Thursday, 3 September 2020
मुळावकर काकू
काकूंची ठेवणं अगदी साधी होती. व्यक्तित्व डोळ्यात भरेल असे अजिबात नव्हते. एकतर उंची ५ फुटाच्या आतबाहेर, किंचित सावळ्या रंगाकडे झुकणारा वर्ण, शरीराची चण काहीशी हडकुळी होती परंतु काकू बोलायला लागल्या की डोळ्यात तेज यायचे. मुळातला स्वभाव अति मायाळू. काकू कधी रागावतील असे आम्हाला कधीच वाटले नाही. किंबहुना काकूंच्या घरी मी असंख्य वेळा गेलो होतो. काकूंची दोन्ही मुले आजही माझे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात मला विनातक्रार प्रवेश होता. काकू कधीही स्वस्थ बसल्या आहेत असे फारसे दिसले नाही. अर्थात काकू झाल्या तरी माणूसच होत्या तेंव्हा शरीराला कधीतरी दमछाक ही जाणवणारच पण आमच्या नजरेस कधी पडली नाही. सतत घरकामात गर्क असायच्या. कधी शिवणकाम, कधी घरासाठी जेवण बनवायचे इत्यादी कामात ही बाई नेहमी तंगडलेली असायची. काकूंना मी, त्यासारख्या काळ्याभोर एक शेपटा (क्वचित अंबाडा) वेणी घालून बघितले होते आणि पुढे वय वाढल्यावर केसांतील रुपेरी सौंदर्य देखील बघितले होते. परंतु माझ्या मनावर कायमचा ठसा उमटला तो त्यांचा हसतमुख चेहऱ्याचा. त्यांच्या घरी कधीही गेलो तरी काकू "अरे अनिल, ये. काय म्हणतोस?" अशीच बोलायची सुरवात व्हायची आणि घरात कधी बाहेरच्या खोलीत तर कधी आतल्या खोलीत बसायला सांगायच्या आणि घरातील कामात गर्क व्हायच्या. वास्तविक मी त्याच्या घरी जायचो ते त्यांच्या मुलांना भेटायला पण प्रत्येक वेळी त्यांची मुले घरी असायचीच असे नाही मग कधी मुळावकर नाना माझ्याशी बोलायला यायचे - या माणसाशी सुरवातीला कधीही मोकळेपणाने बोलूच शकलो नाही कारण नानांचे डोळे!! परंतु या डोळ्यांच्या विरुद्ध काकूंचे स्निग्ध डोळे असायचे. ही स्निग्धता मावळली, जेंव्हा काकू अखेरच्या प्रवासाला गेल्या तेंव्हाच!!
घरी गेलो आणि काकू स्वयंपाकघरात काही करत असतील तर आवर्जून मला खायला द्यायच्या, अगदी मनापासून आग्रह करीत द्यायच्या.
मग माझ्या आई-वडिलांच्या प्रकृतीची चौकशी व्हायची. तसे या दोन्ही कुटुंबाचे संबंध कौटुंबिक होते. अर्थात गाठीभेटी कामानिमित्तच व्हायच्या. माझी आई देखील १९७३ पर्यंत नोकरी करीत होती आणि काकू एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायच्या. अर्थात व्यवसाय म्हणून शिक्षिका असा स्वीकारला तरी आम्हा मुलांवर त्यांनी त्याचा प्रयोग फार केल्याचे आठवत नाही. किंबहुना कुणाला "उपदेश" करावा हा काकूंचा स्वभावच नव्हता. मात्र काकू आमच्यात मिळून मिसळून असायच्या, इकडचा, तिकडचा विषय काढून गप्पा मारायच्या. आम्ही त्यावेळी शाळेतील अर्ध्या चड्डीतील मुले होतो पण हे पिढीतील अंतर काकूंच्या बाबतीत कधीच जाणवले नाही. किंबहुना त्यावेळच्या आमच्या वयाचा विचार करता, काकूंनी पुढाकार घेऊन ते अंतर मिटवले होते.
काकुंशी आमचा अतिशय जवळचा संबंध आला तो, त्यांच्या घरातील गणपती आम्हा मित्रांनी एकत्रितपणे साजरा करण्याच्या निमित्ताने. आता आठवत नाही पण आमच्यापैकी कुणाच्या तरी डोक्यात ही शक्कल आली होती आणि आम्ही सगळ्यांनी उचलून धरली होती. वास्तविक, हा मुळावकर कुटुंबाचा गणपती तरीही आम्ही सगळया मित्रांनी एकत्रितपणे साजरा करायचा घाट घातला होता. जवळपास ३,४ वर्षे हा उपक्रम आम्ही चालवला होता. गणपती निमित्ताने, घरातील मूर्तीचे डेकोरेशन करणे, त्यानिमित्ताने रात्री काहीतरी मनोरंजात्मक कार्यक्रम करणे इत्यादी उद्योगात काकूंची आम्हाला पूर्ण साथ होती. आम्ही त्यावेळी त्यांच्या घरातच सदासर्वकाळ वावरत होतो आणि निव्वळ झोपण्यासाठी घरी जात होतो. वास्तविक मूर्तीच्या आराशीचे काम मुख्यतः प्रशांत आणि अरविंद हेच दोघे बघायचे. आम्ही शाळेतील अर्धवट वयाचे विद्यार्थी तेंव्हा आराशीसाठी पैसा कुठून आणायचा? इथे काकू मदतीला यायच्या, आम्हाला जमेल तशी मदत करायच्या. एक नक्की, आम्ही मित्र, ती ३,४ वर्षे काकूंच्या घरात मनसोक्त हुंदडण्यात घालवली, अतिशय निर्व्याज आनंदाचे धनी झालो. एक बाब अजूनही आठवत आहे, जरी त्यांच्या घरात वावरत असलो तरी शक्यतो नानांच्या संपर्कात येण्याचे टाळत होतो!!
पुढे आमची वये वाढली, नव्या विचारांची मिसरूड फुटायला लागली आणि आम्ही मित्र चारी दिशांना पांगायला लागलो. अर्थात ही तर जगरहाटीच होती म्हणा. मग कधीतरी काकू रस्त्यात भेटायच्या, आवर्जून घरी यायचे आमंत्रण द्यायच्या, अगदी निर्व्याज गप्पा मारण्याचे आमंत्रण असायचे पण का कुणास ठाऊक, जितक्या गप्पा मारणे शक्य होते त्याच्या निम्म्याने देखील गप्पा मारल्या नाहीत. काकूंच्या घरात जाण्यासाठी खरतर आमंत्रणाची गरज देखील नसायची इतके घरगुती संबंध होते पण अनेक कारणे झाली, नवनवीन व्यापात अडकणे व्हायला लागले आणि त्यांच्या घरी जाण्याचे प्रसंग कमी व्हायला लागले. यात एक मुद्दा अवश्य मांडायला हवा, जेंव्हा कधी मी त्यासारख्या घरी जात असे, तेंव्हा घरी येणे कमी झाले, याची त्यांनी चुकूनही खंत व्यक्त केली नाही पण त्याचे असे झाले, प्रशांत १९८३,८४ च्या सुमारास दुबईला नोकरीनिमित्ताने गेला आणि हळूहळू माझे जाणे कमी होत गेले, तरीही प्रशांत सुटीवर घरी आला की त्याला भेटण्याच्या निमित्ताने काकूंची भेट व्हायची. इतरांना काहीही न बोलता समजून घेणे, हे काकूंचे खास वैशिष्ट्य होते.
पुढे मी देखील परदेशी गेलो आणि माझ्या भेटी विरळ व्हायला लागल्या. प्रदीप, सुरेश यांच्या भेटी बाहेरच व्हायला लागल्यावर घरी जायचे प्रसंग कमीच झाले. आमची बहुतेकांची लग्ने झाली आणि आमचे संसार सुरु झाले. अर्थात या सगळ्या मायंदळीत एक क्षण मात्र कायाचा माझ्या मनात चिरंतन झाला. २००१ साली मी साऊथ आफ्रिकेतून प्रकृतीच्या कारणास्तव भारतात परतलो आणि त्यावेळचे दिवस सगळेच अंधारी होते. तशात एकदा मी सुरेश, प्रदीप यांना भेटायला चौथ्या मजल्यावर गेलो होतो, नुकताच प्रशांत देखील सुटीवर आला होता. माझी ट्रीटमेंट भरात आली होती आणि प्रदीप मला म्हणाला - अनिल घरी ये, आई, नाना बोलावत आहेत. मला एकूण कल्पना आली होती. सुरवातीचे काही क्षण सगळेच अवघडल्यासारखे झाले होते पण शेवटी मीच पुढाकार घेऊन, सविस्तर माहिती दिली. काकूंनी लगेच "अनिल, नाना कसे आहेत?" हा प्रश्न विचारला तशी मी काहीतरी तुटपुंजे उत्तर देऊन वेळ मारून नेली. पुढे काही दिवसांनी, कदाचित काही आठवड्यांनी असेल पण मी घरातील काही कामानिमित्ताने बाहेर आलो होतो आणि अचानक काकू समोर आल्या. "अनिल कसा आहेस?' हा प्रश्न विचारला आणि लगेच माझा हात हातात घेऊन किंचित दाबला. काकूंनी चेहऱ्यावरील खळबळ लपवली होती तरी त्यांचे डोळे बोलके होते. मी काहीच बोललो नाही आणि काकूंनी माझा हात सोडला. रहदारीचा रस्ता असल्याने, आम्ही वेगळा रस्ता पकडला पण तो, विव्हळ स्वरांतील प्रश्न आजही माझ्या मनात आहे आणि बहुदा कायमच माझ्या सोबत राहील. कोण कुठल्या काकू? माझ्या मित्रांची आई, हेच खरे नाते परंतु काकूंनी त्यापलीकडील जिव्हाळा मला दर्शवला. खरतर मी त्यांना आता वर्षानुवर्षे भेटत नव्हतो तरीही काकूंनी नाते राखले होते. माझ्याकडून दिरंगाई झाली होती पण काकूंच्या वागण्यात त्याचा लवलेश देखील नव्हता.
मी पुन्हा परदेशाची वाट पकडली. आता तर प्रशांत दुबईला स्थिरावला होता आणि प्रदीपने आपला संसार वेगळा थाटला होता. सुरेश देखील त्याच्या कामात नको तितका गर्क झाला होता. परिणामी २०११ साली मी भारत कायमचा परतलो तरी जिथे आमच्याच भेटी दुरावल्या तिथे काकूंशी भेटणे दुरापास्त होणे, क्रमप्राप्तच होते. असे झाले तरी कधीतरी अवचितपणे काकू रस्त्यात भेटायच्या आणि आवर्जून घरी येण्याचे आमंत्रण द्यायच्या. खरंतर आता, त्या घरात फक्त दोघेच रहात होते, एकमेकांना साथ देत.
मी मुंबईत आलो आणि पुन्हा माझ्या संसारात गर्क झालो. नव्याने आयुष्याची घडी बसवायची होती. त्यातून आता इ ब्लॉकमध्ये जायचे तर कुणासाठी? हा प्रश्न उभा राहिला. सुरेश होता पण सुरेशच्या भेटी, उंबराच्या फुलांप्रमाणे दुर्मिळ झाल्या होत्या आणि पुढे सुरेशने देखील हेमराज वाडी सोडली आणि इ ब्लॉक, माझ्या दृष्टीने रिकामा झाला होता.
अचानक एके रात्री सुरेशचा फोन आला - "अनिल, मुळावकर काकू गेल्या!!" अशावेळी काय बोलायचे? वय तर झालेच होते तेंव्हा निजधामाच्या प्रवासाचा धक्का तर बसला नव्हता तरीही बातमीतील "अचानक" हा धक्का बसलाच. त्या दिवशी काकू काही कामानिमित्ताने खाली उतरल्या होत्या आणि परत घराचे जिने चढताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आता असा झटका का,कधी, आणि केंव्हा येतो याचे गणित अजूनतरी वैद्यकीय शास्त्राला सोडवता आले नाही. काकू जिन्यातच कोसळल्या आणि मग कुणीतरी त्यांना उचलून घरी आणले!! आता प्रशांतची वाट बघणे क्रमप्राप्तच होते आणि तसा प्रशांत आला. काकू इथे इतरांपेक्षा फार वेगळ्या ठरल्या. त्यांनी लिहूनच ठेवले होते, प्राणोत्क्रमण झाल्यावर, डोळे आणि त्वचा हॉस्पिटलला दान करायचे. आता काकुंचीच इच्छा म्हटल्यावर विरोधाचा प्रश्नच नव्हता. वास्तविक आजही आपण अशा गोष्टी टाळण्याकडे वळतो आणि "अंतिम संस्कार" सारख्या निरर्थक कर्मकांडात गुंतत जातो. काकू किती आधुनिक विचाराच्या होत्या, याचा रोकडा अनुभव दिला. पुढे त्यांनी आणखी इच्छा लिहून ठेवली होती, आपले निश्चेष्ट शव हे हॉस्पिटलला दान द्यावे. आधुनिक विचारसरणी आचरणात आणावी तर अशी!! एक शांत निरांजन तेवण्याचे थांबले. एक वर्तुळ पूर्ण झाले!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment