Thursday, 20 August 2020

कभी खुद पे कभी हालात पे

हिंदी चित्रपट संगीत हे सर्वसामान्य लोकांना इतकी वर्षे आकर्षित करीत आहे, यात शंकाच नाही आणि दिवसेगणिक त्याची लोकप्रियता वाढत आहे. कालानुरूप प्रतवारी बदलत असते आणि गाण्याचा कार्यकारणभाव तसेच निर्मिती देखील बदल स्वीकारत असते. याचा परिणाम असा झाला, चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेत कधीही खंड पडला नाही. हे संगीत साधे आहे, सर्वसमावेशक आहे, त्यात फार गुंतागुंत नाही (रागदारी संगीताच्या संदर्भात) ही आणि अशी आणखी अनेक कारणे, लोकप्रियतेची निदर्शक म्हणून मांडता येतील. परंतु, याचाच दुसरा भाग असा झाला, चित्रपट संगीताचा कधीही अभ्यासपूर्ण व्यासंग झाला नाही आणि ही एकूणच भारतीय संगीताच्या वाटचालीच्या मार्गातील उल्लेखनीय कमकुवत दुवा ठरू शकतो. आपल्याकडे पहिल्या पासून, हिंदी चित्रपट संगीता विषयी विलक्षण उदासीनता आढळते आणि ती अशी की, हे संगीत अजिबात अभ्यास करण्याच्या लायकीचे नाही किंवा तोंडात सुपारी चघळत ठेवावी इतपतच, या संगीताचा आस्वाद. त्यामुळे, या संगीताकडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. वास्तविक, ज्या संगीताने अखंड भारत बांधला गेला आहे, ते संगीत इतके दुर्लक्षित करण्याच्या लायकीचे आहे का? आणि लोकप्रियता हा फक्त "उथळ" निकष आहे, असे मानणे कितपत संय्युक्तिक ठरते? आता या पार्श्वभूमीवर आपण आजचे गीत ऐकायला घेऊया - "कभी खुद पे कभी हालात पे रोना आया". १९६१ साली आलेल्या "हम दोनो" या चित्रपटातील हे गीत म्हटले तर लोकप्रिय आहे परंतु खुद्द संगीतकार जयदेव यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश होत नाही आणि जिथे संगीतकाराच्या लोकप्रिय गाण्याच्या यादीत समाविष्ट होत नाही तिथे एकूणच लोकप्रिय हिंदी गाण्यांपासून तर फार दूर राहते. परंतु गाणे म्हणून खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कविता साहिर लुधियान्वी यांची आहे. कवितेकडे जरा बारकाईने नजर फिरवली तर ही गझल वृत्तात लिहिलेली कविता आहे. साहिर यांच्या शायरीचे एक खास वैशिष्ट्य सर्वत्र दिसते. समजा २ ओळींचा शेर असेल तर त्यातील पहिली ओळ सर्वसाधारण शब्दांत लिहिली जाते आणि पुढील ओळ मात्र काहीशी अवघड शैलीतून लिहिली जाते. परिणामी कविता वाचायला घेतल्यावर पहिल्या ओळीचा मनावर काहीसा गाढा परिणाम होत असताना लगेच काहीसा अंतर्मुख करणारा आशय वाचकाला तितकासा खटकत नाही. प्रस्तुत कवितेतील दुसरा शेर उदाहरणादाखल बघूया. "किस लिये जीते हैं, हम किसके लिये जीते हैं बारहा ऐसे सवालात पे रोना आया" यामध्ये पहिली ओळ समजून घ्यायला कसलीच अडचण येत नाही परंतु पुढील ओळीची सुरवात "बारहा" अशा अनपेक्षित शब्दाने होते. वास्तविक "बारहा " म्हणजे मराठीतील "बारा"!! आणि हिंदी भाषेत "बारा" शब्द आहे पण साहिर यांनी उर्दू भाषिक शब्द योजला. अर्थात वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, संगीतकाराला एक अक्षर अधिक मिळाले आणि लय अचूक साधली गेली. अर्थात लयीबद्दल आपण पुढे विचार करणार आहोतच. साहिर अशा प्रकारे नेहमीच आपली गाणी लिहिताना उर्दू भाषेचा उपयोग करतात आणि आपली कविता श्रीमंत करतात. यात आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे वर जो शेर दिला आहे, त्यातील पहिल्या ओळीची शब्दसंख्या आणि दुसऱ्या ओळीची शब्दसंख्या यामध्ये विषमता आहे आणि एका बांधीव रचनेच्या दृष्टीने अडचणीची होऊ शकते परंतु गाणे ऐकताना आपल्या हे लक्षात देखील येत नाही. अर्थात याचे श्रेय संगीतकार जयदेव यांच्याकडे जायला हवे. गाण्याची पार्श्वभूमी व्याकुळ मनस्थितीची आहे आणि हे उघड आहे. या गाण्याच्या बाबतीत असे ऐकायला आले आहे, प्रस्तुत कविता ही या चित्रपटासाठी लिहिली नव्हती परंतु संगीतकार जयदेव यांच्या नजरेस ही गझल आली आणि त्यांनी चाल लावायला घेतली. संगीतकार जयदेव यांनी या गाण्यासाठी "गारा" राग योजला आहे. हा राग तसा सहजपणे मैफिलीत ऐकायला मिळत नाही, किंबहुना असे म्हणता येईल, या रागावर वादकांनी खूप प्रेम केले. काहींच्या मते, या रागाचा समय उत्तर सकाळची वेळ आहे तर काहींच्या मते, उत्तर संध्याकाळ योग्य असल्याचे, ऐकायला/वाचायला मिळते. "षाडव/संपूर्ण" जातीचा हा राग, आरोही सप्तकांत "रिषभ" स्वराला अजिबात जागा देत नाही तर अवरोही सप्तकांत मात्र सगळे सूर लागतात. या रागाची आणखी नेमकी करून घ्यायची झाल्यास, "गंधार" आणि "निषाद" स्वर हे "कोमल' आणि "शुद्ध" लागतात तर बाकीचे स्वर शुद्ध लागतात. अर्थात संगीतकार जयदेव हे नेहमीच स्वतःच्या प्रकृतीनुसार रागाला वळवून घेणारे संगीतकार असल्याने त्यांच्या स्वररचना बरेचवेळा गुंतागुंतीच्या होतात. जयदेव यांच्याबाबत आणखी एक वेधक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा हिंदी भाषेतील अनेक श्रेष्ठ कवींच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत आणि याचा परिणाम असा झाला, त्यांच्या रचना अगदी वेगळ्या आव्हान देणाऱ्या झाल्या. मी वरती याच गीताबाबत विधान केले होते - प्रस्तुत गीत ही साहिर यांनी स्वतंत्र कविता केली होती आणि त्यावरून जयदेव यांच्या विचक्षण नजरेची कल्पना येऊ शकते. याचा कारणामुळे जयदेव यांच्या रचना चित्रपटीय चौकटीशिवाय उभ्या राहतात. इथे देखील त्यांनी स्वररचना बांधताना याच वृत्तीचा परिचय करून दिला आहे. जयदेव यांच्या रचनाप्रतिभेचे एक आणखी वैशिट्य म्हणजे साधे, मधुर, तसे पाहता परिचयाचे तरीही बारकाव्यांनी भरलेले आणि विस्तारशक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. आता या गाण्याच्या संदर्भात हे निरीक्षण सहज पटण्यासारखे आहे. सहजपणे ऐकले तर "मुखडा" लगेच मनात शिरतो परंतु तोच मुखडा गायला घेतल्यावर त्यातील प्रत्येक शब्दागणिक असलेल्या हरकती, तेच गाणे अवघड करून टाकतात. जयदेव यांना बहुदा दादरा हा ताल आवडत असावा कारण त्यांच्या अनेक गीतांतून या तालाचे स्वरूप आढळते. अर्थात गाण्यातील भावस्थितीला किंचितही धक्का न लावता हा ताल गाण्यात दरवळतो. कल्पना अशी मनात येते, याप्रकारे दादरा वापरून बहुदा त्यांनी आपली सांगीत वाक्ये व कल्पना यांची बांधणी घट्ट विणीची करावी लागली असणार आणि याचा दुसरा परिणाम म्हणजे केवळ ६ मात्रांचा ताल असल्याने गीतांतील भावना जास्त तीव्रपणे प्रतीत होते आणि कुठलाही चरण विनाकारण लांबवावा लागलेला नाही. त्यांच्या सर्जनशीलतेस संगीत आणि काव्य यांच्या दरम्यानची प्रभावी देवाणघेवाण हीच अधिक आवडीची वाटतेआणि त्यामुळेच आपल्या सांगीत विधानात कुठेतरी बौद्धिकता असणे इष्ट आहे, यावर त्यांची निष्ठा होती. जयदेव यांच्या बहुसंख्य रचनांमध्ये कुठेतरी रागदारी संगीताचा संबंध आणलेला आढळतो मग तो चालीतून असेल किंवा गायन करवून घेताना असेल. गायक मोहम्मद रफी यांचे अतिशय संयत स्वरात केलेले गायन हे आणखी वैशिष्ट्य मानायला हवे. मुळातील लवचिक गळा आणि विस्तृत तारता पल्ला, यामुळे कितीही अवघड लय असली तरी गेल्यावर पेलण्याची अद्वतिय क्षमता. अतिशय संथ आवाजातील गायन असल्याने गीतातील शब्द आणि त्यात लपलेला आशय देखील समजून घेता येतो. पहिला अंतरा घेताना पहिली ओळ "हम तो समझे थे के हम भूल गाये उनको" दोन वेळा गायली आहे आणि दुसऱ्यांदा गाताना, "भूल" शब्दावर विलक्षण अशी बारीकशी निमुळती होत जाणारी हरकत घेतली आहे. विसरले जाण्याची खंत त्यातून सुरेखरीत्या व्यक्त झाली आहे. कवितेत "रोना" शब्द बरेचवेळा आला आहे परंतु त्याचे उच्चारण त्यांनी अतिशय सहजपणे आणि कुठेही नाट्यात्मपणा टाळून केलेला आहे. तसेच शेवटचा शेर गाताना, सुरवातीलाच वरच्या सुरांत आरंभ केला आहे परंतु लगेच आपले गायन अतिशय सम्यकभावनेने केले आहे. इतर ठिकाणी काहीवेळा दिसलेली भडक शैली इथे पूर्णपणे टाळलेली आहे. गायनात साहिर यांनी जो "आब" राखलेला आहे त्याचेच प्रत्यंतर रफींनी दिले आहे. खरंतर एकूणच सगळे गाणे हे आपले स्वतंत्र अस्तित्व राखून आपल्यासमोर येते. कभी खुद पे कभी हालात पे रोना आया बात निकली तो हर एक बात पे रोना आया हम तो समझे थे के हम भूल गये हैं उनको क्या हुवा आज ये किस बात पे रोना आया किस लिये जीते हैं, हम किसके लिये जीते हैं बारहा ऐसे सवालात पे रोना आया कौन रोता हैं किसी और के खातीर ऐ दोस्त सबको अपनी ही किसी बात पे रोना आया https://www.youtube.com/watch?v=KcZ3GSHpJ3s&t=37s

No comments:

Post a Comment