांचा एक दूरच नातेवाईक कधीतरी त्यांच्याकडे रहायला यायचा पण त्या नातेवाईकाचा सुद्धा इतरांशी संपर्क शून्य. त्यामुळे मास्तर उत्तरोत्तर घुमे आणि काहीसे विकृत होत गेले. एक प्रसंग ठळकपणे मला आठवत आहे. तेंव्हा हेमराज वाडीत रेडियोवरील गायक आर.एन.पराडकर रहात होते. त्यांची विशेषतः दत्ताची भजने खूप प्रसिद्ध झाली होती. परंतु बहुदा वार्धक्याने त्यांचा गळा काम करीनासा झाला आणि तो गायक घरीच रहायला लागला. अर्थात चाळीत अशा बातम्या लगोलग पसरतात तशी सगळ्या वाडीला ही बातमी समजली.
एका सकाळी. मास्तर गॅलरीत फेऱ्या मारीत असताना, त्यांना बहुदा समोरच्या चाळीत कुणातरी ओळखीचे दिसले असावे. लगेच संपूर्ण जगाला ऐकायला जाईल अशा मोठ्या आवाजात मास्तर बोलले - "अरे काय झाले त्या पराडकरला? आयुष्यभर दत्त दत्त करून शेवटी त्याच दत्ताने आवाज काढून घेतला ना!!" आणि स्वतःच मोठ्याने हसायला लागले. वास्तविक ही भयानक विकृत कुचेष्ठां होती. मी आणि माझ्या आईने हे सगळे बघितले आणि ऐकले. आई तर सर्दच झाली होती आणि मला देखील, त्या वयात देखील फार वाईट वाटले. आईने तर मला, मास्तर किती कृतघ्न आणि विकृत आहेत, हेच पटवून सांगितले.
पुढे आम्ही सगळेच कॉलेजमध्ये जायला लागलो आणि मास्तर आमच्या आयुष्यातून दुरावले पण हे तर विधिलिखितच होते. मी माझ्या मित्रांना भेटायला जात असे पण यात मास्तर कुठेच नसायचे. पुढे मी परदेशी गेल्यावर तर मास्तर कायमचे विस्मृतीत गेले. एकदा असाच सुटीवर आलो असताना, त्या वर्षात मास्तर गेल्याची बातमी समजली. अगदी मनापासून कबूल करायचे झाल्यास, ऐकलेल्या बातमीने मला काहीसुद्धा वाटले नाही कारण एकच - मास्तरांचा एकलकोंडेपणा आणि घुम्या स्वभाव. अखेर मास्तर देखील माणूसच होते. घुम्या स्वभावाने आतल्या आत कुढत असणार, कुठेतरी पश्चात्तापाची प्रसंग आठवत असणार पण ही बातमी ऐकून माझ्या मनात काहीही विचार आले नाहीत. जे विचार आले ते आता हे सगळे लिहिताना आले इतकेच.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment