परवाच घरी निवांतपणे बसलो असताना आणि स्मार्ट टीव्हीवर युट्युब बघत असताना, अचानक, १९७९/८० साली गाजलेली वेस्टइंडीज/ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका आठवली. हाताशी युट्युब असल्याचा हा सर्वात मोठा फायदा. तेंव्हा लगेच सर्फिंग सुरु केले आणि ऍडलेड कसोटी सामान्यांच्या सलग ५ दिवसांच्या वेगवेगळ्या व्हिडियोज बघायला मिळाल्या. ही कसोटी सुरु होण्याआधी वेस्टींइंडीजने १-० अशी आघाडी घेतली होती आणि ऑस्ट्रेलियाला हा शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य होते. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ आणि दोन्ही संघात वेगवान गोलंदाजांचा सक्षम ताफा. समालोचक अर्थात रिची बेनॉ. हा माणूस खेळाडूपेक्षा समालोचक म्हणूनच अधिक चांगला होता, असे म्हणायला जागा आहे. खेळाचे थोडक्यात, परखड आणि नेमके विश्लेषण करण्यात आजही कुणीही बरोबरी करू शकणार नाही. आवाजातील किंचित खर्ज, शब्दांची अचूक निवड आणि समयोचित शेरे ही खास बेनॉची वैशिष्ट्ये म्हणता येतील. व्हिडियो सुरु व्हायच्या आधीच बेनॉ आपल्या शैलीत दिवसाच्या खेळाचे थोडक्यात करतो आणि मगच पडद्यावर तुंबळ (हाच शब्द योग्य आहे) युद्ध बघायला मिळते.
सामन्यात लॉइड (पहिल्या इनिंगमध्ये) आणि कालिचरण (दुसऱ्या इनिंगमध्ये) यांच्या शतकी खेळी बघायला मिळतात तसेच विव रिचर्ड्सच्या दोन छोटेखानी सत्तरीच्या खेळी बघायला मिळतात. लॉइड म्हणजे काय चीज होता, याचे त्याच्या १२८ धावांच्या खेळीत पुरेपूर प्रत्यंतर येते. किंचित पुढे वाकून उभा राहायचा स्टान्स, बॅट काहीशी हवेत ठेवायची आणि अखेरच्या क्षणी अत्यंत बेदरकार पद्धतीने गोलंदाजाला हाताळायचे!! प्रथम वेस्टइंडीजची फलंदाजी, ग्रीनिज लवकर बाद झालेला आणि खेळपट्टीवर विव येतो. हा फलंदाज खेळायला येतो तो नेहमीच चेहऱ्यावर गुर्मीचा भाव घेऊन, तुच्छता केवळ चेहऱ्यावर नसून अंगात भरलेली. गोलंदाज, गोलंदाजी करतात म्हणजे याचे दास्यत्व पत्करतात, नव्हे हा त्यांना पत्करायला लावतो. बेमुर्वतखोर आणि बेछूट वृत्तीचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे रिचर्ड्सची फलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये रिचर्ड्सने ७८ धावा केल्या. शतक नव्हे पण जोपर्यंत तो खेळपट्टीवर होता, तोपर्यंत हा तिथला राजा होता. लिलीसारख्या प्रलयंकारी गोलंदाजाने एक चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर, काहीसा आखूड टप्प्याचा टाकला. कुणीही फलंदाज एकतर हा चेंडू सोडून देईल किंवा नुसताच तटवेल. इथेच विव आणि इतर फलंदाजात फरक पडतो. उसळी घेणारा चेंडू अंगावर घेतला आणि अगदी शेवटच्या क्षणी त्याने मिडविकेटकडे हाणला (हाच शब्द योग्य). लिली त्या फटक्याकडे अवाक होऊन बघत बसला. गोलंदाजाला संपूर्णपणे नामोहरम केल्याचा हा क्षण. लिली सारखा गोलंदाज जेंव्हा चकित होतो तेंव्हा तो फलंदाज त्याच कुवतीचा असला पाहिजे, हे ज्या कुणाला लिली माहीत असेल त्याला सहज पटावे.
लंचनंतर वेस्टइंडीजची पडझड होते आणि पहिल्या तासात विव, हेन्स आणि रोवे फटाफट बाद होतात आणि मैदानावर लॉइड अवतरतो!! पाठीला बाक देऊन, हळूहळू खेळपट्टीवर येतो. सगळीकडे नजर फिरवतो. अगदी खेळणारा लॉइड असला तरी सुरवात ही काहीशी अडखळतच होत असते आणि इथे तर लिली, पास्को, हॉग सारखे गोलंदाज. पास्कोचे पहिले चेंडू त्याने तटवण्यात घालवले आणि आपली नजर स्थिर केली. संघाला सावरायची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावरच होती. हालूहालू त्याने आपल्या भात्यातली शस्त्रे बाहेर काढली आणि प्रथम मिडविकेटला पूल मारून, आपल्या खंबीर अस्तित्वाची जाणीव करून दिली. खरेतर १९७९/८० म्हणजे लॉइडचा भरातला संपलेला पण तो दिवस त्याचाच होता. या खेळीतले दोन फटके केवळ अविश्वसनीय होते. १) हॉगने मिडल स्टॅम्पवर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आणि लॉइडने क्षणार्धात स्क्वेयर लेगला हूक मारला - चेंडू मैदानाच्या बाहेर!! अरेरावी म्हणतात ती अशी. २) लिलीने ऑफ स्टम्पच्या बाहेर पण छातीच्या उंचीएवढ्या उसळीचा चेंडू टाकला आणि लॉइडने पाय टाकून, कव्हर ड्राइव्ह मारला. हे कसे शक्य आहे? चेंडू जवळपास पाचव्या किंवा सहाव्या स्टॅम्पइतका बाहेर होता पण तरीही कुठल्यातरी अतर्क्य उर्मीने लॉइडने हा फटका खेळला. चेंडू निमिषार्धात सीमापार. एकाही क्षेत्ररक्षकाला साधे हलायची पण संधी मिळाली नाही. असे खेळायचे मनात आले आणि ते खेळून दाखवले, हेच अफलातून. संघाला ३०० पार नेले आणि इनिंग संपली.
ऑस्ट्रलियाने आपला डाव सुरु केला आणि वेस्टइंडीजच्या गोलंदाजांनी रणकंदन सुरु केले!! रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर आणि क्रॉफ्ट!! एकाच्या आगीतून सुटका केली तर दुसऱ्याच्या फुफाट्यात!! बरे या चारही गोलंदाजांच्या शैली एकमेकांपासून सर्वथा भिन्न. त्यातल्या त्यात गार्नर कमी वेगाचा म्हणजे ८५ ते ९० मैल वेगाचा गोलंदाज!! परंतु त्याचा चेंडू येणार म्हणजे १० ते १२ फुटांवरून - चेंडूवर नजर स्थिर ठेवणेच अवघड. होल्डींगला तर "whispering death" ही लक्षणीय उपाधीच मिळालेली. वेगवान गोलंदाजांमधील मूर्तिमंत काव्य म्हणजे होल्डिंग आणि त्याचा वेग हा जवळपास ९५ ते १०० च्या आसपास. रॉबर्ट्स तर तैल बुद्धीचा गोलंदाज, एकाच शैलीत दोन वेगवेगळे बम्पर टाकून फलंदाजांची भंबेरी उडवणारा तर क्रॉफ्टचा अँगल जगावेगळा!! कुठल्या दिशेने, किती वेगाने चेंडू येईल याची आधीच कल्पना करणे अशक्य!! अशा वेळी रॉबर्ट्सने जगप्रसिद्ध ओव्हर टाकली. पहिला चेंडू इयान चॅपलला समजलाच नाही. निव्वळ नशिबाने वाचला. पुढील चेंडू इतक्या वेगाने अंगावर आला की इयान स्वतः:ला बाजूला करूच शकला नाही. बोटेच शेकली!! फलंदाजाचे मानसिक खच्चीकरण होते ते अशा प्रकारे. तिसरा चेंडू, रॉबर्ट्सने त्याच वेगाने टाकला पण यावेळेस हाफव्हॉलीच्या किंचित आधी टप्पा ठेवला. इयानला खेळायला भाग पाडले पण चेंडू बॅटची कड घेऊन सहजगत्या स्लिपमधील क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. रॉबर्ट्स कशा प्रकारे विचार करणारा गोलंदाज होता, याचा साक्षात जिवंत अनुभव. इयान बाद आणि त्याचा भाऊ, ग्रेग आला. वास्तविक हे दोघेही फलंदाज दहशतवादीच म्हणून प्रसिद्ध होते. रॉबर्ट्सने चौथा चेंडू जो ग्रेगचा पहिलाच चेंडू होता, बम्पर टाकला पण हा चेंडू ग्रेगच्या चेहऱ्याच्या समोर!! नजर हटवणे निव्वळ अशक्य. हताशपणे ग्रेगने कसाबसा चेहरा वाचवला पण चेंडूने बॅटची कड घेतली आणि ग्रेग बाद. लागोपाठच्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघातील दोन खंद्या फलंदाजांना बाद करून वेस्टइंडीजने सामन्यावर वर्चस्व ठेवले. या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया संघ सावरूच शकला नाही आणि जेमतेम २०० पार झाली.
पहिल्या इनिंगमध्ये ७०, ८० धावांची आघाडी घेतली आणि वेस्टइंडीजने दिमाखदार खेळ सुरु केला यावेळेस, ग्रीनिज आणि विव यांनी सत्तरी गाठली, रोवेने चाळीशी गाठली. दुसऱ्या बाजूने कालिचरण आपली नजाकत पेश करीत होता. या वेस्टइंडीज संघातील खऱ्या अर्थाने नजाकतदार फलंदाज म्हणजे कालिचरण!! अर्थात प्रसंगी अंगातली रग दाखवून द्यायचा पण तरीही मुळातील नयनरम्य कलाकार. भारतीय संघातील विश्वनाथबरोबर याची तुलना होऊ शकेल. यावेळेस, कालिचरणने खेळपट्टीवर जम बसवला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज काहीसे हताश दिसायला लागले. याच्या खेळीत काय नव्हते? डोळ्यांचे पारणे फिटवणारा लेट कट, नयनरम्य कव्हर ड्राइव्ह, खिळून ठेवणारा पूल असे सगळे पोतडीतील फटके बघायला मिळाले. हा संघ आजही क्रिकेट इतिहासातील काही सर्वोत्तम संघापैकी एक संघ म्हणून का गणला जातो, याचे प्रात्यक्षिक या सामन्यात बघायला मिळाले.
हाताशी ५०० धावांचा पुढाकार घेऊन वेस्टइंडीजने गोलंदाजी सुरु केली. वास्तविक मालिका वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते परंतु पाठीवर ५००+ धावांचा बोजा घेऊन फलंदाजी करणे, हे अति दुष्कर कर्म होते. पहिल्या डावात रॉबर्ट्सने खिंडार पाडले होते तर यावेळेस होल्डींगने आपली किमया दाखवली आणि ४ विकेट्स घेतल्या. परिणाम ऑस्ट्रेलियाचा ४००+ धावांनी पराभव!! संघात चॅपल बंधू,किम ह्यूज, अॅलन बॉर्डर, रॉडनी मार्श सारखे फलंदाज, लिली, पास्को, हॉग सारखे आग्यावेताळी गोलंदाज तरीही संघाचा ४०० धावांनी नामुष्की दाखवणारा पराभव!! ऑस्ट्रेलियन संघाचा त्यापूर्वी आणि त्यानंतर आजतागायत इतक्या मोठ्या फरकाने पराभव कधीही झाला नव्हता. १९७४-७५ च्या मालिकेचे संपूर्ण उट्टे काढले आणि त्या पराभवाचा वचपा घेतला.
आजच्या पिढीला वेस्टइंडीजची क्रिकेटमध्ये काय दहशत होती, याची सुतराम कल्पना येणार नाही आणि ही दहशत अशी तशी नाही सलग १५ ते १७ वर्षे होती. केवळ स्वप्नातच कल्पना करता येईल असे गुणवान खेळाडू लॉईडला एकाच वेळी मिळाले आणि त्यांनी आपले साम्राज्य उभे केले होते. अर्थात इतिहासाची गतीच अशी असते - शिखरावर वास्तव्य केल्यावर हाताशी उतरंड असणे क्रमप्राप्तच ठरते आणि त्यानंतरचा इतिहास हा फक्त घसरणीचाच राहिला आणि त्यात दुर्दैवाने आजही सुतराम बदल नाही.
No comments:
Post a Comment