Sunday, 21 July 2019

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

सर्वसाधारणपणे एक समज सर्वत्र पसरलेला आहे, प्रतिभाशाली पित्याच्या छायेत वावरल्याने, अपत्याची वाढ खुंटते. पित्याचे अलौकिक यश त्या अपत्याला बोजड होते आणि बहुतेकवेळा अंगी गुण असून देखील मागे पडतात. समाज देखील नेहमी हातात तागडी घेऊन, तुलना करीत असतो. वास्तविक प्रत्येक व्यक्ती ही नेहमीच स्वतःचे गुणविशेष घेऊन जन्माला येत असते आणि त्यानुरुपच आयुष्याला एक आकार मिळत असतो परंतु समाजाला त्याची फारशी गरज वाटत नसते आणि या पार्श्वभूमीवर आपल्या आजच्या गाण्याच्या रचनाकाराचे - श्रीधर फडक्यांचे विशेष कौतुक करायलाच लागते. सुधीर फडक्यांच्या कुटुंबात जन्म घेतला परंतु स्वतःची वेगळी वाट चोखाळली आणि यशस्वीपणे पेलली. हे सहज वाटते तितके सोपे कधीच नसते. 
आजचे गाणे ही मुलत: एक सक्षम कविता आहे आणि कवितेला तितकीच समर्पक चाल लावणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यातून कवितेचा जनक ग्रेस असतील तर जबाबदारी अधिक वाढते. कवी ग्रेस म्हटले लगेच दुर्बोध हाच शब्द ओठाशी येतो परंतु असे करून आपण त्या कवींवर अन्याय करीत आहोत, हेच लक्षात घेत नाही. आपल्याकडे "सरसकटीकरण" नावाचा प्रचंड रोग पसरलेला आहे आणि त्यातूनच मग प्रत्येक कलाकाराला एखाद्या लेबलखाली जखडून ठेवायचे आणि त्याच नजरेतून त्याच्या निर्मितीबाबत आस्वाद घ्यायचा, अशी सरधोपट पद्धत आहे. ग्रेस यांच्या काही कविता, ज्याला "दुर्बोध" म्हणाव्या अशा जातीच्या आहेत पण म्हणून सगळ्याच कविता तशा नाहीत. मुळात "दुर्बोध" म्हणताना, आपण आपली रसिकता बरेचवेळा तोकडी करतो. कविता ही नेहमीच शब्द, शब्दांची घडण आणि त्यांची लावलेली जोड, या प्रक्रियेतून घडत असते आणि तिथेच नेहमी गोंधळ करतो. आपण शब्दांच्या अर्थाचे परिचित अन्वय ध्यानात घेतो परंतु कवीचा काय दृष्टिकोन आहे, याची आपल्याला गरज वाटत नाही. इथे देखील सुरवातीच्या ओळीतून एखाद्या प्रेयसीचे वर्णन असावे असा भास होतो परंतु जसे पुढे वाचायला घेतो तशी आपल्याला चकवा मिळतो. "आई" हा फ्रेश यांच्या कवितेचा अति आवडीचा विषय आणि त्याबाबत अतिशय हृद्य कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. ग्रेस यांच्या कवितेतील प्रतिमा रूढार्थाने समोर येत नाहीत तर वाचकाला विचार करायला लावतात आणि विचार करणे, आपल्याकडे सार्वजनिक पातळीवर अभावानेच आढळते. "धुक्याच्या महालात" या शब्दांशी "न माझी मला अन तुला सावली" या शब्दांशी लावल्याने आशय धुकाळल्यासारखा होतो. तसेच "तमांतुनी मंद ताऱ्याप्रमाणे,दिसें की तुझा बिल्वरांचा चुडा" ही ओळ अशीच संदिग्ध आहे. विशेषतः "बिल्वरांचा चुडा" हे शब्द तर आजच्या पिढीला समजणे अवघड आहे. असो.  
वर मी म्हटल्याप्रमाणे संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वररचना करताना, कुठेही आपल्या पित्याची त्या रचनेवर सावली पडू नये अशी दक्षता घेतली की काय? इतपत वेगळेपण राखले आहे. तसे बघितले तर श्रीधर फडके हे दोन्ही प्रकारे चाली बांधत असतात म्हणजे "आधी शब्द मग चाल" किंवा "आधी चाल मग शब्द". अर्थात कुठल्याही पद्धतीने स्वररचना तयार करताना, कवीच्या शब्दांना नेहमी प्राधान्य दिलेले आढळते. कमीतकमी वाद्यवृंद, आशयाला सर्वाधिक महत्व, लयीला काहीशी अवघड चाल अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील.  अत्यंत हळुवार स्वरांत मुखड्याला सुरवात होते आणि तीच लय संपूर्ण रचनेत कायम ठेवली आहे. कवितेत  एका दृष्टीने मूक संवाद चाललेला आहे आणि त्या संवादाशी समांतर अशीच चाल लावलेली आहे. 
श्रीधर फडक्यांचा सगळा भर हा सक्षम मुखडा तयार करण्यावर असतो आणि त्यामानाने अंतरे वेगळे बांधले गेले नाहीत. अंतऱ्यासाठी संपूर्ण वेगळी चाल लावणे, हे एक सर्जनशीलतेचे खास अंग मानले जाते. अर्थात "मनावेगळी लाट व्यापी मनाला" ही दुसऱ्या अंतऱ्याची सुरवात काहीशा वरच्या पट्टीत केली आहे पण तरीही मुखडा लक्षात घेता फार नावीन्य आढळत नाही. 
गायक म्हणून सुरेश वाडकरांचा मुद्दामून उल्लेख करायला हवा. आवाजाची जात शुद्ध किंवा मंद्र सप्तकात अधिक खुलते परंतु एक दोष बरेचवेळा गायनात आढळतो. शब्दोच्चार करताना अकारण स्वरांत "लाडिकपणा" अवतरतो आणि त्यामुळे काहीवेळा गायन नाटकीपणाकडे झुकते. वास्तविक, गळा अतिशय सुरेल आहे छोट्या हरकती, खटके इत्यादी सौंदर्यस्थळे गायनात प्रकर्षाने दिसतात तेंव्हा अशा लाडिक उच्चारांची खरंच आवश्यकता आहे का? हा प्रश्न मनात उद्भवतो आणि सुदैवाने या गीताच्या गायनात कुठेही असला "नाट्यात्म" अंश ऐकायला मिळत नाही. मुळात संगीतकारानेच निर्मिलेली स्वररचना अतिशय गोड, रसवाही आहे तेंव्हा त्याला अनुलक्षून गायन करणे, हेच रचनेच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरते. 
या गीताने एक बाब अधोरेखित केली, गाण्यात "काव्य" असले तरी रचनेत कसलाही उणेपणा येत नाही, किंबहुना सार्थवाही कविता, हे देखील उत्तम गीताचे महत्वाचे अंग असू  शकते,हे सिद्ध झाले. मागील पिढीत हृदयनाथ मंगेशकरांनी मराठीतील अशाच कविता हुडकून काढल्या आणि ललित संगीत श्रीमंत केले. पुढील पिढीत श्रीधर फडक्यांनी तोच मार्ग स्वीकारला आणि मराठी भावगीताचे विश्व अधिक विस्तारले. 

तुला पाहिले मी नदीच्या किनारी 
तुझे केस पाठीवरी मोकळे 
इथे दाट छायांतुनी रंग गळतात 
या वृक्षमाळेतले सांवळे!!

तुझी पावले गे धुक्याच्या महालात 
ना वाजली ना कधी नादली 
निळागर्द भासे नभाचा किनारा 
न माझी मला अन तुला सावली 

मनावेगळी लाट व्यापी मनाला 
जसा डोंगरी चंद्र हा मावळे 
पुढे का उभी तू, तुझे दु:ख झरते ?
जसे संचिताचे ऋतू कोवळे 

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून 
आकांत माझ्या उरी केवढा!
तमांतुनी मंद ताऱ्याप्रमाणे 
दिसें की तुझा बिल्वरांचा चुडा 


No comments:

Post a Comment