लिखाण माध्यमातील सर्वात सशक्त आणि तरीही अल्पाक्षरत्व असे स्वरूप फक्त "कविता" लेखन, याच माध्यमाला मिळते आणि हे कुणालाही पटू शकेल. याचाच पुढील विचार म्हणजे कविता आणि तिचा आस्वाद. आपल्या काव्याला रसिकाने दाद द्यावी ही कवीची अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूने, दाद देण्यासारखे त्या कवितेत काहीतरी असावे, ही रसिकाची अपेक्षा. वास्तविक हा देवघेवीचा खेळ दोन्ही बाजूने रंजकतेने खेळाला आजू शकतो आणि काही वेळा खेळला देखील जातो. याबाबत आणखी वेगळे म्हणायचे झाल्यास, आपल्या कवितेतील कुठल्या गोष्टीला रसिकाने महत्व द्यावे याबद्दल कवीच्या काही पूर्वकल्पना असतात. आणि रसिकांबाबत लिहायचे झाल्यास, आपल्याला वाचत असलेल्या कवितेतून काय मिळवायचे आहे, या बाबत असलेली धारणा. परंतु याबाबतची निरपेक्ष वृत्ती ही सदासर्व काळ परस्परांशी जवळीक करणारी असावी ही ही अपेक्षा मात्र प्रत्येकवेळेस पूर्ततेच्या पातळीवर पोहोचू शकत नाही. त्यादृष्टीने पूर्तता ही एक तार्किक शक्यता असते, हे म्हणावेच लागते. ज्याला वस्तुस्थितीची दाखल घ्यायची आहे त्याला अपेक्षा ही मूलभूत अडचण म्हणून टाळता येणार नाही. फार तर "अपेक्षांतर" कमी-जास्त प्रमाणात ठरवता येते. अर्थात असे अपेक्षांतर पूर्णपणे टाळता येणे किंवा पूर्ण करणे, ही सर्वस्वी अशक्य कोटीतील बाब आहे. करावी आणि रसिक यांच्यातील संवादाचे साधन म्हणजे "भाषा". सृजनशील कलाकृतीतील भाषा ही रोजच्या व्यवहारातील भाषेपेक्षा सर्वस्वी भिन्न असते परंतु रोजच्या व्यवहारात अस्फुटपणे जाणवणारी भाषेची सुप्त शक्ती एखादा समर्थ कवी सर्वंकषपणे वापरू शकतो, त्यामुळे मुलत:गतिरूप असलेली भाषा कवीच्या अभिव्यक्तीत अधिक प्रभावी आणि अधिक संमिश्र बनण्याची मोठी शक्यता असते. एखाद्या शब्दाचा एका विशेषतः कवितेतील अर्थ हा १) त्या शब्दाचा रूढ अर्थ, २) कवीच्या विशेषतः हेतूमुळे प्राप्त झालेला अर्थ, ३) कवितेच्या घाटाने संस्कारित झालेला अर्थ , ४) शब्दांचा कल्पित ध्वनीरूपाने जाणवणारा अर्थ, ५) कागदावरील दृश्य स्वरूपाने जाणवणारा अर्थ, ६) कवितेतील इतर शब्दांच्या साहचर्याने जाणवणारा अर्थ, ७) विशिष्ट सांस्कृतिक परिस्थितीतून उद्भवणारा अर्थ, ८) रसिकांच्या विशिष्ट हेतूंमुळे प्रतीत होणारा अर्थ (इथे बरेचवेळा गफलत होऊ शकते आणि तशी होते देखील) आणि ९) शब्दांच्या आशयात, भविष्यात होणार संभाव्य बदल. इतक्या आणि अशा आणखी अनेक विविध ताणांनी कवितेचा अर्थ प्रभावित होऊ शकतो. एक नक्की, भाषेचा अंतिम अर्थ कुणालाही, कधी निश्चित करता आलेला नाही तेंव्हा संपूर्ण निरपेक्ष वृत्तीची असंभाव्यता आणि भाषेच्या साधनाने संपूर्णपणे निश्चयात्मक असा अर्ह सूचित होण्याची अशक्यता, या दोन्ही गोष्टी जमला धरूनच आपल्याला कवी आणि रसिक यांच्या संवादातील इतर अडचणी समजून घ्याव्या लागतील.
दुर्बोधतेच्या संदर्भात पुढे जायचे झाल्यास, ज्या वेळी विचार, भावना आणि संवेदना एकात्म जाणिवेमध्ये अंतर्भूत असतात त्यावेळी त्याचे संपूर्ण अस्तित्व नाहीसे झालेले असते. अमुक एक अर्थ दुय्यम मानल्यामुळेकिंवा टाळल्यामुळे आजकालचे आधुनिक काव्य फार दुर्बोध आहे असे म्हणण्याचा एक मतप्रवाह दिसतो. त्याशिवाय कवितेचा रसिक, मग तो जुना असो किंवा नवीन असो, काव्याकडून तार्किक संगतीची आणि वस्तुदर्शक अर्थाची अपेक्षा करतो, म्हणून कविता दुर्बोध वाटते, असे समाजानेच काहीसे एकांगी विवेचन ठरेल. उदाहरणच द्यायचे झाल्यास, बालकवींची "औदुंबर" ही कविता दुर्बोध वाटू शकते. संपूर्ण जाणिवेचे एकात्मीकरण साधण्याच्या प्रयत्नातून निर्मिलेली संमिश्रता किंवा आनुषंगिक दुर्बोधता सर्वसाधारण रसिकाला जाणवत नाही. याबाबत वेगळे मांडायचे झाल्यास, उत्कट संवेदना, उत्कट भावना अथवा विचार याचन्हे अस्तित्व स्वतंत्रपणे जाणवू शकेल अशा घटकांना परस्परानुजीवी करणाऱ्या कविता रसिकांना सर्वसाधारणपणे दुर्बोध वाटत नाहीत. या सर्व घटकांचे सामिलीकरां झाले आणि त्यामुळे अभिव्यक्तीचे वेगवेगळे घाट निर्माण होऊ लागले की मग हळूहळू निर्मिलेली कविता काही प्रमाणात दुर्बोध व्हायला लागते.
आता मराठी कवितेच्या संदर्भातील दुर्बोधतेचा प्रश्न हा गेल्या शतकात प्रामुख्याने चर्चेला आणि त्या अनुषंगाने बोलायचे नवनवीन वादांना निमंत्रण देणारा ठरला. नवकाव्यपूर्व दुर्बोधता, नवकाव्यातील दुर्बोधता आणि नवकाव्योत्तर दुर्बोधता, असे ढोबळपणे ३ कालखंड पाडता येतील. यात, पहिली अवस्था ही केशवसुतांच्या संदर्भात विचारात घ्यायला हवी. "झपुर्झा" किंवा कवी बींची "चाफा" या संदर्भाने सूचित होऊ शकेल तर दुसरी अवस्था मर्ढेकरांच्या "पिपात मेले उंदीर" ही उदाहरणादाखल घेता येईल आमी तिसरी अवस्था, अरुण कोलटकरांच्या "घोडा" कवितेतून मिळू शकते. काव्यात्म दुर्बोधतेच्या या तीन अवस्थांना एकत्र बांधणारे सूत्र, जाणिवेचे अधिकाधिक एकात्मीकरण हेच असेल. यात एक गंमत आहे, केशवसुतांच्या किंवा कवी बी, यांच्या कविता या कविताच नव्हेत, अशी काही टीका वाचण्यात आलेली नाही. याचाच वेगळा अर्थ, रसिकांच्या पूर्वनिश्चित काव्यकल्पनेतील महत्वाच्या घटकांचे अस्तित्व त्या रसिकांना या कवितेत जाणवत होते. या कवींच्या भावानुभवाबद्दल आणि त्याच्या काव्यात्मका बद्दल कुठेही,, कसलाच संशय व्यक्त केला गेला नाही. परंतु त्या भावानुभवातून जे विचार प्रगट होत होते, त्याबाबत ठाम निश्चितता निर्माण करणे अवघड होत होते. मर्ढेकरांच्या बाबत म्हणायचे झाल्यास, त्यांचे भावानुभव आणि त्यात अंतर्भूत असलेले विचार आणि त्याचे एकूणच सादरीकरण हे काव्यात्म मानायचे का? हाच प्रश्न मराठीत नव्याने उद्भवला होता. अरुण कोलटकरांचा "घोडा" प्रसिद्ध झाला आणि आजच्या "निरवयवी" कवितेची सुरवात झाली!! यात मुख्य् मेख अशी होती, प्रतिमांचे भावनासापेक्ष किंवा विचारसापेक्ष विश्लेषण करणे अवघड झाले होते आणि म्हणूनच सगळे शब्द कळूनही सगळी कविता दुर्बोध वाटायला लागली. एकात्मीकरणाच्या या वाटचालीत दुर्बोधतेची तिसरी अवस्था अटळ होती, असे देखील विधान आपण करू शकतो.
कवी आणि रसिक यांच्यामध्ये काव्यात्म दुर्बोधता, ही एकमेव अडचण होती.परंतु इथे मराठीतील टीकाकार काहीसे कमी पडले का? हा प्रश्न इथे उद्भवू शकतो. विशेषतः: ज्या कालखंडात काव्याच्या विकासाचा आणि रसिकांच्या अभिरुचीचा वेग, यात तफावत पडायला लागली, असे म्हणता येते. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे काव्याच्या विकासात व्यक्तिगत प्रतिभेला केंद्रीय स्थान मिळणे तर अभिरुचीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, सामाजिक संस्कृतीला महत्वाचे स्थान असते आणि खरी तफावत इथे पडते. काव्य हे नेहमीच संस्कृतीचे प्रारूप घेऊन अवतारात असते आणि जर का संस्कृती काळाचे बदल स्वीकारण्यात कमतरता दाखवत असेल तर मग दुर्बोधता निर्माण होणे शक्य होय आणि इथेच टीकाकार अवतरतात. कवितेचं विकास हा अभिरुचीच्या विकासापेक्षा अधिक गतिशील आणि अधिक अतर्क्य राहिला पाहिजे आणि त्यामुळेच पडणारे अंतर अपरिहार्य असले तरी संवाद अशक्य व्हावा, असे न घडण्याची जबाबदारी टीकाकारांची!! टीकाकाराने असलेली दुर्बोधता सुबोध करण्यामागे न पडता दुर्बोधतेचे नेमके स्वरूप काय आहे? हे समजावून सांगितले तरी पुष्कळ काही कमावले, असे म्हणायला वाव आहे. मघाशी मी " घोडा" या कवितेचा उल्लेख केला त्या संदर्भात लिहायचे झाल्यास, भाषेची विघटनात्मक मूलप्रकृती संपूर्णपणे मिटवून संबंध कविता म्हणजेच एक शब्द बनविणे, ही त्या कवितेमागील प्रमुख प्रेरणा दिसते. अशा कवितेतून, कवितेची पिंजण करून त्यातून एखादे जीवनदर्शक सूत्र वगैरे काढण्यात फारसे हशील नाही. मुळात कविता ही भोगायची असते, हे कवी विं.दा.करंदीकरांचे प्रसिद्ध विधान इथे चपखलपणे लागू पडते तेंव्हा या आणि अशा कवितेसाठी भिडण्यासाठी प्रथम मराठी टीकेला बदलावे लागेल, पारंपरिक विचारांचे साचे मोडून नवीन साचे करणे अधिक योग्य!! त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल, काव्यात दुर्बोधता कमी आणि टीकाकार जास्त.
कविता आस्वाद प्रक्रियेत वरील मुद्दे फार महत्वाचे आहेत. बरेचवेळा आपण कविता वाचीत असतो आणि त्याचा मनाशी अर्थ लावीत उपभोगीत असतो कविता सर्वसाधारणपणे अशीच आत्मसात केली जाते आणि रक्तात मुरवली जाते. आस्वादन प्रक्रियेचा मागोवा घेताना आपण सरधोपटपणे एक शब्द, त्या पुढील शब्द असा नातेसंबंध जोडत जातो परंतु काहीवेळा कवितेत असा संबंध निर्माण न होता, निरनिराळ्या प्रतिमा, प्रतीकांच्या साहाय्याने बांधणी करीत शेवटी आशयाची अभिवृद्धी साधली जाते. अशा वेळेस बहुतेकवेळा आपण आपली सहनशीलता मध्येच सोडतो आणि निष्कारण कवितेला दुर्बोधतेचे लेबल लावतो आणि कवितेच्या अभिसरणाचे सगळेच मार्ग खुंटवून टाकतो. एकापरीने आपण त्या कलाकृतीवर अन्याय करीत असतो. कविता ही ठराविक पायऱ्यापायरीनेच समजून घेणे हा जो पारंपरिक संस्कार झालेला आहे, तो अशा कवितेच्या आस्वादक प्रक्रियेला फार घातक आहे. कविता सहज समजली पाहिजे, गाण्याची चाल सोपी असायला हवी, कथाविष्कार डोक्याला त्रास देणारा नसावा, इत्यादी मागण्या नेहमीच निर्मितीच्या प्रगतीला मारक असतात. म्हणूनच मी वर म्हटले त्याप्रमाणे समाज आणि सांस्कृतिक बदल कधीही सहज प्रक्रियेने घडत नसतात. त्यातून कलाविष्कार बदल हा नेहमीच शेवटच्या पायरीवर येत असतो. यातूनच साचलेपण साचत जाते आणि एकूणच गढूळ वातावरण निर्माण होते. मुळात कवितेत रस घेणारे रसिक हे तसे संख्येने कमीच असतात त्यातून स्वागतशील प्रवृत्तीचे रसिक नेहमीच तुरळकच असतात. जसे कलेत प्रयोगशील जरुरीचे असते त्याच चालीवर बोलायचे झाल्यास, आस्वाद आणि आस्वाद प्रक्रिया ही नेहमीच परिवर्तनशील असणे फार जरुरीचे आहे. अर्थात या प्रक्रिया नेहमीच हळूहळू घडत असतात आणि त्या तशाच घडायला हव्यात अन्यथा कुठलेही बदल सर्वार्थाने स्वीकारणे अशक्य होऊन बसते आणि प्रगती थांबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कुठलाही आस्वाद हा आधी आपल्या मनाशी नंतर रक्तात मुरावा लागतो त्याशिवाय कलाकृतीचे समग्र आकलन अशक्य.
No comments:
Post a Comment