Wednesday 1 March 2023

लताबाई - अविरत शोध

खरतर आत्तापर्यंत लताबाईंवर असंख्य लेख लिहून झालेत, पुस्तके आली आहेत. तेंव्हा नवीन काय लिहायचे? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. मला देखील पडला परंतु त्यांची गाणी ऐकताना, सतत काहींना काहीतरी नवीन ऐकायला मिळाले. वास्तविक रेकॉर्डवरील गाणे हे कधीही बदलत नसते!! ओरॅशन इतकाच असतो, आपल्या वकूब किती आहे? ऐकताना, आपली एकतानता किती आहे? या प्रश्नांचा विचार केला तेंव्हा माझे मलाच अपुरेपण जाणवले. आपण किती उथळपणे गाणे ऐकतो, असेच वाटले. गाणे ऐकताना, मन एकाग्र करतो परंतु मध्येच कुठेतरी ती एकाग्रता भंग पावते आणि तिथेच गाण्याचा संपूर्ण आवाका,माझ्या परिप्रेक्षाच्या पलीकडे जातो! बरेचवेळा असे होते, गाण्याच्या सुरवातीलाच एखादी जागा अशी ऐकायला मिळेते की तिथेच मन गुंतून जाते आणि गाणे पुढे निघून जाते. हे माझ्या रसिकतेची तोकडेपण नक्कीच आहे पण लताबाईंच्या गायकीचा समग्र आढावा घ्यायला मी किती अपूर्ण आहे, याची जळजळीत जाणीव पोखरून टाकणारा आहे. या बाईंच्या आवाजात असे काय आहे जे इतरांच्या गळ्यात नाही? काहीतरी नक्कीच आहे त्याशिवाय सलग इतकी वर्षे पंडितांपासून सामान्यांपर्यंत या आवाजाची भुरळ पडणे अशक्य. आवाज गोड आहे, नितळ आहे, तिन्ही सप्तकात सहज फिरणारा आहे, भाषेनुरूप शब्दोच्चार करण्याइतका व्यासंग आहे, प्रासादिक आहे, लालित्यपूर्ण आहे, इत्यादी अनेक विशेषणे आत्तापर्यंत लावून झाली आहेत तरीही त्यांच्या आवाक्यात या आवाजाचे समग्र वर्णन आले आहे का? संगीतबाह्य विशेषणे तर अगणित लावली गेली आहेत आणि मी तरी याचा इथे अजिबात विचार करणार नाही. इथे फक्त लताबाईंच्या आवाजाने जे अलौकिक गारुड टाकले आहे, त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक काही वर्षांपूर्वी मी लताबाईंच्या आवाजावर ३ सलग लेख लिहिले होते आणि तेंव्हा असे वाटले की मी पुरेसा वेध घेतला आहे पण माझी समजूत याच आवाजाने खोटी पाडली. लताबाईंनी सगळ्या देशाला आपल्या आवाजाने भुरळ टाकली, हे तर मान्यच करायला लागेल आणि यात त्यांना मिळालेल्या नैसर्गिक देणगीचा भाग देखील अंतर्भूत आहे कारण सर्वसामान्य माणूस आवाजाच्या विश्लेषण करायला धजत नाही किंवा तो विचार त्यांच्या मनात देखील येत नाही. याच कारणास्तव लताबाई दंतकथा झाल्या. अर्थात दंतकथा झाल्या म्हणजे पूर्णत्व मिळाले का? दंतकथांना वास्तवाचा आधार कधीच नसतो. कुठलाही आवाज वास्तवावर तपासून घेणे, हे आवश्यक असते. मग त्यासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागला तरी काय हरकत आहे. अगदी लताबाई झाल्या तरी संगीतशास्त्र आणि संगीतकला आहे, म्हणून लताबाई आहेत. कला आधी मग कलाकार येतो. आपल्याकडे बरेचवेळा हीच जाणीव ठेवली जात नाही. असो, लताबाईंच्या आवाजाचा वेध घेताना काही गाणी उदाहरणादाखल घ्यावीच लागतील जेणेकरून मुद्दा स्पष्ट होईल. एक बाब महत्वाची, लताबाईंनी आवश्यक तितकी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि त्या ललित संगीताच्या क्षेत्रात आल्या. परिणामी सूर पक्का झालेला होता, तालाची नेमकी समज ग्रहण करून झाली होती. लताबाई ललित संगीतातात आल्या तेंव्हा काय परिस्थिती होती? अनेक संगीतकारांनी याबाबत भरपूर लिहून ठेवले असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे नको. एक प्रसिद्ध गाण्याचे उदाहरण बघूया. "ये जिंदगी उसी की है" हे गाणे आजही अतोनात लोकप्रिय आहे आणि रसिकांच्या मनात ठाण मांडून बसले आहे. या गाण्याची स्वररचना भीमपलास रागावर आधारित आहे.आणखी खोलात विचार केला तर गाण्यात काफी आणि किरवाणी रागाचे सूर देखील ऐकायला मिळतात. या गाण्याच्या संदर्भात बघताना, मुखड्याची ओळ - ये जिंदगी उसी की है, या ओळीचे स्वर ताडून बघताना - *सा प प म ध/प म ग म ग म प * हे स्वर ऐकायला मिळतात. हा झाला तांत्रिक भाग आणि हा देखील जरा बाजूला सारू. इथे लताबाई "जिं" या अक्षरावर "पंचम" स्वर घेतात पण तो आंदोलित स्वर घेऊन त्याचा स्वरात पुढील अक्षर "द" देखील तांत्रिक दृष्ट्या "पंचम" स्वरात घेतात. इथेच गंमत आहे. तंत्रानुसार दोन्ही अक्षरे एकाच सुरांत आहेत पण ऐकायला वेगळे वाटत कारण इथेच पहिल्या पंचम स्वरानंतर त्यांनी ज्या श्रुती वापरल्या आहेत किंवा असे म्हणून गळ्यातून निघाल्या आहेत, तिथेच वेगळेपण सिद्ध होते. सूर तोच आहे पण त्याला नवीन झळाळी दिली आहे. ही जी शब्दांना झळाळी, लताबाई देतात, तेच स्वर इतरांना प्रदान करणे जमत नाही. याच गाण्यातील दुसरे वैशिठ्य बघायचे झाल्यास, "धडक रहा है दिल तो क्या, दिल की धडकने लेकिन" ही ओळ बघूया. "धडक रहा है" इथे "प नि म प म ग म" तर पुढील "दिल की धडकने ना गिन" ही ओळ "प सां सां सां नि नि सां रें मं गं" या सुरांनी सजवली आहे. आता इथे लताबाई कुठे श्रेष्ठ ठरतात? "धडक" शब्द नीट ऐकावा. हृदयाची धडधड त्या सुरांतून उमटते. प्रेयसी आहे आणि प्रियकराला भेटली आहे तेंव्हाची आतुरता, सलज्जपणा सगळे त्या "धडक" शब्दाच्या उच्चारातून समोर येते. तिथे लागलेला "पंचम" स्वर आणि पुढे "धडकने" हा शब्द गाताना घेतलेला "वरचा सा", हा विचारपूर्वक घेतलेला आहे. एका शब्दात केवळ एका "ने" अक्षराने वेगळी भावना समोर येते आणि टी भावना दाखवायला स्वरांची वापराने देखील तितकेच सक्षम होते. ही किमया लताबाईंच्या आवाजाची, त्यांनी केलेल्या विचाराची आहे. आपल्याला आवाजाची देणगी नक्कीच मिळाली आहे परंतु त्या देणगीवर अवलंबून न राहता टी देणगी, सादरीकारांतून सादर करताना, अधिक परिष्कृत कशी करायची, जेणेकरून संगीतकाराच्या आराखड्यात "विशेष" भर टाकता येते. हा जो भरणा आहे, तिथे लताबाईंच्या आवाजाची कमाल ऐकायला मिळते आणि इथे निव्वळ दैवी प्रसाद नव्हे तर व्यासंगी कुशाग्रता महत्वाची ठरते. आपण आणखी उदाहरण बघूया. "हाये रे वो दिन क्यूँ ना आये". लयीला अतिशय अवघड गाणे आहे आणि म्हणूनच मी निवडले आहे. हे गाणे "जनसंमोहिनी" सारख्या अनवट रागावर आधारित आहे. आपण तंत्राचा अति आहारी न जाता, सुरांवर लताबाई अवघड लय कशी तोलून घेतात, हे बघण्यासारखे आहे. वर निर्देशित केलेली ओळ स्वरांकित करायची झाल्यास, "ग प ध नि ध नि ध प/प प ग प/रे ग सा रे/नि सा" अशा पद्धतीने मांडता येते. आता इथे "रे" या अक्षरावरून "धैवत" स्वरावरून "वो" अक्षर घेताना "पंचम" स्वरपर्यंत "मींड" कशी घेतली आहे, हा निव्वळ बुद्धीवादी भाग नसून श्रवणेंद्रिय तृप्त करणारा भाग आहे. गाण्यात "रूपक" ताल आहे. इतर गाण्यात हाच ताल अगदी उडत्या स्वरूपात ऐकायला मिळतो पण इथे त्याच तालाचे धीरगंभीर स्वरूप ऐकायला मिळते. "तिन तिन ना/ धिं ना/धिं ना" असा ७ मात्रांचा आराखडा आहे. अर्थात यात पुढे असंख्य permutation/combination येत राहतात. जसे आपण वरच्या गाण्यात श्रुतींचे अस्तित्व बघितले जे मूळ स्वरांना असंख्य परिमाणे देत असतात. भारतीय संगीताचे हे अलौकिक वैशिष्ट्य म्हणायला हवे. आता या केवळ ७ मात्रांचे "वजन" लक्षात घेऊन, या गाण्यातील लयींशी लताबाई कशा खेळतात, हेच अतिशय महत्वाचे आहे. मात्रांची लय सुरांच्या अवगाहनाशी जोडलेली असताना, प्रत्येक अक्षर आणि त्याचे लयींशी असलेला अन्योन्य संबंध, निव्वळ अवर्णनीय आहे. तालाच्या मात्रांचे वजन तर ध्यानात ठेवायलाच हवे पण गाण्यातील सौंदर्यतत्त्व अचूकपणे सांभाळायला हवे. हा लयीचा बोजा अति बिकट आहे. "हाये" शब्दांचा उच्चार तर वर्णनाच्या पलीकडे आहे. सगळी वेदना, त्या उच्चारात वाचता येते. भावभावनांचे परिष्करण तर लताबाईंच्या तिलोमोलाचे आजमितीस कुणीही अचूकपणे करू शकलेले नाही. इतके लिहून देखील मनात हेच येत आहे, लताबाईंची गाणे दशांगुळे वर उरले आहे. माझी रसिकताच तोकडी पडली आहे.

No comments:

Post a Comment