कुठलीही कला, ही किती "अमूर्त" स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा "शास्त्राधार" सापडत नाही. बहुतेक वर्णने ही पारंपारिक संकेतावार आधारलेली आढळतात. याचाच वेगळा अर्थ, स्वरांचे सौंदर्य बघताना, स्वरांतून जाणवणारा "आशय" आणि त्याची व्याप्ती, हेच महत्वाचे असते. याच स्वरांतून, पुढे होणाऱ्या रागदारी संगीताबाबत हाच विचार प्रबळ ठरतो.
इथे बरेचवेळा, मी रागांविषयी लिहिताना, अनेक भावछटांचा उपयोग करतो पण, ते केवळ, त्या रागाबाबत एक विशिष्ट चित्र मनासमोर उभे राहावे, इतपतच. अन्यथा, एकाच रागातून, एकापेक्षा अनेक भावनांचा आढळ अशक्य. यामागे नेमके म्हणायचे झाल्यास, आपल्याला परत त्या रागांच्या सुरांकडेच वळावे लागते. त्यामुळेच, रागदारी संगीतात, कुठलाही सूर हा "उगीच" म्हणून किंवा "चूष" म्हणून येत नाही. प्रत्येक सुरांमागे काहीना काहीतरी कार्यकारणभाव नक्की असतो आणि तो भाव जाणून घेणे, म्हणजे रागसंगीताचा अननुभूत आनंद घेणे!!
"देस" राग आणि "तिलक कामोद" राग याबाबत हेच अतिशय महत्वाचे आहे. दोन्ही रागांत स्वर तेच आहेत पण, तरीही दोन्ही राग वेगवेगळे आहेत. हे नेमके कसे घडते? यामागे मुख्य कारण हेच आहे, दोन्ही रागांतील स्वरांचे "ठेहराव" वेगळे आहेत आणि स्वरांची खरी गंमत इथे दिसून येते. कुठला स्वर कशाप्रकारे घेतला की, त्या रचनेचे सगळे स्वरूप पालटून जाते, याचा प्रत्यक्षानुभव, हे दोन राग आलटून, पालटून ऐकले तर सहज ध्यानात येऊ शकते. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संगीतात का आवश्यक आहे, यासाठी या दोन रागांचे उदाहरण चपखल होऊ शकते.
आपल्या भारतीय संगीतात, "षडज-पंचम" भावाला निरातिशय महत्व आहे आणि या रागाचे वादी/संवादी स्वर तर "षडज/पंचम" हेच आहेत!!
पंडिता केसरबाई केरकर हे नाव फार आदराने घेतले जाते. मला काही त्यांची मैफिल प्रत्यक्ष ऐकायचे भाग्य लाभले नाही परंतु त्यांच्या गायनाच्या अनेक रेकॉर्ड्स, सीडी ऐकायला मिळाल्या. अर्थात, प्रत्यक्ष मैफिलीतला आनंद जरी रेकॉर्ड ऐकण्यात तितका येत नसला तरी, आवाजाची जात, गोडवा, शैली इत्यादींचा आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आवाजाची जात थोडी "मर्दानी" भासते पण तरीही गायनाची पट्टी "काळी चार" च्या आसपास आहे. विस्ताराची लय, सप्तकाचा धुंडाळलेला जाणारा अर्थ तसेच निकोप, स्वच्छ आणि ताकदवान असा स्वर अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यात, आ-कार तर खासच म्हणावा लागेल. जयपूर घराण्याची खास वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात म्हणजे गुंतागुंतीची तानक्रिया हे खास ऐकायला मिळते.
या रचनेत आपल्याला ही सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. तान दुहेरी विणीची करून, तान बांधणे तसेच तानांचे व्यापक आकृतिबंध जाणीवपूर्वक योजणे, हा विचार अगदी स्पष्ट दिसतो. आणखी एक बारकावा इथे नोंदता येईल. ताना अति दीर्घ नसून, त्याचे छोटे छोटे आकृतिबंध त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे बरेचवेळा ताना द्रुतगती असल्याचा भास होतो. दुसरे युक्ती अशी दिसते, ठेक्याची लय फार विलंबित न ठेवता, त्याच्या दुप्पट गतीने ताना घ्यायच्या. याचा परिणाम असा होतो, श्रोत्यांचे चित्त जरादेखील विचलित होत नाही आणि गाण्याचा संपूर्ण आनंद मिळतो.
आता आपण, रागाच्या ललित स्वरूपाकडे वळूया. १९७७ साली आलेल्या "भूमिका" या चित्रपट या रागावर आधारित एक सुंदर गाणे आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर, यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला, संगीतकार वनराज भाटीया यांनी नितांत रमणीय गाणी दिली आहेत. प्रस्तुत गाणे, प्रीती सागर या गायिकेने गायले आहे. "My heart is beating" सारख्या पाश्चात्य संगीतावर आधारित गाण्याने प्रकाशात आलेली ही गायिका. हे गाणे गाउन, मात्र तिने रसिकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. "तुम्हारे बिना जी ना लगे" हेच ते गाणे इथे ऐकणार आहोत.
काहीशी लाडिक वळणाची चाल, ठुमरीच्या अंगाने गेलेल्या ताना इत्यादी खास बाबी या गाण्यात उठून दिसतात. पारंपारिक पंजाबी ठेक्यावर हे गाणे उचलून धरले आहे. तशी चाल साधी आहे पण गोड आहे. प्रीती सागरने देखील तितक्याच गोडव्याने गायली आहे.
"ये नीर कहा से बरसे" हे गाणे देखील याच रागावर आधारित आहे, "प्रेमपर्बत" चित्रपटातील अतिशय सुश्राव्य आणि गायकी ढंगाचे गाणे आहे. जयदेव आणि लताबाई, या जोडगोळीने खूपच अप्रतिम गाणी दिली आहेत आणि बहुतेक गाणी, चालीच्या दृष्टीने अवघड आणि लयीला कठीण अशी(च) आहेत. जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत, पाश्चात्य चाली, पाश्चात्य वाद्ये हाच संगीताचा "ढाचा" बनत चालला होता, त्यावेळी जयदेवने मात्र, अपवाद वगळता, आपली बहुतेक गाणी, ही भारतीय संगीतावर आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, कुठलेही गाणे केले तरी त्याला कुठेतरी रागदारी संगीताचा "स्पर्श" द्यायचा, याच हेतूने बनवली आणि तिथे मात्र कसलीही तडजोड केली नाही. याचा परिपाक असा झाला, त्यांची गाणी ही नेहमीच गायनाच्या दृष्टीने आव्हानात्मक झाली.
या गाण्यातील पहिल्याच वाद्यमेळ्याच्या रचनेतून, आपल्याला तिलक कामोद रागाची झलक ऐकायला मिळते. पहिल्याच ओळीत, "ये बदरी कहा से आयी रे" ऐकताना, आपल्याला ही ओळख अधिक "घट्ट" झालेली आढळेल. या गाण्यात आणखी एक मजा आहे. पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हाचे शब्द - "गहरे गहरे नाले, गहरा पानी रे" या ओळीत, हा राग बाजूला सारला जातो आणि तिथे "पानी रे" या शब्दावरील हरकत तर, या रागाशी संपूर्ण फारकत घेते. असे होऊन देखील, दुसऱ्या ओळीत चाल, परत "मूळ" रुपाकडे वळवून घेतली आहे. हे जे "वळवून" घेणे आहे, इथे संगीतकाराची दृष्टी समजून घेता येते.
१९८२ मध्ये मराठीत आलेल्या "उंबरठा" चित्रपटात असेच एक अप्रतिम गाणे आपल्याला ऐकायला मिळते. हृदयनाथ मंगेशकरांच्या रचना देखील अशाच "गायकी" ढंगाच्या असतात, किंबहुना काहीवेळेस तर अति अवघड असतात. कवी वसंत बापटांची सघन शब्दकळा आणि मंगेशकरांची चाल, या गाण्यात अतिशय सुंदरपणे जुळून आली आहे. अर्थात, ही चाल मंगेशकरांनी आपल्याच बाबांच्या "वितरी प्रखर" या गाण्यावरून बेतलेली आहे, हे कबूल केले आहे पण तरीही नाट्यगीताचे स्वरूप लक्षात घेऊन, चित्रपटगीत करताना, आवश्यक ते फेरफार करावेच लागतात आणि त्या दृष्टीने, ही रचना ऐकण्यासारखी आहे.
चालीवर खास मंगेशकरी ठसा तर आहेच पण तरीही बऱ्याच ठिकाणी, शब्दाप्रमाणे चालीला "वळण" दिल्याचे दिसून येईल. वास्तविक तिलक कामोद राग तसा सरळ, गोड, फारशा अति वक्र ताना नाहीत,अशा प्रकारे बरेचवेळा सादर होतो पण तरीही अशा रागात अशा प्रकारचे अति अवघड तर्ज बनविणे, हे केवळ हृदयनाथ मंगेशकर(च) करू जाणे. या गाण्याच्या सुरवातीला, रचना मंद्र सप्तकात सुरु होते पण, एकदम "दे प्रकाश, देई अभय" इथे रचना जे काही अकल्पित वळण घेते, ते केवळ आणि केवळ, लताबाई(च) घेऊ जाणे, इतके अवघड आहे.
रवी मी चंद्र कसा - वसंतराव देशपांडे
दिसलीस तू, फुलले ऋतू - सुधीर फडके
हिया जरत रहत दिन रैन - मुकेश
आपली लिहिण्याची रसग्रहणात्मक शैली वाचकाला दृष्टी प्रदान करते.आपले लेख आवर्जून वाचत असतो.असेच लिहीत जा.
ReplyDelete