फार वर्षांपूर्वी प्रख्यात संगीतकार श्रीनिवास खळ्यांचे "गोरी गोरी पान, फुलासारखी छान" हे बालगीत अतिशय लोकप्रिय झाले होते, इतके की कवी ग.दि.माडगूळकरांनी कौतुकाने "अहो खळे, या गाण्याने मी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलो". वास्तविक माडगूळकर, त्याआधीच घरगुती झाले होते पण यानिमित्ताने त्यांनी श्रीनिवास खळेकाकांचे कौतुक करून घेतले. अशाच वेळी कुणीतरी या गाण्याचे कौतुक करीत असताना, खळ्यांनी मात्र आपली आवड म्हणून "नाच रे मोरा आंब्याच्या वनात" या बालगीताचे नाव घेतले. वास्तविक प्रस्तुत बालगीत प्रसिद्ध नक्कीच होते परंतु कालौघात काहीसे मागे पडले होते. अर्थात त्यानिमित्ताने काही लोकांना या गाण्याचे संगीतकार पु.ल.देशपांडे आहेत, ही माहिती "नव्याने" समजली. पु.ल. आपल्या असंख्य व्यापात वावरत असताना, त्यांनी आपल्यातील संगीतकार या भूमिकेबाबत नेहमीच अनुत्साही राहिले आणि खुद्द संगीतकारच जिथे मागे रहात आहे तिथे मग इतरेजन कशाला फारसे लक्षात ठेवतील? परंतु संगीतकार म्हणून पु.लं. नी ललित संगीतात काही, ज्याला असामान्य म्हणाव्यात अशा संगीतरचना केल्या आहेत. बऱ्याचशा रचना कालानुरूप अशा केल्या आहेत आणि त्यात फारशी प्रयोगशीलता आढळत नाही परंतु चालीतील गोडवा, शब्दांचे राखलेले औचित्य आणि काहीवेळा स्वररचनेवर राहिलेला नाट्यगीतांचा प्रभाव आणि त्यातूनच निर्माण झालेले "गायकी" अंग, यांमुळे गाणी श्रवणीय झाली आहेत.
याच मुद्द्यांना धरून आपण इथे "माझिया माहेरा जा" या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. कवी राजा बढे यांची कविता असून, ज्योत्स्ना भोळ्यांनी गायलेले आहे. या गाण्याचा, स्वररचनेच्या अंगाने विचार केल्यास, त्याच्यावर मास्तर कृष्णरावांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो. खरतर असे देखील म्हनता येईल, १९४० च्या सुमारास सुरु झालेल्या मराठी भावगीतांचा प्रवास हा मास्तर कृष्णरावांच्या प्रभावाखालीच सुरु झाला. अर्थात पुढे मराठी भावगीताने अनेक प्रकारची वळणे घेतली आणि तशी वळणे घेणे स्वाभाविकच ठरते. मुळातला गद्य लेखक, त्यामुळे शब्दांची किंमत काय असते,याची यथायोग्य जाणीव आणि याचाच परिणाम, पु.लं.च्या संगीतरचनांवर झाला. त्यांची कुठलीही स्वररचना घेतली तरी त्यात चाल बांधताना, शब्दांचे औचित्य कसोशीने सांभाळल्याचे दिसून येते.
आता याच रचनेच्या संदर्भात मांडायचे झाल्यास, "हळूच उतरा खाली" इथे स्वर पायरीपायरीने उतरवून, शब्दांबाबतची औचित्याची भावना सुरेखरीत्या दाखवून दिली आहे. वरती मी उल्लेख केल्याप्रमाणे , मास्तरांच्या रचनेतील प्रासादिकता, कल्पक छोट्या अशा ताना, आवाजाला तरलपणे फिरवण्याची हातोटी, एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीत दोन वेगळ्या सुरांचा वापर करून चमत्कृती घडवायची आणि रचनेत रमणीयता आणायची इत्यादी खुब्यांचा आढळ पु.लं.च्या बहुतेक रचनांमधून ऐकायला मिळतो. गाण्यातील भावना ही उघडपणे नुकतीच सासुरवाशीण झालेल्या नवथर तरुणीच्या माहेरच्या आठवणीने व्याकुळ झालेली आहे. अर्थात आठवण म्हटल्यावर काहीशी कातर अवस्था साहजिकच आहे. कविता म्हणून विचार केल्यास, सरळ, साधी शब्दरचना आहे. कुठेही गूढता नाही आणि उपमा, उत्प्रेक्षा असल्या अलंकारात अडकलेली नाही. मुळात पाखराचे प्रतीक आधाराला घेतल्यावर कवितेत एकप्रकारचा तरंग अनुभवता येतो.
माझिया माहेरा जा! रे पाखरां,
माझिया माहेरा जा.
देतें तुझ्या सोबतीला ,आतुरले माझे मन
वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण
मायेची साउली, सांजची साउली
माझा ग भाईराजा.
खरतर निरोप देण्यासाठी पक्ष्याचे प्रतीक वापरायचे, ही कालिदासाने मांडलेली कल्पना!! तीच कल्पना इथे राजा बढे यांनी स्वीकारली आहे पण अंधानुकरण न करता, त्या कल्पनेला मराठी संस्कृतीचा दाखला दिला आहे. माहेरच्या आठवणीने मनात उठलेले तरंग, हेच या कवितेचे प्रधान वैशिष्ट्य आहे आणि याच भावनेतून मांडली गेलेली कविता आहे. "मायेची साउली, सांजची साउली" ही शब्दकळा अगदी पारंपरिक आहे पण इथे मात्र आशयाशी नाते जुळवून गेली आहे. ललित संगीतातील कविता कशी असावी, याबाबत राजा बढे यांच्या कविता आदर्श ठरू शकतात.
माझ्या रे भावाची उंच हवेली,
वहिनी माझी नवीनवेली
भोळ्या रे सांबाची भोळी गिरीजा.
गायिका म्हणून ज्योत्स्ना भोळ्यांच्या आवाजाला काही मर्यादा होत्या. तारता पल्ला फार विस्तृत नव्हता तसेच गायन हे शक्यतो मध्य सप्तकातच उठून यायचे. स्त्री स्वर म्हणून तयार सप्तकात स्वर लांबवणे फार काळ जमत नसे. परिणामी छोट्या ताना, हरकती, वेलांटीयुक्त मुरक्या हीच त्यांच्या गायकीची खरी शक्तिस्थाने म्हणता येतील. परंतु एक बाब विशेषत्वाने मांडावी लागेल, गेल्यावर शास्त्रीय संगीताचे थोडेफार संस्कार असल्याने गायनात ठसठशीतपणा तसेच प्रसंगी चढ-उतार घेणे सहज जमत होते. काहीसा अनुनासिक स्वर तसेच काहीसा निमुळता होत जाणारा आवाज, त्यामुळे गायनाला एक "सुरेख टोक" मिळायचे परंतु त्याचा वेगळा परिणाम असा झाला,आवाजात गोलाई फारशी अनुभवणे अवघड गेले, तसेच "गाज" ऐकणे दुर्लभ होते.
अंगणात पारिजात, तिथं घ्या हो घ्या विसावा
दरवळे बाई गंध, चोहीकडे गावोगावां
हळूच उतरा खाली, फुलें नाजूक मोलाची
माझ्या माय माऊलीच्या काळजाच्या की तोलाची
"तुझी ग साळुंखी, आहे बाई सुखी"
सांगा पांखरांनो, तिचिया कानीं
एवढा निरोप माझा.
संगीतकार म्हणून पु.लं.चे वैशिष्ट्य आणि मर्यादा याबाबत वरतीच थोडेफार लिहिले आहे. मराठी ललित संगीताच्या बाबतीत एक बाब नेहमीच जाणवते, वाद्यमेळ आणि त्यातून निर्मिली जाणारी सर्जनशीलता, याचे नेहमीच व्यस्त प्रमाण राहिले. याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक चणचण. हाताशी मोजकीच वाद्ये आणि वादक असल्याने, प्रयोगशीलता (हिंदी गाण्यांच्या संदर्भात विचार करता) जवळपास नाहीच आणि हे बरीच वर्षे मराठी ललित संगीतात चालू होते. याचा परिणाम असा झाला, गाण्याची चाल हेच स्वररचनेचे बलस्थान राहिले आणि गळ्यातून निर्मिलेले लयीचे वेगवेगळे बंध, हीच सौंदर्यवृद्धी राहिली. त्यातून खाजगी गाण्याच्या बाबतीत (मराठी भावगीते) तर ही मर्यादा अधिक स्पष्ट झाली. निरनिराळी वाद्ये हाताशी घेऊन,स्वरांचे अभूतपूर्व सौंदर्य दाखवण्याची संधी एकूणच कमी आढळते, त्यामागे हेच कारण महत्वाचे आहे.
आणखी एक बाब मांडायची झाल्यास, या गायनावर बालगंधर्वांच्या शैलीचा पगडा गडद आहे. ओळीचा शेवट करताना,ज्या हरकती घेतल्या आहेत, त्या जाणीवपूर्वक ऐकल्या तर या विधानाचे प्रत्यंतर येईल. आता, इथेच बघायचे झाल्यास, "माझिया माहेरा जा" ही ओळ किंवा शेवटच्या अंतऱ्यातील "अंगणात पारिजात" हे गाताना वेगवेगळ्या लयीत घेताना बालगंधर्वांच्या शैलीचा प्रत्यय येतो.
असे असले तरी हे गाणे मराठी भावगीतात आपले नेमके स्थान निर्माण करून बसले आहे, हे निश्चित. काहीशी नाट्यगीताच्या धर्तीवरील चाल पण तरीही गायकी अंगाची असल्याने, गायला काहीशी अवघड झालेली चाल, असेच एकुणात वर्णन करता येईल.
No comments:
Post a Comment