Monday, 24 August 2020

हेमराज वाडी - भाग ७

आज पुन्हा माझ्या बालपणीच्या आठवणी लिहायला सुरवात करीत आहे. पूर्वी मी परदेशात असताना आठवणी लिहायला सुरवात केली होती. पुढे अनेक विषय आणि व्याप मागे लागले आणि या आठवणींवर लिहायचे मागे पडत गेले. आता पुन्हा लिहायला सुरवात केली कारण आमचा मित्र उदय पोवळे!! सध्या गेली काही आठवडे उदय, दर रविवारी हेमराज वाडीवर लेख लिहीत आहे आणि ते वाचून माझ्या मनात पुन्हा उर्मी संचारली. आता लिहायचे ठरवले आणि पुन्हा मनात आठवणींचे मोहोळ जागे झाले. त्यातली एक महत्वाची आठवण. आम्ही सगळे शाळेतच होतो आणि तेंव्हा ड्रिंक्स वगैरे गोष्टी कोसो दूर होत्या. अर्थात ड्रिंक्स घ्यावे अशी इच्छा मात्र मनात वारंवार यायची. एकदा प्रदीपच्या मनात आले की आपण सगळे टिटवाळ्याला (गणपती मंदिराला भेट) जायचे आणि तसे घरी सांगितले. आता गणपती मंदिराला भेट द्यायची तेंव्हा घरून परवानगी मिळायला काहीच हरकत नव्हती. निघायच्या ३,४ दिवस आधी "बियर" घेऊन जायचे ठरवले. आता ठरवले खरे पण बियर कुठली विकत घ्यायची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरात कुठे लपवून ठेवायची? आता टिटवाळा इथे जायचे म्हणजे पहाटे घर सोडणे क्रमप्राप्तच होते म्हणजे त्या दिवशी बियर विकत घेणे अशक्य!! याचाच वेगळा अर्थ, आदल्या दिवशी बियर विकत घ्यायची. प्रदीपने, बियर त्याच्या घरी लपवायची जागा शोधून काढली. असल्या उचापती करण्यासाठी प्रदीपसारखा मित्र नाही. टिटवाळ्याचा आम्ही एकूण ८ जण होतो आणि या ८ जणांत एक बियरची बाटली!! त्यापूर्वी कधीही बियर घेण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे बियर कशी लागते? कशी प्यायची? असले फडतूस प्रश्न आमच्या कुणाच्याच डोक्यात आले नव्हते. टिटवाळ्याच्या मंदिराच्या बाहेरील विस्तीर्ण बागेत बियर घ्यायची - म्हणजे बियर पिण्याचे स्थळ नक्की झाले होते. आज आठवत नाही, कुठली बियर विकत घेतली!! बहुदा त्यावेळची स्वस्तातली बॉंबे बियर घेतली असणार. आम्ही सगळेच शाळेत जाणारे म्हणजे पैशाचा प्रश्न हा कायम पडलेला असायचा. पैसे कसे उभे केले हे देखील आता आठवत नाही परंतु प्रदीपने बियर विकत घेतली आणि त्याच्या घरात कुठेतरी लपवली. माझी तर झोपच उडाली होती. बियर प्यायची, याचेच प्रचंड औत्सुक्य मनात होते. घरातून प्रत्येकाने प्लास्टिकचे ग्लासेस घेतले होते आणि मी कुठूनतरी मोठे प्लास्टिकचे टमरेल पैदा केले होते. पहाटे मी, राजू, मोहन, नंदू, अरविंद, सुरेश, प्रशांत आणि प्रदीप निघालो आणि थेट बसने बोरीबंदर रेल्वे स्टेशन गाठले. आता नवल वाटते पण रात्रभर लपवलेली बाटली पहाटे थंडगार वाटत होती (अर्थात हा आमच्या मनाचा खेळ सुद्धा असू शकतो अन्यथा रात्रभर फ्रिजबाहेर ठेवलेली बियरचे बाटली थंडगार कशी राहणार म्हणा) बसमध्येच बाटलीतील बियर टमरेलमध्ये भरली आणि स्टेशनजवळ एका गटारात रिकामी बाटली टाकून दिली (हुश्श....) टमरेल एका फडक्यात गुंडाळून ठेवले होते. संपूर्ण प्रवासात सगळे उत्तेजित झाले होते. वास्तविक सगळे, ज्याला "टपोरी"म्हणतात तसेच होते त्यामुळे एकमेकांची यथेच्छ टिंगल करायची, हाच सोहळा चालू होता आणि टिटवाळा स्टेशन आले. सर्वात आधी देवळात गेलो आणि गणपतीचे व्यवस्थित दर्शन घेतले. लगोलग मंदिराची बाग गाठली आणि एक कोनडा शोधला जिथे फारशी वर्दळ नव्हती. लगेच प्लास्टिकचे ग्लासेस काढले आणि हळूहळू टमरेलमधील बियर सगळ्याच्या ग्लासात थोडी, थोडी ओतली. बियर चढली तर काय घ्या? आणि मुख्य म्हणजे घरी "व्यवस्थित"परतायचे होते!! मजेचा भाग असा, आम्ही ८ जण असूनही टमरेलमध्ये थोडी बियर शिल्लक!! ग्लासमधील बियर हळूहळू घ्यायची हे तत्व पाळायचे ठरवले होते आणि तशी घोटाघोटाने बियर पित होतो. वास्तविक बियरची चव अतिशय कडवट पण तसे कुणीही बोलत नव्हते. मुळात, मनात एक धाकधूक होती, बियर चढू नये. मला वाटते मोहनचा ग्लास सर्वात आधी संपला आणि त्याने पुन्हा मागितली!! आमही सगळे अवाक. आमच्या सगळ्यात मोहन प्रशांत आणि अरविंद, हे वयाने सर्वात छोटे तरीही मोहनने पुन्हा मागितली आणि झटक्यात संपवली. कधीतरी मग अखेर टमरेल रिते झाले आणि जेवायला (घरून जेवणाचे डबे नेले होते) सुरवात केली. सगळे एकदम आनंदात होते. अखेर हो, नाही म्हणता आम्ही बियर घेतली होती. बियर घेतली म्हणजे आम्ही एखादा दिग्विजय मिळवला, याच धुंदीत होतो. पुढे आयुष्यात मी असंख्य प्रकारच्या बियर घेतल्या परंतु हा पहिला अनुभव आजही मनात ताजा राहिला.

No comments:

Post a Comment