Wednesday 15 March 2023

ये दिल और उनकी निगाहो के साये!!

"अशीच आलीस निळ्या नभांतून पांघरुनी स्वप्नांचा शेला!! आणिक मजला तव नयनांतुन नव्या जागांचा प्रत्यय आला." कविवर्य विं.दा. करंदीकरांच्या "मृदगंध" कविता संग्रहातील या ओळी. प्रणयोत्सुक मानसिकतेचे सुरेख दर्शन या ओळींतून आपल्याला भावते. वास्तविक विं. दा. करंदीकर हे प्रणयोत्सुक कवी म्हणून फारसे कुणाला ज्ञात नाहीत पण म्हणून अशा कवीची थोडी वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न. आजचे गाणे "ये दिल और उनकी निगाहो के साये" हे देखील अशाच एका ओढाळ मनस्थितीचे आहे. चित्रपटातील नायिकेला प्रेमाची ओळख पटते आणि त्या धुंदीत वावरताना, अशी ओळ गुणगुणायला लागते. काही गाणी ही सतत तुमच्याशी "संवाद" साधण्याचा प्रयत्न करीत असतात, आपणच, एकतर त्या संवादाची भाषा समजून घ्यायला तयार नसतो किंवा दुर्लक्ष करीत असतो. वास्तविक गाण्यातील शब्दांची भाषा काय किंवा सुरांची भाषा काय, माणसानेच निर्माण केलेली परंतु आपण बरेचवेळा तिकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो. सुरांची भाषा ही अतिशय तरल आणि अमूर्त असते, त्यामुळे त्या भाषेशी संवाद साधायचा झाल्यास, आपल्यालाही तशीच मनोभूमी तयार करणे आवश्यक असते. "ये दिल और उनकी निगाहो के साये" हे गाणे अशाच प्रतीचे आहे, अप्रतिम कविता, तितकीच बेजोड चाल, त्यालाच साजेसा वाद्यमेळ आणि या सर्वांचा शर्कारावगुंठीत गायकी आविष्कार!! चाल स्पष्टपणे "पहाडी" रागावर आहे पण तरीही वेगळी आहे!! कशी? सुरवातीलाच जे वाद्यमेळाचे संगीत आहे, त्यातून पहाडी रागाचे सूर प्रतीत होत असले तरी जो प्रचलित पहाडी राग आहे, त्यापासून थोडे वेगळे आहेत आणि ही संगीतकार म्हणून जयदेव यांची खासियत. चित्रपट किंवा एकूणच सुगम संगीतात, संगीतकाराचे जे महत्व अधोरेखित होते, त्यात वाद्यमेळाची रचना नेहमीच ,महत्वाची गणली जाते. आपल्याकडे, या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. या गाण्याच्या सुरवातीला बासरी आणि संतूरच्या सुरांचा जो अद्भुत मेळ घातला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. जवळपास दीड मिनिटांचा मेळ आहे पण प्रत्येक सूर आणि त्याची पुढील स्वराशी घातलेली सांगड आणि त्याला दिलेली तालाची जोड, इथेच गाण्याची "बैठक" पक्की होते. बासरी आणि संतूर, ही जयदेवची खास आवडीची वाद्ये!! बासरीचे सूर तर त्यांनी इतक्या गाण्यात ज्या खुमारीने वापरले आहेत, त्याला तोड नाही. वास्तविक, हिंदी चित्रपट संगीतात बासरी काही नवीन नाही पण, जयदेवच्या रचनेत, बासरीचे :वजन" नेहमीच वेगळे असते जशी मदन मोहनच्या संगीतात सतार!! पहाडी रागातील "गधार", "पंचम" आणि "धैवत" स्वरांची जी जोड आहे, त्याचाच आविष्कार या पहिल्या स्वररचनेत आविष्कृत होतो आणि तुम्ही या गाण्यात गुंगून जाता. तसे बघितले तर पहाडी राग हा लोकसंगीताशी फार जवळचे नाते राखणारा राग, त्यामुळे इथे स्वराविष्काराला भरपूर वाव. काही कलाकार तर, "मध्यम" स्वराला "षडज" मानून रागाची बढत करतात!! गाण्याचे सुरवातीचे शब्द देखील, याच रागाशी साद्धर्म्य राखतात. आता आपण मुखड्याची ओळ स्वरलेखनासाठी घेऊया ये दिल और उनकी नि गा हो के सा ये प प मम गम म ग सा नि सा पप या पहिल्याच चरणात, चालीचे "गायकी" अंग स्पष्ट होते. जयदेव यांची कुठलीच चाल कधीही सरळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पहिल्या ओळीतील "उनकी" या शब्दावरील मुरकी, कशी अवघड आहे!! "उन" ही अक्षरे चालू असलेल्या सुरावटीत येतात पण "की" शब्द मात्र क्षणात वरच्या पट्टीत जातो, इतका की ऐकताना चकित व्हावे आणि गाणे अवघड लयीत शिरावे!! बरे तिथे स्वराचा "ठेहराव" क्षणमात्र असून, पुढे "निगाहो" शब्दावर शब्दावर लय विसावते!! हा सांगीतिक प्रकार, फार,फार अवघड आहे!! सुरवातीला श्रवणीय वाटणारी चाल, एका क्षणात चालीचे स्वरूप पालटते आणि वेगळ्याच लयीचे दर्शन घडवते!! इथे जयदेवची कुशाग्रता आणि लताबाईंची गायकी दिसून येते. पुढील ओळीत अशीच सांगीतिक गुंतागुंतीची रचना आहे. "मुझे घेर लेते है ये बाहो के साये"!! जरा बारकाईने बघितले असे दिसेल, पहिल्या ओळीतील अक्षर संख्या आणि दुसऱ्या ओळीतील अक्षर संख्या, यात तफावत आहे आणि लयीच्या दृष्टीने अशी तफावत योग्य असत नाही आणि इथेच जयदेवची खासियत दिसते. त्याने काय केले बघा, "मुझे" नंतर "घेर" शब्द सुरांत बांधताना, त्याला हलक्या अशा हरकतीची जोड दिली आहे आणि ते देखील आशय अधिक अर्थपूर्ण होईल, या दृष्टीने दिली आहे. म्हणजे बघा, शब्दसंख्या अनघड झाली तरी लय कुठेच अडखळत नाही!! सगळ्या गाण्यात, वाद्ये फारशी नाहीतच आणि जयदेवने काही अपवाद गाणी वगळता, कधीच गाण्यात भरमसाट वाद्यांचा वापर केलाच नाही. मोजकी वाद्ये घ्यायची पण त्या वाद्यांचा गुणधर्म ओळखून, त्यातून वेचक सुरांची निर्मिती करून, आवश्यक तो परिणाम साधायचा!! खरेतर, लताबाईंचा आवाज, हा देखील त्या वाद्यमेळात असा काही जमून जातो की तिथे आणखी कुठलेही वाद्य उपरे वाटावे. "पहाडो को चंचल किरण चुमती है, हवा हर नदी का बदन चुमती है, यहा से वहा तक, है चाहो के साये" इथे प्रत्येक ओळीतील खटके ऐकण्यासारखे आहेत. गायिकेला शब्दांचे नेमकी जाण असेल तर प्रत्येक शब्द सुरांतून उच्चारताना, त्याचा आशय आणि वजन, याचा नेमका "तोल" साधून गायला गेला की तेच शब्द आणि तीच चाल, एका वेगळ्या झळाळीने झगमगते!! "हवा हर नदी का बदन चुमती है" मध्ये, "हर" या शब्दावर दिलेला "हलकासा" जोर आणि त्यामुळे हेलकावणारी लय, प्रणयी विभ्रम, सुरांतून कसे व्यक्त करावेत, याचा, ही गायकी म्हणजे उत्तम नमुना ठरावा!! किंवा, पहिल्याच ओळीचा शेवट करताना, जो "है" शब्द आहे, तो कसा येतो, "चुमती" मधील "ती" शब्द वरच्या पट्टीत जातो पण "है" मात्र मुलाच्या लयीत अवतरतो!! कमाल आहे, गायिकेची आणि संगीतकाराची!! "लिपटते है पेडो के बादल घनेरॆ, ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे, बहोत ठंडे ठंडे, है राहो के साये" इथे, पहिल्याच ओळीत चाल वरच्या पट्टीत गेली आहे आणि कशी गेली आहे, बघा!! "लिपटते" पासून लय हळूहळू वरच्या पट्टीत जाते आणि "घनेरे" इथे ती लय संपते. संपूर्ण ओळ वरच्या सप्तकात जाते पण लगेच " ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे" ही ओळ सुरवातीच्या लयीत अवतरते. अवघड लय आणि ती गळ्यावर कशी पेलायची, इथे लयीतील प्रत्येक "क्षण" टिपून घ्यावा!! वास्तविक इथे स्वर, शब्दांवर गारुड घालू शकले असते पण तरीही स्वरयोजना अशी आहे, की शब्द कुठेही स्वरांखाली गुदमरत नाहीत तर शब्दात दडलेला आशय अधिक मोकळा करते!! "धडकते है दिल कितनी आजादीयो से, बहोत मिलते जुलते है इन वादियो से, मोहब्बत की रंगीन पनाहो के साये" या असामान्य गाण्याची शब्दरचना सुप्रसिद्ध शायर जान निसार अख्तर (जावेद अख्तरचे वडील) यांची आहे. वास्तविक हा शायर रूढार्थाने चित्रपटात गीते लिहिणाऱ्या कवींच्या पंक्तीत कधीच बसला नाही. या शायरची चित्रपटीय कारकीर्द बघायला गेल्यास,बहुदा हाताची बोटे देखील अधिक भरतील परंतु जेंव्हा केंव्हा संधी मिळाली, तेंच या कवीने आपला "वेगळा" दर्जा दाखवून दिला. या शब्दकळेतील खास निसर्गचित्रे अनुभवण्यासारखी आहेत. "लिपटते है पेडो के बादल घनेरॆ" अशा सारखी रम्य ओळ, चित्रपट गीतांत फार अभावानेच वाचायला मिळते. अगदी उदाहरण घ्यायचे झाल्यास, साहिरच्या काही कवितेत अशा प्रकारच्या ओळी वाचायला मिळतात.खरंतर इथे हे एक सुंदर भावकाव्य म्हणून आपल्याला प्रतीत होते आणि त्यामुळे हे गाणे आपल्याला अधिक जवळचे वाटायला लागते. चित्रपट गीतांतील कविता वाचावी का? वाचल्यावर अनुभवावी का? असा प्रश्न बरेचवेळा विचारला जातो, एक नक्की, गाणे म्हटल्यावर त्यातील सूर हा घटक नेहमीच प्रबळ ठरतो आणि त्याचे गारुड दीर्घकाळ टिकणारे असते. त्यामुळे बहुतेक सगळ्याच गाण्यात "शब्द" घटक नेहमीच एकतर दुर्लक्षिला तरी जातो किंवा बाजूला सारला जातो. यापुढे आपल्याला असे म्हणता येईल, जर का शब्द नसतील तर आकारास येणारा आविष्कार, गाणे यासाठी पात्र ठरेल का? वेगळ्या शब्दात, त्याला मग धून म्हणणे भाग पडेल. म्हणजे शब्दांविना गाणे सर्वस्वी अशक्य. असे असताना, "शब्द" हा घटक आवर्जूनपणे दखल घेणाराच ठरतो. गाण्याचा योग्य आस्वाद घेण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी, गाण्यातील शब्दकळा ही नेहमीच प्रभावी, अर्थपूर्ण आणि सघन असावीच लागते. बरेच रचनाकार "आधी शब्द, मग चाल" या पंथाचे आणि त्यानुसार चाल निर्मिणारे असतात, तेंव्हा त्यावेळी त्यांच्या डोक्यात हाच एकमेव विचार घोळत असतो. अर्थात हा काही नियम किंवा निकष म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. विशेषतः चित्रपट गीत प्रक्रियेत उलट्या प्रकारे देखील सुंदर गीत जन्माला येण्याची भरपूर उदाहरणे सापडतात. असे देखील, गीतातील प्रक्रियेत शब्दाचे महत्व हे नेहमीच अधोरेखित केले जाते. त्यादृष्टीने इथे शब्द कसे निसर्गातील प्रतिमा घेऊनच अवतरले आहेत आणि त्याच निसर्गात दडलेली चाल, संगीतकाराने, कवितेला "अर्पिलेली" आहे. इथे आणखी बारकाईने ऐकले तर कळेल, प्रत्येक कडव्याची सुरवात वेगळ्या सुरांवर होते पण शेवट मात्र, पहिल्या ध्रुवपदाच्या सांगीतिक रचनेशी नाते जोडत असतो. संगीतातील अवघड तरीही मनात रुंजी घालणारी व्यामिश्रता, ही अशी!! इथे प्रत्येक सूर, त्याला जोडलेली मात्रा याचे नाते नेमकेपणी समजून घ्यावे. रचनेत कुठेच "रेंगाळलेपण" नाही, किंबहुना जी नायिकेची प्रणयी आतुरता आहे, त्या भावनेचे स्फटीकीकरण सुरांतून मांडलेले आहे. लयीचे इतके विभ्रम ऐकायला मिळतात की मनाला संभ्रमावस्था यावी आणि तशी येते!! रचनेतील कुठला स्वर न्याहाळावा, याचाच संभ्रम पडावा!! अतिशय स्वच्छ गायकी तरीही कुठेही अकारण स्पष्टता नाही!! ऐकताना, चाल, मनाला वेढून टाकते आणि आपण हे गाणे सहज गाऊ शकतो, असे आव्हान करते पण जेंव्हा गाणे गायला घेतले जाते तेंव्हा आपले आपल्याच कळून चुकते, इथे फक्त लताबाईंचाच गळा आवश्यक आहे आणि आपल्या हातात, जयदेव आणि लताबाई, यांच्यासमोर नतमस्तक होण्यापलीकडे काहीही रहात नाही!! @अनिल गोविलकर Ye Dil Aur Unaki, Nigaahon Ke Saaye ..... Original Track - Lata Mangeshkar - Prem Parbat (1973) - YouTube

No comments:

Post a Comment