Sunday, 2 August 2015

ब्रिंदाबनी सारंग

वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची तिरीप त्रस्त करीत असावी. अगदी डोळे मिटले तरी ग्लानी यायच्या ऐवजी लालसर पिवळे रंग फेर धरत असावेत. आणि अशा अस्वस्थ क्षणी दूरवरून, "मध्यम","पंचम" स्वरांच्या जोडीने "कोमल निषाद" कानावर येऊन, मनाची अवस्था किंचित मनोरम व्हावी. हीच किमया, ब्रिंदाबनी सारंग या रागाच्या, सुरांनी होते. रागदारी सुरांची ही किमया केवळ अलौकिक म्हणावी अशीच आहे. वातावरणात क्षणात बदल घडवून आणण्याची ताकद, सुरांच्या अवगाहनातून सहजगत्या होते आणि आपल्याला देखील, या किमयेचे नेमके विश्लेषण अवघड होऊन बसते. अर्थात, यामागे  मनावर झालेले पारंपारिक संस्कार देखील कारणीभूत असतात. 
वास्तविक, हा राग म्हणजे दुपारच्या काहीलीवर "उतारा" असा उल्लेख, बऱ्याच ग्रंथातून वाचायला मिळतो. "औडव/औडव" जातीचा हा राग, फार विलक्षण किमया करतो. "गंधार" आणि "धैवत" वर्जित सूर असले तरी, अवरोही स्वरांतील "कोमल निषाद" इथे भलतीच करामत करून जातो. "मध्यम" आणि "पंचम" हे या रागाचे वादी - संवादी स्वर असले तरी, या रागात काही वेळा "तीव्र निषाद" आणि "कोमल निषाद" अशा दोन्ही स्वरांचा वापर केला जातो, पण खरी ओळख होते ती, "मध्यम" आणि "कोमल निषाद" या स्वरांनी. वर उल्लेखलेली दुपारची दाहकता, जणू या दोन स्वरांच्या सहाय्याने शीतल करण्याची जादू करतात. काफी थाटातील या रागाची "मींड" ही मध्यम, पंचम आणि कोमल निषाद स्वरांतून सिद्ध होते. या रागाची आणखी एक गंमत सांगता येते. या रागाचे स्वर जर का नेमकेपणी घेतले नाही तर, हा राग नकळत "मेघ" रागात मिसळून जाऊ शकतो, इतके या दोन रागांत साम्य आहे. या रागात काहीवेळा दोन्ही निषाद घेतले जात म्हणजे कोमल आणि तीव्र निषाद घेतले जातात पण अर्थात, याला एक प्रयोग, इतपतच अर्थ घेता येईल. कोमल निषाद, हेच खरे या रागाचे स्थान!! 
उस्ताद रशीद खान, हे नाव आता शास्त्रीय संगीताच्या रसिकांना परिचित झालेले आहे. अत्यंत मुलायम आवाज, ताना घेताना देखील शक्यतो खंडित स्वरूपाच्या घ्यायच्या, ज्या योगे प्रत्येक सुराची "ओळख" रसिकांना घेता यावी. मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात शक्यतो गायन सादर करण्याची प्रवृत्ती. सरगमचा अतिशय सुंदर उपयोग करणे, इत्यादी अनेक वैशिष्ट्ये, या गायकाची सांगता येतील. गायन ऐकताना काहीवेळा उस्ताद अमीर खान साहेबांच्या गायनाचा प्रभाव जाणवतो, विशेषत: लयकारी ऐकताना, हा प्रभाव जाणवतो. "रामपूर साहसवान" घराण्याचा जरी गायक असला तरी इतर सगळ्या घराणेदार गायकीतून, चांगले उचलून, स्वत:च्या गायकीत मिसळून, स्वत:ची अशी वेगळीच गायकी प्रस्थापित केली. काहीवेळा खर्जातील सूर लावताना, पंडित भीमसेन जोशींचा देखील ठसा दिसतो. याचा अर्थ इतकाच घ्यायचा, उस्ताद रशीद खान यांनी, सगळ्या घराण्यांची वैशिष्ट्ये आपल्या गायनात सामावून घेतली आहेत. 


या रचनेत, विशेषत: आलापी ऐकताना, आपण वरती जी "मिंड" मांडली आहे, तिचा अनुभव घेता येतो. खरतर, मला बरेचवेळा " रागदारी गायनातील भावगीत" असे म्हणायचा मोह होतो इतके भावपूर्ण गायन असते. कुठेही स्वर लावण्याचा खटाटोप नाही की कुठे अडखळणे नाही. ज्या सहजतेने, कोमल स्वर लावले जातात त्याच सहजतेने, शुध्द स्वर आणि तीव्र स्वर घेतले जातात आणि वरच्या पट्टीत गाताना, कुठेही स्वर "ताणला" आहे, असे न होता, स्वरांचे "मुलायमपण" कायम राखले जाते. 
संगीतकार हेमंत कुमार, यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्याअर्थाने स्थिरावायची संधी प्राप्त झाली, ती "नागिन" चित्रपटाच्या अभूतपूर्व लोकप्रियतेने. या चित्रपटातील सगळी गाणी अप्रतिम आहेत.  याच चित्रपटात, या रागावर आधारित अतिशय सुश्राव्य असे गाणे आहे - "जादुगार सैय्या" आणि हे गाणे आपण इथे ऐकुया. 


मेंडोलीनच्या सुराने सुरु होणारे गाणे, झटक्यात जलद लयीत जाते. ताल, पारंपारिक केरवा आहे. यात लय जलद असली तरी इतक्या अप्रतिम हरकती आहेत की, प्रत्येक हरकत अत्यंत बारकाईने न्याहाळावी. तालाच्या प्रत्येक मात्रेगणिक हरकत आहे आणि त्यामुळे चालीला एक सुंदर निमुळते "टोक" येते. प्रणयी गाणे आहे आणि चाल तशी साधी असली असली तरी मनाची लगेच पकड घेते. अर्थात, उडत्या तालामुळे हे शक्य होते. साधी चाल असून देखील, त्यात "गायकीला" कसा वाव मिळतो, याचे हे गाणे म्हणजे नमुना आहे. या गाण्यावर तालाचा इतका प्रभाव आहे की, ताल बाजूला ठेऊन, केवळ हरकती ऐकायच्या तर त्याला फार प्रयास पडतो.  
मघाशी मी लिहिताना, एक वाक्य लिहिले आहे, या रागाचे "मेघ" रागाशी फार जवळचे नाते आहे आणि जर का स्वरांची ठेवण नेमकी ठेवली नाही तर रागांची "गल्लत" होऊ शकते. खालील गाणे, माझ्या या म्हणण्याला "दाखला" म्हणून देता येईल. "सावन आये, या ना आये" हे, "दिला दिया दर्द लिया" या चित्रपटातील गाणे, आपण ऐकुया. गाण्याचे शब्द तर स्पष्टपणे, " मेघ" रागाशी जवळीक दाखवतात पण तरीही, पहिला अंतरा जिथे संपतो तिथे सतारीचे सूर आहेत, तिथे "ब्रिंदाबनी सारंग" दिसतो. खरतर, या रागाची उत्तम ओळख या गाण्यातून आपल्याला होते.


या गाण्यात चक्क दोन ताल आहेत. १] केरवा आणि २] त्रिताल. गाण्याची सुरवात त्रितालाने होते पण पुढे त्याच लयीत केरवा ताल मिसळतो. फारच सुंदर प्रकार आहे. या गाण्यात पहिला अंतर संपत असताना, "नि सा रे म प" ही जी सरगम आहे, तिथे हा राग सिद्ध होतो. रागदारी संगीताची आवड आणि ओळख करून घेण्यासाठी हे गाणे एक अप्रतिम उदाहरण म्हणून सांगता येईल. 

मंगेश पाडगावकरांनी अनेक चिरस्मरणीय भावगीते लिहिली आहेत. प्रस्तुत गीत हे त्यातील अजरामर स्वरूपाचे गीत आहे. वास्तविक, या कवितेचा ढाचा थोडासा "कथात्म" स्वरूपाचा आहे, क्वचित गद्याकडे झुकणारा आहे परंतु तरीही संगीतकार यशवंत देवांनी चाल लावताना, चाल कुठेही रेंगाळणार नाही आणि प्रवाहित्व कायम राहील, इकडे नेमके लक्ष दिले आहे. सुगम संगीतात, चाल कुठेही रेंगाळणार नाही, याकडे बारकाईने भान ठेवावे लागते. "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" या गीतातून, समर्थपणे, हा राग दिसून येतो. 


अरुण दाते यांनी, हे इतके मोठे गाणे असून देखील, अतिशय सुंदर गायले आहे. गाण्याच्या सुरवातीला वाजलेल्या सनईमधून, "ब्रिंदाबनी सारंग" रागाची झलक मिळते. खरतर, हे गाणे म्हणजे आत्ममग्न कथासूत्र आहे. अर्थात, याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शब्दानुरूप बदलेली चाल. लय तशीच कायम ठेऊन, सुरांत किंचित बदल करून, आवश्यक तो "भाव" सुरांतून व्यक्त करायचा. हा खेळ इथे फारच बहारीने साधला आहे. त्यादृष्टीने या गाण्यात वाद्यमेळाचे फारसे प्रयोग नाहीत आणि प्रत्येक अंतऱ्यात जवळपास तशीच " धून"कायम ठेवली आहे. 

आता आपण आणखी काही गाण्याच्या लिंक्स इथे बघू आणि या रागाची ओळख अधिक खोलवर समजून घेऊ. 

झुठी मुठी मितवा  - चित्रपट रुदाली 

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची 

संथ वाहते कृष्णामाई 

No comments:

Post a Comment