प्रिटोरिया मधील २००७ ऑगस्ट महिन्यातील शेवटचा आठवडा. अर्थात सगळीकडे कडाक्याच्या थंडीचा अंमल असल्याने, रस्त्यावरील तुरळक फिरणारे देखील कपड्यांचा जामानिमा सांभाळून, थंडीपासून संरक्षण करीत होते. मी मात्र, उत्सुकतेने, युनिव्हर्सिटी सभागृहाकडे गाडी झपाझप पळवत होतो. जगप्रसिद्ध कलाकार आंद्रे रुई आणि त्याच्या ग्रुपचा तिथे कार्यक्रम होता. एकतर मी, प्रथमच अशा कार्यक्रमाला जात असल्याने, कार्यक्रम कसा असेल, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. तसे त्याचे कार्यक्रम मी साउथ आफ्रिकेतील टेलिव्हिजनवर काहीवेळा बघितले होते पण अखेर प्रत्यक्ष कार्यक्रम बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कार्यक्रम संध्याकाळी ६.०० चा होता. माझे तिकीट आरक्षित असल्याने, जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता.
थंडीचे दिवस असल्याने, सभोवताली दाट काळोख पसरला होता. आदल्या दिवशी पाउस शिंपडलेला असल्याने, वातावरण कमालीचे गारठलेले!! सुदैवाने, गाडी पार्क करायला लगेच जागा मिळाली आणि मी सभागृहात गेलो. जवळपास, १२ वर्षे या देशात राहून देखील, त्यावेळेपर्यंत, मी अशा प्रशस्त सभागृहात गेलो नव्हतो, तसा जाण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. दुमजली प्रशस्त सभागृह!! आता शिरता क्षणीच, सभागृहाचा आवाका, तुम्हाला अवाक करतो!! समोर विस्तीर्ण स्टेज, जिथे आंद्रे आणि त्याचा ग्रुप कार्यक्रम सादर करणार होते. सहज आजूबाजूला बघितले, कार्यक्रमाला केवळ वयस्कर माणसे नसून कितीतरी तरुण मुले/मुली आल्या होत्या. मुलांनी देखील, नेहमीप्रमाणे जीन्स वगैरे न घालता, पारंपारिक वेशभूषा केली होती, अगदी चक्क टाय वगैरे घालून, तरुण मुले आली होती!! मुली देखील त्यामानाने व्यवस्थित कपडे घालून आल्या होत्या.
कार्यक्रमाला सुरवात व्हायची होती म्हणून लोकं हळू आवाजात कुजबुजत होती. अचानक, सभागृहातील दिवे मंदावले आणि स्टेजवरील दिवे थोडे प्रखर झाले. हळूहळू एकेक वादक येउन, आपापल्या जागी बसायला लागला आणि वाद्ये जुळवायला लागला. आता, आजूबाजूची कुजबुज बंद झाली होती. सगळे वादक स्थिरावले असताना, तिथे आंद्रेने प्रवेश केला आणि सगळे सभागृह त्याला अभिवादन देण्यासाठी उभे राहिले. किंचित कुरळे केस, थोडासा वयस्कर भासणारा, उंचापुरा गोरा वर्ण, चेहऱ्यावर लखलखित हास्य आणि आत्मविश्वास!! लगेच त्याने आपले व्हायोलीन स्वरांत लावले आणि "आता, आम्ही बिथोव्हनची पाचवी सिंफनी सादर करणार आहोत" अशी अत्यंत हलक्या आवाजात घोषणा केली. मी देखील खुश. ही रचना म्हणजे बिथोव्हनची सर्वोत्तम रचना मानली जाते.
एकदम, ताफ्यातील व्हायोलिन्स एका सुरात वाजायला लागली. मी अत्यंत एकाग्र होऊन ऐकत होतो. कुठेही एखादे व्हायोलीन, वरखाली वाजत नव्हते. वास्तविक C minor या स्वराने सुरु होणारी रचना, सादर करायला घेणे, हेच मुळात एक आव्हान असते.
सभागृहातील Acoustic System तर केवळ थक्क करणारी होती. वाद्यातून उमटणारा प्रत्येक स्वर, अत्यंत सुस्पष्टपणे आणि तो जो स्वर, ज्या "वजनाने" वाजत आहे, त्याच वजनाचा तंतोतंत प्रत्यय देणारी अशी ही व्यवस्था असल्याने, कान तृप्त होत होते. जवळपास २० मिनिटे ही रचना वाजवली, पुढे त्यांनी आणखी काही रचना वाजवल्या. एक लक्षात आले, आपण भरल्या मैफिलीत जशी उस्फुर्त दाद देतो, तसा प्रकार इथे अजिबात आढळला नाही. रचना संपली की मग टाळ्यांचा पाउस. पुढे, त्यांनी एक हंगेरियन लोकसंगीतातील धून वाजवायला घेतली आणि अहो आश्चर्यम, सभागृहातील सगळी जोडपी, स्टेजपुढील मधल्या मोकळ्या जागेत एकत्र येउन, नृत्याला सुरवात केली!! कुठेही गडबड नाही की गोंधळ नाही!! सगळे कसे अत्यंत सुविहितपणे चालले होते. जशी ही रचना संपली तसा सभागृहात एकाच गलका उठला आणि परत तीच धून आणि परत तसेच नृत्य!! हा विलक्षण सुंदर अनुभव होता.
संपूर्ण कार्यक्रम जवळपास ३ तास चालला होता. कार्यक्रम संपला तशी पुन्हा टाळ्यांचा प्रचंड गजर आणि स्टेजवरील आंद्रे, कमरेत झुकून, ते अभिनंदन सस्मित स्वीकारत होता. कार्यक्रम संपला आणि ज्या प्रकारे प्रेक्षक सभागृहात आले, त्याच शिस्तीने, सभागृहाच्या बाहेर पडले, कुठेही धक्का-बुक्की नाही की आरडा-ओरड नाही!!
कार्यक्रम संपला आणि त्याच धुंदीत, मी घरी परतलो. शनिवार असल्याने, घरी आल्या आल्या, सिस्टीमवर मी बीथोवनची पाचवी सिंफनी लावली. अर्थात माझ्याकडे दुसरे version होते. नुकतेच आंद्रेने सादर केलेले ऐकल्याने, ते सूर डोक्यात तरंगत होते आणि आता त्याच्या जोडीने, माझ्याकडील जर्मन वाद्यवृंदाने सादर केलेली रचना, सीडीवरून ऐकत बसलो. तसे बघितले सूर तेच परंतु दोन्ही सादरीकरणात बऱ्याच ठिकाणी फरक जाणवत होता. याचे मुख्य कारण, प्रत्येकाची रचनेकडे बघण्याची "नजर" वेगळी. वास्तविक, बीथोवनची रचना लिखित स्वरूपात उपलब्ध असते पण तरीही, वाद्यवृंदाचा प्रमुख - कंडक्टर जो असतो, तो त्याच रचनेकडे काय नजरेने बघतो, म्हणजे त्याला कुठला भाग अधिक भावतो आणि त्याप्रमाणे तो, आपल्या वादकांकडून तसे वादन करवून घेतो, इथे सगळा फरक पडत होता. हे थोडेसे आपल्या रागदारी संगीतासारखे झाले.
आपल्या भैरवी रागाचे स्वर लिहिलेले असतात म्हणजे प्राथमिक स्वरसप्तक लिहिलेले असते परंतु त्या स्वरांचे उच्चारण कसे करायचे, याबाबतचे "स्वातंत्र्य" प्रत्येक कलाकाराला असते आणि त्यानुरूप ती भैरवी रसिकांच्या समोर सादर केली जाते. रात्रभर मी ही सीडी ऐकत होतो. रात्री कधीतरी मला अशीच एक अविस्मरणीय मैफिल आठवली.
मुंबईतील रंगभवन सभागृह. रात्रीचे जवळपास ११. वाजले होते. मला वाटते, १९८१ मधील ही मैफिल असावी. त्यावेळी, मैफिलीच्या वेळेवर कसलेच बंधन नसायचे. आता, आधी कोण कलाकार होते, ते नक्की आठवत नाही पण, मध्यरात्रीच्या सुमारास पंडित रवि शंकर आणि साथीला उस्ताद अल्लार खांसाहेब आणि उस्ताद झाकीर हुसेन. स्टेजच्या मधोमध पंडितजी आणि त्यांच्या उजव्या बाजूला उस्ताद अल्लार खांसाहेब आणि डाव्या बाजूला उस्ताद झाकीर हुसेन. पंडितजींच्या मागे त्यांचेच शिष्य, शमीम अहमद. प्रेक्षकांत पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरीप्रसाद चौरासिया होते.
स्टेजवर आल्या आल्या, लगेच वाद्ये सुरांत जुळवली आणि पंडितजींनी, सतारीवर "झणत्कार" काढला. डिसेंबर महिना असल्याने, हवेत सुखद गारवा होता. सभोवताली, रातराणीची झाडे असल्याने, त्या फुलांचा गंध वातावरणात पसरला होता.
पंडितजींनी सुरवातीला पुरिया वाजवायला घेतला, सुरवातीची आलापी इतकी जीवघेणी होती की, आता पुढील मैफिल उत्तरोत्तर रंगत जाणार, याची आम्हा रसिकांना जणू ग्वाही(च) मिळाली!! अत्यंत सुहास्य वदनाने वादन सुरु केले, हळूहळू "बढत" सुरु केली. आलापी नंतर, मध्य लय आणि पुढे द्रुत झाला वाजवून झाला. सगळा पुरिया राग, जणू रसिकांच्या पुढ्यात उभा केला!! त्यानंतर, या दोन उस्तादांनी तबल्यावर आपली करामत दाखवायला सुरवात केली आणि फटाक्यांची माळ वाजवावी, तसे वादन सुरु झाले.
प्रेक्षक देखील अधून मधून टाळ्यांची बरसात करीत होते. जवळपास, तासभर अशी आतषबाजी चालू होती. साधारपणे, उत्तर रात्री ३.३० च्या सुमारास, पंडितजींनी "सिंध भैरवी" वाजवण्याची घोषणा केली. लगेच भैरवीचे आर्त सूर आसमंतात पसरले गत मध्य लयीत शिरली आणि अचानक, पंडितजींनी, दोघां उस्तादांना वाजवण्याची संपूर्ण मोकळीक दिली!! त्यावेळी, या दोघांनी, जी काही जुगलबंदी पेश केली, ती आजही ३४ वर्षे झाली तरी डोळ्यासमोरून हललेली नाही. जवळपास, अर्धा तास कहर वादन. तबल्यातील, "रेला", "चक्रधार","कायदा" इत्यादी अलंकार अक्षरश: झगझगीतपणे रसिकांच्या समोर पेश होत होते. अखेर भैरवी दीड तासाने संपली आणि अवाक झालेल्या प्रेक्षकांनी उभे राहून, जी काही मानवंदना दिली होती, तिला तोड नाही. पहाटेचे ५. वाजून गेले होते आणि मी तसाच चालत घरी आलो, ते त्या अलौकिक सुरांच्या मदतीने.
इथे मी मुद्दामून, या दोन मैफिलींचे थोडे सविस्तर वर्णन केले आहे. दोन्ही मैफिली शास्त्रीय संगीताच्याच परंतु वादन, सादरीकरण आणि अनेक बाबतीत मला या मैफिलींमध्ये फरक जाणवला. सगळेच कलाकार, त्यांच्या क्षेत्रातील अत्युच्च स्थानावर विराजमान झालेले, प्रेक्षकांसमोर मैफिल कशी सादर करायची, याचा अचूक आराखडा मांडून, त्याप्रमाणे रचना सादर करण्याचे असामान्य कौशल्य!!
आता थोडा विचार करायचे झाल्यास, सिंफनी आणि रागदारी संगीत, यांच्यात "सप्तक" हे सारखेच असते. मग प्रश्न उद्भवतो, नेमका फरक कुठे आणि कसा विशद करता येईल? फरक तर नक्कीच आहे. त्या दृष्टीने बघायला गेलो तर,"सप्तक" याची मूळ संकल्पना ही भारतीय संगीतात सापडते. भरत मुनींच्या "नाट्यशास्त्र" ग्रंथात, या विषयाची पाळेमुळे सापडतात आणि भरताचा काल, हा इसवी सन पूर्व २०० वर्षे आधीचा मानला जातो, ज्यावेळेस पाश्चात्य संगीताचा उगम अति प्राथमिक ग्रीक संगीताशी जोडला जातो परंतु पाश्चात्यांनी, पुढे ग्रीक संगीताचा संपूर्ण त्याग करून, १६०० च्या सुमारास, सध्याच्या प्रचलित संगीताची प्रतिष्ठापना केल्याचे समजून घेता येते. त्या दृष्टीने भरत मुनींना याबाबत अग्रहक्क देणे, क्रमप्राप्त होते पण तरीही, भरताच्या ग्रंथात, संगीतावर केवळ एकच दीर्घ प्रकरण आहे आणि त्यात, सप्तकाची आणि श्रुतींची कल्पना मांडली आहे. या कल्पनेचा खरा विस्तार, शारंगदेवांच्या "संगीत रत्नाकर" या ग्रंथात आढळतो. हा ग्रंथ साधारणपणे इ.स. १२१० च्या सुमारास लिहिल्याचे आढळते, म्हणजेच आजचे जे पाश्चात्य संगीत आहे, त्याचा मागमूस देखील, त्या काळात नव्हता. अर्थात, भारतीय संगीत देखील अनेक वेगवेगळी वळणे घेऊन, आजच्या वळणावर येउन ठेपले आहे, हे देखील मान्यच करायला हवे.
आपल्या भारतीय संगीतात ज्याप्रमाणे, ठाय लय, मध्य लय आणि द्रुत लय, असे ढोबळ मानाने खंड पाडलेले दिसतात आणि पाश्चात्य संगीतात देखील, याचा धर्तीवर,"Allegro Sonata", "Adagio","Minuet or Scherzo" आणि "Rondo or Sonata" अशा प्रकारच्या रचना किंवा रचनेची "बढत" ऐकायला मिळते. पाश्चात्य संगीत हे प्रामुख्याने वाद्यांच्या संगतीने विस्तारित गेले आहे तर भारतीय संगीत हे मौखिक पद्धतीने वाढले आहे आणि यात आजही फारसा बदल झालेला आढळत नाही. याचा प्रमुख परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे व्यक्तिपरत्वे बदलत गेले. बदलत गेले,म्हणजे स्वर तेच राहिले परंतु त्या स्वरांची मांडणी बदलत गेली आणि त्यामुळे आजही भारतीय संगीत संपूर्णपणे, लिखित स्वरूपात मांडणे अशक्य होऊन बसले. या उलट, पाश्चात्य संगीत हे अतिशय काटेकोरपणे, बंदिस्त होत गेले आणि त्यामुळे ते संगीत संपूर्णपणे लिखित स्वरूपात मांडणे शक्य झाले.
पाश्चात्य संगीत हे प्रामुख्याने, इटली, ऑस्ट्रिया आणि जर्मनी या देशांत अधिकाधिक विकसित होत गेले. याचा सदृश परिणाम असा झाला, त्या देशांतील रचनाकारांच्या विचारांचे प्रतिबिंब, त्यांच्या रचनेत पडले आणि त्यात विविधता आली. अगदी पुढे, ऑर्केस्ट्रा पद्धत अस्तित्वात आली पण, तरीही रचना आणि त्याचे सादरीकरण, यात उपरी निर्दिष्ट देशांच्या संस्कृतीचा प्रभाव अभावितपणे पडलेला दिसून येतो. आधुंक काळात, या देशांच्या मालिकेत रशिया येउन मिसळला आणि वैविध्य अनेक पटीने वाढत गेले.
याबाबत असे म्हणता येईल, जर्मनीतील रचना अधिकतर पियानो वाद्य आधाराला घेऊन, बहुतांशी रचल्या गेल्या आहेत आणि याचे प्रमुख कारण असे संभवते, पियानो वाद्यात, एकाच वेळी अनेक स्वर घेण्याची सुविधा असते आणि त्यातून हार्मनी निर्माण करणे सहज शक्य असते. तर ऑस्ट्रियात व्हायोलीन,फ्ल्यूट वाद्यांचा सढळरीत्या रचनेत आढळ दिसतो. अर्थात हे फार ढोबळ वर्णन आहे.
आता प्रश्न असा आहे, जर का दोन्ही संगीत प्रकारांत सूर तेच असतात तर सादरीकरण वेगळे कसे? वादन तर भिन्न असते, हे स्पष्टपणे समजून घेता येते. यासाठी आपण, "सिंफनी" संगीत आणि त्याची रचना, याबाबत थोडे विवेचन करूया. अठराव्या शतकात या संगीताचा उदय झाला. त्यावेळी, विशेषत: युरपमध्ये कंठसंगीत विकसित झाले नव्हते, आणि जे होते ते थोडेफार "ऑपेरा" संगीताच्या स्वरूपात होते. परंतु या संगीताचा जनमानसावर तितका पगडा बसला नव्हता. हे ऑपेरा संगीत म्हणजे आपल्या मराठी नाट्यसंगीताचे उगमस्थान!! याबाबतचे एक सुरेख उदाहरण इथे देता येईल. प्रसिद्ध गायक प्लेसिडो डोमिंगो याने सादर केलेली "Celesta Aida" ही रचना ऐकावी. ऑपेरा संगीतातील एका असामान्य ताकदीच्या गायकाने, या रचनेत जी गायकी दाखवली आहे, ते केवळ अपूर्व आहे. संगीताबाबत आपल्या जाणीव विस्तारित करणारी ही रचना आहे. ही रचना ऐकताना, आपल्याला पूर्वीचे ग्रीक संगीत कसे होते आणि त्यानंतर त्यातून परावर्तीत झालेले सिंफनी संगीत, हा प्रवास देखील अजमावता येतो. या ऑपेरा संगीतातील शास्त्रीय संगीताचा भाग उचलून, पुढे "जोसेफ हायडन","मोझार्ट","बाख" ह्यांनी सिंफनी संगीताचा पाया घातला आणि त्याला मूलत: जोड होती, ती हाताशी असलेल्या वाद्यांची. याचे परिवर्तन पुढे "ऑर्केस्ट्रा" मध्ये झाले. त्यावेळी, "violin","cello", "viola" , "double Bass," अशी वाद्ये होती. यातूनच "ऑर्केस्ट्रा" ही संकल्पना विकसित झाली. पुढे यात "Trumpet", " Clarinets","Flute",' Keyboards" ही वाद्ये अंतर्भूत झाली. याचाच वेगळा अर्थ लावायचा झाल्यास, या सगळ्या वाद्यांना, सामावून घेणारी अभिजात कृती - हा सिंफनी संगीताचा पाया ठरला. याच मालिकेत नंतर जर्मनीमधून, "बीथोवन","ब्राहम" असे संगीतकार उदयाला आले, आणि सिम्फनी संगीत विस्तारायला लागले.
हे संगीत विकसित करताना, ग्रीक नाटकांतून जे "ऑपेरा संगीत" प्रचलित होते, त्यातील काही निवडक भाग, सिंफनी संगीतात समाविष्ट केला गेला - जसे इटालियन नाटकांत "Overture" नावाची रचना असायची.मराठी संगीत नाटकात, नाटकाच्या आधी, "नांदी" म्हणून गायन प्रकार असायचा, त्याचेच "मूळ" म्हणजे Overture. याचाच आधार घेऊन, सिंफनी रचनेतील पहिल्या भागाला Overture हेच नाव ठेवले. प्रसिद्ध संगीतकार टायकोव्हस्कीची "Tchaikovsky 1812 Overture" ही बारकाईने ऐकली म्हणजे "Overture" या संकल्पनेची अधिक येऊ शकेल. नेहमीप्रमाणे व्हायोलीन वाद्यावर सुरावट सुरु होते आणि हळूहळू त्यात इतर वाद्ये मिसळत जातात. हे जे सुरांचे "मिसळणे" आहे, ते इतके मनोवेधक आहे की आपण त्यात कधी गुंतून जातो, याचा पत्ताच लागत नाही. या संकल्पनेचा पाया थोडा व्यापक करून, भारतीय संगीताच्या बाबतीत लिहायचे झाल्यास, "ठाय लय,","द्रुत लय","अति द्रुत लय" असे खंड पाडून भारतीय संगीत नव्याने सादर करायला सुरवात झाली.
आता, अशी अनेक वाद्ये वापरायची ठरल्यावर मग, सगळ्या रचना या वाद्यांना अनुलक्षून तयार करण्यात आल्या. सिंफनी संगीत जरा बारकाईने ऐकले तर लगेच आपल्या ध्यानात येऊ शकते. वाजवायला जरी अनेक वादक असले तरी बहुतेक रचनेत एखादे वाद्य प्रमुख असते आणि त्या वाद्याला अनुरूप असे स्वर इतर वाद्ये एकाच वेळी परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व राखून वाजत असतात. याचा परिणाम असा होतो, एकाच वेळी, एकाच लयीत अनेक स्वर एकत्रित गुंफले जातात आणि त्याचा संपृक्त परिणाम आपल्या ऐकायला मिळतो. यहुदी मेन्युहीन हे नाव याबाबतीत घ्यायला लागेल आणि ज्यांनी या कलाकाराचे वादन ऐकले असेल, त्यांना माझ्या वाक्याची प्रचीती येऊ शकेल. यहुदी मेन्युहीन यांचे बरेच वेळा एकल वादन, अशा स्वरूपाचे कार्यक्रम सादर केले. काहीवेळा त्यांनी सिंफनी ऑर्केस्ट्रासह वादन केले आहे पण एकूण कल, ऐकल वादनाकडे. या संदर्भात उदाहरण द्यायचे झाल्यास, Mozart Violin Concerto # 5 Vienna Symphoniker ही रचना आवर्जून ऐकावी. या वादनात मेन्युहिन यांचे एकल वादन चालू असते पण त्याच्या पाठीमागे, इतर व्हायोलीन वादकांच्या सुरावटीची अत्यंत मंद स्वरांत साथ आहे, जणू स्वरांचे "अस्तर" असावे. याचा संपृक्त परिणाम आपल्या मनावर अतिशय घनदाट होतो. अर्थात, बाकीची वाद्ये देखील त्यात वाजत आहेत पण, सगळ्या वादनाचा परिणाम,ती रचना घाटदार होण्याकडे असते.
सिंफनी संगीताबाबत आणखी वेगळा विचार मांडायचा झाल्यास, आपल्याकडील सतार किंवा सरोद वादन चालू असते तेंव्हा वाद्याच्या मुख्य पडद्यांवर रागाची सुरावट चालू असते परंतु त्याच्या पाठीमागे, इतर "पडदे" जे बांधलेले असतात, त्यातून या प्रमुख स्वरांना भरीव जोड मिळत असते आणि त्यामुळे सादर होणारी रचना अधिक बंदिस्त तरीही व्यापक पायावर आधारित होत असते. फरक इतकाच असतो, सिंफनी संगीतात एकाच वेळी अनेक वाद्ये वाजत असतात.
सिंफनी संगीताबाबत आणखी वेगळा विचार मांडायचा झाल्यास, आपल्याकडील सतार किंवा सरोद वादन चालू असते तेंव्हा वाद्याच्या मुख्य पडद्यांवर रागाची सुरावट चालू असते परंतु त्याच्या पाठीमागे, इतर "पडदे" जे बांधलेले असतात, त्यातून या प्रमुख स्वरांना भरीव जोड मिळत असते आणि त्यामुळे सादर होणारी रचना अधिक बंदिस्त तरीही व्यापक पायावर आधारित होत असते. फरक इतकाच असतो, सिंफनी संगीतात एकाच वेळी अनेक वाद्ये वाजत असतात.
अर्थात, हे फार ढोबळ वर्णन झाले कारण, भारतीय संगीत हे प्रामुख्याने "मेलडी"वर आधारित असते तर पाश्चात्य संगीत हे "हार्मनी" वर आधारलेले असते. आपल्या पुढील विवेचनात, हेच मुद्दे विचारार्थ घ्यायचे आहेत.
"हार्मनी" याचा सर्वसाधारण अर्थ असा, ज्या सांगीतिक रचनेत, एकाच वेळी अनेक स्वर घेऊन, स्वरांच्या निरनिराळे "स्वरबंध" निर्माण करून स्वरांचे सौंदर्य सादर करायचे. पाश्चात्य संगीतात, "ऑर्केस्ट्रा" किंवा "वाद्यमेळ" जो विकसित झाला, त्याची "पाळेमुळे" आपल्याला हार्मनीमध्ये आढळतील.
"मेलडी" जी भारतीय संगीताचा "गाभा" म्हणून ओळखली जाते, तिचा या संदर्भात विचार करायचा झाल्यास, भारतीय संगीतात, एक स्वर घेऊन तिथून पुढे दुसरा स्वर घ्यायचा, असा प्रवास सुरु असतो. याचाच वेगळा अर्थ असा घेता येतो, एका वेळी एक स्वर घ्यायचा आणि त्या स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे वळायचे, असा होतो.
यात अधिक स्पष्टता येण्यासाठी, आपण एक तक्ता बघूया.
भारतीय सप्तक :- सा रे ग म प ध नि
पाश्चात्य सप्तक :- C D E F G A B
आता आपल्या सहज ध्यानात येईल, दोन्ही प्रकारच्या संगीतात, स्वरांचे "मुलतत्व" सारखे आहे म्हणजे सप्तक तसेच आहे. परंतु हार्मनीमध्ये, C स्वराच्या जोडीने D, E हे स्वर घेतले जातात तर मेलडी मध्ये, सा स्वर घेऊन तिथून पुढे रे,ग असे स्वर घेतले जातात. भारतीय संगीतात, "सम" ही संकल्पना अतिशय महत्वाची मानली जाते.वास्तविक "सम" म्हणजे तालवाद्याची पहिली मात्रा आणि त्या मात्रेशी, स्वरलयीचे विसर्जन होत असते आणि याच अनुषंगाने लिहायचे झाल्यास, आपल्याला इथेच समजून घेता येते. पहिला स्वर घेतला की पुढे जो स्वरांचा प्रवास सुरु होतो, आणि त्या अनुरोधाने, पुन्हा स्वररचना परत "मूळ" स्वराकडे वळते.
मेलडी अधिक सुंदर पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण, एक उदाहरण बघूया. लताबाईंचे "तुम क्या जानो, तुम्हारी याद मी हम कितना रोये" हे गाणे ऐकताना, आपण "मेलडी" चा आस्वाद घेऊ शकतो. हे गाणे, अगदी पहिल्या सुरापासून अतिशय ठाय लयीत आहे आणि स्वररचना सलग आहे. बागेश्री रागाच्या सावलीत गाण्याची चाल आहे पण,रागाचे स्वर आणि चाल यात बरीच फारकत आहे. गाणे ऐकताना स्वर कुठेही खंडित होत नाही, कापसाच्या पेळूतून सुताचा अखंडित धागा निघावा त्याप्रमाणे या गाण्यातील सूर येत असतात.
हार्मनीच्या बाबतीत उदाहरण घ्यायचे झाल्यास, आपण सगळ्यांनी मोझार्टची सिंफनी नंबर ४० जरा बारकाईने ऐकल्यावर असे आढळेल, सुरवातीपासून व्हायोलीनचे स्वर एका पातळीवर वाजत असतात आणि त्याचबरोबर या वाद्याच्या सोबतीला पियानोचे स्वर येत असतात. सुरवात काहीशी संथ, खालच्या सुरांनी होत असते पण लगोलग इतर व्हायोलिन्स त्याला येउन मिळतात आणि ध्वनीचा "उद्घोष" व्हावा त्याप्रमाणे रचना आपल्याला ऐकायला येते आणि आपण त्या रचनेत गुंगून जातो. ही रचना आणखी जरा बारकाईने ऐकली तर आपण सहज समजून घेऊ शकतो, रचना ज्या सुरावटीवर चालू होते, ती सुरावट ठराविक काळाने परत वाजत असते पण, तिचा ढंग निराळा असतो.
पाश्चात्य संगीतात, भारतीय संगीतात जसा एक प्रकारचा "ठेहराव" असतो, तसा येत नसून, त्याचा प्रवास सतत चालूच असतो. यातच पाश्चात्यांच्या संगीतातील "CHORD" ही संकल्पना जन्माला येते. तीन किंवा चार स्वरांच्या एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला "CHORD" म्हणता येईल. "Chord System" ही एकाच वेळी तीन स्वरांची देखील असू शकते किंवा चार स्वरांची देखील. हार्मनी या संकल्पनेचा विस्तार किंवा नेमके उदाहरण म्हणजे "Chord System" असे विधान,आपण इथे सहज करू शकतो.
यात आणखी मजेची बाब म्हणजे भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत, यात स्वरांच्या जाती, म्हणजे स्वरांचे उच्च/निचत्व हे जवळपास सारखेच असते. आपल्याकडे तीव्र/खर्ज अशी नावे आहेत तर पाश्चात्य संगीतात, Flat/Sharp अशा संज्ञा वापरलेल्या आहेत. आणखी साम्य बघायचे झाल्यास, पाश्चात्य संगीतात, एखादी chord मध्यवर्ती ठेऊन, रचनेचा विस्तार केला जातो. भारतीय संगीतात देखील आपण वादी/संवादी स्वर घेतच असतो, जिथे "वादी" स्वर केंद्रीभूत ठेऊन, रचनेचा विस्तार केला जातो. अर्थात, chord ही किती स्वरांची घ्यायची हे रचनाकारावर अवलंबून असते. थोडा विचार केल्यास, आपल्याला सहज आढळून येते, हार्मनीमध्ये मेलडीचा 'अंश" असतो!! जेंव्हा एकाच वेळी अनेक स्वर एकत्रित घेतले जातात तेंव्हा, जरी स्वरांचा "गुच्छ" असला तरी प्रत्येक स्वर हा "स्वतंत्र" असतोच!! फक्त सादरीकरण त्याची आपल्याला जाणीव करून देत नाही. थोडक्यात, हार्मनीमध्ये मेलडी असू शकते पण, मेलडी स्वतंत्रपणे आपले अस्तित्व राखू शकते.
खरतर वर दिलेल्या उदाहरणात, हार्मनीमध्ये मेलडी असू शकते, हे देखील बघता येईल. मोझार्टच्या रचनेत, सुरवातीला जे व्हायोलीनचे स्वर आहेत, ते एका सुरावरून दुसऱ्या स्वरावर संथपणे विसावत आहेत, म्हणजेच प्रत्येक स्वर "सुटा" वाजत आहे. ही तर भारतीय संगीतातील मेलडीची प्राथमिक अवस्था!! पुढे वाद्यमेळ सुरु होतो आणि तिथे हार्मनी अवतरते.
आता थोडे पुढे जाउया. आता, हार्मनी काय किंवा मेलडी काय, दोन्ही प्रकारात तालांचे अस्तित्व हे असतेच. त्या दृष्टीने बघायचे झाल्यास,भारतीय संगीत अतिशय "श्रीमंत" आहे, असे मानायला प्रत्यवाय नाही. भारतीय संगीतात, तालाचे विविध तसेच अतिशय गुंतागुंतीचे प्रकार आहेत आणि त्यामुळे भारतीय संगीत अधिक वैविध्यपूर्ण झालेले आहे. पाश्चात्य संगीतात, तालाचे अस्तित्व नक्कीच आहे. थोडे तांत्रिक भागाकडे वळायचे झाल्यास, ज्याप्रमाणे संगीतात, जिथे स्वरलय अस्तित्वात असते, त्याचबरोबर तिथे कालस्तरावरील लय देखील अंतर्भूत असते. कालस्तरावरील लय म्हणजे ताल.
भारतीय संगीतात अनेक ताल अस्तित्वात आहेत, जसे १६ मात्रांचा त्रिताल, जो सर्वात लोकप्रिय आहे तर १४ मात्रांचा दीपचंदी सारखा काहीसा अनवट ताल. पाश्चात्य संगीतात त्यामानाने ताल आणि मात्रा याबाबत गुंतागुंत दिसत नाही. Metrical Rhythm, Measured Rhythm, Free Rhythm अशा प्रकारचे वर्गीकरण केलेले आहे. अर्थात, ताल आणि मात्रा, याबाबतीत भारतीय संगीतात, तालाचा सुरवातीचा आराखडा ठरल्यानंतर, पुढे "रेला", "चक्रधार","कायदा" अशी विस्ताराची परिमाणे तालाच्या प्राथमिक आराखाड्याला मिळत जातात आणि तालाचे वर्तुळ, अगदी आश्चर्य वाटावे, इतक्या विविधतेने नटलेले आढळते.
तालाच्या बाबतीत आणखी एक साम्य दर्शविता येते. दोन्ही संगीतात, तालाच्या मात्रा या लिहून तसेच हाताने दर्शविता येतात. भारतीय संगीतात, "टाळी", "खाली" अशा प्रकारे ताल आणि त्याचे वजन दाखवता येते. पाश्चात्य संगीतात, metre (music), Bar (Music) अशा प्रकारे तालाचे निर्देशन केले जाते. थोडे वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, भारतीय संगीतातील त्रिताल हा १६ मात्रांचा आहे.
"धा धिन धिन धा/ धा धिन धिन धा/ धा तिन तिन ता/ ता धिन धिन धा" अशा या १६ मात्रा आहेत आणि त्याचे ४ खंड पडले आहेत आणि नेहमीप्रमाणे पहिली मात्रा "धा" ही समेची आणि म्हणून सर्वाधिक महत्वाची मात्रा ठरते. अर्थात प्रयोग म्हणून इथे दर चार मात्रांच्या खंडाऐवजी काही प्रतिभावंत "साडे पाच" मात्रा घेऊन याचे अनोखे खंड पाडतात. अर्थात याला पाश्चात्य ताल भाषेत Off Beat" असे म्हणतात.
आता आपण, आस्वाद या बाबीकडे वळूया. भारतीय संगीत काय किंवा सिंफनी संगीत काय, कुठलेही संगीत प्रथमदर्शनी प्रेमात पडावे, असे अजिबात नसते. किंबहुना पहिल्या प्रथम "कंटाळवाणे" वाटण्याची बरीच शक्यता आहे. याचे मुख्य कारण संगीताची गती आणि स्वरांबद्दल वाटणारी अनुत्सुकता. आपण, सुरवातीलाच बघितले की, दोन्ही संगीतात स्वरभाषा सारखीच असते - फरक असतो, ती भाषा कशी वापरली जाते, त्यावर. दोन्ही संगीत रचना या ठाय लयीतून फुलत जातात, हळूहळू लय मध्य लयीत आणि नंतर द्रुत लयीत!! असा स्वरांचा प्रवास सुरु असतो. आस्वाद घेण्याच्या दृष्टीने, आपल्याला हा प्रवास समजून घेणे अत्यावश्यक ठरते. मुळात, "स्वर" म्हणजे काय? स्वरांची रचना आणि त्यातून निर्माण होणारी लय, या बाबींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अर्थात, एकदा का स्वरांची ओळख पटली की पुढील प्रवास तसा सुकर होतो. इथे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे, "स्वर" ओळखणे म्हणजे "षडज","पंचम" स्वर ओळखता येणे!! वास्तविक त्याची ओळख, आस्वादाच्या पहिल्या पायरीवर करून घेण्याची अजिबात गरज नसते कारण हा भाग तसा "जटील" आहे. परंतु जे स्वर ऐकायला येत आहेत, त्याच्या ध्वनीची गोडी निर्माण करून घेणे, हे इथे अपेक्षित आहे. मग, तो स्वर "षडज" असेल किंवा पाश्चात्य "C" असेल!!
एकदा का या स्वरांची ओळख झाली की त्यापुढे, या स्वरांचे "चलन" अवलोकणे, हा भाग येतो. अर्थात, या आवडीसाठी मनाचा थोडा "धीर" धरणे आवश्यक असते. चायनीज जेवण जसे पहिल्या प्रथम आवडीचे होणे तसे कठीण असते, हळूहळू त्याची taste develop करावी लागते आणि मगच त्या जेवणाची "चटक" लागते. स्वरांच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात असेच व्हावे लागते.
पाश्चात्य संगीताची गोडी लावून घ्यायची झाल्यास, आपल्याला आधी "ऑर्केस्ट्रा" या शब्दाची माहिती करून घेणे आवश्यक ठरेल. या शब्दाचा इतिहास बघायला गेल्यास, आपल्याला ग्रीक संस्कृतीकडे वळावे लागते. त्यावेळेस, "ग्रीक कोरस" हा संगीत प्रकार अस्तित्वात होता आणि त्यातून पुढे "ऑर्केस्ट्रा" ही संकल्पना निर्माण झाली. साधारणपणे, यात दोन भाग पडतात. १] चेंबर ऑर्केस्ट्रा, २] फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा. सर्वसाधारणपणे, चेंबर ऑर्केस्ट्रामध्ये, ५० ते ६० वादक असतात तर फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रामध्ये ८० ते ९० वादक असतात. " चेंबर ऑर्केस्ट्रा" ही संकल्पना १९८१ साली अस्तित्वात आली. अर्थात हा अतिशय ढोबळ फरक आहे. या ऑर्केस्ट्रा मध्ये, "कंडक्टर" नामक व्यक्ती असते, ही व्यक्ती या सगळ्या वादकांवर नियंत्रण करीत असते. कंडक्टर हा केवळ नियंत्रणापुरता नसून, कुठली सिंफनी निवडायची, त्या सिंफनीसाठी कुठली वाद्ये निवडायची, ती रचना वादकांकडून कशाप्रकारे वाजवून घ्यायची इत्यादी जबाबदाऱ्या स्वीकारायच्या असतात. इथे प्रत्येक कंडक्टरचे perception वेगळे ठरू शकते. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, वर निर्देशिलेला आंद्रे रुई आणि जगप्रसिद्ध झुबीन मेहता, या दोघांचे, बीथोवनच्या प्रसिद्ध 5th सिंफनीचे विश्लेषण संपूर्ण वेगळे असू शकते आणि त्यानुरूप त्यांची सांगीतिक कल्पना, ते, त्यांच्या वादकांकडून काढून घेतात.
सिंफनी संगीताचा आस्वाद घेताना, या सगळ्या बाबींचे भान असणे, महत्वाचे ठरते.एकदा, आपल्या मनात "ऑर्केस्ट्रा" ही संकल्पना रुजली की मग, सिंफनी समजून घेणे फारसे अवघड ठरू नये. बीथोवन, मोझार्ट, ब्राहम इत्यादी संगीतकारांनी त्यांच्या रचनेचा जो आराखडा, स्वरावलींच्या रूपाने मांडलेला असतो, ते स्वर, हा कंडक्टर आपल्या वादकांकडून वाजवून घेतो. अर्थात इथे बीथोवनने मांडलेली स्वरावली जाणून घ्यायलाच पाहिजे, असे नाही ( ज्यांना जिज्ञासा आहे, ते तशा प्रकारे आस्वाद घेतात) परंतु स्वरांची ओळख झाल्यावर, सुरवातीला जो स्वर ऐकायला येतो, त्या स्वरांच्या दिशेने इतर स्वरांचे "वहन" हळूहळू ध्यानात यायला लागते आणि मग, त्या सिंफनीची गोडी लागणे सहज शक्य होते. स्वरांची लय, असे जे आपण म्हणतो, ती स्वरिक लय अशीच असते. एका स्वराहून दुसऱ्या स्वरावर जाताना, जो ध्वनींचा "प्रवास" घडतो, त्या प्रवासाला(च) लय म्हणतात.
ही लय, पाश्चात्य संगीतात तसेच रागदारी संगीतात कायम असते आणि या लयीच्या अनुरोधाने ऐकत राहिलो तरी आपण आस्वादाची पहिली पायरी ओलांडली, असे म्हणायला हरकत नाही. अर्थात जाणकारीने ऐकणे, ही दीर्घ परिश्रमाची बाब आहे. त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक असते. रागदारी संगीतात देखील असाच प्रकार असतो. राग ओळखता येणे, हे रसिकत्वाची खूण अजिबात नाही.
आता एक गंमत लिहितो. ज्या बीथोवनच्या पाचव्या सिंफनीचा उल्लेख इथे केला आहे, त्या सुरावटीच्या आधाराने, "बीटल्स" या जगप्रसिद्ध संचाने, एक गाणे तयार केले होते. "Roll Over Beethoven" हे गाणे ऐकताना, त्या गाण्यात, बीटल्सने strings section rhythm आणि हार्मनीचा अप्रतिम उपयोग केलेला आढळतो. आता मजेचा भाग असा आहे. जेंव्हा केंव्हा मी ही सिंफनी ऐकतो, तेंव्हा न चुकता मला बीटल्सची आठवण येते. आपल्या रागदारी संगीताबाबत असाच प्रकार बहुतेक रसिकांच्या बाबतीत घडतो. एखादे परिचित चित्रपट गीत किंवा मराठी भावगीत मनात रुंजी घालत असते आणि एखादा राग ऐकताना, अचानक त्या रागातील एखादी स्वरावली, त्या गाण्याची आठवण करून देते आणि मग, तोच राग आपल्या परिचयाचा होऊन बसतो. इथे मला एका हिंदी गाण्याची आठवण आली. "इतना ना मुझ से प्यार बढा" हे संगीतकार सलिल चौधरींनी बनवलेले गाणे ऐकताना,त्यांनी मोझार्टच्या ४० वी सिंफनी आधाराला घेतलेली आहे पण ती कशी घेतली आहे, हे बघण्यासारखे आहे. गाण्याची सुरवातीची सुरावट अगदी तशाच सुरांत केलेली आहे पण, त्याचा ताल मात्र भारतीय ढंगाचा आहे आणि तिथेच या गाण्याचे स्वरूप बदलते. अर्थात या गाण्याचा पुढील विस्तार देखील, या सिंफनीचा "आधार" सोडून स्वतंत्रपणे होत आहे. हा संगीतकाराच्या व्यामिश्रतेचा अप्रतिम नमुना म्हणता येईल.
पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीताचा आस्वाद अशा(च) प्रकारे लोकांच्या पसंतीस उतरु शकतो. रागदारी संगीतातील, "मींड","गमक","बोलतान" इत्यादी अलंकार समजून घेणे, महत्वाचे असले तरी अत्यावश्यक नसते. आपण वरती, लताबाईंचे "तुम क्या जानो तुम्हारी याद मी" हे जे गाणे ऐकले आहे, त्यातील "मिंड" ऐकण्यासारखी आहे. अगदी नेमकेपणे मांडायचे झाल्यास, या गाण्यातील सुरवातीची सारंगीची सुरावट ऐकताना, जी सुरांची सलगता आहे आणि त्यालाच जोडून गाण्याची सुरवात आहे, तिथे "मिंड" ऐकायला मिळते.
या इथे आणखी एक फरक दाखवता येईल. सिंफनी संगीतात, "समेची" मात्रा नाही कारण हे संगीत सतत पुढे, पुढे चालत असते तर रागदारी संगीतात, समेच्या मात्रेला अपरिमित महत्व!! कलाकाराने जरी पूर्ण सप्तकी तान घेतली तरी ती तान आणि अर्थात लय, जोपर्यंत समेच्या मात्रेशी येउन, विसर्जित करीत नाही तोपर्यंत रागदारी संगीत सिद्ध होत नाही. याचा परिणाम असा होतो, पाश्चात्य संगीत फार बारकाईने ऐकावे लागते अन्यथा सुरांचा मागोवा घेणे कठीण जाते.
सुरवातीला मी एक विधान केले होते, हार्मनीमध्ये अत्यंत "अल्प" का होईना पण मेलडी अवतरू शकते. याचा अर्थ इतकाच घ्यायचा, सिंफनी संगीतात देखील, एका सुरांवरून दुसरा स्वर, असा प्रवास होऊ शकतो आणि तसा होताना तिथे मेलडी अवतरते. भारतीय संगीतात, जरी प्रत्येक सुराला महत्व असले तरी अनावधानाने एखादा सूर ऐकताना, लक्ष विचलित झाले तरी रसभंग होऊन फारसा फरक पडत नाही आणि याचे महत्वाचे कारण, भारतीय संगीत "आवर्तनी" असल्याने ऐकताना "गहाळ" झालेला सूर आपल्याला परत अनुभवण्याची शक्यता बरीच असते.
सिंफनीमध्ये सतत पुढे जाण्याची प्रवृत्ती आणि साथीला अनेक वाद्ये, यामुळे मन तसे एकाग्र करणे काहीवेळा अवघड जाते. सगळ्या वाद्यांवर तुम्ही एकाच वेळी एकाग्र होऊ शकत नाही. अर्थात, काहीवेळा "एकल" वादन देखील ऐकायला मिळते आणि तिथे मात्र खऱ्याअर्थाने सिंफनी "उपभोगता" येते. यहुदी मेन्युहिन याचे अप्रतिम उदाहरण देता येईल. अर्थात, जेंव्हा हा वादक आपले व्हायोलीन वाजवत असतो, तेंव्हा देखील, त्या वाद्याच्या पार्श्वभूमीवर इतर वाद्ये साथ करीत असतात परंतु त्यांचे अस्तित्व इतक्या संथ आणि हळू स्वरांत असते की, कान तिकडे एकाग्र केल्याशिवाय त्याची मजा घेता येत नाही.
रागदारी संगीत हे अजूनही बहुश: एकल वादन/ गायन प्रकारे सादर केले जाते.गायनाच्या सादरीकरणात, साथीला, बहुश: तबला आणि हार्मोनियम असतो. अर्थात रागदारी संगीतात एका स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे, असा प्रकार असल्याने, तिथे प्रत्येक स्वर "न्याहाळता" येतो आणि त्यामुळे कलाकाराने निर्माण केलेली मिंड,गमक, इत्यादी अलंकार अनुभवता येतात. किशोरी आमोणकरांची भूप रागातील "सहेला रे" ही चीज याबाबत अप्रतिम उदाहरण म्हणून घेता येईल. त्रितालातील १६ मात्रांच्या विस्तारित आवाक्यात,ही चीज ऐकताना, अगदी पहिल्या ओळीतच - सहेला रे - ही गाताना, पहिल्या "आकारात" आपल्याला "मिंड" ऐकता येते. अत्यंत सुरेल, धारदार तरी व्याकुळता. तसेच गाताना मधून एखादा "खटका" घेऊन, गायकी अधिक श्रीमंत करायचे कौशल्य केवळ अतुलनीय आहे.
सादरीकरणाच्या वेगळ्या पद्धतीमुळे,दोन्ही संगीत रचनांच्या आस्वादाची पद्धत बदलत जाते. भारतीय संगीतात उस्फूर्तता अधिक असल्याने, अनपेक्षितता रसिकाला बरेचवेळा धक्का देऊन जाते. तर सिंफनी वादनात, प्रत्येक सूर नेमका वाजवणे आणि ज्या हिशेबात संगीतकाराने रचना तयार केली आहे, त्याच हिशेबात सादरीकरण करणे, इतपत आस्वादाची दिशा राहते. अर्थात, वादनात नेमकेपणा आणि अचूकता आणणे, हे निश्चित अति अवघड काम आहे. त्यातून, बीथोवन, मोझार्ट यांच्या काही रचना इतक्या गुंतागुंतीच्या असतात की, तिथे वादकाची खरी कसोटी लागते. ८० वादकांच्या ताफ्यात, एखादे जरी वाद्य वाजताना, एखादा सूर जरी बेसूर झाला तरी सगळ्या रचनेचा डौल बिघडू शकतो आणि इथे चूक सुधारण्याची शक्यता अजिबात नसते. Tchaikovsky या रशियन संगीतकाराची एक रचना आहे - Swan Lake Waltz नावाची. या रचनेची सुरवात खास ऐकण्यासारखी आहे. व्हायोलीन वाद्य किती निरनिराळ्या तऱ्हेचे सूर निर्माण करू शकतात, याचा अप्रतिम नमुना, या रचनेच्या सुरवातीलाच ऐकायला मिळतो. एकेक सेकंदाचे खंडित सूर आपल्या कानावर येतात आणि अचानक, अनेक व्हायोलिन्सचा आवाज ऐकायला मिळतो आणि आजूबाजूचे वातावरण बदलून जाण्याची किमया घडते. हे फार कठीण आहे. व्हायोलीन वाद्यातून कशाप्रकारची किमया निर्माण करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल.
एव्हाना रात्रीची जेवणे आटोपलेली असतात आणि मी, विक्लान्तपणे घराच्या गच्चीत, आरामखुर्चीवर शांतपणे बसलेला आहे. दिवसभराच्या कामाच्या दगदगीने मनाला प्रचंड मरगळ आली होती. वातावरणात कुंदपणा भरलेला होता, मधुनच हवेची झुळूक, मनाची तलखी शांत करण्याचा प्रयत्न करीत होत्ते. आजुबाजुला कसलाच आवाज नव्हता. घरात देखील कसलीच गडबड नव्हती. डोळे पेंगायच्या अवस्थेत आले होते. अचानक दूरवरून परिचित सूर ऐकायला येत होते पण तशी ठाम ओळख पटत नव्हती. त्या सुरांनी डोळ्यावरील पेंग कमी झाली होती. त्या सुरांची आस मात्र लगेच लागली. कुठलेतरी वाद्यसंगीत होते, म्हणून जरा बारकाईने ऐकायला लागलो आणि त्या सुरांना नाव सापडले - बीथोवनची असामान्य मूनलाईट ही रचना होती आणि त्या पियानोच्या अलौकिक सुरांनी मात्र परत मी ग्लानीत शिरलो, तो एका अतीव समाधानाने!!
No comments:
Post a Comment