Saturday, 8 August 2020

पार्वती वेची बिल्वदळे

 


आजचे आपले गीत ही एक भूपाळी आहे. भूपाळी ही बव्हंशी मराठी संस्कृतीशी अधिक करून जोडली गेलेली आहे आणि तिचा अंतर्भाव मराठी लोकसंगीत हा सांगीतिक गटात करता येईल. एका बाजूने विचार केल्यास, "भूपाळी" हे एकप्रकारे ईश्वर स्तवन म्हणता येईल कारण भूपाळीमध्ये बहुतेकवेळा कुठल्यातरी देवाची आळवणी केलेली असते तरी देखील भूपाळी इतर भक्तिसंगीतापेक्षा वेगळी असते. एकतर भूपाळी ही फक्त पहाटे गायली जाते. पहाटे म्हणजे नुकताच सूर्योदय होत असताना. त्याचबरोबर काही विधी असतात. पूर्वीच्या काळी प्रत्येक छोटेखानी घराच्या समोर छोटेसे अंगण असायचे, त्या अंगणात तुळशीचे रोपटे लावलेले तुळशी वृंदावन असायचे आणि घरातील कर्ती स्त्री अंगण सारवण करताना आणि इतर झाडांना पाणी घालताना अत्यंत विश्रब्ध मनस्थितीत गायली जायची. आता आधुनिक काळात हा विधी लोप पावल्यातच जमा आहे. अर्थात दिवस सुरु व्हायच्या आधी ही गाणी गायली जात असल्याने, गाण्याचे स्वरूप हे आळवणी तर असायचेच पण स्वर आनंदी असणे क्रमप्राप्तच ठरत होते. जेणेकरून दिवसाची सुरवात आशादायक सुरांनी व्हावी. 
आता पारंपरिक भक्तिसंगीतापेक्षा हा प्रकार वेगळा का आणि कसा? भक्तिसंगीतात वापरली जाणारी बहुतेक वाद्ये लयीचे स्पंद निर्माण करणारी असतात. त्यांचा ध्वनी मोठा, बांधणी टणक आणि बहुदा धातूच्या किंवा लाकडाच्या ध्वनीसारखा ध्वनी देणारी असते. घन आणि अवनद्ध वाद्यांचा भरणा सहज लक्षात येतो. शिवाय ही वाद्ये अनिश्चित तारतेची असतात. सुषिर (फुंकण्याची) वा तत (छेडण्याची) वाद्ये वापरली गेली तरी त्यांच्याकडेही लयबंधनिर्मितीचे कार्य सोपवले जाते. एका व्यक्तीच्या तांत्रिक कौशल्याला खास वाव क्वचित दिला जातो. आता या पार्श्वभूमीवर भूपाळी ही रचना बघितल्यास, वाद्यांचा अवकाश कायम मृदू असतो आणि पहाटेची वेळ असल्याने वाद्ये खालच्या सुरांतच बव्हंशी वाजत असतात आणि महत्वाचा फरक म्हणजे भूपाळी हे एकल गायन असते त्यामुळे गायन करणारी व्यक्ती केंद्रस्थानी असते. त्यामुळे त्या व्यक्तीचे गायन कौशल्य महत्वाचे ठरते. 
आजच्या रचनेचे कवी आहेत ग.दि.माडगूळकर. गीतात "गेयता" कशी असावी याचा त्यांनी अप्रतिम मानदंड निर्माण केला. माडगूळकरांच्या कवितेचे आणखी वैशिष्ट्य सांगण्यासारखे म्हणजे त्यांची "चित्रदर्शी" शैली. कविता म्हणून वाचन करताना, वाचतानाच आशयाचे संपूर्ण चित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभे करण्याची त्यांची ताकद विरळाच होती आणि याचा फायदा, त्यांची गाणी चित्रपटाव्यतिरिक्त इतर श्रवण माध्यमांतून ऐकताना नेहमीच मिळतो. या कवितेत त्यांनी काही संस्कृतोद्भव शब्द वापरलेत जसे "बिल्वदळे","हास्य हराचे" असे काही शब्द वाचायला मिळतात. "उष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप डोळे" अशी ओळ लिहून कवितेतील आशय एकदम वेगळ्याच पातळीवर नेला आणि ही तर माडगूळकरांची खासियत. अर्थात या मुद्द्यावरून काहीवेळा माडगूळकरांवर टीका देखील झाली आहे. माडगूळकरांची आणखी खास वैशिष्ट्य सांगितले जाते - त्यांची शीघ्रगती शैली अर्थात एक रसिक म्हणून त्याबाबत फार काही व्यक्त होणे योग्य नाही कारण ४,५ दिवसांनी गाणे लिहिले आणि लगोलग गाणे लिहिले याचा कवितेच्या दर्जाशी कसलाच संबंध नसतो. ही भूपाळी खरी पण थोडे बारकाईने वाचल्यास, पार्वतीचा आपल्या पतीशी (शंकराशी) चालललेला संवाद किंवा मनोगत आहे. अर्थात भूपाळी असल्याचे थोडे निसर्ग वर्णन आणि त्याच्या प्रतिमा योजन हे सगळे आपसूकच वाचायला मिळते. 
संगीतकार दत्ता डावजेकरांनी स्वररचना बांधली आहे. अगदी पहिल्या सुरापासून लख्ख "भूप"राग दिसतो. भूपाळी रचना या बव्हंशी भूप रागातच बांधल्या जाव्यात हा अनोखा योगायोग दिसतो कारण भूप रागाचा समय, शास्त्रकारांनी संध्याकाळ असा दिला आहे. कदाचित संध्याकाळची सूर्यास्त वेळ देखील काहीही अंतर्मुख करणारी आणि अनिर्वचनीय अनुभव देणारी असते म्हणून सायंसमय दिलेला आढळतो. केवळ ५ स्वरांचा राग परंतु प्रचंड आवाक्याचा राग आहे. मला तर असेच वाटते, "यमन" किंवा "भैरवी" पाठोपाठ "भूप" राग असावा , ज्यात असंख्य रचना झाल्या आहेत आणि आजही त्यात खंड पडलेला नाही. सुरवातीच्या सतारीच्या आणि त्याला जोडून घेतलेल्या बव्हायोलिनच्या सुरांनी आपल्यासमोर भूप राग येतो. वास्तविक  भूप रागाचा संसार केवळ ५ स्वरांचा आणि सगळे सूर शुद्ध स्वरूपात लागतात पण, हेच "शुद्ध" स्वर वातावरण "शुद्धी" करतात. या रागात "मध्यम" आणि "निषाद" स्वर वर्ज्य तर बाकी सगळे शुद्ध स्वर. तसे बघितले "औडव - औडव" जातीचा राग असून त्याचा विस्तार इतका प्रचंड कसा? हा प्रश्न कुणालाही पडण्यासारखा आहे पण, हेच "नेटकेपण" या रागाचे वेगळेपण आहे. प्रत्येक सुराला विस्तार करायला भरपूर अवकाश आहे. गाण्यातील दोन्ही अंतरे जवळपास समान बांधणीचे आहेत आणि एकूणच वाद्यमेळ भूप रागाशी सुसंगत आणि मोजकाच ठेवला आहे. या गाण्यातील लय अतिशय गोड आणि तरल आहे. चाल बांधताना कुठेही शब्द तोडलेला नाही. हे गाणे म्हणजे पार्वतीने आपल्या प्रियकराबद्दलची भावना आहे आणि हेच ध्यानात ठेऊन मुखड्यातील "पार्वती" शब्दावर किंचित वजन देऊन उच्चारला गेला आहे. तसेच दुसऱ्या अंतऱ्यात "प्रसन्न शंकर" हे शब्द आल्यावर लगेच त्याच लयीत "ओंकार" ध्वनी घेऊन शब्दांचे औचित्य नेमकेपणाने दर्शवली आहे. शंकराच्या शंखातील ओंकाराचा ध्वनी हा त्या देवाचे व्यवच्छेदक लक्षण मानले गेले आहे. 
गायिका सुमन कल्याणपूर यांनी गाण्यातील सात्विक भाव आपल्या गायनातून अचूक दाखवला आहे. अतिशय मोकळा, स्वच्छ आवाज आणि तिन्ही सप्तकात लगाव घेण्याची ताकद असूनही गायन मध्य सप्तकात ठेवले आहे. फक्त अंतरे संपवताना शेवटची ओळ गाताना सुरवातीला किंचित वरच्या सुरात केली आहे पण ते स्वर किंचित्काल!! आपण पहाटेच्या प्रहाराचे सूचना करणारे गायन करीत आहोत याची वाजवी जाणीव गायनातून प्रगट होते. मुखड्यातील "भावमुग्ध डोळे" गाताना, त्या शब्दाचा नेमका "भाव" गायनातून उमटलेला आहे. "बिल्वदळे" हा शब्द देखील उद्मेखून ऐकायला हवा. जोडाक्षर आहे पण गायनातून नेमकी ऋजुता दिसत आहे. गाण्यात सोज्वळ भाव दरवळत आहे आणि याचे श्रेय गायिका म्हणून सुमन कल्याणपूर यांना द्यायला हवे. 

पार्वती वेची बिल्वदळे 
शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळे 

धुके तरळते धूसर धूसर 
भस्ममाखले दिसे चराचर 
उष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप डोळे 

फुले लहडली प्राजक्तावर 
तो तर भासे प्रसन्न शंकर 
सुमने कसली हास्य हराचे भूमीवर निथळे 


No comments:

Post a Comment